भारत-पाकिस्तानातील कलावंतांचं नातंच अजब आहे. आपापसात तीव्र स्पर्धा आणि चढाओढ असूनही एकमेकांच्या कलेबद्दलचं अनिवार आकर्षण ‘उचलेगिरी’सारख्या गरप्रवृत्तीकडे आकृष्ट करीत असावं. वादग्रस्त प्रसंग उद्भवले की त्यांच्यात निर्माण होणारी तेढ अळवाच्या पानावरील दविबदूसारखी अल्पकालीन असते. कलेच्या प्रांगणातलं शत्रुत्व कालौघात विरून आणि विसरून जातं.. त्यामुळे आपणही या प्रकारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीनं पाहायचं.

महेश कौल दिग्दíशत ‘जीवन-ज्योती’ (१९५३) या चित्रपटात, संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी साहिर लुधियानवीच्या तरल व हळव्या संवेदनांना लता मंगेशकरांच्या भावोत्कट स्वरात गुंफून एक नितांतसुंदर अंगाई स्वरबद्ध केली होती. चित्रपटात अभिनेत्री चांद उस्मानीवर ती चित्रित करण्यात आली होती. आपल्या तान्हुल्याला जोजवताना अंगाई गातानाचा सीन चाँदने आपल्या लोभस अदाकारीने साजिवंत केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थानं या गाण्याला शब्द, सूर, स्वर आणि अभिनयाचे ‘चार चाँद’ लागले होते; असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.. या अंगाई गीताचे बोल होते.
सोजा रे सोजा ऽऽ
सोजा रे सोजा मेरे अंखियों के तारे, मेरे राजदुलारे,
राजदुलारे, ओ तोहे सपनों कि
नगरी से िनदिया पुकारे
सोजा रे सोजाऽऽ
परियों के बालक तारों के भेस में,
तुझको बुलाने आये चंदा के देस में
चंदा के देस में, सपनों का राज है ।
मेरे मुन्ने के लिए फूलों का ताज है
राजदुलारेऽ, ओ तोहे सपनों कि नगरी से िनदिया पुकारे
सोजा रे सोजाऽऽ
लताने गायलेल्या या अवीट गोडीच्या अंगाईचा काही भाग चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये गीता दत्तने ठाय लयीत गायला होता. मात्र रुपेरी पडद्यावर लोकांना भावलेलं हे गाणं रेडिओ आणि ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या माध्यमातून फारसं लोकप्रिय होऊ शकलं नाही. रेडिओ सिलोनवर अधूनमधून रेकॉर्ड वाजायची; पण हे गाणं शब्दांसकट लोकांच्या मनात कायमस्वरूपी रुजलं नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर जेमतेम वर्षभरातच आशा भोसले यांच्या आवाजात या गाण्याची दुसरी स्वतंत्र ध्वनिमुद्रिका काढण्यात आली होती; तथापि अपेक्षित यश लाभलं नाही. साहजिकच ही सर्वागसुंदर लोरी ‘भूले-बिसरे’ गीत बनून विस्मृतीच्या गत्रेत भिरकावली गेली.

सचिनदांनी गाण्याची अस्ताई तंतोतंत चिश्तींच्या ‘मणूं रब दी सौ..’च्या चालीवर बेतली होती. फक्त अंतऱ्याची चाल तेवढी बदलली होती. गीता दत्तने गायलेलं हे गाणं फारसं लोकप्रिय होऊ शकलं नाही.

जी. ए. ऊर्फ बाबा चिश्ती यांनी १९५५ साली ‘नौकर’साठी याच अंगाईगीताची चाल उचलली होती. पाकिस्तानात व भारतातदेखील ती अफाट लोकप्रिय झाली; परंतु भारतात मात्र मूळ आवृत्तीची उपेक्षा झाली. बाबा चिश्ती कामाची शिस्त व परफेक्शनच्या बाबतीत काटेकोर म्हणून परिचित होते.. त्याचबरोबर ते आपल्या मूल्यांच्या व आदर्शाच्या बाबतीत आग्रही होते. आपल्या तत्त्वांना ते सहसा मुरड घालीत नसत. अशा ज्ञानी व गुणी संगीतकाराला ही उसनवारीची अवदसा का आठवावी? मुळात ती उसनवारी नव्हतीच.. तर चक्क सचिनदेव बर्मन यांच्यावर उगवलेला सूड होता. या सुडाची पाश्र्वभूमीदेखील मोठी रंजक आहे. ती जाणून घेण्याआधी गुलाम अहमद ऊर्फ बाबा चिश्तींचा एकूण कलाप्रवास जाणून घेणं अगत्याचं आहे.
बाबा चिश्तींचा जन्म १९०५ साली जालंधर जिल्ह्य़ातील एका छोटय़ाशा खेडेगावात झाला. आई-वडिलांचं छत्र लहान वयातच हरपल्यामुळे त्यांना नराश्याने ग्रासलं. शालेय जीवनापासूनच ते अध्यात्माकडे वळले. शाळेत, छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून नातख़्वानी (पगंबरांच्या स्तुतीपर रचनांना ‘नात’ असे म्हणतात. तिचं कव्वालीसारखं सामुदायिक गायन म्हणजे नातख़्वानी) करू लागले. नंतर संगीताच्या वेडापायी घर सोडून १९३३ साली लाहोरला आले. काही काळ तिथल्या स्थानिक पाटबंधारे खात्यात त्यांनी खर्डेघाशी केली. त्यावेळी उर्दू रंगभूमीचे जानेमाने दिग्दर्शक, कथालेखक, शायर व संगीतकार आगा हश्र काश्मिरी एका चित्रपटाच्या जुळवणीत व्यग्र आहेत असं त्यांना समजलं. संगीतक्षेत्रात काही काम करायला मिळावं म्हणून चिश्ती आगा हश्र यांना भेटले. रीतसर ऑडिशन झाली. त्यात ते उत्तीर्ण झाले. आगासाहेबांनी महिना पन्नास रुपयांच्या वेतनावर त्यांना आपला साहाय्यक म्हणून नेमलं. चिश्तींची शास्त्रोक्त संगीताची पायाभरणी खऱ्या अर्थाने आगा हश्र काश्मिरी यांच्याकडेच झाली. सुगम संगीत तसेच सिनेसंगीत या विषयांतही त्यांना त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. पुढे आगासाहेबांचं निधन झाल्यानंतर काही काळ चिश्ती कोलंबिया रेकॉìडग कंपनीत संगीत विभागाचं कामकाज पाहू लागले. कंपनीने त्यांच्यावर संगीतकाराची जबाबदारी सोपविली. चिश्तींनी जद्दनबाई व अमीरबाई कर्नाटकींच्या आवाजात स्वरबद्ध केलेल्या काही गरफिल्मी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका कंपनीने बाजारात आणल्या. या ध्वनिमुद्रिकांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता.
तीसच्या दशकात १९३६ साली कलकत्त्याच्या मूनलाइट बॅनर्सचा ‘दीन-ओ-दुनिया’ हा चिश्तीसाहेबांनी स्वरसाज चढविलेला पहिला चित्रपट. त्यानंतर १९३८ साली रोशनलाल शोरींच्या (रूप के. शोरी यांचे पितामह) ‘सोहनी महिवाल’ व पंजाबच्या रावी टॉकीजचा ‘पाप की नगरी’ या चित्रपटांना जी.ए. चिश्तींचं संगीत होतं. मात्र हे दोन्ही चित्रपट डब्यात गेल्याने त्याचा फारसा तपशील आज उपलब्ध नाही. चाळीसच्या दशकात त्यांनी सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आर. सी. तलवार यांच्या काही निवडक चित्रपटांना संगीत दिलं होतं. यात ‘परदेशी ढोला’ (१९४१) या पंजाबी चित्रपटाचा समावेश होता. त्यानंतर ‘ख़ामोशी’ (१९४२) या िहदी चित्रपटाला संगीत देऊन बाबा चिश्ती प्रथमच लोकप्रिय संगीतकार बनले.. ‘ख़ामोशी’तील ‘चांदनी है मौसमें- बरसात में आओ डिअर क्या सुहानी रात है..’ (रमोला व सुंदरसिंह), एक शहज़ादी थी बेहद हसीं..’ (रामदुलारी सुंदरसिंह), ‘नयन हमारे बावरे..’ (रामदुलारी), ‘झूला डारे डारपर.. तोडम् जा कर आम..’ (सुंदरसिंह), ‘सरमस्त फिजाएं हैं..’ (रमोला, सुंदरसिंह व रामदुलारी) यासारख्या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. ‘झूला डारे डारपर..’ या गाण्यात ‘चल चमेली बाग में मेवा खिलाऊंगा’ अशी एक ओळ होती. आपल्या तरुणपणी ऐकलेली व आठवणींच्या कप्प्यात वर्षांनुवष्रे जपून ठेवलेली ही ओळ शोमन सुभाष घईने आपल्या ‘क्रोधी’ (१९८१) या चित्रपटात गाण्याच्या स्वरूपात वापरली. सुरेश वाडकर व लता मंगेशकरांनी गायलेलं व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे युगुलगीत खूपच लोकप्रिय झालं होतं.

यूटय़ुबच्या सर्च बॉक्समध्ये Aasifali Pathan या नावाचा सर्च दिल्यास या लेखाशी संबंधित सर्व गाणी ऐकता येतील.

याशिवाय बाबा चिश्ती यांनी ‘मनचली’त (१९४३) स्वरसाज चढविलेली ‘धूप ढलती है हवा चलती है..’ (रमोला आणि कोरस), ‘दर्दे-ग़म उल्फ़त से लबरेज़्‍ा है पमाना..’ (रामदुलारी), ‘सायकल की सवारी है..’ (रमोला आणि कोरस) ही गाणी लोकांना आवडली. केदार शर्मा दिग्दíशत ‘कलियाँ’तल्या (१९४४) ‘सांवरे बांवरे बांसुरी बजाए जा..’ (लीला सावंत आणि व्ही. भाटकर), ‘सखी रे अब के न सावन आए..’ (लीला सावंत व ललित पारुलकर), ‘ले आए बहारोंको..’ (लीला सावंत) या गाण्यांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘शुक्रिया’ (१९४४), ‘अलबेली’, ‘ज़िद’ (१९४५), ‘यह है िज़्‍ादगी’ व ‘झूठी कसमें’ (१९४८) तसेच ‘जवानी की आग’ (या चित्रपटाचं निर्मिती वर्ष जरी १९५१ असलं तरी तो फाळणीपूर्व काळात निर्मिला गेला असावा.) या भारतीय चित्रपटांना संगीतबद्ध केलं होतं.
एच.एस. रवेल दिग्दíशत ‘शुक्रिया’त (१९४४) चिश्तींनी कंपोज केलेलं ‘हमारी गली आना जी. अच्छा जी..’ हे गाणं ज़्‍ाीनत बेग़म व अमरच्या आवाजात अगदी गल्लीबोळातून गाजलं. पण सुंदरसिंगने गायलेल्या ‘ननों की तीर चला गई. शहर की लौंडीया..’ या गाण्यामुळे मात्र गदारोळ निर्माण झाला. सेन्सॉर बोर्डाने या गाण्याच्या शब्दांवर व अर्थावर आक्षेप घेत त्यावर बंदी घातली. हे गाणं स्वत: बाबा चिश्तींनी लिहिलं होतं. बाबा चिश्तींना संगीताव्यतिरिक्त चित्रपटात गाणी लिहिण्याचाही शौक होता.
फाळणीनंतर बाबा चिश्तींनी पाकिस्तानात राहणं पसंत केलं. गुलाम हैदर यांनी चाळीसच्या दशकात जो पंजाबी बाज चित्रपटसंगीतात आणून बंगाली वर्चस्वाला हादरा दिला त्या पंजाबी परंपरेचे पाईक म्हणून बाबा चिश्ती ओळखले जाऊ लागले. सूफियाना संगीताची फकिरी परंपरा जतन करणारे व गाण्यात माफक वाद्यमेळ (ऑर्केस्ट्रेशन) वापरणारे म्हणून ‘घडम्े चिमटेवाला’ किंवा ‘ढोलक चिमटेवाला संगीतकार’ असा उपहास करणाऱ्या पाकिस्तानातल्या टीकाकारांना त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेतून उत्तर दिलं.
पाकिस्तानात नजीर अहमद व स्वर्णलता यांची निर्मिती असलेल्या ‘फेरे’ हा पंजाबी चित्रपट २८ जुल १९४९ रोजी प्रदíशत झाला. वेधक संगीतामुळे चक्क रौप्यमहोत्सवी ठरला. पाकिस्तानातील हा पहिलावहिला सुपरहिट सिनेमा होता. यातली सर्वच गाणी गाजली असली तरी मुनव्वर सुलतानाने गायलेल्या एका गाण्याने धमाल केली होती. गाण्याचे बोल होते-
मणूं रब दी सौं तेरे नाल प्यार हो गया,
वे चन्ना सच्ची-मुच्ची,
वे चन्ना सच्ची-मुच्ची
तेरी याद विच दिल बेकरार हो गया,
वे चन्ना सच्ची-मुच्ची,
वे चन्ना सच्ची-मुच्ची
गाणं बाबा चिश्तींनीच लिहिलं होतं. ऑर्केस्ट्रेशन बहारदार होतं. व्हायलिन्स, व्हियोला, चेलोज, डबल बेस, पियानो, क्लॅरोनेट व पिक्लो-फ्ल्यूटसारखा वाद्यमेळ व ढोलकचा चित्ताकर्षक ठेका यामुळे या गाण्याने लोकांना अक्षरश: वेडं केलं.
‘मणूं रब दी सौ..’ या गाण्याची चालच इतकी आकर्षक होती की सचिनदांसारख्याा बंगाली संगीतकारालाही या चालीचा मोह पडला. त्यांनी ओ.पी. गुप्ता दिग्दíशत ‘एक नज़्‍ार’ (१९५१) चित्रपटात या चालीवर गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्याकडून गाणं लिहून घेतलं व ते गीता दत्तच्या आवाजात कंपोज केलं. गाण्याचे बोल होते.
बस चुपके ही चुपके से प्यार हो गया
ओ पिया तेरा-मेरा, ओ पिया तेरा-मेरा
बस आँखो ही आँखोंमें इकरार हो गया
ओ पिया तेरा-मेरा, ओ पिया तेरा-मेरा
सचिनदांनी गाण्याची अस्ताई तंतोतंत चिश्तींच्या ‘मणूं रब दी सौ..’च्या चालीवर बेतली होती. फक्त अंतऱ्याची चाल तेवढी बदलली होती. गीता दत्तने गायलेलं हे गाणं फारसं लोकप्रिय होऊ शकलं नाही. उलट चोरीच्या आरोपामुळे नाव ‘खराब’ झालं. एस.डी. बर्मन यांनी आपली चाल चोरली म्हणून बाबा चिश्ती जाम ‘ख़फा’ झाले. सचिनदांना ही चाल एवढी आवडली होती तर त्यांनी आपली रीतसर परवानगी घेऊन हे गाणं वापरायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं होतं. अशा प्रकारची आगळीक केल्याबद्दल सचिनदांनी आपली जाहीर माफी मागावी व हे गाणं तात्काळ चित्रपटातून वगळावं अशी त्यांची संतप्त मागणी होती. सचिनदांनी गाणं वगळलं नाही आणि माफीही मागितली नाही. या वादात काही बंगाली संगीतकारांनी एस.डी. बर्मन यांची तळी उचलून धरली. यात एवढं ‘गहजब’ करण्यासारखं काय आहे, असा चित्रपटसंगीत क्षेत्रातील तत्कालीन वंगबांधवांचा सवाल होता. बहुतेक बंगाली संगीतकार बंगालीत हिट झालेलं गाणं जसंच्या तसं िहदीत आणायचे. िहदीत हिट झालेली चाल सर्रास बंगालीत वापरायचे. गायक बदलण्याचीसुद्धा तोशीस घेतली जात नसे. ‘ओ सजना बरखा बहार आई..’ हे िहदी गाणं लता मंगेशकर गाणार आणि बंगालीत ‘ना जेयो ना रजोनी एखो ना बाकी..’सुद्धा लताच गाणार. म्युझिक अरेंजमेंटचं ‘स्कोअर कार्ड’ एकच असल्यामुळे दोन्हीकडे गाण्यांच्या प्रील्यूड व इंटरल्यूडमधले म्युझिक पीसेस एकसारखे असत. परंतु सचिनदांची बाजू घेणारे बंगाली बांधव हे गाणं सचिनदांनी पंजाबीत स्वरबद्ध केलेलं नसून बाबा चिश्तीनामक दुसऱ्याच संगीतकाराने कंपोज केलं आहे हे सोईस्कररीत्या विसरले.
बाबा चिश्तींनी आपल्या परीने या ‘उचलेगिरी’ला धडा शिकविण्यासाठी एक मार्ग शोधला. त्यांनी ३ जून १९५४ साली रिलीज झालेल्या ‘सस्सी’ या लोककथेवर आधारित उर्दू चित्रपटासाठी भारतात सहाच महिन्यांपूर्वी (१ जाने. १९५४) रोजी रिलीज झालेल्या ‘शर्त’मध्ये हेमंतकुमार व गीता दत्तने गायलेल्या गाण्याची चाल शब्दांसकट उचलली, गीतकार अज़्‍ाीज मेरठीकडून फक्त अंतऱ्यातली कडवी बदलून घेतली आणि कौसर परवीनच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली. गाण्याचे बोल होते.
न ये चाँद होगा न तारे रहेंगे
मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे
न तुमने सुना मेरे ग़मका फंसाना
सुलगता रहा प्यारका आशियाना
कहां अब तेरे ग़मके मारे रहेंगे
न ये चाँद होगा.
कौसरचा मधाळ आवाज, चिश्तींचं मोहक ऑर्केस्ट्रेशन आणि मेरठीने लिहिलेल्या उत्तम काव्यगुणांचा विचार करता ‘न ये चाँद होगा.’ हे ‘खुलेआम’ ‘ढापलेलं गाणं’ तांत्रिकदृष्टय़ा छान जमलं आहे यात वादच नाही. तथापि, सचिनदेव बर्मन यांचा सूड हेमंतकुमार यांच्या गाण्यावर उगवण्यामागचं प्रयोजन अनाकलनीय होतं. शिक्षेचा हा प्रकार ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देणारा होता. बर्मनदांची यांची बाजू घेणाऱ्यात हेमंतकुमार यांचा सहभाग असावा असं क्षणभर मानलं तरी तात्त्विकदृष्टय़ा चोरीचं समर्थन होऊ शकत नाही. दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५५ साली चिश्तींनी एस.डी. बर्मन यांच्या ‘जीवन-ज्योती’तल्या गाण्यावर हात साफ केला. चित्रपटसंगीताच्या इतिहासात ‘खून का बदला खून’ या धर्तीवर ‘चोरी का बदला चोरी’ हा प्रकार प्रथमच घडत होता.

शिक्षेचा हा प्रकार ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देणारा होता. बर्मनदांची यांची बाजू घेणाऱ्यात हेमंतकुमार यांचा सहभाग असावा असं क्षणभर मानलं तरी तात्त्विकदृष्टय़ा चोरीचं समर्थन होऊ शकत नाही.

बर्मनदांनी चिश्तींच्या ‘फेरे’च्या चालीवर बेतलेलं ‘बस चुपके ही चुपके से प्यार हो गया.’ हे गीता दत्तचं गाणं गुणवत्तेच्या बाबतीत ‘तोकडं’ पडल्याने ते लोकप्रिय होऊ शकलं नाही. परंतु ‘मणूं रब दी’च्या चालीचा आधार घेतलेल्या ओ.पी. नय्यरच्या ‘नया दौर’ (१९६७) मधल्या ‘उडम्े जब जब ज़ुल्फे तेरी..’ या गाण्याने लोकप्रियतेचे शिखर काबीज केलं. ओ.पी.ने पहिली ओळ चिश्तींसारखी, तर दुसरी ओळ काहीशी वेगळी कंपोज करून गाणं तंतोतंत ‘कॉपी’ वाटणार नाही याची खबरदारी बाळगली होती. बाकी चालीत ओ. पीं. नी फारसं कसब पणाला लावलं होतं असंही नाही. अस्ताई आणि अंतऱ्याची चाल इथून तिथून सारखीच होती. साहिरच्या ‘जिंद मेरिए’, ‘मेरा यार बसदा’, ‘रुत प्यार करण की आई’ अशा प्रकारच्या पंजाबी ढंगांच्या शब्दांमुळे गाण्याच्या खुमारीत भर पडली होती. त्यामुळे हे गाणं चिश्तींच्या गाण्यावरून बेतलं आहे हे लक्षात येऊनही ते ‘नक्कल’ वाटत नाही. त्यातही गंमत अशी की ‘उडम्े जब जब ज़ुल्फे तेरी..’ चिश्तींच्या मूळ गाण्यापेक्षा सर्वच बाबतीत उजवं वाटतं. रफी-आशाचा धुंद करणारा मदहोश युगुलस्वर, साहाय्यक जी.एस. कोहलीचा चित्ताकर्षक ऱ्हिदम, अरेंजर सबॅस्टियन डिसोझाची वैशिष्टय़पूर्ण म्युझिक अरेंजमेंट या साऱ्याच गोष्टी इतक्या उत्कृष्ट जुळून आल्या आहेत की ‘उडम्े जब जब ज़ुल्फे तेरी..’ हे बहारदार गाणं ऐकणाऱ्याला आजही ‘िझग’ आणतं.
योगायोग पाहा, ‘मणूं रब दी..’ हे गाणं ‘उडम्े जब जब ज़ुल्फें’च्या आठ वर्षांपूर्वी पडद्यावर आलेलं गाणं असलं तरी तेदेखील अद्याप विस्मरणात गेलेलं नाही. आजही ते ‘सदाबहार’ गीतात गणलं जातं. पाकिस्तानात ७०-८० च्या दशकात ‘बेंझामिन सिस्टर्स’ या नावाने तीन सख्ख्या भगिनी सुवर्णकाळातील गाजलेली गाणी ‘मख्ख’ चेहऱ्याने गाऊन प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झाल्या होत्या. तेव्हा ‘मणूं रब दी सौं तेरे नाल..’ हे गाणं त्यांच्या ‘टॉप लिस्ट’मध्ये समाविष्ट होतं. प्रेक्षकांचा या गाण्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व ‘वन्समोअर’चा पुकारा अभूतपूर्व असायचा.
फार लांबची गोष्ट कशाला? पाकिस्तानात चार-पाच वर्षांपूर्वी ‘ज़्‍ार्का’ नावाच्या देखण्या गायिकेने ‘मणूं रब दी सौं तेरे नाल..’चं ‘रिमिक्स व्हर्जन’ सादर केलं आणि एकच धमाल उडवून दिली. आजही तिच्या कार्यक्रमात या गाण्याची फर्माईश होतेच. काही वर्षांपूर्वी भारतात अलिशा चिनॉयने गायलेलं ‘उडम्े जब जब ज़ुल्फे तेरी..’चं रिमिक्स ‘इट्स रॉकिंग यारा कभी इश्क तो करो..’ सुपरडुपर ‘हिट’ ठरलं होतं. आजही कुठल्याही चॅनेलवर ते लागलं की भान हरपायला होतं. नक्कल करणाऱ्यांकडे उच्च दर्जाची अक्कल असली की ‘परछाइयाँ’सुद्धा तेजाने तळपू लागतात.
निर्माता दिग्दर्शक सावनकुमार टाक याला कोणी तरी (बहुधा त्याच्या स्वत:च्याच अंतर्मनाने असेल) सांगितलं ‘मणूं रब दी सौं तेरे नाल’ हे गाणं तुझ्या चित्रपटात टाक! त्याने गाण्याचा मुखडा वगळता आख्खं गाणं िहदी भाषेत खरडून ‘प्यार की जीत’ (१९८७) नावाच्या चित्रपटात टाकलं. उषा खन्ना चित्रपटाची संगीतकार होती. तिने मूळ गाण्याची चाल बदलून त्याची पुरती विल्हेवाट लावली. मुखडा पंजाबीत आणि बाकी काव्य िहदीत असलं ‘अतरंगी’ गाणं आशा भोसले यांना गायला लावलं. मुळात संगीतात दम नसेल तर त्याला बिचाऱ्या आशाबाई तरी काय करणार? हे सुमार दर्जाचं गाणं ‘अल्पजीवी’ ठरलं हे सुज्ञास सांगणे न लगे. ‘दिल देके देखो’द्वारे पदार्पणातच दमदार चाली देणाऱ्या खन्नाबाईंना या गाण्यात ‘पंजाबी स्टाइल’ची ऐट मिरवता आली नाही.
लेखमालेच्या पुढच्या भागात संगीतकार जी.ए. चिश्तींनी पाकिस्तानात दिलेल्या यादगार गाण्यांची चर्चा करताना शिष्योत्तम संगीतकार खय्यामसाहेबांबरोबर असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, तसेच चिश्तीसाहेबांच्या गुणग्राहक स्वभावाला अनुसरून काही बडय़ा कलावंतांना त्यांनी दिलेला ‘ब्रेक’ यासारख्या काही ज्ञात-अज्ञात पलूंवर प्रकाश टाकू; तोवर अलविदा.!!