तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात टाळेबंदी सुरू झाली. २१ दिवस मस्त घरी राहायचं, अनेक र्वष न मिळालेला आराम करायचा, कुटुंबात वेळ घालवायचा असा माझा प्लान होता. सुरुवातीला मज्जा आली. कधी मित्रमैत्रिणींना व्हिडीओ कॉल करण्यात वेळ घालव, तर कधी गेम खेळण्यात; पण नंतर रुग्णांचा आकडा वाढू लागला आणि टाळेबंदीचा एक टप्पा संपेपर्यंत पुढच्या टप्प्याची घोषणा झाली. घरात अडकून पडल्याची भावना बळावू लागली. अशा वेळी मन कशात तरी गुंतवलं तर बरं वाटतं, म्हणून अनेक गोष्टी करून पाहिल्या. चित्रं काढणं, पुस्तकं वाचणं अशा गोष्टींमधून फक्त क्षणिक सुख मिळत होतं. आई-वडील दोघेही अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असल्यामुळे ते रोज ऑफिसला जातात. छोटय़ा भावाला कॉलेजचा अभ्यास आहे. अशा वेळी माझं मानसिक आरोग्य मलाच सांभाळायचं होतं. या काळात मला साथ दिली माझ्या झाडांनी!

सुदैवाने घरी बऱ्यापैकी मोठी बाल्कनी आहे. त्यात मी अनेक वर्षांपासून झाडं लावली आहेत; पण रोजच्या धावपळीत त्यांच्याकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. आता खूप मोकळा वेळ असल्यामुळे मी माझा मोर्चा त्यांच्याकडे वळवला. माझ्या बाल्कनीमध्ये लहान-मोठय़ा जवळपास ३० कुंडय़ा आहेत. एप्रिलच्या कडक उन्हात त्यातली अनेक झाडं मरणाच्या उंबरठय़ावर होती. त्यांना नीट खतपाणी दिलं. दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन मागवलेल्या बिया पेरायच्या ठरवल्या. थोडी माती, लॉकडाऊनच्या आधी जत्रेतून आणलेलं खत, छोटय़ा कुंडय़ा सगळं घेऊन शुभारंभ केला. बी पेरल्यापासून रोज सकाळी उठले, की मी त्या कुंडय़ा बघायला जायचे. रोज त्यांच्या जवळ बसून निरीक्षण करायचे. त्यात माझं मन चांगलंच रमलं. मातीत पेरलेल्या बियांमधून काहींनी आपल्यावरचं आवरण दूर करून, माती बाजूला सारत वर मान काढली. या जागेत हजेरी लावली; पण काहींनी मातीतून डोकावयीचीही तसदी घेतली नाही. या छोटय़ाशा नैसर्गिक घटनेतून मी खूप काही शिकले. आपण ठरवलं तर कोणत्याही संकटाला मागे टाकून उभे राहू शकतो आणि आपली इच्छा नसेल, मेहनत करायची तयारी नसेल, तर काहीही करू शकत नाही. ते बाहेर आलेले कोंब हळूहळू मोठे होऊ लागले. हळूहळू सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करत त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. काहींनी थोडं मोठं झाल्यावर माना टाकल्या. त्यांना जगवण्यासाठी अनेक व्हिडीओ, लेख वाचून मी प्रयत्न केले; परंतु जसं आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात तसंच झाडांसाठी लागणारं योग्य तापमान, ऊर्जा, कीटक आपल्या हाती नसतात. जगण्याची उमेद असेल तर आपण कितीही संकटं आली तरी हार न मानता, त्यावर मात करत जगू शकतो हे मला काही रोपांनी शिकवलं. या झाडांकडून मी टीमवर्क आणि आपल्या माणसांची साथ किती गरजेची असते हे शिकले. कधी तुम्ही घरी मेथी, कोथिंबीर किंवा पालक अशा पालेभाज्या लावायचा प्रयत्न करा. त्यांच्या बिया जर तुम्ही जवळजवळ पेरल्या नाहीत, तर त्यांना एकमेकांचा आधार मिळत नाही. एकमेकांचा आधार न मिळाल्यामुळे ती झाडं मोठी होत नाहीत, टिकत नाहीत. याचा अर्थ आपल्याला आयुष्यात जगायलाही एकमेकांची गरज असते. अनेक कामं करायला टीमवर्कची आवश्यकता असतेच.

या नव्याने जन्माला येणाऱ्या झाडांबरोबरच माझी जुनी झाडंही होती. त्यांचं निरीक्षण करून, इंटरनेटवर दिवसरात्र व्हिडीओ बघून, वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर करून मी त्यांना अधिक निरोगी आणि सुंदर आयुष्य देण्याचा प्रयत्न करू लागले. पावसाळ्याच्या तोंडावर काहींची छाटणी केली आणि आपण जसा लूक चेंज करतो तसा त्यांचा मेकओव्हर केला. त्यांनीही सुंदर, नवीन फांद्यासह माझ्या कामाची पावती दिली. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कधी तरी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जगायला सुरुवात करावी लागते. त्या वेळी जर मनापासून ठरवलं तर आपण आपल्याला हवी ती गोष्ट नक्की साध्य करू शकतो. नव्या गोष्टीतही कम्फर्ट निर्माण करू शकतो, हे झाडं दाखवून देतात. छोटय़ा कुंडीत लावलेली झाडं जास्त मोठी झाली की त्यांची कुंडी बदलावी लागते. नवीन कुंडीत गेल्यावर झाडं सुरुवातीला माना टाकतात, त्यांची पानं गळतात; परंतु पुन्हा नव्या उत्साहाने नवीन जागी एकरूप होऊन मोठी होतात. झाडाला लागलेल्या प्रत्येक फुलाचं फळ होतं असं नाही. याचाच अर्थ आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही.

तुम्ही तुमच्या झाडांशी बोलू शकता आणि ती तुम्हाला प्रतिसादही देतात. मी सकाळी ध्यानधारणेसाठी झाडांजवळच बसते. नंतर त्यांच्याशी गप्पा मारते. तुम्ही रोज त्यांच्याशी एकदा जरी बोललात, कसे आहात, असं विचारलंत, तरी त्यांना आनंद होतो. कधी चुकून तुमच्याकडून झाडाची नासधूस झाली तर त्याला सॉरी म्हणायला विसरू नका. ज्याच्याकडे झाडांची वाढ होत नाही त्यांनी तर नक्कीच झाडांशी गप्पा मारा. आपण जसं वीकेंड मस्त गाणी लावून नाचून साजरा करतो तसं झाडांनाही आवडतं. मी माझ्या झाडांना सुंदर सुंदर संगीत आठवडय़ातून एकदा तरी ऐकवते आणि तीसुद्धा संगीताच्या तालावर छान डुलतात. मी माझ्या कुंडीमध्ये भाजी लावण्याचा प्रयत्न केला, ज्यात अनेक प्रयोग फसले तर अनेक  यशस्वीही झाले. आपण लावलेल्या झाडांना मोठं होताना पाहणं, फुलाचं फळ होताना पाहणं या गोष्टी शब्दांत मांडण्यापलीकडच्या आहेत.

हा सगळा पसारा सांगण्यामागे कारण असं, की मी या टाळेबंदीच्या काळात माझे हरवलेले मित्र, माझी झाडं यांना पुन्हा नव्याने भेटले. झाडं हा आमच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. या झाडांमुळेच टाळेबंदीतही माझ्या अनेकांशी नव्याने ओळखी झाल्या. फेसबुक, यूटय़ूब, टेलिग्राम, इन्स्टाग्राम अशा अनेक डिजिटल मंचांवर माझ्यासारखे अनेक झाडंवेडे मला भेटले. कोणताही मोबदला न घेता आपल्याकडे जे आहे ते देण्याची शिकवणसुद्धा या झाडांनी मला दिली. एखादी फांदी दुसऱ्याला दिली तर त्याच्याकडे त्याचं मोठं झाड होतं. या ग्रुप्सच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या झाडांचे कटिंग, बिया, माहिती यांची देवाणघेवाण चालते. मी बागकामाच्या अनुभवांचे धडे बागकाम आवडणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनाही दिले. तुम्ही काही न करता फक्त झाडांकडे रोज बघितलं तरी शांत वाटतं. माझ्या या ग्रीन थेरपीने माझ्यातली घरात अडकून पडल्याची भावना बरीच दूर झाली. तुम्हीही स्वत:ला ही थेरपी देऊन पाहा. तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल आणि वागण्यात सकारात्मक बदल सहज दिसून येतील. शेवटी माझ्या या हिरव्या दोस्तांना आणि तुम्हा सर्वाना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends of nature friendship day dd70