‘ॐगणानां त्वा गणपतिं हवामहे।
कवि कवीनामुपश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्!’
(ऋग्वेद २.२३.१)
गणपती असे म्हटले की, अनेकदा ही प्रार्थनाच आपल्या कानात गुंजन करू लागते. साहजिकच त्यात ऋग्वेदाचा संदर्भ देण्यात आल्याने गणपती ही वेदकाळापासूनची देवता आहे, असे आपल्याला वाटते. पण आजूबाजूच्या संदर्भासहित ही प्रार्थना वाचली तर ती बृह्मणस्पतीची स्तुतीपर प्रार्थना आहे. प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. अरिवद जामखेडकर आणि इतर तज्ज्ञांच्या मते गणपतीचे पुरातत्त्वीय संदर्भ हे ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकानंतरचे आहेत. याचा अर्थ गणपतीचे अस्तित्व हे त्यापूर्वीचे नाही, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कारण मुळातच भारतातील सर्व परंपरा हा मौखिक पद्धतीनेच जपल्या गेल्या आहेत. अगदी ऋग्वेदाच्याच बाबतीत बोलायचे तर ऋग्वेदाला आता जगातील सर्वात प्राचीन मुखोद्गत परंपरेचा जागतिक बहुमान मिळाला आहे. गणपती हा किती प्राचीन यावर वाद घालण्याचा हा विषय नाही. पण सांगायचा मुद्दा हा की, आपण आजवर आपल्या प्रथा- परंपरांचा बुद्धिपुरस्सर पद्धतीने शोध घेण्यात अनेकदा कमी पडलो आहोत. काही वेळेस आपल्या समज- गैरसमजांना छेद जाण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण कचरतो. पण ज्या वेळेस आपण गणपती या बुद्धिदेवतेच्याबद्दल विचार करतो त्या वेळेस त्या संदर्भातील सर्व बाबी आपण बुद्धिपुरस्सररीत्या स्वीकारणे आवश्यक ठरते. इथे ऋग्वेदातील प्रार्थनेत अपेक्षित असलेला ब्रह्मणस्पती म्हणजे गणपतीच आहे का, याचाही शोध आपण घेतलेला नाही. अनेक परंपरांच्या बाबतीत आपण केवळ वाड-वडिलांकडून आले म्हणून प्रथा स्वीकारतो. त्याही पलीकडे जाऊन शोध घेतल्यास आपल्याच समाजात झालेले बदल आणि त्या बदलांच्या प्रेरणांचा शोध घेत नवे काही गवसण्याचीही शक्यता असते. बुद्धिपुरस्सर शोधांमध्ये तर अनेकदा नवीन गोष्टी हाती लागतात.
या बुद्धिदेवतेचा उत्सव सध्या एकविसाव्या शतकात बुद्धीशी फारकत घेत आपण ज्या पद्धतीने साजरा करत आहोत, ते पाहता तर त्या बुद्धिदेवतेलाही वैषम्य वाटावे! काय चुकत असावे, याचा अंदाज देणारा एक लेख याच अंकात आहे. गणपतीच्या या परंपरांचा शोध खूपच रोचक आहे. आणि हे देवता भारताच्या खेडय़ापाडय़ात पोहोचली आहे. तिच्या त्या पोहोचण्यामागे अनेक कथा- दंतकथा आहेत. त्यांचा शोधही याच अंकात वाचता येईल. हा शोध देश आणि महाराष्ट्र अशा दोन्ही स्तरांवर आहे. गणेशभक्तांना हा निश्चितच आवडेल.
यंदाच्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण बुद्धिदेवतेला स्मरून बुद्धीच्याच आधारे या देवतेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गणेशपूजनातील षोडशोपचाराचाच एक भाग असलेल्या उपचारानुसार आपण आवाहन करुया.. बुद्धीम् आह्वयामि !
बुद्धीम् आह्वयामि !
‘ॐगणानां त्वा गणपतिं हवामहे। कवि कवीनामुपश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्!’ (ऋग्वेद २.२३.१)
First published on: 29-08-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh vishesh