तुम्हाला आश्चर्य वाटले ना? अहो, पण मी आहेच तशी, प्रत्येक घरात ललनांची प्रिय सखी, रावांपासून रंकापर्यंत, घराघरांत देशविदेशच्या सीमा ओलांडून सहजपणे विनापारपत्र वावर करू शकणारी मी तुमची सखी.
बिहार किंवा परप्रांतातून, अमेरिका, पाकिस्तानमधून येऊन मी जरी महाराष्ट्रात स्थिरावले तरी कोणत्याही पुढाऱ्याला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटलं नाही. अशा पुढाऱ्यांच्या घरातही मला मानाचे स्थान असते.
जातिपातीचा, रंगभेदाचा विचार न करता मी कोठेही गुण्यागोविंदाने नांदते, अगदी लहान आकारापासून भल्या मोठय़ा आकाराची मी असते, सोप्यापासून वळचणीपर्यंत कोठेही मला ठेवले तरी मी आनंदात असते.
आता जास्त संशयात न ठेवता सांगते- अहो, मी म्हणजे तुमची आवडती प्लॅस्टिकची कॅरी बॅग, आता आले ना लक्षात?
बारशाच्या सामानापासून अगदी अंत्ययात्रेच्या सामान नेण्यापर्यंत मी उपयोगी पडते. शेजारून उसने मागून आणण्यास आता भांडे लपवून नेण्याची गरज नसते, मी सदैव तयार असते. माझ्यामुळे बऱ्याच वस्तूंची, दुकानांची जाहिरात होते. माझ्यामुळे पदार्थ ओले होण्यापासून, खराब होण्यापासून वाचतात. पावसात भिजणाऱ्या डोक्याला माझ्यामुळे संरक्षण मिळते.
गरम, थंड, पातळ, घट्ट, चिवट, कुरकुरीत काहीही माझ्यात ठेवले तरी मी कुरकुर करत नाही. कुरडय़ा, सांडगे, पापड वाळवण्यास, गरम वडय़ा थापण्यास मी कामी येते. हातातल्या घट्ट बांगडय़ा काढण्यात माझा हातखंडा आहे.
मिठाई आणण्यापासून कचरा टाकण्यापर्यंत मी कामी येते. बस लागून उलटी होणाऱ्यास माझा आधार असतो. उकिरडय़ात टाकले तरी मी स्थितप्रज्ञ, आनंदी असते.
चांगल्या-वाईट गोष्टी मी सहज सामावून घेते. मी नेहमी समाधानी असते. मी दुसऱ्यांच्या उपयोगी पडते म्हणून खूप समाधानी असले तरी एवढे सर्व असूनदेखील मी अल्पमोली असल्याने अगदी गरीबदेखील माझा वापर करू शकतात. वजनाने हलकी, सहज दुमडता येणारी असल्याने मी कोठेही सामावू शकते. माझ्यात कोणती वस्तू भरली जात आहे याची मी कधीच काळजी करत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मी आ वासून सज्ज असते.
मी अविनाशी असल्याने माझ्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. मी खराब झाले तर मला वितळवून माझे निर्माण केले जाते. माझ्यात असलेल्या घटकातून टोपीपासून पायताणापर्यंत सर्व वस्तू तयार करण्यात येतात, त्याने लोकांना काम मिळते.
मी अविनाशी आत्म्याप्रमाणे मुक्त संचार करू शकते, हवेत उडू शकते, पाण्यात, बर्फात राहू शकते, जमिनीत पुरले तरी मी जिवंत असते. अशी ही अविनाशी सखी तुमच्याही घरात आहेच की.

Story img Loader