गणेशगीता आणि ऋद्धिसिद्धिसहस्र्नामासहित श्रीगणेशनामाष्टक ही श्रीगणेशावरील दोन महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यांचा परिचय-
भगवद्गीता हा भारतीय तत्त्वज्ञानावरील फार श्रेष्ठ ग्रंथ. या ग्रंथाची मोहिनी भारतीय जनमानसावर एवढी की गीतेला समोर ठेवून नंतरच्या कालखंडात अनेक गीता रचल्या गेल्या. अशीच एक गणेशगीता. गणेशपुराणांत १३८-१४८ अशा अकरा अध्यायांतून चारशे चौदा श्लोकांचे नवनीत मांडले गेले. ही वेगळी गीता असली तरी मूळ भगवद् गीतेतील तत्त्वज्ञान साररूपात मांडण्यात आले आहे. गुरू-शिष्य व प्रश्नोत्तरांच्या पायावर उभे राहिलेले भारतीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप गणेशगीतेतही कायम आहे. भगवद्गीतेत शिष्य अर्जुनाने जगत्गुरू कृष्णांना प्रश्न विचारले, तर गणेशगीतेत वरेण्यराजाने विघ्नहर्त्यां, सुखकर्त्यां गणेशाला प्रश्न विचारले. या दोन्ही गीतेत प्रश्नकर्ता शिष्य क्षत्रिय आहे तर उत्तर देणारी अधिकारी व्यक्ती ब्रह्मस्वरूप आहे. दोन्ही ठिकाणी गुरू-शिष्य परंपरेतील हे साम्य असले तरी एक मोठा भेदही आहे, पहिल्या गीतेतील शिष्य अकर्मण्यता धारण केलेला अर्जुन आहे तर दुसऱ्या गीतेत मोक्षाच्या अभिलाषेने प्रश्न विचारणारा वरेण्य आहे.
गणेशपुराणातील क्रीडा खंडात वरेण्याला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी गणेशाने केलेला उपदेश असे या गीतेचे स्वरूप आहे. व्यासरचित भगवद्गीतेचा जगभर प्रसार झाला पण व्यासांनीच रचलेल्या गणेशगीतेचा म्हणावा तसा प्रचार झाला नाही. अगदी गाणपत्य संप्रदायातदेखील ही गीता फारशी प्रसिद्ध नाही. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठाता असलेल्या गणेशाच्या मुखातून स्रवलेले हे गणेशगीतारूपी अमृत साधक व सामान्यजनांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रदीप रामचंद्र रास्ते यांनी मोठी मेहनत घेतली आहे. ‘ब्रह्मणस्पतिविश्व’ या ग्रंथसंपदेतील गणेशगीता हे दुसरे पुष्प आहे. जालन्याजवळ राजूर येथे ही गीता सांगितली गेली.
ग्रंथारंभ ‘क’ उवाच असा होतो. संस्कृत साहित्यात प्रत्येक अक्षर हे कोणत्या ना कोणत्या देवाला वाहिलेले आहे. त्यानुसार ‘क’ हे अक्षर ब्रह्मदेवाचे मानले आहे. सूतांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेवांना पूर्वी अशाच प्रकारे सूतांनी व्यासमहìषना प्रश्न विचारला होता त्याचे स्मरण झाले आहे. येथे गणेशगीतेचे श्रेष्ठत्व दाखवण्याच्या हेतूने सूताच्या मुखी श्लोक आहे,
अष्टादशपुराणोक्तममृतं प्राशितं त्वया।
ततोरतिरसवत्पातुमिच्छाम्यमृतमुत्तमम्॥
सूत व्यासांना विचारतात तुम्ही मला अठरा पुराणं सांगितलीत पण आता त्याहून उत्तम आणि रसाळ अमृत पिण्याची इच्छा आहे आणि मग गीतेला प्रारंभ होतो.
खऱ्या अर्थाने गीतेला प्रारंभ पहिल्या अध्यायातील पाचव्या श्लोकाने होतो. राजा वरेण्य गणेशांकडून योग जाणण्याची इच्छा करतो आणि मग योगामृतमयी गीता गणेशांच्या मुखातून पाझरू लागते.
गणेशगीतेवर संपूर्णपणे भगवद्गीतेचा प्रभाव आहे तरीसुद्धा संपादक रास्त्यांनी जिथे जिथे विस्तृत विवेचन करणे शक्य आहे तिथे तिथे केले आहे. याग या शब्दाच्या निमित्ताने पंचमहाभुते, त्यांची सूक्ष्मतत्त्वे, अष्टमहासिद्धी, दशसौम्यसिद्धी, पंच क्षुद्रसिद्धी अशा विविध विषयांवर विवेचन केले आहे.
पहिल्या अध्यायात योगनिष्ठ साधकाची लक्षणे सांगताना कर्म, भक्ती, ज्ञान, विषाद, सांख्य, विभूती, आत्मसंयम, गुणत्रयविभाग, समत्व, सम्यक्, ध्यान, हठ, सहज, सम, स्वानंद, पातञ्जल अशा योगमार्गाचा परिचय दिला आहे.
दुसऱ्या कर्मयोग अध्यायात कर्मेद्रियांना प्रयत्नपूर्वक नियंत्रणात ठेवून मनात मात्र विषयांचे चिंतन करण्याच्या पद्धतीला निंद्य मानले आहे. या प्रवृत्तीच्या निमित्ताने पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संस्कृतीतील कर्माच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. कर्म सोडून पळ काढण्याच्या संकल्पनेविषयी रास्ते म्हणतात, ‘‘पाश्चिमात्यांनी वेगळ्या प्रकारे कर्म सोडून देण्याचा प्रयत्न केला. माणसाची सारी कम्रे यंत्रांकडून झाली म्हणजे माणूस कर्मातून मुक्त होईल या हेतूने नवनवीन यंत्रांचा शोध लावला गेला. पण त्यामुळेच पाश्चात्त्यांना वेगळ्या संकटाला तोंड देणे भाग पडले. माणूस रिकामा राहिला म्हणजे नको त्या क्षेत्रात त्याचे उद्योग वाढू लागले. कारण कर्माची ऊर्जा कुठे ना कुठे बाहेर पडणारच. याचा परिणाम म्हणजे सुटीच्या दिवसात त्यांच्याकडे वाईट घटना घडू लागल्या.’’ आणि या सगळ्या परिस्थितीला उत्तर देताना ते म्हणतात, ‘‘कर्मापेक्षा कर्त्यांला बदलणे महत्त्वाचे आहे.’’ रास्त्यांचा हा विचार मात्र निश्चितच स्तुत्य आहे.
इकडे पौर्वात्य किंवा विशेषकरून भारतीय परिस्थितीविषयी ते म्हणतात, ‘‘मनुष्याने इंद्रियांच्या विषयांचा बाहेरून त्याग केला आणि मी कर्म करत नाही असे मानले तरीही तो कर्मरहित झालेला नसतो. कारण बाहेरून क्रियारहित दिसत असला तरी मनात विषयभोगरूपी कर्म होतच असते. भोगांचा प्रत्यक्ष उपभोग किंवा त्या भोगांचे मनात चिंतन यात कोणताच भेद नाही. जुन्या धर्मानुसार माणसाने दमन करायला शिकले पाहिजे. पण रास्त्यांच्या मते माणसाचे मन द्वैताविषयीच विचार करते, द्वंद्वात जगते. त्यामुळे पारलोकाचा विचार करताना इहलोकाचा अव्हेर करायचा, आत्म्याचा विचार करायचा आणि शरीराकडे दुर्लक्ष करायचे हे अयोग्य मानले आहे. अशा प्रकारचे दमन हे माणसाला आत्मिहसा करायला प्रवृत्त करते, आत्मघातकी बनवते. यासाठी जीवनात कशापासूनही पळ न काढता जीवनाचा समग्र स्वरूपात विचार करण्यावर भर दिला आहे.
पाचव्या अध्यायातील योगावृत्तिप्रशंसनम् या अध्यायात ‘स्वधम्रे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:’ या गीतेतील श्लोकाशी साम्य दाखवणाऱ्या श्लोकाच्या विवेचनात वापरलेली रूपके छान आहेत. प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो. अग्नीचा धर्म उष्णता, जलाचा शीतलता, वायूचा शुष्कता पण अग्नी जर जलाचा धर्म स्वीकारू पाहील तर नष्ट होईल. आपल्याही आयुष्यात तसेच आहे. डोळ्यांचा धर्म पाहणे तर कानांचा ऐकणे आहे. डोळे कानांचा धर्म करू पाहतील तर नष्ट होतील त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने जन्मानुसार आपल्या वाटेला आलेला मार्ग अनुसरावा (अर्थात आजच्या काळात हा विचार स्वीकार्य आहे अथवा नाही याची चर्चा इथे अप्रस्तुत आहे.)
चवथ्या अध्यायात आत्मज्ञानी माणसाची बुद्धी आध्यात्मिक पातळीवर व लौकिक पातळीवर कशी वेगवेगळी आहे ते समजावून सांगताना रास्ते म्हणतात, आत्मज्ञानी माणसाकडे समत्व बुद्धी असते त्यामुळे माणूस असो की प्राणी सर्वाच्यात आत्मतत्त्व समान आहे याची जाणीव आत्मज्ञानी माणसाला असली तरी त्या प्रत्येकाशी त्याचा व्यवहार वेगळा असतो. आणि हे भान व्यावहारिक पातळीवर बाळगावेच लागते.
क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेकयोग या नवव्या अध्यायात मूíतपूजेच्या अवडंबरावर संपादक अत्यंत रोखठोकपणे आपली मते मांडतात. ‘सगुण भक्तीत प्राचीन काळच्याच विभूतींची सेवा येते असा विचार प्रबळ होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे विविध देवतांच्या मूर्ती बनवून आपापले संप्रदाय करणे आणि हे करत असता प्रत्यक्षात अनेक रूपांनी समोर असलेल्या परमेश्वराकडे लक्षही देत नाही,’ याचा खेद रास्ते स्पष्टपणे व्यक्त करतात. ‘वेद पुराणात सांगितलेले विश्वरूप संपूर्ण समाजात सामावलेले आहे आणि त्याची सेवा करणे हीच सगुणोपासना,’ असे स्पष्ट मत रास्ते मांडतात.
अशा प्रकारे आजच्या काळाला डोळ्यापुढे ठेवून केलेली स्पष्टीकरणे मनात बसतात. एकूणच रास्त्यांनी संपादनासाठी विशेष मेहनत घेतली आहे. गीतेवर असलेला प्रभाव त्यांनी कुठेही अमान्य केला नाही, त्यामुळे दुसऱ्या भागाच्या शेवटी गणेशगीतेतील श्लोकांशी साधम्र्य असणाऱ्या भगवद्गीतेतील श्लोकांची संपूर्ण सूचीच दिली आहे. मुखपृष्ठ व मलपृष्ठासाठी वापरलेला कागद चमकदार आहे. शिवाय पहिल्या भागावरील मुखपृष्ठावर चांदोरी येथील गणेश आणि दुसऱ्या भागावर चिंतामणी गणेश, विशाखापट्टणम् येथील गणेशांची चित्रे असल्याने ग्रंथांच्या आकर्षकतेत भर पडली आहे. गणेशगीतेचे अकरा अध्याय दोन भागांत आपल्यासमोर येतात. यासाठी उपलब्ध टीका मिळवण्यासाठी केलेली खटपट व अभ्यास प्रस्तावनेत मांडला आहे. अनेक महनीय व्यक्तींचे त्यांच्या कार्याला लाभलेले शब्दाशीर्वाद सुरुवातीला दिले आहेत. एकूण ग्रंथ अभ्यासनीय झाला आहे.
गणेशगीता – भाग – १ व २, संपादक – प्रदीप रामचंद्र रास्ते, प्रकाशक – लतिका प्रकाशन, पुणे., मूल्य – रु. ७००/- .
ऋद्धिसिद्धिसहस्रनामासहित श्रीगणेशनामाष्टक
गणपतीचे उपासक प्रदीप रामचंद्र रास्ते यांच्या ब्रह्मणस्पतिविश्व या ग्रंथमालेतील पहिले पुष्प श्रीगणेशसहस्रनामाष्टक. प्राचीन ऋषिमुनींनी, संतांनी गणेशावर जे साहित्य निर्माण केले ते सर्व ब्रह्मणस्पतिविश्व या ग्रंथमालेच्या रूपाने भक्तवाचकांना उपलब्ध करून देण्याचा रास्ते यांचा मानस आहे. त्यानुसार रास्ते यांनी गणेशासंबंधी अनेक हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ यांचा मागोवा घेतला. तो घेताना गणेशपुराणातील उपासना खंडात आलेल्या गणेशसहस्रनामाचा अभ्यास करून ते वाचकांपुढे ठेवले आहे.
ग्रंथाच्या प्रारंभी स्तोत्राचा विनियोग, न्यास, ध्यान व नंतर केवळ सहस्रनामावली दिली आहे. ही नामावली पूर्ण झाल्यावर एकेक श्लोक आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा आवश्यकतेनुसार विस्तृत अर्थ असा क्रम ठेवला आहे. सामान्य शब्द आहेत तिथे विस्तृत विवेचन न करता अर्थ सांगितला आहे, पण अनेक अर्थ आहेत किंवा त्या शब्दांत काही विशेष ज्ञान आहे तेथे तेथे संपादकांनी सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे अर्थ दिले आहेत. उदा. उडुभृन्मौली किंवा उण्डेरकबलिप्रिय यासारखे संस्कृतप्रचुर शब्द कळणे कठीण असते. स्वाभाविकच उडु म्हणजे नक्षत्र, भृन् म्हणजे भरण पोषण करणारा अर्थात नक्षत्रांचा राजा म्हणजेच चंद्र आणि मौली म्हणजे मस्तक. त्यामुळे ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे असा उडुभृन्मौली, असे प्रत्येक शब्दांचे योग्य स्पष्टीकरण देतात. रसप्रिय हे गणेशाचे नाव आल्यावर रस हे दोन प्रकारचे आहेत- अन्नातील षड्रस व काव्यातील नऊ रस यांची माहिती दिली आहे. पञ्चशन्मातृकालय या मातृका म्हणजे वर्ण आणि या वर्णाचे आलय म्हणजे ठिकाण यावरून अ ते ज्ञपर्यंतच्या पंचाशत वर्णाचे लयस्थान किंवा नादस्थान असा हा गणेश.
ज्या नावांशी पुराणकथांचा संबंध आहे तेथे त्या कथा दिल्या आहेत. उदा. लक्षविनायक. तारकासुराशी युद्ध करताना स्कन्धाने तारकाच्या सेनेला हरवले तरी त्याला प्रत्यक्ष तारकाला हरवणे अशक्य होत होते तेव्हा माता पार्वतीच्या सांगण्यानुसार स्कंदाने अन्नपाणी वज्र्य करून घृष्णेश्वरी गणेशाचे लक्ष अनुष्ठान केले. गणेश प्रसन्न झाले म्हणून स्कंदाने त्याचा लक्षविनायक या नावाने जयजयकार केला, असा मुख्य कथाभाग. पण या कथेच्या निमित्ताने स्कन्दाची जन्मकथा, स्कन्द शब्दाची व्युत्पत्ती अशाही गोष्टी दिल्या आहेत.
शेवटी फलश्रुती देऊन गणेशसहस्रनामावली पूर्ण होते. पण त्यानंतर स्वत: गणेशाने भक्तांच्या सोयीसाठी सांगितलेल्या लघुसहस्रनामस्तोत्राची माहिती येते. यात एकवीस नावे आहेत. याशिवाय एकविंशती नामावली, महाबुद्धि पंचविंशती नामावली, महासिद्धि पंचविंशती नामावलीही दिल्या आहेत. त्यानंतर गणेश नामांचे अत्यंत योग्य असे वर्गीकरण केले आहे.
त्यानंतर गकारादिगणेशसहस्रनामस्तोत्रात ग ने सुरू होणारी सहस्रनामावली आहे. उच्छिष्टगणेश व तंत्रमार्गाची माहिती देऊन उच्छिष्टगणेशसहस्रनामस्तोत्र व महासिद्धि व महासिद्धिसहस्रनामस्तोत्राने ग्रंथाची समाप्ती होते. या साऱ्या अभ्यासासाठी वापरलेल्या संदर्भग्रंथांची यादी सरतेशेवटी दिली आहे.
मुखपृष्ठावर उज्जनीचा बडा गणेश व मलपृष्ठावर ब्रह्मावर्तातील अतिप्राचीन गणपतीचे चित्र आहे. याशिवाय अनेक ठिकाणांहून गोळा केलेल्या अनेक गणेशांची विविध व सुंदर चित्रे ग्रंथाच्या आकर्षकतेबरोबर उपयुक्ततेत भर घालतात.
ऋद्धिसिद्धिसहस्र्नामासहित श्रीगणेशनामाष्टक, संपादक – प्रदीप रामचंद्र रास्ते., प्रकाशक – लतिका प्रकाशन, पुणे., मूल्य – रु. ३००/-
शब्दांकन : चैताली जोशी