मैत्री म्हटले की त्यात वय, जात, रूप, शिक्षण, आर्थिक स्थिती, उद्योगधंदे हे निकष कळत-नकळत लागतच असतात. अशा प्रकारे मैत्री ही चाकोरीतील असते. आता कुटुंबाचे सदस्य कमी असल्याने कुत्र्या-मांजरांची मैत्रीसुद्धा चाकोरीतच आली आहे. माझी मैत्री मात्र चाकोरीबाहेरील होती आणि आहे. घरात, शेतात काम करणारे कामगार, दारात दिवाळीच्या सुमारास येणारी नंदीवाली या लोकांशी माझी मैत्री होती. मी आठ वर्षांची असताना माझी नंदीवाल्या बाईशी मैत्री झाली. ती मैत्री माझी मुलगी आठ वर्षांची होईपर्यंत होती. त्यानंतर माझी अखेरची भेट घेऊन तिचे निधन झाले.
दुपारी अडीचच्या सुमारास घरकामे करून क्लास घेऊन मी दमले होते म्हणून दिवाणावर पडले. इतक्यात दारावरची बेल वाजली. मी जरा नाखुशीनेच दार उघडले. दारात भांडी विकणारी बाई उभी होती. तिला टाळण्यासाठी मी म्हटले, ‘बाई, मला भांडी नाही घ्यायची हो.’ त्यावर ती म्हणाली, ‘ताई, मला पाणी द्या हो’ मी तिला पाणी दिले. तिला पाहून माझ्या लक्षात आले की, ती अत्यंत दमलेली आहे. तिच्या अंगावर भाजलेल्याच्या खुणा आहेत. मी तिला विचारले, ‘बाई, फार त्रासलेली दिसतेस गं’. त्यावर तिला रडूच कोसळले.
ती तिची हकिगत सांगू लागली. मी पुढचे क्लास, काम सगळे विसरून तिची हकिगत ऐकत बसले. ती तळजाई झोडपट्टीत राहते. ती बारा वर्षांची असताना तिचे चाळीस वर्षांच्या दमेकरी म्हाताऱ्याशी लग्न झाले. पैसे मिळवून आणणे, घर सांभाळणे हे सगळे तिलाच करावे लागे. अधूनमधून मारही खावा लागे. यथावकाश ती दोन मुलग्यांची आई झाली. तिचा थोरला मुलगा सोळा वर्षांचा आणि धाकटा बारा वर्षांचा होता. बाईच्या मोठय़ा मुलाने दोन दिवसांपूर्वीच खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वस्तीतील एका मुलीवर त्याचे प्रेम होते. घरच्यांनी विरोध केला म्हणून त्या दोघांनी- मुलीने व मुलाने आत्महत्या केली. त्या दु:खाने भांडीवाल्या बाईने पेटवून घेतले. आजूबाजूच्या मंडळींनी तिला वाचविले. काल भाजली आणि तीच बाई आज भांडी विकायला आली. बाईची जिद्द आणि संसाराची आवड चिकाटी असते असेच म्हणावे वाटते.
मी तिला जेऊ-खाऊ घालून समजूत घालून घरी पाठविले. जाताना तिने एक इच्छा व्यक्त केली. ‘ताई, तुम्ही माझ्या धाकटय़ा मुलाला इंग्लिश शिकवा.’ मी ते मान्य केले. त्या आनंदातच ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी तिच्या बारा वर्षांच्या मुलाला हाकलत हाकलत घेऊन आली. मला त्याला शिकवून तिला मदत करण्याची इच्छा होती. पण तिच्या मुलाला शिकायचे नव्हते. ती महिन्यातून एकदा तरी माझ्याकडे येत असे. आपली हकिगत सांगत असे. हळूहळू तिची-माझी मैत्री वाढली. तिचा-माझा भांडी खरेदी-विक्रीचा व्यवहार पाहणारांना वाटे, बाई किती देतात आणि थोडेसेच घेतात. पण त्यांना कल्पना नसे की मी खूप काही मिळविले आहे. घरात बसून तळजाई झोपडपट्टीचा अभ्यास केला आहे. एका कष्टकरी महिलेचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा मुलगा माझ्याजवळ शिकला असता तर मला मोठेच समाधान मिळाले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा