आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com

गणेशाची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वानाच माहीत असतात. पण काही मंदिरं या सगळ्या झगमगाटापासून दूर कुठे तरी रानावनात, डोंगरकपारींत, गडकिल्ल्यांवर एकटीच वसलेली असतात. तिथे ना भाविकांची गर्दी असते ना दुकानांच्या रांगा. निसर्गाच्या सान्निध्यात अगदी साधेपणाने राहणाऱ्या गणरायाशी तादात्म्य पावण्यासाठी यापरती उत्तम संधी ती कोणती!

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
Mahabaleshwar, Tourism, Tourists, hill station
दिवाळी सुट्टीत पर्यटकांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

भुलेश्वरची वैनायकी प्रतिमा

पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यावतपासून हे ठिकाण अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे. सह्य़ाद्रीची भुलेश्वर रांग म्हणून हा परिसर ओळखला जातो. शिवकाळात इथे मुरार जगदेवांच्या काळात दौलतमंगळ नावाचा एक किल्ला होता. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे त्याला म्हणू लागले दौलतमंगळ. या किल्लय़ाचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत; पण इथे असलेलं अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगं आहे. इथेपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे. यादवकाळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सुरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचे अंकनही या मंदिरावर आढळते. या सर्व शिल्पाकृतींमध्ये स्त्री रूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. हा काय प्रकार आहे? गणपती असा स्त्री रूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली, असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे; पण ही चूक वगैरे काही नाही. प्रत्येक देवतेची शक्ती ही मूर्तिरूपात दाखवायची असेल तर ती स्त्री रूपात दाखवतात. सप्तमातृका हेही त्याचेच प्रतीक आहेत. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाच्या मदतीसाठी देवांनी आपापल्या शक्ती युद्धात मदत करण्यासाठी शिवाला दिल्या होत्या. त्यांचे शिल्पांकन करताना स्त्री प्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवाची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात. अन्वा या गावी तर विष्णूच्या चोवीस शक्तींच्या अप्रतिम स्त्री प्रतिमा केदारेश्वर मंदिरावर कोरलेल्या आहेत. साहित्यामध्ये शक्ती हे स्त्रीलिंगी रूप आपण वापरू शकतो; परंतु मूर्ती घडविताना शक्ती स्त्री रूपात दाखवतात. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेले आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी अशी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. इथे भुलेश्वरला प्रदक्षिणा मार्गावर वरती वैनायकीची देखणी प्रतिमा आहे. या प्रतिमेखाली उंदीरही दाखविला आहे. अशीच एक प्रतिमा बीड जिल्ह्य़ातल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाडय़ात आहे, गणेशीची मूर्ती म्हणून ही प्रतिमा ओळखली आहे. इथे चेहरा गणपतीचा आणि अंगावर साडीचे वस्त्र दाखवलेले आहे. तसेच कपाळावर स्त्रिया लावतात तसेच कुंकू लावलेले आहे. सोळा हातांची ही प्रतिमासुद्धा सुरेख दिसते. भुलेश्वर हे ठिकाणच वेगळे नसून तिथली गणपतीची मूर्तीसुद्धा आगळीवेगळी आहे.

त्रिकूट गणेश – नांदेड</strong>

प्राचीन शहर नांदेड. शिखांचे पवित्र स्थळ अशी ख्याती असलेल्या नांदेडमध्ये एक अल्पपरिचित गणेशस्थान आहे. त्रिकूट गणेश हे त्याचे नाव. नांदेडच्या पूर्वेला अंदाजे ८ कि.मी. अंतरावर गोदावरी आणि आसना या नद्यांचा संगम होतो. या संगमस्थानी गोदावरीच्या पात्रात हे दगडी बांधणीचे मंदिर आहे. हे गणेशमंदिर नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी बांधले. आसना नदीच्या पैलतीरावर त्रिकूट हे एक छोटे गाव वसलेले आहे. नांदेड-हैदराबाद राजमार्गावर गोदावरी नदीवरचा जुना पूल ओलांडून पुढे मुदखेडकडे जाताना या त्रिकूट गणेशाच्या स्थानी पोहोचता येते. स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच, अन्यथा नांदेडमधून इथे येण्यासाठी ऑटोरिक्षासुद्धा मिळू शकतात. साक्षात भगवान शंकरांनी गणेशाला गणाध्यक्षपद मिळविण्यासाठी इथे अनुष्ठान करण्यास सांगितले, अशी भाविकांची श्रद्धा आहे.गणेशाने अनुष्ठान केले. त्या तपसिद्धीनंतर शंकरांनी गणेशाला मांडीवर बसवून इथे गणेशतीर्थाची स्थापना केली. त्याचे द्योतक म्हणून येथे शिवलिंग आणि त्यावर गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. हे गणेशस्थान स्वयंभू आणि सिद्ध मानले जाते.

त्रिकूट राजाने व्यासांच्या सांगण्यावरून या ठिकाणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे गणेशकृपेने त्याला राज्यलाभ झाला अशी कथा या स्थानाबद्दल सांगितली जाते. भगवान शंकरांनी स्थापन केलेल्या या गणेशतीर्थात स्नान केल्यास मनुष्याला विद्या- धन- ऐश्वर्य आदी प्राप्त होऊन तो शिवलोकास जातो असे इथले माहात्म्य सांगितले जाते. थोर गणेशभक्त रामकृष्ण बापू सोमयाजी यांच्या काव्यात या स्थानाचा उल्लेख आहे. माघ शुद्ध चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. इथला प्रसाद खूपच आगळावेगळा आहे. भक्तांना त्या वेळी लाह्य़ांचे पीठ आणि फोडणी दिलेले हरभरे प्रसाद म्हणून वाटले जातात. खूपच आगळ्यावेगळ्या असलेल्या या स्थानाला वाट वाकडी करून भेट द्यावी. नांदेडच्या सहलीमध्ये या स्थानाचा जरूर समावेश करावा.

श्रीसिद्धिविनायक तुरंबे

गणपतीच्या नावाचा गाजावाजा न करता आपल्याकडून समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत कशी होईल हे जाणीवपूर्वक पाहणारी मंडळीदेखील भेटतात. तुरंब्याचे देवस्थान हे याच प्रकारातले एक आहे. अशी ही खूप सुंदर, सामाजिक बांधिलकी जपणारी आणि भक्तांचे, ग्रामस्थांचे हित जोपासणारी मंदिरे, देवस्थाने आडवाटेवरचे निरनिराळे गणपती शोधत असताना अचानक सापडतात. कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावर कोल्हापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर राधानगरी तालुक्यात तुरंबे नावाचे गाव आहे. गावातूनच वाहणाऱ्या दूधगंगा नदीमुळे गाव समृद्ध आहे. मुख्य रस्त्यावरच आता जीर्णोद्धार झालेले सिद्धिविनायकाचे मंदिर लागते. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरातन आहे. नोव्हेंबर २००० साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. ४० फूट रुंद आणि ८० फूट लांब असा प्रशस्त  प्राकार असलेल्या या मंदिरात अंदाजे अडीच फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती संपूर्णपणे शेंदूरचर्चित आहे. चारही हातांत विविध आयुधे आहेत. अष्टविनायकातल्या एका गणपतीच्या पुजाऱ्यांनी अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून या सिद्धिविनायकाला नवस केला आणि त्यांची मनीषा पूर्ण झाली, अशी वदंता आहे. पंचक्रोशीतच नव्हे तर अगदी दूरदूरच्या गावांहून इथे लोक मोठय़ा श्रद्धेने येतात. माघी गणेश उत्सव हा इथला खूप मोठा उत्सव असतो. गणेश सप्ताह इथे साजरा केला जातो. आणि या सात दिवसांमध्ये देवस्थानतर्फे ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते यांचे कार्यक्रम ठेवले जातात. जलसुराज्यचे सचिव डॉ. इंद्रजित देशमुख यांचे सक्रिय योगदान या ठिकाणी असते. गायन, कीर्तनाबरोबरच गावातील दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक आणि जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम देवस्थानतर्फे राबवला जातो. देवस्थान समितीचे सचिव बाळासाहेब वागवेकर आणि त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमात असते. मार्गशीर्ष चतुर्थीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो तेव्हा महाप्रसादाचे आयोजन असते. सामाजिक जाणीव जपणारे हे आडवाटेवरचे देवस्थान वेळ काढून बघायला हवे.

शमी विघ्नेश – आधासा

महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राहीत्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली श्रीगणेशाची आराधना केली तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थापना केली तेच हे अदोष क्षेत्र. नागपूर-छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आधासा क्षेत्र आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून ४ कि.मी.वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात गणेशाची भव्य अशी दशभुज मूर्ती सिंहावर आरूढ झालेली आहे. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.

या ठिकाणाची दुसरी कथा अशी की, वालीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून श्री शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर रात्री विघ्नेशाजवळच वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती वामनाने स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. गणेशाच्या २१ स्थानांपैकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहितांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात अशी या ठिकाणाची ख्याती आहे.

कडावचा सिद्धिविनायक

राजमार्ग सोडून आडवाटेवर चालायची सवय लागली की तिथे येऊन भगवंतसुद्धा आपल्याला दर्शन देतो. त्याच त्याच ठिकाणी जाऊन गर्दीमध्ये रेटारेटी करून घेण्यापेक्षा जरा वेगळ्या वाटा धुंडाळल्या तर निश्चितच रम्य, निवांत स्थाने पाहता येतात. किल्ले भटकणाऱ्या मंडळींना या गोष्टीचा अनुभव नेहमी येतो. कर्जत तालुक्यात पेठचा किल्ला किंवा कोथळीगड प्रसिद्ध आहेच. तिथेच पायथ्याला आंबिवली गावात डोंगरात खोदलेली लेणीसुद्धा आहेत. कोथळीगडाजवळून कौल्याच्या धारेने म्हणजेच घाटवाटेने भीमाशंकरला जाता येते. याच कोथळीगडाच्या परिसरात एक सुंदर गणेश स्थान आहे. कडाव गावचा दिगंबर सिद्धिविनायक. कर्जत रेल्वे स्टेशनपासून जेमतेम ८ कि.मी.वर आहे कडाव. इथली गणेश प्रतिमा खूप प्राचीन आहे, असे सांगितले जाते. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. अंदाजे ३०० वर्षांपूर्वी या गावचे पाटील धुळे यांना शेत नांगरत असताना ही मूर्ती मिळाली. त्यामुळे धुळे परिवाराचे हे कुलदैवत मानले गेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला, असे सांगितले जाते. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे ही खूप मोठी असून एकदंत शूर्पकर्ण या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ती घडवलेली आहे. दिगंबर आणि यज्ञोपवीत परिधान केलेली अशी ही निश्चितच आगळीवेगळी मूर्ती आहे.

साधुमहाराजांचा गणपती

राष्ट्रकुटांच्या राजधानीचे शहर असलेले कंधार हे गाव मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्य़ात वसलेले आहे. कंधारचा किल्लादेखील प्रसिद्ध आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या काळात कंधार नगर खूप जाणीवपूर्वक वसविले गेले होते. राष्ट्रकूट राजांनी मन्याड नदीच्या काठावर सर्व बाजूंनी निसर्गत: संरक्षण लाभलेल्या भूभागावर आपली राजधानी वसवली होती. याच कंधार गावाच्या पश्चिमेस सुमारे ३ कि.मी. अंतरावर हे गणेश मंदिर आहे. एकदा मराठवाडय़ातील प्रसिद्ध संत साधुमहाराज आषाढी एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात असताना त्यांचा मुक्काम शेकापूर इथे होता. तिथे गणेशाने स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला की, मन्याड नदीच्या उत्तर तीरावर जमिनीत अनेक वर्षे पडून आहे. तू तिथून मला बाहेर काढ. त्या दृष्टांतानुसार साधु महाराजांनी कंधार गावच्या लोकांना ही गोष्ट सांगितली. गावकरी जमा झाले आणि त्यांनी महाराजांनी दाखवलेल्या जागेवर खोदायला सुरुवात केली. काही वेळातच मूर्ती दिसू लागली. लोकांनी मूर्ती उभी करून ठेवण्यासाठी पार बांधला; पण मूर्ती काही जागची हलेना. नंतर साधु महाराजांनी हात लावताच मूर्ती त्या पारावर विराजमान झाली, अशी आख्यायिका आहे. याचमुळे या गणेशास साधुमहाराजांचा गणपती किंवा शिवेवरचा गणपती असे नाव पडले. हे ठिकाण अत्यंत प्रसन्न आणि निसर्गरम्य आहे. जवळच मन्याड नदी वाहत असल्याने या ठिकाणाची शोभा अधिकच वाढली आहे. कंधार गावच्या सीमेवर अंदाजे ६ फूट उंचीची ही गणेशमूर्ती आहे. लंबोदर, महाकाय, गजकर्णक अशी असून ती दुरून शेंदुराची रास असल्यासारखे भासते. मूर्तिपूजेसाठी पाच किलो शेंदूर, चार फूट यज्ञोपवीत आणि हार यांची सोय असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यात साधुमहाराज संस्थानातर्फे गणपतीची महापूजा केली जाते.

पोखरबावचा गणेश

कोकणात भटकंतीला कुठेही जा, जागोजागी तुम्हाला निरनिराळी देवळे- राऊळे निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेली दिसतील. इथल्या जवळपास प्रत्येक देवस्थानाला एकेक दंतकथा, गूढरम्य अशा गोष्टी चिकटलेल्या आहेत. काही देवळे मात्र खरोखरच आडवाटेवरची आहेत. चांगले रस्ते असल्याने तिथे जाणे जरी आता सोयीचे झाले असले तरीसुद्धा ही देवळे अशा अनगड जागी वसली आहेत की तिथे पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. अशा ठिकाणी गेले की खरोखर मन:शांती लाभते. देव आणि आपण. फक्त दोघेच आणि आपल्या साक्षीला असतो पाण्याचा झुळुझुळु वाहणारा प्रवाह आणि पक्ष्यांची अखंड साद. इतर कोणीही नाही. पोखरबावला आल्यावर अगदी असेच वाटते. इथून हलूच नये असे वाटते. इथे डोंगराला एक खूप मोठे नैसर्गिक छिद्र पडले आहे. त्याच्या खालून अव्याहत एक ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेलाय म्हणून पोखर आणि खाली तळे, ओहोळ आहे म्हणून बाव. त्यामुळे हे स्थान झाले पोखरबाव. देवगड या आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ठिकाणापासून पोखरबाव जेमतेम ११ कि.मी.वर आहे. देवगड- दाभोळे- दहिबाव रस्त्यावर दाभोळे गावापासून २ कि.मी.वर हे ठिकाण आहे. रस्त्याच्या बाजूला एक छान गणपती मंदिर बांधलेले दिसते. संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती बघण्याजोगी आहे. चतुर्भुज गणेश एका आसनावर बसला असून त्याच्या पायाशी वाहन उंदीर आहे. मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने खाली जायला पायऱ्यांचा रस्ता आहे. खाली शंकराची एक स्वयंभू पिंड दिसते. याबद्दल एक कथा अशी सांगतात की, ही पिंडी हजारो वर्षे पाण्याखाली होती. १९९९ साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांनी ही मूर्ती पाण्यातून वरती काढली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. अत्यंत नितळ आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह इथे वाहत असतो. हे पाणी भक्त तीर्थ म्हणून वापरतात. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर, मालवण, विजयदुर्ग, देवगड यापैकी कुठेही गेलात तर या गणपतीचे दर्शन आणि इथल्या अनाहत निसर्गाचा अनुभव अवश्य घ्यावा.

निद्रिस्त गणेश – आव्हाणे

काही ठिकाणे इतकी वेगळी आणि तितकीच सुंदर असतात की, इतके दिवस आपण हे कसे काय पाहिले नाही असे वाटून जाते. नगर जिल्ह्य़ातले अगदी वेगळे ठिकाण. खरं तर उभ्या महाराष्ट्रातले हे असे एकमेव मंदिर असावे. निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात; पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्य़ातील तिसगावपासून अंदाजे १५ कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधली आहे. गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टांत झाला, की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढय़ाला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढय़ात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहत गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की, मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय- एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टांत झाला की, ती मूर्ती आहे तशीच असू देत, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली २ फुटांवर स्वयंभू गणेश मूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाडय़ात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच आहेत, असे सांगितले जाते. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथे मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. सुंदर असा सभामंडप नुकताच बांधून घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. निद्रिस्त गणेशाचे हे आगळेवेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जाऊन पाहण्याजोगे आहे.

नंदीग्रामचा सिद्धिविनायक

प्रत्येक ठिकाणामागे काही ना काही दंतकथा ऐकायला मिळतातच. अत्यंत सुप्रसिद्ध अष्टविनायक तर आपल्याकडे आहेतच, पण त्याशिवाय जरा आडवाटेवर गेले की काही वैशिष्टय़पूर्ण गणपती आपल्याला आढळतात. रायगड जिल्ह्य़ातील मुरुड जंजिरा या ठिकाणापासून जेमतेम ८ कि.मी.वर नंदीग्राम ऊर्फ नांदगाव आहे. या गावी आहे श्रीसिद्धिविनायकाचे देवस्थान. मंदिर भव्य आणि प्रेक्षणीय आहे. मंदिराचा अंतर्भाग अत्यंत कलाकुसरीच्या नक्षीकामाने सुशोभित केलेला दिसतो. अतिशय शांत आणि रमणीय परिसरामध्ये हे मंदिर वसलेले आहे. ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील मूर्ती अंदाजे ४ फूट उंचीची असून ती उजव्या सोंडेची आहे. या गणपतीभोवती प्रदक्षिणा घालताना सर्व बाजूंनी याचे दर्शन घेता येते. स्वयंभू मूर्ती असलेल्या या मंदिराला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भेट दिली होती. माघ चतुर्थीला या विनायकाची जन्मतिथी साजरी केली जाते. तसेच संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला भक्तांची मोठी गर्दी दर्शनासाठी इथे जमते. अलिबागहून नागाव चौल रेवदंडामार्गे आपण या नंदिग्रामी येऊन पोहोचतो. अखंड सागराची सोबत आणि नारळी-पोफळीच्या झाडांच्या सान्निध्यातून हा प्रवास अत्यंत रमणीय असा आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे धर्मशाळा बांधली आहे.

मोरयाचा धोंडा

‘‘शुद्ध खडक, स्थल उत्तम, गोडय़ा पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली, या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. चौरयांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही!’’ छत्रपती शिवाजीराजांचे स्वराज्य आता पश्चिमेला सिंधुसागरापर्यंत विस्तारले. कोकणचा कारभार करायचा तर समुद्रावर स्वामित्व हवंच. सुसज्ज आरमार आणि त्याच्या मदतीला तेवढेच बेलाग जलदुर्ग यांचे महत्त्व या राजाने केव्हाच ओळखले होते. राजे मालवणास आले असता त्यांच्या मनात समुद्रातील एक बेट भरले- कुरटे बेट. महाराजांनी इथे सिंधुदुर्ग किल्लय़ाचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले, वेदमूर्तीना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता २५ नोव्हेंबर १६६४. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱ्यावर होता का गणपती? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱ्यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाईटने तयार झालेला जांभळट रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. या मोरयाची साग्रसंगीत पूजा करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरुवात केली. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे स्थळ सध्या मात्र उघडय़ावर निसर्गाच्या सर्व ऋतूंचा मारा सहन करत उभे आहे. मालवणला गेल्यावर किनाऱ्यावर जाऊन या मोरयाला नक्की वंदन करावे. या ठिकाणी उभे राहिल्यावर समोर सिंधुदुर्ग किल्ला फार सुरेख दिसतो.

लक्ष विनायक – वेरूळ

वेरूळ म्हटले की डोळ्यासमोर येतात त्या चारणाद्री पर्वताच्या पोटात खोदलेल्या, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या नितांतसुंदर कोरीव लेणी आणि त्यातल्या त्यात कैलास लेणे हे तर केवळ एकमेवाद्वितीय. लयन स्थापत्यकलेचा तो सर्वोच्च आविष्कार आहे असेच म्हटले पाहिजे. ‘आधी कळस मग पाया’ या न्यायाने वरून खालपर्यंत खोदलेल्या या शिल्पकृतीला जगात तोड नाही. स्थापत्याचे असे शास्त्र आणि तंत्र याच भूमीवर विकसित झाले होते याचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले श्रीघृष्णेश्वर हेसुद्धा वेरूळलाच आहे. छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे याच वेरूळचे पाटील होते आणि घृष्णेश्वराचे अनन्यभक्त होते. हे सगळे वैभव वेरूळला आहेच; परंतु त्याचबरोबर एक सुंदर गणेशस्थानसुद्धा इथे आहे. त्याचे नाव आहे लक्ष विनायक. अर्थातच आडवाटेवरचे असल्यामुळे अनेक मंडळींना त्याची माहिती नसते. श्रीगणेशाची मूर्ती भव्य असून डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी वर करून बसलेल्या स्थितीतली आहे. या स्थानाशी साहजिकच एक सुंदर दंतकथा निगडित असणारच. त्यानुसार या गणेशाची स्थापना शिवपुत्र कार्तिकेयाने केल्याचे सांगितले जाते. त्याची पौराणिक कथा अशी की, जेव्हा तारकासुराचे व कार्तिकेयाचे युद्ध सुरू झाले तेव्हा पराक्रमाची शर्थ करूनदेखील कार्तिकेयाला तारकासुराचा वध करता येईना तेव्हा भगवान शंकराच्या उपदेशावरून त्याने विघ्नराज गणपतीची या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाला आणि त्याच्या कृपेमुळे कार्तिकेयाला तारकासुराचा वध करणे शक्य झाले. कार्तिकेयाने म्हणजेच स्कंदाने स्थापन केलेला गणेश तो हाच लक्ष विनायक होय. या कथेवरूनच इथल्या स्थानाला प्राचीन काळी ‘स्कंदवरद एलापूर’ असे नाव पडले असावे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो.

लिंबागणेश

महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात भटकंती करत असताना अनेक वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे नजरेस पडतात. किल्ले, मंदिरे, देवस्थाने आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक कथा, दंतकथा यांनी आपली भटकंती समृद्ध होते. मराठवाडा परिसरसुद्धा त्याला अपवाद कसा असेल. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव अशा मातब्बर राजसत्ता इथे नांदल्या. याच मराठवाडय़ातील ६७ गणेशस्थानांपैकी एक असलेले स्थान म्हणजे लिंबागणेश. या इ.स. १३३० ते १४८० या काळात बहमनी राजवटीचे राज्य होते. पुढे अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर मुघल आणि नंतर मराठय़ाचे आधिपत्य होते. इ.स. १७२९ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मुघलांचा पराभव करून हा भाग मराठी साम्राज्यात सामाविष्ट करून घेतला. रंगनाथराव कानिटकर हे इथले मराठी राज्याचे पहिले महसूल अधिकारी होते. त्यांच्या नंतर व्यंकाजी आणि मग गणेश व्यंकाजी यांनी इथला महसुलाचा कारभार पहिला.

प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून हा श्री भालचंद्र. नगर बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे ११ कि.मी.वर हे देवस्थान आहे. जवळपास २ फूट उंचीची शेंदूरचर्चित गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. मोरया गोसावी या स्थानाचे वर्णन करताना म्हणतात की. ‘‘चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सन्निध..’’ महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामींनी या स्थानाला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.

लिंबासुर नावाचा एक दैत्य इथे राहत होता. त्याने इथल्या प्रजेला उच्छाद आणला होता. प्रजेने गणेशाचा धावा केला आणि या दैत्यापासून सोडवण्यासाठी साकडे घातले. गणेश भक्तांच्या हाकेला धावून आला आणि त्याने एका घनघोर लढाईमध्ये लिंबासुराचा वध केला. मरतेवेळी त्या राक्षसाने गणेशाची क्षमा मागितली आणि इथले स्थान हे त्याच्या व गणेशाच्या नावाने प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा प्रकट केली. गणेशाने त्याची इच्छा पूर्ण होईल, असा वर दिला आणि हे ठिकाण लिंबागणेश या नावाने प्रसिद्ध झाले, अशी आख्यायिका आहे. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार इ.स. १९३० मध्ये श्री भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर बसवलेला आहे. दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपाच्या मागे मोठी दीपमाळ, तसेच प्रवेशद्वारावर नगारखाना असे सर्व असलेला हा सुंदर परिसर आहे. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदीने तो संरक्षित केलेला आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती लिंबासुराची समाधी असल्याचे सांगितले जाते. परळी वैजनाथाचे दर्शन घेण्याआधी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

त्रिमुखी गणेश – बुरोंडी

देवाची इच्छा असली की देव स्वत: त्याला पाहिजे त्या ठिकाणी येतो आणि नंतर भक्तांच्या कल्याणाकरिता मग तिथेच तो स्थानापन्न होतो, अशी भाविकांमध्ये श्रद्धा असते. भक्तांचे भले करणारा हा सुखकर्ता आपल्याला अनेक पुराणकथांमधून सापडतो; पण अगदी आत्ता आत्ता म्हणजे जेमतेम काही वर्षांपूर्वी अशा काही घटना घडल्या की सांगितले तर ते खोटे वाटेल, थोतांड वाटेल; पण अशीच एक घटना घडली आहे इ.स. २००६ साली आपल्या कोकणात, दापोलीजवळ आणि त्या प्रसंगाचा नायक आजही मोठय़ा दिमाखात तिथे उभा आहे, भक्तांची वाट पाहतो आहे.

बुरोंडी या दापोलीपासून फक्त १२ कि.मी.वर असलेल्या गावातली ही गोष्ट आहे. या गावात कोळी आणि खारबी समाजाचे लोक राहतात. अर्थातच मासेमारी हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हण्रच्या जवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर एक लाकडाची श्रीगणेशाची मूर्ती होती ती. कोणी तरी ती विसर्जित केली असावी असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली. काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा ती मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. हा काही तरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडे यायचे असावे असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की, या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते. मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला आणि साखरकर कुटुंबीयांना भरभराटीचे दिवस आले, असे मानले जाते.

चार फूट उंचीची शिसवीच्या लाकडाची ही मूर्ती तीन तोंडांची आहे. मूर्तीला ६ हात असून पाश, दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. तुंदिलतनू आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक दिसते. बीजपूरक हे फळ लाडवासारखे दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक आहे. ते कायम गणपतीजवळ दाखवलेले असते. दापोली दाभोळ या परिसरात कायम लोकांचे जाणे होते; परंतु या गणेशाचे दर्शन आता मुद्दाम जाऊन घेतले पाहिजे. जवळच असलेला रम्य सागरकिनारा या मंदिराला आणि परिसराला अजूनच शोभा देतो.

कुलाबा किल्ल्यातील गणेश पंचायतन

आज्ञापत्रात वर्णन केल्यानुसार ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ या नीतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे बलदंड आरमार उभे केले. स्वराज्याच्या पश्चिम सीमेच्या रक्षणासाठी सुसज्ज आरमार आणि बलदंड जलदुर्गाची गरज आहे हे ओळखणारा पहिला राजा म्हणून शिवाजीमहाराजांची नोंद घेतली गेली आहे. अलिबागजवळच्या नवघर या खडकाळ बेटावर जलदुर्ग बांधायचा संकल्प शिवरायांनी केला. कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी. ज्या बेटावरील किल्ल्याला सर्व बाजूंनी पाण्याचा वेढा आहे, तो कुलाबा! शिवरायांनंतर पुढे प्रचंड मेहनत आणि अत्यंत बेरकी आणि बेधडक वृत्ती या गुणांमुळे कान्होजी आंग्रे पश्चिम किनाऱ्यावरचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी याच कुलाबा किल्ल्याच्या साथीने मराठय़ांच्या आरमाराची (आर्माडा म्हणजे नौदल या इंग्लिश शब्दाचा हा अपभ्रंश आहे.) ताकद सिंधुसागरावर निर्माण केली. किल्ल्यावरचे गणेश किंवा किल्ल्याच्या दरवाजावर गणेशपट्टी असणे हे काही नवीन नाही; पण या किल्ल्यामध्ये चक्क गणेश पंचायतन आहे. या पंचायतनाचे आवार चांगले प्रशस्त आहे. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे आहेत. या मंदिरसमूहासमोर गोडय़ा पाण्याचा एक मोठा तलाव दिसतो. सन १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी ४५ सें.मी. उंचीची संगमरवराची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. गणेशाच्या उजव्या बाजूला एक चतुर्भुज शिवमूर्तीसुद्धा आहे, तर मागच्या बाजूला चतुर्भुज सूर्याची प्रतिमा दिसते. गणेशाच्या डाव्या बाजूला मागे महिषासुरमर्दिनी आहे, तर पुढे त्रिविक्रम विष्णूची मूर्ती आहे. सिद्धिविनायकाच्या हातात अक्षमाला, कमल, परशू आणि मोदक दिसतात. गणेश मंदिराच्या पायऱ्या उतरून बाहेर आल्यानंतर उजव्या हातास सुंदर असे तुळशीवृंदावन आहे.

हा किल्ला तर पाहण्याजोगा आहेच, पण त्याबरोबर आतील गणेशाचेसुद्धा दर्शन जरूर घ्यावे. इथे जाण्यासाठी भरती-ओहोटीच्या वेळा पाळून मगच किल्ल्यात जाता येते. ज्या दिवशी आपण जाणार त्या दिवसाच्या तिथीची पाऊणपट म्हणजे त्या दिवशीची पूर्ण भरतीची वेळ असते. त्यात ६ मिळवले किंवा वजा केले की पूर्ण ओहोटीची वेळ येते. मग या वेळी किल्ल्यात आपल्याला जाता येते. भरती येऊ लागली की, हा जाण्या-येण्याचा मार्ग पाण्याखाली जातो. तरीसुद्धा स्थानिकांना विचारूनच किल्ल्यात जावे. इथेच नव्हे तर कोणत्याही समुद्रकिनारी तिथल्या स्थानिक मंडळींशी चर्चा करूनच पाण्याजवळ जावे म्हणजे आपली भटकंती निर्धोक होते.

खिंडीतला गणपती – पुणे

पुण्यातले गणपती, असं म्हटलं की कसबा गणपती, सारसबाग, दगडूशेठ हलवाई आणि मग इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती, १० दिवस चालणारा गणेश उत्सव इत्यादी गोष्टी डोळ्यांसमोर येतात; पण पुण्यातसुद्धा आडवाटेवरची काही गणेश स्थाने आहेत आणि त्यांना प्राचीन इतिहास लाभलेला आहे. गणेशखिंडीमध्ये असलेला पार्वतीनंदन गणपती किंवा खिंडीतला गणपती हा त्यातलाच एक. शिवकाळापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असावे. या गणपतीशी खूप आगळ्यावेगळ्या कथा निगडित आहेत. राजमाता जिजाबाई यांना साक्षात्कार झाल्यामुळे बांधण्यात आलेले हे मंदिर आहे, असेही सांगितले जाते. जिजामाता या एका श्रावणी सोमवारी पालखीतून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्या वेळी खिंडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. सत्पुरुषांचे आशीर्वाद आणि देवाचे दर्शन या दुहेरी हेतूने त्यांनी झाडीतील या गजाननाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीसारखीच हीसुद्धा पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार जिजाबाईंना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले. काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर पाषाण भागात राहणारे शिवराम भट्ट चित्राव यांनी या मंदिराची दैन्यावस्था पहिली आणि जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले. इथल्या विहिरीची साफसफाई करत असताना त्यांना विहिरीत मोठेच गुप्तधन सापडले. चित्राव ते धन घेऊन शनिवारवाडय़ावर गेले; परंतु बाजीराव पेशव्यांनी ते धन घेण्याचे नाकारले. अखेर त्याच धनाचा वापर करून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि खिंडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे मंदिर उभारले गेले. या मंदिरात गणेशाची सिंदूरचर्चित चार फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. मूर्ती बैठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात मांडीवर असून मागील दोन हातांत परश आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांप्रमाणे इतर पेशवेसुद्धा मोहिमेवर जाताना या खिंडीतल्या गणपतीचे दर्शन घेत असत. राक्षसभुवनच्या मोहिमेवेळी थोरल्या माधवराव पेशव्यांनी याचे दर्शन घेतले होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुत्रप्राप्तीसाठी या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आढळते. किवळे इथल्या कॉन्ट्रॅक्टर रानडे घराण्यातील मंडळी कुटुंबात कुणाचे लग्न झाले, की नवीन जोडप्याला घेऊन या गणेशाच्या दर्शनासाठी येत. त्या विधीला ‘ओहर’ असे म्हणत. त्या वेळी मोठा जेवणावळीचा कार्यक्रम होत असे. एकदा हे सर्व कुटुंबीय या समारंभासाठी जमले असता त्यातल्या श्रेष्ठींना या गजाननाचा दृष्टांत झाला, की या ठिकाणी दरोडेखोर येणार आहेत, तेव्हा तुम्ही इथून लगेच निघावे. श्रेष्ठींनी सर्व मंडळींना लगेच किवळे इथे हलवले. दरोडेखोर आले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आजही पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर रानडे मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आवर्जून जातात. आणखी एक महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती १८९७ साली. रँडच्या खुनापूर्वी चाफेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रँडचा खून केल्यावर दामोदर हरी चाफेकरांनी ‘खिंडीतला गणपती नवसाला पावला’ असा सांकेतिक निरोप खंडेराव साठे यांच्यामार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला खिंडीतला गणपती ऐन पुण्यात असूनही आडवाटेवर वसला आहे.

श्रीक्षेत्र गणेशगुळे

अनेकदा असे होते की, खूप मोठय़ा स्थानापुढे इतर ठिकाणे झाकोळून जातात. इथे असेच काहीसे झाले आहे. सुप्रसिद्ध गणपतीपुळ्याच्या जवळच असलेले हे ठिकाण असेच काहीसे झाकोळले गेले आहे. या ठिकाणाचे आणि गणपतीपुळ्याचे संबंध काही दंतकथांमधून आपल्याला आढळतात.

नम: कालीमालापघ्नम् भाक्तानामिष्टदम् प्रभुम् गव्हरं सुनिबद्ध तम् शिलाविग्रहिणेनम:

कलियुगातील सर्व दोषांचा संहार करणारा, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, विश्वव्यापी असणारा; पण गुळ्यातील डोंगरामध्ये गुहेत अत्यंत गुप्तपणे राहणारा व बाह्य़त: पाषाणाच्या रूपाने दृश्यमान होणारा असा गजानन त्याला आम्ही नमस्कार करतो. रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या गणेशगुळे इथल्या गणपतीबद्दल अगदी यथार्थ वर्णन या श्लोकात केलेले आढळते. रत्नागिरीच्या दक्षिणेला श्री स्वरूपानंद स्वामींच्या पावस या गावापासून गणेशगुळे अवघे २ किलोमीटरवर आहे. गावाला सिंधुसागराची साथ आणि हिरवेगार विलोभनीय सृष्टिसौंदर्य लाभलेले आहे. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला अथांग सिंधुसागर पसरलेला पाहून इथे आलेल्या पर्यटकांचे देहभान हरपते. गावात आदित्यनाथ, वाडेश्वर, लक्ष्मीनारायण ही मंदिरे तर आहेतच; परंतु इथे असलेले श्रीगणेश मंदिर अगदी वैशिष्टय़पूर्ण आहे. ते उंच डोंगरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी शिळा असून त्यामुळे ते दार बंद केल्याप्रमाणे दिसते. इथे या शिळेलाच गणेश मानून तिची पूजा करतात. त्या शिळेवरच एक गणेशाकृती प्रकट झालेली दिसते. ‘गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला व तो पुन्हा इथे प्रगट झाला’ अशी इथल्या रहिवाशांची श्रद्धा. रत्नागिरीमधील एक सधन व्यापारी थरवळशेठ यांनी या मंदिराला एक मोठा सभामंडप बांधून दिला. माघी चतुर्थीला इथे तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.

श्रीराम सिद्धिविनायक – कनकेश्वर

समुद्रकाठी गिरीवर, नाना जाती तरुवर,

पुष्पवाटिका अपार, मन निवे पाहता

स्थळ पाहता सबळ, नम साजिरे कनकेश्वर,

होती कामना सफल, जिथे ठायी राहता

मूळ स्थापना यथार्थ, सर्व भक्तांचा कृतार्थ,

गजानन तो समर्थ, स्वामी येथे नांदतो

श्रीहृदयी केवळ, ऐसे भासती सकळ,

निरुमेय महास्थळ शोक सर्व भंगतो

असे हे निसर्गरम्य गिरिस्थान- कनकेश्वर अलिबागपासून अगदी जवळ २००० फूट उंचीवरील डोंगरावर आहे. काहीसे वेगळे, चढून जाण्यासाठी सुलभ आणि माथ्यावरून नजरेस पडणारे दृश्य केवळ अप्रतिम असे हे ठिकाण आहे. ‘आश्वापत्र’ या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षांत कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मन:स्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे; परंतु इथे गणपतीची एक सुडौल, देखणी प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. अलिबागपासून फक्त १० किलोमीटरवर मापगाव नावाचे गाव लागते. मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱ्हाड येथील गणेशशास्त्री जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांनी ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके १७९८ रोजी बांधले. त्यांनीच पुढे स्वामी लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामाने तपश्चर्येसाठी श्रीलक्ष्मी गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथे जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक  स्नेही बापट यांनी स्वामींच्या समाधीशेजारीच हे गणेश मंदिर बांधले; परंतु या गणेशाची पूजा करू नये, असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील गोपाळराव मैराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदरस्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेश प्रतिमा साधारण ३ फूट उंच असून संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्तीशेजारीच रिद्धी-सिद्धीच्या यांच्या मूर्तीसुद्धा आहेत.

इंचनालचा गणेश

पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही लोकांना फारसा माहिती नसलेला, अनेक निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला कोल्हापूर जिल्ह्य़ातला गडहिंग्लज तालुका.. खरं तर हा काहीसा दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. भौगोलिकदृष्टय़ासुद्धा हा प्रदेश वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरिस्थान इथून जवळ आहे. गर्द झाडी, सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यांसारखे निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला फक्त ७ कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला इतिहास लाभलेला आहे. १९०७-०८ साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाल, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून १९८७ ते १९९२ या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधले. त्यासाठी गोकाकवरून आणलेला आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीरपीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते ४ मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे. इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सव्वा दोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरदमुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावाने जवळजवळ ९ एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महागावचे दंडगे (जोशी) घराण्याकडे गेल्या ३०० वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज बससेवा विपुल आहे. हा परिसर मुद्दाम वाट वाकडी करून पाहण्याजोगा आहे.

इच्छापूर्ती गणेश – एरंडोल आजरा

कोल्हापूर जिल्ह्य़ातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे. गर्द झाडी, विविध पशुपक्ष्यांचा भरपूर वावर आणि एक प्रकारचे गूढ रम्य वातावरण लाभलेला हा तालुका खरोखरच काहीसा निराळा आहे. हा सगळा प्रदेश खरे तर दुर्गम म्हणायला हवा. एका बाजूने आंबोलीसारख्या प्रख्यात पर्यटनस्थळाचे सान्निध्य लाभलेले आहे, तर दुसरीकडे तिलारीसारख्या ठिकाणाहून येणारे जंगली हत्तींचे कळप आणि त्याने होणारा विध्वंस अशा दोन्ही गोष्टींमध्ये सापडलेला हा प्रदेश आहे; परंतु अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे, एरंडोल इथे. हे गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीतून हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या प्रतिमा आठ दिशांना ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे. मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहे. तांत्रिक साधना करणाऱ्या लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ इथल्या एका ऋषींकडे असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जन-तंजावर-गोकाक असा प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्री नामक महात्म्याकडे आली. रघुनाथशास्त्री आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम महाराज पोखरकर यांना द्यावी, असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली, असे सांगितले जाते. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला; परंतु त्यांचे गुरू काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि त्यांचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही, तर गुळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची इच्छा पूर्ण करणारा म्हणून हा गणपती ओळखला जातो. त्यामुळेच त्याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. आजऱ्यापासून फक्त १० कि.मी.वर असलेल्या या आडवाटेवरच्या इच्छापूर्ती गणेशाला नक्कीच भेट द्यायला हवी.

एकचक्रा गणेश

विदर्भात काही वेगळ्या वाटेवर गणेश स्थाने आहेत, त्यातले केळझर इथले एकचक्रा गणेशाचे स्थान नक्कीच महत्त्वाचे आहे. रामायण आणि महाभारतात अनेक स्थाने, गावे यांचा उल्लेख येतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा, दंतकथा आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अधिकच उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे २५ किलोमीटरवर केळझर किल्ला आहे. या किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुरवधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रा नगरी म्हणून ओळखले जात असे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रा गणेश असे म्हणतात. मंदिराच्या मागच्या बाजूला पुष्कर्णीसारखी एक विहीर आहे. ही विहीर चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. तलावात बाहुबलीची एक काळ्या दगडातील मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची व सुंदर असून, या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो.

भोरगिरीचा गणपती

नेहमीच्या रुळलेल्या वाटा सोडून जरा आडमार्गाला, वेगळ्या वाटेने चालू लागलो की, काही गमतीशीर गोष्टी आपल्यासमोर येतात. डोंगरदऱ्या, कडेकपारी आणि गड-किल्ले यांनी आपला सह्य़ाद्री सजला आहे. सह्य़ाद्रीच्या कुशीत केलेली भ्रमंती मनाला ताजेतवाने तर करतेच, पण त्याचबरोबर अनेक आश्चर्यकारक आणि आगळ्यावेगळ्या गोष्टींचे दर्शन घडवते. भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे हे भोरगिरी. राजगुरुनगरवरून वाडा, टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. अगदी छोटं टुमदार गाव आहे हे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर हे गाव आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला. किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या गुहा. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर महादेवाचे मंदिर आहे. देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते, त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे, अशी इथली आख्यायिका. कुणा झंझराजाने १२ शिवालये बांधली असे मानले जाते, त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे. कोटेश्वर मंदिरात शिवपिंडी तर आहेच, पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. ही वेशभूषा पाश्चात्त्य वाटते. तुंदिलतनु असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो, तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेशमूर्ती त्याच्या वस्त्रांमुळे निश्चितच वेगळी ठरते.