काळाचौकी मुंबई
स्थापना : १९४० उत्सवी वर्ष : अमृत महोत्सवी
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या लोकमान्यांच्या प्रचार-प्रसारामुळे हा उत्सव बहुजन समाजात चांगल्या प्रकारे स्थिरावला. काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सव हे त्याचेच प्रतीक म्हणावे लागेल.
केसरी वर्तमानपत्रातून टिळकांनी लोकांना केलेले एकीचे आवाहन आणि ब्रिटिशांना दिलेले कडवे आव्हान काळाचौकीतले रंगारी बदक चाळीतले राष्ट्रीय मित्रमंडळातील तरुणांच्या वाचनात येत होते. एकी निर्माण झाली पाहिजे, हे सांगण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला होता. टिळकांच्या या उपक्रमाची अंमलबजावणी करीत १९३८ साली एका छोटय़ा अंधाऱ्या खोलीत रंगारी बदक चाळीतील राष्ट्रीय मित्रमंडळातील तरुणांनी पहिला गणपती बसवला. या छोटय़ा खोलीत सुरू केलेल्या गणेशोत्सवात विभागातल्या अनेकांचा सहभाग मिळवायचा होता. म्हणून ‘रंगारी बदक चाळ रहिवासी संघ’ या नावाने अख्ख्या मोहल्ल्याची सार्वजनिक मोट बांधली आणि छोटय़ा खोलीतला हा गणपती रंगारी बदक चाळीच्या भव्य पटांगणात १९४० साली आला आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.
सुरुवातीला वर्गणी तुटपुंजी, जेमतेम खर्च भागवण्यापुरते पैसे जमा व्हायचे. तरीही उत्सव साजरा करण्याचा उत्साह दांडगा होता. त्यामुळे त्या छोटय़ा खोलीत सुरू केलेला गणेशोत्सव त्याच पूर्वीच्या उत्साहात अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
गेल्या ७४ वर्षांत मंडळाने रामायण, महाभारत, इतर धार्मिक ग्रंथ, ऐतिहासिक घटना यांच्या आधारावर समाजप्रबोधनाचे उत्तमोत्तम देखावे सादर केले. त्या माध्यमातून ममता आणि समता हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. देशाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून लोकमान्य टिळकांना त्यांच्या राष्ट्रकार्यात आशीर्वाद देण्यासाठी १९०० साली शेगांवच्या गजानन महाराजांच्या अकोला येथे झालेल्या आगमनाच्या गाजलेल्या कथानकाचा देखावा सादर केला.
मंडळाच्या कार्यामुळे समाजमनावर गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक ठसा उमटविण्याचा प्रयत्न होत असतो. स्थानिक विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी मंडळ वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परिसंवाद असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करते. मंडळ शैक्षणिक क्षेत्राची विशेष काळजी घेते. म्हणूनच गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च, गणवेश या सगळ्याची जबाबदारी मंडळ घेत असते. वैद्यकीय चाचण्यांची शिबिरे, महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा लाभ मिळवून देणे अशी समाजकल्याणादी कामे मंडळातर्फे करण्यात येतात.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने वाढविला जोपसला तो अशा चाळीतील मंडळांनीच. रंगारी बदक चाळीचा उत्सव हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे.