किमी,
हेल्लो मॅडम, काय झालं? नो रिप्लाय. मेल वाचलास की नाही? की आता काय उत्तर देणार म्हणून शांत? मला हे मान्य आहे की मी इतके व्हॅलिड मुद्दे मांडलेले असताना तुला काउन्टर करणं डिफिकल्ट आहे. तू माझा आधीचा इमेलही नीट न वाचता मला ‘आम आदमी पार्टी’चा प्रचारक म्हणून डिक्लेअर करणं चुकलं तुझं, पण म्हणून उत्तरच द्यायचं नाही, धिस इज नॉट फेअर. ये भी क्या कोई बात हुई! आता यासाठी तुला फाइन झालाच पाहिजे. और वो फाइन होगा- यू हॅव टू गिव्ह मी टू एक्लीअर्स. डन?
एनीवेज, काल काय झालं, अगं मी बसस्टॉपवरून निघालो अन् अचानक पाऊस सुरू झाला. आता खरं म्हणजे हा काही रेनी सीझन नाही; पण पाऊस सुरू झाला. आपल्या अभिजात मराठीत त्याला वळवाचा पाऊस म्हणतात. तर पाऊस सुरू झाला आणि मग माझ्यासह अनेकजण बसस्टॉपला आले. तिथं पाऊस लागत नव्हता. बाजूला एक मुलगी होती. तिच्यासोबत एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा होता. सगळे जण आडोशाला थांबले, पण हा मुलगा तो पुन्हा पावसात जायचा आणि ती मुलगी त्याला ओरडायची. आतमध्ये ओढायची. सर्दी होईल. खोकला होईल ब्ला ब्ला. पण तो तिच्या पकडीतून निसटलाच आणि पुढं जाऊन रस्त्यावर नाचू लागला. मस्त पाऊस होता. त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटलं की आपण का आडोशाला थांबलो आहोत? कशासाठी आपण आडोसा शोधत होतो? सर्दी खोकला होऊ नये म्हणून की हातातली फाइल भिजू नये म्हणून की खिशातलं पैशाचं पाकीट भिजू नये म्हणून? आपल्याला पावसात मनसोक्त भिजता का येत नाही? आपली पावलं अशी खिळलेली का आहेत? कुणीतरी बांधून ठेवल्यासारखं का जगत आहोत? त्या छोटय़ा मुलानं मला इतकं विचारात पाडलं की बस्स. मी बाकावर फाइल ठेवली आणि तसाच पावसात गेलो त्या मुलाजवळ. तो तर जोरदार नाचत होता. अ‍ॅण्ड कॅन यू इमॅजिन मी रस्त्यावर नाचू लागलो त्याच्यासोबत. बसस्टॉपवरची माणसं माझ्याकडं आश्चर्याने पाहू लागली. गम्मत बघ, तो छोटा नाचत होता तर त्यात काही आश्चर्य नाही; पण मी नाचायला लागलो की मग मात्र लगेच काही तर चुकीचं किंवा विपरीत असल्यासारखं लोक माझ्याकडं बघू लागले. लहान मुलाला जितकं स्वातंत्र्य तितकं आपल्याला नाहीच. वयासोबत स्वातंत्र्य कमी होतं जात का? किंवा आपणच आपल्या स्वातंत्र्यावर लिमिटेशन आणतो का आपल्याला ते पेलवत नाही म्हणून? हे असलं माझ्या डोक्यात सुरू होतं. तो छोटय़ा तर गाणं म्हणायला लागला- रेन रेन कम अगेन. मी विसरलोच होतो ते गाणं. पावसावरची किती गाणी आहेत ना. पावसाच्या म्युझिकमध्येच इतक्या टोन, इतकी लिरिक्स इन बिल्ट आहेत की प्रत्येकाला कॅलिडिओस्कोपमध्ये वेगवेगळ्या एन्गल्समधून पाहिल्यानंतर जसं वेगळं दिसतं तसं प्रत्येकाला वेगळीच पावसाची टोन सापडते. वेगळंच गाणं सापडतं. म्हणजे तो छोटय़ा रेन रेन कम अगेन म्हणत होता आणि मला त्या कवितेच्या ओळी आठवत होत्या-
ही व्यथांची वेधशाळा
हा नभीचा मेघ काळा
आसमंता ऐक माझे
मी उद्याचा पावसाळा!
किती मस्त ओळी आहेत ना या. मला अजून आठवत नाहीए कवीचं नाव. बाय द वे तू ‘बिफोर द रेन्स’ पाहिला आहेस का? काय दिसलीय त्यात नंदिता दास! (बाय द वे नंदितानं पण तुझ्या मोदींच्या विरोधात स्टान्स घेतला आहे बरं. कोणतीही शहाणी व्यक्ती असाच स्टान्स घेणार) शी इज ऑसम! आय लव्ह नंदिता! तू तिचा ‘फिराक’ पाहिला आहेस का? तो तिनं डायरेक्ट केला आहे सिनेमा. गुजरात दंगलींनंतर सगळ्याच धर्मातल्या लोकांची किती फरफट झाली हे तिनं खूप चांगलं दाखवलंय. मस्ट वॉच. तिनं मध्ये ‘डार्क इज ब्युटीफुल’ नावाचं कॅम्पेनही सुरू केलं होतं बघ. आपल्याकडं गोरं दिसणं म्हणजे ब्युटी अशी एक रॉन्ग नोशन आहे त्याच्या विरोधात केलं होतं तिनं ते. तर कमिंग बॅक टू पाऊस असा मस्त भिजलो काल की बस्स. थोडय़ा वेळानं बस आली. तो छोटय़ा त्या मुलीसोबत गेला, पण मला मात्र त्यानं ओलचिंब करून टाकलं. अर्थात त्याचा आज परिणाम दिसतो आहेच. सटासट शिंका येत आहेत, पण पावसात भिजलो नसतो तर क्या मजा?
बेवक्त बारिश का
मजा ही कुछ और हैं !
तुला हा ओलावा कितपत सेन्ड होईल माहीत नाही. असो. आता तरी रिप्लाय कर. तुझको माफ किया आपुनने.
विकी

Story img Loader