आपल्याकडे गणेशाची अनेक क्षेत्रे आहेत. त्यापैकी एकवीस गणेशक्षेत्रे अत्यंत श्रेष्ठतम आहेत. या सर्व गणेशक्षेत्रांवर सर्व जीवांनी व ईश्वरांनी, सुर-असुर, मानव, सिद्ध, योगी इत्यादी सर्वानीच आपापल्या कार्यसिद्धीकरिता श्रीज्येष्ठराज गणेशाचे आराधन केलेले आहे. स्वायंभूव, ब्राह्म, प्राजापत्य, आर्ष (ऋषिप्रणीत), दिव्य, असुर, वैप्र (ब्राह्मणस्थापित), क्षात्र (क्षत्रियस्थापित) वैश्यक (वैश्यस्थापित), शौद्र (शुद्रस्थापित) आणि सांकर अशा अकरा प्रकारांनी गणेशक्षेत्रांची स्तुती वेद-पुराणांनी सांगितलेली आहे. पंचजगदीश्वरांच्या (ब्रह्मा-विष्णू-महेश- शक्ती आणि सूर्य) अनुग्रहाकरिता श्रीगणेश ज्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या पंचपरमेश्वरांनी गजाननाची जी मूर्ती स्थापन केली, अशा क्षेत्रस्थळांना स्वायंभूव क्षेत्र म्हणतात. यात मोरेश्वर (मोरगाव) हे क्षेत्र श्रेष्ठतम मानले जाते. याचप्रमाणे त्रिगुणात्मक अशा देवत्रयांच्या अनुग्रह स्थळांना ‘ब्राह्म’ क्षेत्रे म्हणतात. अशा क्षेत्रांमध्ये ‘श्रीढुंढिराज’ क्षेत्र, काशी हे सर्वश्रेष्ठ समजले जाते. त्रिमूर्तीपैकी कोणाही एकाच्या अनुग्रह स्थळांला ‘प्राजापत्य’ क्षेत्र म्हणतात व त्यात ‘मणिपूर’ क्षेत्र रांजणगाव श्रेष्ठ मानले जाते.
श्रीगणेश हे हिंदूंचे आद्यदैवत असून सर्व कार्याच्या आरंभी त्याचे पूजन अत्यावश्यक मानले गेले आहे. गणपती ही केवळ ज्ञान व बुद्धीची देवता नव्हे, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. म्हणून या पुराणोक्त एकवीस गणेशक्षेत्री गणेशभक्तांनी, त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्षे उपासना केली आहे, असे सांगितले जाते. श्रीगणेशाच्या कृपाबलाने ज्या ज्या देवतांना, असुरांना सिद्धी प्राप्त झाल्या, वरदान मिळाले असे मानले जाते. त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या उपासकाने गणेशाच्या स्मारकरूपात मूर्तीच्या स्थापना केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर कुठल्याही देवतेची पूजा, आराधना गणेशाने केली, असे कुठल्याही पुराणात संदर्भ आढळत नाहीत. म्हणून गणेश ही देवता सार्वभौम वर्णिली गेली आहे. तसेच सर्व देवादिकांनी, थोर संतांनी, अनेक गणेशभक्तांनी, गणेशस्तवन करून अखंड शांती मिळविली, मात्र गणेशाने कधी कोणा देवतेची स्तुती केली अथवा कोणा देवतेची स्थापना केली किंवा वर्षांनुवर्षे तपश्चर्या केली, असे वेद-पुराणात कोठेही वर्णन नाही.
ॐकारस्वरूप गणेशाने सृष्टी निर्माण करण्याचे ठरविले. त्यात त्याने निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर, सर्वाच्या पोषणाची श्रीविष्णूवर, संहाराची महादेवांवर, सामथ्र्य देण्याची आदिशक्तीवर आणि प्रकाश देण्याची जबाबदारी सूर्यावर सोपविली. परंतु या पाचही देवांच्या मनात गर्व निर्माण झाला आणि त्यांनी ॐकाराच्या सहकार्याशिवाय कार्य सुरू केले. या सर्व घटना ॐकार गणेश अंतज्र्ञानाने जाणत होता, पण तो या सर्वाची गंमत पाहत होता. त्याने दंडकारण्यातील वृद्धगंगेच्या म्हणजेच गोदावरीच्या दक्षिण तीरावर एक क्षेत्र निर्माण केले. पुढे श्रीविष्णूंनी या क्षेत्री येऊन उग्र स्वरूपात गणेशाची आराधना सुरू केली. नंतर सर्व देवांनी येथे येऊन ॐकार स्वरूपाशी आपली चूक कबूल केली. ॐकाराने त्यांना क्षमा केली. या चारी देवांना या क्षेत्री आपली पूर्वीची सिद्धी पुन्हा प्राप्त झाली, म्हणून भक्तमंडळी या क्षेत्राला ‘सिद्धाश्रम’- ‘सिद्धिक्षेत्र’ म्हणू लागली, अशी आख्यायिका आहे. या देवांनी या ॐकार गणेशाचे पूजन केले आणि दक्षिणा म्हणून ब्रह्मदेवाने आपली कन्या सरस्वती, विष्णूने पुष्टी, शिवाने योगिनी, सूर्याने संजीवनी आणि आदिशक्तीने गोहिनी त्याला अर्पण केल्या व पंचकन्यापती ॐकार गणेश म्हणून त्याच्यावर अक्षता उधळल्या. पण त्याच वेळी त्याची सोंड, गजमुख, चार हात, लंबोदर पाहून चंद्राला हसू आले. हे पाहताच ॐकार गणेश संतप्त झाला आणि त्याने चंद्राला शाप दिला की, ‘‘यापुढे तुझे तेज नष्ट होईल. तू कुरूप होशील आणि तुला जे पाहतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल.’’ या शापामुळे चंद्राचे तेज नष्ट झाले. आपले मुख दाखविण्याची त्याला लाज वाटू लागली. चंद्राच्या अनुपस्थितीमुळे वातावरणातील शीतलता नष्ट झाली, म्हणून, ब्रह्मा, विष्णू, महेश व त्याची पत्नी रोहिणी यांनी चंद्राला सिद्धाश्रमी जाऊन गणेश आराधना करून ॐकार गणेशाची कृपा संपादन करावयास सांगितली. याच सिद्धाश्रमी चंद्राने एकवीस वर्षे ‘ॐ गं गणपतेय नम:’ या मंत्राची उग्र अनुष्ठाने केली, तेव्हा ॐकार गणेश त्याला प्रसन्न झाला आणि त्याने चंद्राला उ:शाप दिला की, ‘‘फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ज्या वेळी घरोघरी भक्त माझी प्रतिष्ठापना करतील, त्या रात्री जे तुझ्याकडे पाहतील, त्यांच्यावर चोरीचा आळ येईल, त्यांच्यावर संकटे येतील, पण एरवी दरमहा शुक्ल द्वितीयेला जे तुझे दर्शन घेतील, त्यांची त्या मासातील विघ्ने दूर होतील. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या पूजेची सांगता तुला अध्र्य देण्याने व तुझ्या पूजनाने होईल. तुझ्या दर्शनानंतर जे उपास सोडतील त्यांनाच त्या व्रताचे पूर्ण फल प्राप्त होईल.’’ चंद्राच्या इच्छेनुसार श्रीगणेशाने त्याला आपल्या भाळी धारण केले. या दिवशी शुक्ल पक्षातील द्वितीया होती म्हणून गणेशाच्या भाळी द्वितीयेच्या चंद्राची कोर असते. यानंतर ॐकार गणेश तेथून अंतर्धान पावले आणि सर्व देवदेवतांच्या उपस्थितीत चंद्राने तेथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या क्षेत्राला भक्तमंडळी ‘भालचंद्रपूर’ म्हणू लागली. ‘आर्षक्षेत्र’ असेही या स्थानाला म्हणतात. देवांना येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून याला ‘सिद्धिक्षेत्र’ही म्हणतात, असे सांगितले जाते.
या क्षेत्राचे माहात्म्य ऐकून पुढे गौतमऋषी येथे आले आणि त्यांनी तेथे ॐकाराचे उग्र तप केले. ॐकार त्यांना प्रसन्न झाले. त्या वेळेला गौतमऋषींनी ‘‘हा माझा आश्रम सतत विविध प्रकारच्या धान्यांनी समृद्ध राहू दे. त्यातील कणग्यांमधून कितीही वेळा धान्य काढले तरी कधीही त्या रिकाम्या पडू देऊ नकोस,’’ अशी विनंती केली. पुढे या क्षेत्रावर गौतम ऋषींच्या अनुयायांनी त्यांची दुष्काळातून सुटका झाल्यामुळे, सर्वानी भालचंद्र गणेशाचे पूजन केले व पुष्टी देणारे हे त्याचे स्थान म्हणून ‘मांसल’ क्षेत्र असे त्याचे नाव केले. ‘मांसल’ नावाचाच पुढे अपभ्रंश ‘मसले’ असा झाला. ‘पुष्टी’ आणि ‘मांसल’ हे समानार्थी शब्द असून, ‘चांगले पोषण झालेला’ असा त्याचा अर्थ आहे. पूर्वीपासूनच या स्थानाजवळून वृद्धगंगा वाहत होती. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गंगामसले’ असे या क्षेत्राचे नाव ठेवले गेले. ‘गंगामसले’ म्हणजे ‘गंगेमुळे चांगले पोषण होत असलेला आसमंत!’
सीतामाईला रावणाने पळवून नेले, तेव्हा श्रीराम व लक्ष्मण दंडकारण्यात राहिलेले होते. तेव्हा सीतामाईचा शोध लवकर लागावा, ती सुखरूप असावी आणि तिची प्राप्ती लवकर व्हावी अशी प्रार्थना श्रीरामाने येथे येऊन भालचंद्र गणेशाला केली होती.
पूर्वी गाणेशक्षेत्राच्या ‘दिव्य’ व ‘प्राकृत’ स्वरूपासंबंधी जे तत्त्व सांगितले गेले आहे, त्याला धरूनच सदरचे ‘सिद्धाश्रम’ क्षेत्र, सृष्टीच्या आदिकाळी, विष्णूंवर अनुग्रह करण्याकरिता, प्रकट झालेल्या स्वानंदेशप्रभूने स्वेच्छेने निर्माण केलेले आहे. तेच पुढे चंद्र-गौतम प्रभृती भक्तांकरिता वेळोवेळी प्रसिद्धीस आले. सदर ‘सिद्धाश्रम’ क्षेत्र सृष्टीच्या आदिकाळी, विष्णूंवर अनुग्रह करण्याकरिता, प्रकट झालेल्या स्वानंदेशप्रभूने स्वेच्छेने निर्माण केलेले आहे. तेच पुढे चंद्र-गौतम प्रभृती भक्तांकरिता वेळोवेळी प्रसिद्धीस आले. परभणीतील सदर ‘सिद्धाश्रम’ क्षेत्र ‘कामस्वानंदपीठ’ म्हणून गणेश गुरुपीठत्वाने प्रसिद्ध असून गोदावरी तीर ही त्याची मर्यादा आहे.
दंडकारण्यानजीक नन्दक नावाचे एक गाव होते. त्या गावात एक दुष्ट कोळी राहत होता. लहानपणापासून तो चोऱ्यामाऱ्या, लोकांच्या हत्या, वाटमारी करून आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करीत असे. एकदा तो शिकारीसाठी बाहेर पडला असताना, एका पक्ष्याची शिकार करताना त्याचा पाय खड्डय़ात पडून तो कोसळला. त्याचे सर्वाग चिखलाने माखले होते. तेथे नजीकच असलेल्या तळ्यामध्ये त्याने आंघोळ केली. तळय़ातून बाहेर येताना त्याला एक गणेशमूर्ती काठावर दिसली. तेथून ‘ॐ ॐ ॐ’ असे मुखाने म्हणत मुद्गल ऋषी चालले होते. त्यांना लुटण्यासाठी दुष्ट त्यांच्यावर धावून गेला. त्यांच्यावर त्याने खड्ग असलेला हात उगारला. तेथे एक आश्चर्यकारक घटना घडली. दुष्टाचा उगारलेला हात एकदम लुळा पडला व हातातले खड्ग जमिनीवर पडले. त्या वेळी मुद्गल ऋषींनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याबरोबर त्या दुष्टाचा हात पूर्ववत झाला. या सर्व घटनेमुळे तो दुष्ट शरमिंदा झाला. त्याने ऋषींच्या पायावर मस्तक ठेवले आणि पश्चात्ताप व्यक्त केला. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले- ‘‘येथे गुप्त असे गणेशतीर्थ आहे आणि आज गणपतीला प्रिय असलेली चतुर्थी आहे. तू या सरोवरातील एकवीस कमळे, जवळच असलेल्या दूर्वा आणि शमीपत्रे घेऊन सरोवरच्या तीरावर असलेल्या गणेशमूर्तीची पूजा कर.’’ नंतर मुद्गल ऋषींनी जमिनीत वाळलेली काठी पुरली आणि त्याला म्हणाले- ‘‘या काठीला पाने फुटेपर्यंत पद्मासन घालून इथे बैस आणि ‘श्री गणेशाय नम:’ या मंत्राची अनुष्ठाने कर.’’ असे सांगून मुद्गल ऋषी तिथून निघून गेले. काही वर्षांनी दुष्टाच्या शरीरावर अनेक वारुळे उभी राहिली. त्यानंतर एकदा मुद्गल ऋषी अचानक तेथून चालत जात असताना वारुळात ‘ॐ ॐ ॐ’ असा मंत्रध्वनी ऐकू येऊ लागला. तसेच वाळक्या काठीलाही पालवी फुटलेली त्यांनी पाहिली. त्या वेळी मुद्गल ऋषींनी वारुळाची माती बाजूला करून त्याच्या जर्जर शरीरावर आपल्या कमंडलूतील तीर्थ शिंपडले. या तीर्थाचा प्रभाव एवढा मोठा होता की दुष्टाच्या भुवयांमधून एक सोंड वरती आली. हा चमत्कार पाहून तो दुष्ट उठला आणि त्याने मुद्गलांच्या पायावर डोके ठेवले. भृ्रकुटी म्हणजे भुवयांमधून त्यांना सोंेड फुटली म्हणून लोक त्याला ‘भृशुंडी’ असे म्हणू लागले. मग मुद्गल ऋषींनी त्याला ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आणि म्हणाले, ‘‘आता तुला साक्षात गणेशाचे रूप प्राप्त झाले आहे. हा तुझ्या कठोर तपश्चर्येचा महिमा आहे. सारे देव आता तुझे दर्शन घेण्यात धन्यता मानू लागतील. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील आणि एक कल्पापर्यंत तुला आयुष्य लाभेल.’’
मग भृशुंडीने तेथे एक आश्रम काढला. त्यामध्ये होमहवन करून एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राची अनुष्ठाने सुरू केली. खूप वर्षांनी गणपतीने तेथे येऊन त्यांना दर्शन दिले आणि सांगितले, तू तप केलेली ही जागा ‘नामलक्षेत्र’ म्हणून ओळखली जाईल. तू स्थापन केलेल्या या मूर्तीचे जो अत्यंत श्रद्धेने दर्शन घेईल, त्याला विद्या, संपत्ती, पुत्र, सुखप्राप्ती होऊन शेवटी मुक्ती मिळेल. तुला गाणपत्य संप्रदायात फार मोठे स्थान प्राप्त होऊन ते अक्षय राहील.’’ असे साक्षात गणेशाने सांगताच आपल्या मनातली आशा पूर्ण झाली या आनंदात भृशुंडीने गणेशाच्या चरणांवर ‘आशापूरक’ म्हणत आपला माथा टेकविला. गणपतीने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि तो अंतर्धान पावला.
या सर्व घटना आकाशातून सूर्याने पाहिल्या होत्या. पुढे सूर्यपत्नी आणि तिचा सावत्र पुत्र यम यांचे जोरदार भांडण जुंपले होते. तिने यमाला ‘तू घाणेरडा दिसशील’ असा शाप दिला. त्यामुळे यम अतिशय कुरूप, मलीन झाला. त्यावर सूर्याने त्याला उ:शाप दिला की, तुझ्यावरचा हा मळ दूर करण्याचे सामथ्र्य फक्त ‘आशापूरक’ गणेशातच आहे. तो तुला ना-मल करील. त्या ‘ना-मल क्षेत्री’ जाऊन तुझा करूपपणा आणि अन्य व्याधी जातील. त्या नामलक्षेत्री जाऊन यमाने गणेशदर्शन घेतले आणि तो शापमुक्त झाला.
पूर्वाश्रमी भृशुंडी हा दुष्ट वाटमाऱ्या करणारा होता. त्या पापाच्या पैशावर त्यांच्या आई-वडीलादी पितरांचा उदरनिर्वाह चाले. त्या तामसी अन्नाचा विपरीत परिणाम म्हणून त्याचे पितर नरकात महायातना भोगत होते. त्यांना मुक्ती मिळावी म्हणून भृशुंडीने स्वत: केलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीच्या पुण्यावर उदक सोडून ते पितरांना अर्पण केले. त्याक्षणीच गणपतीने त्याच्या सर्व पितरांना नेण्यासाठी नरकात विमान पाठविले व त्यांची कुंभीपाक नरकातून सुटका केली. ही आशाही गणेशाने पुरी केली. पितरांना पापाचा लागलेला मल या क्षेत्रीच बसून भृशुंडीने नामल, अमल केला. असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे. महान गाणपत्य साधू निरंजनस्वामी यांनी येथे गणेशोपासना केली. त्यांचे वंशज येथे असतात. कर्पूरा-बिंदुसुरा आणि नारदा या तीन नद्यांचा संगम येथे होतो. बीड येथे त्याच्या काठावरच ‘आशापूरक’ गणपतीचे दगडी मंदिर बांधण्यात आले आहे. अशी या गणेशाची आख्यायिका आहे.
ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि महेशाची पत्नी पार्वती या तिघींनी एकदा अत्री ऋ षींची भार्या अनसूया हिच्या पातिव्रत्याची परीक्षा बघण्याचा आग्रह आपापले पती ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्याकडे धरला. त्यानुसार अनसूयेची परीक्षा बघण्यास आलेल्या तिघांना अनसूयेने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांने बालकं बनवले आणि त्यांच्या भुकेची तृप्ती केली. पुढे तिथे तीन मुखांचे एक बालक निर्माण झाले. त्याला अत्री-अनसूयेने ‘दत्तात्रेय’ अशी हाक मारली. ते बालक पुढे मोठे झाल्यावर तप करण्यासाठी महादेवाचा अंशावतार म्हणून ‘दुर्वास’ ऋषी अरण्यात निघून गेले. ब्रह्मदेवाचा अंशावतार म्हणून ‘चंद्राने’ गुणेशाची आराधना करून त्याच्या भाळी स्थान मिळविले आणि फक्त विष्णू हेच दत्तस्वरूपात अत्री-अनसूयेपाशी राहिले. तेथे राहून त्याने अवधूत मार्गाने खूप तप केले, तरी त्यांच्या मनाला शांती लाभेना, त्या वेळी अत्री ऋषींनी आपल्या दत्तपुत्राला वैदिक गणेशोपासनेच्या मंत्राची दीक्षा दिली. ‘जय गणेश’ या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आणि त्यांना अनुष्ठाने करण्यास सांगितले. दत्तात्रेय एकदा आपल्या आश्रमात ध्यानस्थ बसले असताना ॐकारस्वरूप गुणेशाने त्यांना दर्शन दिले. त्या वेळी अत्री ऋषींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले-‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि.’ पुढे दत्तात्रेयांना पारमार्थिक, आध्यात्मिक या सर्व प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती येथे झाली. नंतर दत्तात्रेयांनी आनंदाने त्या जागी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि ‘विज्ञानगणेश’ असे त्याचे नामकरण केले. हा शुभ दिवस ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा होता, म्हणून या तिथीस येथे मोठी यात्रा भरते. नरान्तक आणि देवान्तक हे जुळे दैत्यबंधू ऋषिमुनींना त्रस्त करीत होते, त्या वेळी याच विज्ञान गणेशाने महोत्कटाचा अवतार घेऊन त्यांचा बंदोबस्त केला. सूर्यपुत्र शनी याला त्याच्या पत्नीने शाप दिला होता, त्याचे परिमार्जन व्हावे यासाठी शनीने येथील विज्ञानगणेशाची आराधना केली आणि तो शापमुक्त झाला. त्यामुळे या क्षेत्राला शनीचे राक्षसभुवन असेही म्हणतात. याच ठिकाणी पूर्वी गोदावरी गंगेचा आश्रम करून शंकराने समाधियोगाने विज्ञानगणेशाला प्रसन्न करून घेतले होते, तेव्हापासून तो सर्व विद्यांचा अधिपती ‘विद्यानाथ’ या पदवीला प्राप्त होऊन विज्ञानेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला, तेही स्थान येथून जवळच आहे. श्रीविज्ञानेश्वर शंकराचे स्थान गोदावरीच्या उत्तर तीरावर असून श्रीविज्ञान गणेशाचे मंदिर गोदावरी गंगेच्या दक्षिण तीरावर आहे. पूर्वी आद्य गाणपताचार्य परमश्रेष्ठी गुरू श्रीमुद्गलाचार्य महाराज यांनी सर्व ब्रह्मांडात दिग्विजय करून, धर्मसिद्धान्ताचे रक्षण व्हावे आणि अधिकारी संस्कारी जनांना यथाकाल ज्ञानमार्ग मिळावा म्हणून गाणेशीपीठांची स्थापना केली. त्या योजनेप्रमाणे दत्तात्रेयांची स्थापना या ‘कामस्वानंदपीठावर’ झाली असून येथे अखंड निवास करून, विंध्य पर्वतापासून कृष्णा नदीपर्यंतच्या प्रदेशात ज्ञानप्रदानाचे कार्य ते करीत असतात, अशी आख्यायिका आहे.
जालना जिल्ह्यतील विज्ञानगणेशाची मूर्ती सध्या असलेल्या मंदिराच्या खाली गुहेमध्ये होती. २०० वर्षांपूर्वी महान गणेशभक्त साक्षात्कारी यजुर्वेदी ब्राह्मण शंकरबुवा मंगलमूर्ती यांनी आपल्याला झालेल्या दृष्टान्ताप्रमाणे सदर मूर्ती गुहेतून बाहेर आणली आणि सध्याच्या ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली. पूर्वी या क्षेत्रास पेशवे सरकारातून काही उत्पन्न दिले जात होते.
इ.स. १७६३ साली या ठिकाणी निजाम व थोरले माधवराव पेशवे यांची मोठी लढाई झाली आणि पेशव्यांनी निजामाचा पूर्ण पराभव केला.
आदि शंकराचार्याचे गुरुबंधू श्रीद्रवीडपादाचार्य या स्थानी वास्तव्य करीत होते. या स्थानास ‘सिद्धार्थाश्रम’ असेही नाव पुराणात आहे.
श्रीगणपतीने ओझर येथे विघ्नासुराचा पराभव केला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे विघ्नेश्वर असे नाव धारण केले. तो हा ओझरचा विघ्नेश्वर ऋषिमुनींचा धावा ऐकताच ‘ओ’ देऊन ‘झर्कन’ धावत आला आणि त्यांच्यावरील विघ्नांच्या ओझ्याचे हरण केले, ते हे ‘ओ-झर’ आणि तेथील ॐकार म्हणजेच ‘विघ्नहारी असे सांगितले जाते! सर्व जगातील संकटे, अरिष्टे यांचा नाश व्हावा आणि सर्वत्र शांतता नांदावी या हेतूने सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन हिमालयामध्ये गणेशयाग सुरू केला होता. या यागामध्ये कुठल्याही देवदेवतेला आवाहन केलेले नव्हते, कारण तो फक्त ऋषिमुनींपुरताच मर्यादित होता; परंतु यागाला आपल्याला निमंत्रण नसल्यामुळे देवांचा राजा इंद्र याने काळाला (यमराजाला) विघ्नासुराचे रूप धारण करून ऋषिमुनींच्या यज्ञात प्रचंड विघ्ने आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऋषिमुनींना मरणप्राय दु:ख होऊ लागले. देवर्षी नारदांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ‘ॐश्रीं ग्लों क्लीं गं या मंत्राने आणि दूर्वार्चनाने गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. ऋषिमुनींच्या यज्ञामध्ये काळ हा विघ्ने आणत असल्याची वार्ता गणेशांच्या कानी आली आणि ऋषिमुनी आणि लोकांवर गुदरलेल्या विघ्नांचं ओझं ‘झरकन्’ दूर करण्यासाठी त्यांनी ऋषिमुनींच्या हाकेला ‘ओ’ दिली आणि तो ऋषिमुनींच्या यागातून वर आला. त्याला पाहताच काळरूपी विघ्नासुर तेथून पळत सुटला आणि महाराष्ट्रातील जुने नगर (जुन्नर) परिसरातील कुकडी नदीच्या आसमंतात येऊन वावरू लागला. येथे येऊन विघ्नासुर परत लोकांना त्रास देऊ लागला आणि कुणाकडे कुठेही काही चांगली गोष्ट घडत असेल तिथे विघ्ने आणू लागला. त्यामुळे मंगलकार्ये होईनाशी झाली, तेव्हा भयग्रस्त झालेल्या देवदेवतांनी पाश्र्व ऋषींकडून गणपतीची पुन्हा आराधना सुरू केली. पुन्हा गणेशाने पाश्र्व मुनींच्या पत्नीच्या पोटी जन्म घेतला आणि विघ्नासुराशी युद्ध करून त्याला जेरबंद केले. तेव्हा गणपतीपुढे लोटांगण घालून विघ्नासुराने जीवदान मागितले आणि गणरायाचा जयजयकार सुरू केला. तेव्हा विघ्नासुराने गणपतीकडे आणखीन एक प्रार्थना केली आणि गणपतीने ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे आपले नाव धारण करून, तेथे कायमचे वास्तव्य करावे आणि आपल्यालाही त्याच्यासमवेत स्थान द्यावे. त्याच्या या प्रार्थनेनुसार गणपतीने विघ्नासुराला आपल्या सैन्यात दाखल करून घेतले; परंतु हा दैत्य आपली मूळ विघ्नसंतोषी वृत्ती विसरेल की नाही, अशी शंका आली म्हणून गणपतीने त्याला सांगितले की, कोणतेही मंगलकार्य असो, तिथे शुभारंभी माझे पूजन झाले, तर मात्र तुला तेथे विघ्न आणता येणार नाही. शिवाय विघ्नहर किंवा विघ्नेश्वर या नावाचा जे जप करतील त्यांची विघ्ने नष्ट होतील. एवढे सांगून श्रीगणेश अंतर्धान पावले. विघ्नासुराला जायबंदी करून टाकल्यामुळे आता देवदेवतांवरची अरिष्टेही दूर झाली होती. या आनंदाप्रीत्यर्थ सर्व देवांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला दुपारी सूर्य माथ्यावर येतेसमयी येथे विघ्नेश्वराची प्रतिष्ठापना केली. तो हा ओझरचा विघ्नेश्वर!
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥
विद्येस प्रारंभ, विवाह वगैरे मंगलप्रसंगी, गृहप्रवेशप्रसंगी, यात्रा, युद्ध, संकटप्रसंगी जो विघ्नहराचे स्मरण, पूजन करील त्याचे संकट दूर होईल या श्रद्धेने मंगलकार्य ठरले असता दरवाजावर प्रथम गणपतीचे चित्र लावून तोरण बांधतात. लग्न-मुंज-वास्तुशांत, भूमिपूजनप्रसंगी निमंत्रण पत्रिकांवर प्रथम गणपतीचे स्मरण म्हणून ‘श्रीगजानन प्रसन्न’ असे छापण्याचा प्रघात आहे. पहिली अक्षत गणपतीला दिली जाते. सुपारीला गणपतीचे प्रतीक समजून मंगलकार्याचा शुभारंभ होतो. सुपारी स्वरूपातील गणपतीचे पूजन केले जाते.
सुपारी हा शब्द सु + पारी असा बनला आहे, म्हणजे चांगला गर असलेले फळ. सुपारीला संस्कृतमध्ये ‘पूगीफल’ असे म्हणतात. सुपारी ही समृद्धी, मांगल्य आणि प्रेमभाव याचे प्रतीक मानली जाते. अखंड सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते. घरी अक्षत घेऊन कुणी आले असता त्या दाम्पत्याला सुपारी (अखंड) देतात. त्यामध्ये तुम्ही आरंभिलेल्या कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये, तुमच्या घरात समृद्धी नांदो, अशी मंगल आणि प्रेममयी भावना आणि सदिच्छा सामावलेली असते.
वसईची मोहीम यशस्वीपणे करून येताना चिमाजीअप्पांनी या मंदिराचे शिखर बांधले व जीर्णोद्धार केला होता. त्यानंतरही पुन्हा जीर्णोद्धार झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे या विघ्नेश्वराचे मोठे भक्त होते
थेऊरच्या चिंतामणीबद्दल असे सांगितले जाते की ॐकारस्वरूपाने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि त्याच्यावर सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली. ब्रह्मदेव कार्य करू लागला, परंतु त्याच्या मनात माझ्याशिवाय कोणाचे काहीही चालणार नाही, असा अहंभाव निर्माण झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या हातून सृष्टिनिर्मितीच्या कार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ब्रह्मदेवाच्या चित्ताला काम-क्रोध-लोभ-मोह-मद आणि मत्सर हे षड्रिपू त्रास देऊ लागले आणि ब्रह्मदेवाचे चित्त अस्थिर झाले, त्या वेळी देवर्षी नारदांनी चिंतामणी गणेशाची उपासना करावयास सांगितली. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक या चित्ताच्या पाच भूमिका असून, त्यांना प्रकाशमान करणारा चिंतामणी असतो. त्याच्या आराधनेने चित्ताच्या या पाच अवस्था नष्ट पावून शांती प्राप्त होते. म्हणून नारदाने ब्रह्मदेवाला अर्धागिनीसमवेत ओंकाराची तपश्चर्या करण्यास सांगितले. नजीकच्या काळात ब्रह्मदेवाने मुळा-मुठा नदीच्या पात्रात एका पायावर उभे राहून ॐकाराची उग्र अनुष्ठाने केली. ॐकारदेव ब्रह्मदेवाला प्रसन्न झाले आणि त्याने त्याला आशीर्वाद दिले. पुढे ब्रह्मदेवाने या क्षेत्री मोठय़ा थाटामाटात, सर्व देवांच्या उपस्थितीत, गणेशाच्या मूर्तीची यथासांग प्रतिष्ठापना केली आणि त्याच्या गळय़ात मोठय़ा भक्तिभावाने चिंतामणी रत्नांचा हार घालून ‘चिंतामणी’ असे त्याचे नामकरण केले.
ब्रह्मदेवाच्या चित्ताला येथे स्थावरता म्हणजे स्थिरता प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला ‘स्थावर’ असे नाव पडले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन ‘थेऊर’ असे नाव रूढ झाले. या क्षेत्री गाणपत्य मुनी, कौंडिण्य हेही येथे राहून, त्यांनी ‘चिंतामणी’ गणेशाची उपासना, एक लक्ष दूर्वा वाहून केली. चिंचवडचे महान गाणपत्य साधू मोरया गोसावी यांनी येथील अरण्यात चिंतामणीचे खूप मोठे तप केले होते, तेव्हा चिंतामणीने त्यांना व्याघ्ररूपात दर्शन दिले होते. श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणीमहाराज यांना येथील मंदिर बांधलेले आहे.
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी येथील सभामंडप बांधला आणि मंदिराचा विस्तार केला. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी याच मंदिरात त्यांची प्राणज्योत मालवली. चिंतामणीच्या पायांपाशी आपला देहान्त व्हावा म्हणून, देहान्ताच्या अगोदर त्यांनी दहा हजार रुपये किमतीचा रत्नांचा हार चिंतामणीच्या गळय़ात घालून त्याची पूजा केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रमाबाई येथे सती गेल्या होत्या. मुळा-मुठा नदीच्या तीरावर त्या जागी एक वृंदावन बांधले आहे. दरवर्षी येथे कार्तिक वद्य अष्टमीला रमा-माधव स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो. चिमाजीआप्पांनी वसईच्या मोहिमेतून जिंकून आणलेली एक मोठी घंटा देवळाच्या सभामंडपात बांधलेली आहे. हे क्षेत्र ‘प्राजापत्य’ या क्षेत्रप्रकारात मोडते.
सौंदर्यवती तिलोत्तमेच्या मागे ब्रह्मदेव आकृष्ट झाले आणि तिच्यामागे ते धावू लागले. त्या वेळी त्यांची शक्ती स्खलित होऊन तीन ठिकाणी पडली. त्यातून तीन महादैत्य निर्माण झाले. महापाप, संकष्ट आणि शत्रू. या तिन्ही दैत्यबंधूंनी शिवाची उग्र तपश्चर्या केली आणि ब्रह्मांडाचे स्वामी व्हायचे वरदान मागून घेतले. असा वर मिळताच ते तिघेही उन्मत्त झाले आणि त्यांनी तिन्ही लोकांवर स्वामित्व मिळविले. सर्वत्र हिंडून ते सर्वाना त्रस्त करू लागले. स्वर्गातील ब्रह्मा-विष्णू इतकेच काय पण प्रत्यक्ष महेशालाही ते जुमानेसे झाले. यावर उपाय म्हणून सर्व ऋषीमुनी, देव एकत्र आले आणि शांतीसाठी मुनिश्रेष्ठ मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानी ॐकार गणेशाची आराधना करावयास सुरुवात केली. सर्वप्रथम शिव-पार्वती विदर्भातील अधासा गावी गेले. तेथे त्यांनी शमीवृक्षाचे रूप धारण केले. मुद्गल मुनींच्या पौरोहित्याखाली शमीवृक्षाखाली देवांची ॐ कारसाधना सुरू झाली. पुढे ॐकार गणेश प्रसन्न झाला. त्याने देवांच्या रक्षणार्थ तीन बाण महापाप, संकष्ट आणि शत्रू यांच्या काळजावर सोडले. ते तिघेही दैत्य मृत्युमुखी पडले. या तिन्ही दैत्यांचा नाश झाल्यावर ॐकार गणेश शमीवृक्षापाशी आला आणि त्याच्या मुळात जाऊन अंतर्धान पावला. मग मुद्गल मुनींनी तेथे ॐकार गणेशाची यथासांग प्रतिष्ठापना केली. त्या वेळी सर्व मुनींनी ‘जय गणेश’ असा जयजयकार केला, असे सांगितले जाते.
पुढे ती मूर्ती त्या शमीच्या मुळाशी एकरूप झाली आणि तेथे असंख्य शमीवृक्ष निर्माण झाले. म्हणून त्या जागेला ‘शमीवन’ आणि गावाला ‘शमीमूलपूर’ असे नाव पडले. तसेच शमीवृक्ष हा पश्चात्ताप झालेल्या भक्तांचे दोष त्यांच्या तपसाधनेनंतर दूर करणारा असल्याने या क्षेत्राचे ‘अदोष’ असेही नाव रूढ झाले.
और्व ऋषींना एक अतिशय सुंदर कन्या होती. तिचे नाव होते शमिका. तसेच धौम्य ऋषींना एक पुत्र होता त्याचे नाव होते मंदार. मंदार व शमिका यांचा विवाह झाला. एकदा त्यांच्याकडे भृशुंडी ऋषी आले असता त्यांचे ते लंबोदर पाहून, शमिका व मंदार यांना हासू आले. स्वाभाविकच भृशुंडीऋषी संतप्त झाले व त्यांनी त्या दोघांना ‘तुम्ही झाडे व्हाल’ असा शाप दिला. आपला पुत्र व सून यांची ही अवस्था झालेली पाहून धौम्य ऋषींना फार दु:ख झाले व त्यांनी त्या ठिकाणी गणेशाचे खूप उग्र तप केले. त्या वेळी धौम्यांनी शमिका व मंदार यांना पूर्ववत् करण्याची प्रार्थना केली. त्या वेळी गणेशाने ‘‘मी भृशुंडीचा शाप खोटा करू शकणार नाही. परंतु आजपासून मी मंदारवृक्षाच्या मुळाशी निवास करीन. तसेच त्याची फुले व शमीपत्रे मला प्रिय होतील असा वर दिला. शमीवृक्षाला अग्निगर्भा, केशमथनी, ईशानी, लक्ष्मी, तपनतनया, हर्विगधा अशीही नावे आहेत. हे झाड विघ्नांचे हरण करणारे असल्याने विजयादशमीच्या दिवशी याचे पूजन करून मगच सीमोल्लंघनास निघण्यात येऊ लागले. तसेच पुढे पांडवांनी अज्ञातवासात जाताना एका शमीवृक्षावर लपवून ठेवली होती.
याच क्षेत्री वामनाने (विष्णुरूपी अवतारात) बलीच्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरिता शमीविघ्नेशाची आराधना केली होती. त्याच्या कृपाबलाने बलीच्या यज्ञाचा विध्वंस करून सर्वत्र विजय संपादन केला. या प्रसंगाने सदर क्षेत्रस्थळी शमीविघ्नेशासमीप वक्रतुण्ड नावाने श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केली आणि तेव्हापासून हे क्षेत्रस्थान वामनस्थापित वामनवरद वक्रतुण्डाचे क्षेत्र म्हणून पुराणात प्रसिद्ध झाले. वामनाने प्रतिष्ठापना केलेली ही मूर्ती १८ फूट उंच, सात फूट रुंद, दशभुजा आणि उजव्या सोंडेची व सिंहवाहक आहे. हे मंदिर टेकडीवर पूर्वाभिमुखी आहे. या गणेशाच्या कृपेने विवाह लवकर जमतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कृतयुगामध्ये सिंधू देशात ‘पल्ली’ नावाचे एक गाव होते. त्या गावामध्ये कल्याण नावाचा एक वाणी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते आणि त्याला एक सुंदर, बुद्धिमान असा बल्लाळ नावाचा मुलगा होता. लहानपणापासून बल्लाळांचे मन देवपूजेकडे ओढले गेले होते. इतर कुठलेही खेळ खेळण्यापेक्षा दगडगोटे जमवून त्यांना गणपती मानून त्यांची पूजा अर्चा करणे हा त्याचा नित्याचा छंद होता. एकदा तो सर्व सवंगडय़ांसह रानात खेळायला गेलेला असताना दाट झाडीमध्ये एक पाषाणशिला पाहून त्यास गणपती मानून मंदार, शमी, कमळ, जास्वंदी इत्यादी फुलांनी तसेच आंबे, डाळिंब, केळी यांचा नैवेद्य दाखवून मोठय़ा प्रेमाने त्याची पूजा केली. मग सर्व मुलांनी ‘ॐ गं गणपतेय नम:’, ‘वक्रतुण्ड महाकाय’ इ. मंत्र, श्लोक म्हटले. सकाळी रानात गेलेली मुले रात्र झाली तरी घरी न परतल्यामुळे कल्याणासह सर्व पालक वनात गेले. बल्लाळाने गणेशाची केलेली पूजा आणि चाललेला मंत्रघोष बघून कल्याणाने त्याला खूप मार दिला आणि आपल्या पागोटय़ाने त्याला झालाडा घट्ट बांधून तावातावाने तो घरी निघून गेला.
दुसरे दिवशी डोळे उघडल्यावर बल्लाळाला झालेला प्रकार कळला व त्यास फार दु:ख झाले. आपण बांधलेले मंदिर, बांधलेली पूजा कोणी तरी उद्ध्वस्त केलेले पाहून संतापाच्या भरात तो म्हणाला-‘‘ज्या कोणी हे दुष्कृत्य केले असेल त्याच्या अंगाला दरुगधी सुटो व तो व्याधिग्रस्त होवो.’’ पुढे डोळे मिटून बल्लाळाने गणपतीची आराधना चालूच ठेवली. मध्यरात्रीनंतर एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्याजवळ आला आणि त्याने बल्लाळाची बांधलेल्या पागोटय़ातून सुटका केली आणि त्याच्या अंगावरून आपला हात फिरविला. हा तेज:पुंज ब्राह्मण म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात ॐकार गणेशच आहेत हे ओळखून त्याने गणेशाचे पाय घट्ट धरले. त्यावेळी गणेशाने वर मागावयास सांगितला असताना बल्लाळाने स्वत:साठी काहीही न मागता आपण येथेच राहून भक्तांचे निरंतर रक्षण करण्याची इच्छा प्रकट केली. नंतर ॐकार गणेश बल्लाळाने पूजलेल्या त्या शिळेमध्ये अंतर्धान पावला. बल्लाळासाठी त्याचा ईश्वर धावून आला म्हणून लोक त्या गणपतीला ‘बल्लाळेश्वर’ म्हणू लागले, अशी आख्यायिका आहे.
महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यतील सुधागड तालुक्यातील हे पाली तीर्थक्षेत्र असून, कृतयुगामध्ये त्याचे नाव ‘पल्लिपूर’ होते. फार पूर्वी हे मंदिर लाकडी होते. इ.स. १९७० च्या आसपास महान गणपतिभक्त श्रीमंत बाबुरावजी फडणीस आणि त्यांचे चिरंजीव मोरोबादादा यांनी याचा जीर्णोद्धार करून दगडी मंदिर बांधले. या मंदिराच्या जवळच ढुंढिराज विनायकाचे मंदिर असून तेथील मूर्तीही स्वयंभू आहे. पालीच्या बल्लाळाला जेथे गणपती प्रसन्न झाला होता, तेथे ॐकार गणेशाने बल्लाळाला गणेश लोकात नेण्यासाठी साक्षात् विमान पाठविले, अशी आख्यायिका आहे.
यदुवंशामध्ये धनक नावाचा राजा होता. महिष्मती (महेश्वर) त्याची राजधानी होती. त्याला चार पुत्र होते. त्यामुळे कृतवीर्य हा सर्वात थोरला पुत्र. तो पूर्वजन्मी भीम नावाचा हीन-दुष्ट प्रवृत्तीचा पुरुष होता. या राजाला पुत्रसंतान नव्हते. त्यासाठी तो वेगवेगळी व्रते करीत होता. देवर्षी नारदांनी त्याला संकष्ट-चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले होते. जे पूर्वी कृतवीर्याच्या पित्याला ब्रह्मदेवाने सांगितले होते. कृतवीर्याने ते व्रत यथासांग केले. त्याला एक पुत्र झाला. दुर्दैवाने त्या मुलाला हात-पायच नव्हते म्हणून सर्व दु:खी होते. हाच कृतवीर्य राजा दत्तात्रेयाचा महान भक्त होता. दत्तात्रेयांनी त्याचे दु:ख अंतज्र्ञानाने ओळखले व त्याला गणेशाची आराधना चालू ठेवण्यास सांगितले आणि पुत्राचे नाव ‘कार्तवीर्य’ असे ठेवण्यास सुचविले.
पुढे कार्तवीर्याने अरण्यात जाऊन ‘गणानां त्वा’ या जपाची अनुष्ठाने केली. पुढे माघ शुद्ध चतुर्थीला प्रवाळरत्नधारी ॐकार गणेश त्याला प्रसन्न झाला आणि त्याने त्यास वर मागावयास सांगितले. आपले दु:ख दूर करण्यासाठी आपल्याला सुंदर अवयव मिळावेत असा वर मागितला. त्यावेळी ॐकाराने त्या अपंग कार्तवीर्याच्या अंगावरून हात फिरविला. त्याचक्षणी तो सहस्रबाहुसंपन्न झाला. पुढे याच जागी कार्तवीर्याने प्रवाळरत्नांनी युक्त असलेल्या गणेशमूर्तीची होमहवनादी विधी करून प्रतिष्ठापना केली. पुढे गणेशाच्या आशीर्वादानुसार विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामाने त्याचा वध केला आणि त्याला मोक्ष मिळाला.
त्याच जागी आणखी एक घटना घडली. अमृतप्राप्तीसाठी देव-दानवांना समुद्रमंथन करून अमृतकलशाची प्राप्ती झाली होती. अमृतप्राप्ती माझ्यामुळे झाली असा शेषाला गर्व झाला. त्यावेळी शंकराने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यास पराभूत केले. त्यावेळी देवर्षी नारदांनी शेषाचे सांत्वन करून त्याला ‘गणेशाय नम:’ या मंत्राची अनुष्ठाने करावयास सांगितली. शेषाने ती एक हजार वर्षे अनुष्ठाने केली व श्रीगणेश त्याला प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले- ‘‘तू सहस्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. त्यामुळे भक्त मला ‘व्यालबद्धोदर’ असे म्हणतील, शिवाय पृथ्वीला तू फुलासारखी पेलून धरशील.’’ मग शेषानेही मूळ प्रवाळगेशमूर्तीनजीक आणखीन एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली, असे मानले जाते. त्यामुळे पद्मालय येथील या मंदिरात दोन गणेशमूर्ती आहेत. शेषाला धरणी पेलण्याचे सामथ्र्य गणेशाने दिले, म्हणून त्याने प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीला ‘धरणीधर गणेश’ असे नाव भक्तांनी दिले. या दोन्ही मूर्तीपैकी एक उजव्या सोंडेची तर दुसरी डाव्या सोंडेची आहे.
हे मंदिर डोंगरावर असून, तेथे एक तलाव आहे. त्यात विविध प्रकारची पद्मफुले फुललेली असतात. यावरून या क्षेत्राला ‘पद्मालय’ असे नाव पडले. अलीकडील काळात श्रीगोविंदमहाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. कार्तिकस्वामी हा गणेशाचा थोरला भाऊ. तो आपल्या धाकटय़ा भावाला भेटण्यासाठी कार्तिकी पौर्णिमेला येत असतो, त्यामुळे या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.
हे स्थान जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल गावापासून सुमारे पाच मैलांवर आहे. गणेशपुराणातील उपासना खंडाच्या ७४ व्या अध्यायात या क्षेत्राचा ‘प्रवाल’ म्हणून उल्लेख आहे.
कदंबपूरचा चिंतामणी
पराक्रमी राजा भीम याला गणपतीच्या आशीर्वादाने रुक्मांगद नावाचा एक पुत्र होता. रुक्मांगद हा कर्तबगार आणि सात्त्विक होता. प्रजेवर त्याचे पुत्रवत् प्रेम होते. एकदा तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना, खूप तहान लागली म्हणून वाचक्वनी ऋषींच्या आश्रमात गेला. त्यांची पत्नी मुकुंदा हिला रुक्मांगदाचे शरीरसौष्ठव आणि सौंदर्य पाहून भुरळ पडली. तिने प्रकट केलेल्या इच्छातृप्तीचा अवमान करून रुक्मांगद तेथून निघाला. तिने ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा त्याला शाप दिला. तत्क्षणी तो कुष्ठरोगी झाला आणि वनामध्ये अन्नपाणी वज्र्य करून राहिला. एक दिवस नारदमुनी तेथून जात असता रक्मांगदाने त्यांना आपली हकिकत सांगितली. त्यावेळी नारदांनी त्याला विदर्भदेशात कदंबक्षेत्री चिंतामणी गणेशाच्या समोर असलेल्या गणेशकुंडात स्नान करून व्याधिमुक्त होण्याचा सल्ला दिला. रुक्मांगदाने देवर्षीनी सांगितल्याप्रमाणे कदंबक्षेत्री जाऊन गणेशकुंडात स्नान केले व चिंतामणीचे उग्र तप केले. त्यामुळे त्याचे कुष्ठ जाऊन त्याला पूर्ववत् सुंदर रूप प्राप्त झाले. पुढे गणेशाने आपल्या दूताकरवी त्याला स्वानंदलोकी घेऊन जाण्यासाठी विमान पाठविले आणि आपल्या चरणांपाशी त्याला कायमचा आश्रय दिला, असे सांगितले जाते.
गौतम नावाचे एक ऋषी होते. त्यांची पत्नी अहल्या ही अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्याच्या ख्यातीमुळे इंद्राने तिला भ्रष्ट करावयाचे ठरविले. एकदा गौतमऋषी गंगा नदीवर स्नानासाठी गेले असताना त्यांचे मायावी रूप घेऊन इंद्र आश्रमात आला आणि त्याने तिचा उपभोग घेतला. दुर्दैवाने अहल्येने त्याचे मायावी रूप ओळखले नाही. तेवढय़ात गौतमऋषी गंगेवर स्नान उरकून आश्रमात परतले. झालेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी ‘तुझ्या शरीराला हजार भेगा पडतील’ असा इंद्राला शाप दिला आणि अहल्येलाही ‘तू शिळा होशील’ असा शाप दिला. तसेच ‘प्रभू रामचंद्रांचे चरण तुझ्या शिळेला लागतील तेव्हा तुझे स्वरूप प्रकट होऊन तुझा उद्धार होईल.’ असा उशापही दिला.
पुढे ‘गणानां त्वा’ मंत्राचे अनुष्ठान करून, कदंबवृक्षाखाली आसनावर बसून अन्नपाणी वज्र्य करून त्याने हजारो वर्षे तप केले. त्यामुळे त्याच्या शरीरावर वारूळ निर्माण झाले. त्याचे तप पाहून श्रीगणेश प्रसन्न झाले आणि त्याला परत स्वर्गात जाण्याचा आदेश दिला.
कदंबनगरीत इंद्राने एक गणेश मंदिर बांधले. तेथे चिंतामणी गणेशाची प्रतिष्ठापना केली. पूजा, होमहवन करून त्याने तेथे गंगा आणली आणि तेथे एक सरोवर निर्माण केले. त्यामध्ये भक्तिभावाने स्नान केल्यामुळे इंद्राला गौतमांच्या शापामुळे इंद्राची हजारो छिद्रे पडलेली कातडी तेथे गळून पडली आणि त्याला पूर्ववत सौंदर्य प्राप्त झाले. स्वर्गात जाता जाता इंद्राने आपली गळून पडलेली हजारो छिद्रांची कातडी झाडीमध्ये टाकून दिली. त्यातून खूप पिसे असलेला एक पक्षी निर्माण झाला. ती पिसे विविध रंगी व हात दीड हात लांब होती. त्याच्या अग्रभागी प्रत्येक पिसावर एक डोळा उमटलेला होता. तोच मोरपक्षी होय. चिंतामणीनगरमध्ये पुढे मोरांची वस्ती खूप वाढली.
कळंबक्षेत्र-कदंबक्षेत्र-चिंतामणीनगर-कदंबपूर अशा नावांनी विदर्भातील हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे ३३ फूट खोल आहे. त्याची रचना साधी असली तरी सुंदर आहे. पायऱ्या उतरून खाली गेले की एक चौकोनी कुंड आहे. त्यालाच गणेशतीर्थ किंवा पावनतीर्थ म्हणतात. त्याच्या तळाशी जिवंत पाण्याचे झरे आहेत. चर्मरोगी येथे स्नानासाठी येत असतात. हे क्षेत्र दैवक्षेत्रामध्ये अत्यंत श्रेष्ठ समजले जाते.
ॐकार गणेशाच्या मनात सृष्टी निर्माण करावी असे आले. त्या वेळी त्याला खूप आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवावर सृष्टीनिर्मितीचे कार्य सोपविण्यापूर्वी भूमीच्या अंतर्भागात स्वत:ला झालेला आनंद शतगुणित करण्यासाठी एक स्थान निर्माण केले. मग तो ॐकार स्वत: तेथे अवतरला म्हणून त्या क्षेत्राला ‘स्वानंदपूर’ असे नाव पडले. ‘भूस्वानंदभुवन’ असेही त्याला म्हणतात. ॐकार येथील ज्या भागात प्रगट झाला होता, त्या भागाचा आकार मोरासारखा होता. तसेच पूर्वी येथे फार मोठी मोरांची वस्ती होती म्हणून याचे ‘मोरगाव’ हे नाव प्रचलित झाले. ॐकार येथे सर्वात प्रथम अवतरला म्हणून या क्षेत्रात गणेश संप्रदायात आद्य पीठाचा मान लाभलेला आहे. या क्षेत्राला सर्वक्षेत्र, बीजक्षेत्र, क्षेत्रराज या नावांनी संबोधण्यात येते. या ठिकाणी सृष्टीनिर्मितीचे कार्य करण्या आधी ब्रह्मा-विष्णु-महेश-शक्ती आणि सूर्य या पंचदेवांनी ‘ॐ’ या मंत्राची अनुष्ठाने केली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी या पंचपरमेश्वरांना ॐकार गणेशाने दर्शन दिले. त्या दिवशी या पंचदेवांनी तेथे या ॐकार गणेशाची यथासांग प्रतिष्ठापना केली. ॐकाराचे हे आदिपीठ म्हणून येथे अनेक ऋषिमुनी वास्तव्य करून राहिले आणि ते येथे नित्य यज्ञ-याग करीत असत.
सिंदुरासुर आणि त्याचा सेनापती कमलासुर या दोघांचा वध ॐकाराने या ठिकाणी केला. पंचदेवांनी स्थापन केलेली मयूरेश्वराची मूळ मूर्ती मृत्तिका, लोह आणि रत्ने यांची होती. पुढे तिची झीज झाली, तेव्हा पांडवांनी ती मूर्ती तेथेच गुप्त स्वरूपात ठेवून, तेथे नवीन मोरया मूर्तीची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते.
महान गाणपत्य मोरया गोसावी यांनी १४व्या शतकामध्ये मोरगावात खूप मोठी तपश्चर्या केली. येथे कऱ्हा नदीतील ब्रह्मकमंडलू तीर्थामध्ये स्नान करीत असताना, एकदा त्यांच्या ओंजळीत तांदळा गणपतीची मूर्ती आली. पुढे त्यांनी ती मूर्ती चिंचवड येथे आणली. ही मूर्ती घेऊन मोरया गोसावी पुढे माघ आणि भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोरगावी जात असत. मंदिराजवळच्या ओवरीवर बसून श्रेष्ठ गाणपत्य श्रीगणेशयोगीन्द्रमहाराज यांनी अनेक वर्षे गणपतीची आराधना केली. मुद्गल पुराणावर भाष्य केले. गणेशगीतेवर टीका लिहिली. गणेशावरचे अनेक ग्रंथ त्यांनी येथे लिहिले. प्रसिद्ध योगीन्द्र मठाची स्थापना येथे त्यांनीच केली. हे गणेशक्षेत्र ‘स्वायंभुव’ क्षेत्रात मोडते.
वेदांमधील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत कथेसारख्या रंजक माध्यमातून लोकांच्या मनात बिंबविण्याचे फार मोठे कार्य पुराणांनी केले आहे. वेदव्यासांनीही १८ पुराणे गणेशाकरवी लिहून घेतली अशी आपली सश्रद्ध भावना आहे. पुराणांना वेदांचा आत्मा असे मानतात. ‘पुरा नव भवति। म्हणज जे प्राचीन असतानाही जे नूतन असते ते पुराण होय. वरील पुराणोक्त एकवीस गणेशकथा मुख्यत: गणेशपुराण आणि मुद्गल पुराण या गणपतीवर आधारित पुराणांमधल्या आहेत. तसेच काही कथा ब्रह्मवैवर्त, पद्मा, शिव, लिंग, वामन, मत्स्य, स्कंद, भविष्य पुराणांमध्ये आलेल्या आहेत. यातील सर्व जवळजवळ सर्व गणेशक्षेत्रे आसुरांचा, दैत्यांचा वध करण्यासाठी, देवांनी केलेल्या तपश्चर्येतून निर्माण झालेली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व पुराणोक्त कथांवरून गणेशाचे सार्वभौमत्त्व सिद्ध होते. प्रत्यक्ष पंचपरमेश्वरांना ही त्यांच्या संरक्षणासाठी गणेशाची आराधना करावी लागली, असे या आख्यायिका सांगतात.
एकदा त्र्यंबकेश्वरी शिव तप करीत बसले असताना, पार्वतीने औत्सुक्याने, ‘स्वत: देव असतानाही आपण कुठल्या देवाची तपश्चर्या करता?’ असा प्रश्न केला. त्यावेळेला शंकराने तिच्या प्रश्नाला उत्तर देताना म्ह्टले- ‘मी जरी देवांचा देव महादेव असलो तरी माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा एक देव आहे. तो मला प्रेरणा देणारा आहेच, पण माझ्याप्रमाणे विष्णु-ब्रह्मदेव-शक्ती-सूर्य-चंद्र- वरुण या सर्वानाच प्रेरणा देणारा आहे. सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी त्यानेच ब्रह्मावर, तिच्यातील सर्वाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी श्रीविष्णूवर, तर माझ्यावर संहाराचे उत्तरदायित्व सोपविले आहे. सर्व सिद्धी, सर्व विद्या सर्व कला त्याला अवगत असून तो गणांचा पति आहे, बलवान आहे. मंगलाचा तो आद्यदेव आहे. विघ्नांचे हरण करणाराही तोच आद्यदेव आहे. त्याच्या तपामध्ये फार मोठी शक्ती आहे, सामथ्र्य आहे. त्या देवादिदेवाचे नाव ॐकार आहे. त्याच्या जपाचा एकाक्षरी प्रभावी मंत्र ‘ॐ’ असून त्याचे मी रोज तप करतो. पुढे शंकर पार्वतीला म्हणाले, पुण्याचा साठा करण्यासाठी तुलाही एकांत जागी राहून तपश्चर्या करणे आवश्यक आहे.’’
शंकराने सांगितलेल्या तपाच्या महत्त्वाने पार्वती जीर्णपूर गावच्या नजीक, लेखन पर्वतामधील एका सुंदर लेणीमध्ये बसून ‘ॐ’ या महामंत्राचे अनुष्ठान करू लागली. (जीर्णपूर म्हणजे आत्ताचे जुन्नर शहर) उपासना करताना एखाद्या मूर्तीवर मन एकाग्र करण्यासाठी तिने आपल्यासमोर एका बालकाची मृत्तिकेची मूर्ती बनवून ठेवली. पार्वतीच्या तपश्चर्येला एक तप पूर्ण झाले. तेव्हा त्या मृत्तिकेच्या मूर्तीतून एक सोंड आणि चतुर्भुज असे बालक निर्माण झाले.
हा बालगणेश फार शूर होता. भक्तांची संकटे दूर करण्यासाठीच त्याने तेथे जन्म घेतला होता. साधुसंत, ऋषीमुनी, सज्जन यांना त्रस्त करणाऱ्या बालासुर, व्योमासुर त्याची राक्षसीण बहीण शतमहिषा, कमलासुर वगैरे अनेक दैत्यांना त्याने नष्ट करून टाकले. हा बालगणपती जेव्हा प्रगट झाला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. म्हणूनच पुढे या दिवशी घरोघरी मृत्तिकेची गणेशमूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. गिरी म्हणजे पर्वत. हिमालय या गिरिराजाची पार्वती ही कन्या. म्हणून तिचे नाव गिरिजा झाले आणि तिच्या आत्म्यापासून निर्माण झालेला देव म्हणून त्याचे नाव ‘गिरिजात्मक’ असे ठेवले, अशी आख्यायिका आहे.
हा लेणीमध्ये असलेला गणपती म्हणून याला लेण्याद्री म्हणतात. या लेणीच्या पिछाडीस एक गुहा होती. त्यामध्ये बसून गिरिजेने हे तप केले. गणेश तिच्या समोर आला, परंतु या लेणीच्या बाजूला त्याची पाठ आलेली होती. या गुहेत जाणे शक्य नाही. त्यामुळे लेणीतील गुहेमध्ये गिरिजात्मकाचा पृष्ठभाग असून, त्याची पूजा करण्यात येत असते. लेणीतील गणेश मंदिर दक्षिणाभिमुख असून, तेथे भव्य सभामंडप आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना ओवऱ्या आहेत. ‘गिरिदेव गणेशस्य स्वरूपं चेतिकीर्तितम्!’ म्हणजे हा लेखनाद्री पर्वतच गणेशाचे रूप आहे, असे पुराणांमध्ये म्हटले आहे. या पर्वतालाही भाविक लोक वंदन करतात.
महिष्मती नावाच्या नगरीत वरेण्य नावाचा राजा होता. ब्रह्मदेवाच्या जांभईपासून निर्माण झालेला सिंदुरासुर ऋषिमुनींना खूप त्रास देत असे. तेव्हा सर्वानी ॐकाराचे तप केले. ॐकार त्यांना प्रसन्न झाला आणि म्हणाला की, माझा निस्सीम भक्त आहे, राजा वरेण्याच्या घरी मी जन्म घेईन आणि सिंदुरासुराचा वध करीन.
गणेशमहाकल्पामधील ब्रह्मदेवाच्या पहिल्या दिनकल्पामध्ये पहिले त्रेतायुग प्रवृत्त झाले असता मैथिली देशामधील गंडकी नगरीत राज्य करणाऱ्या चक्रपाणी राजाला सिंधू नावाचा पुत्र होता. तो आसुरी प्रकृतीने संपन्न असा महापराक्रमी होता. त्याने सूर्याचे आराधन करून ब्रह्मण्डविजयी सामथ्र्य व सर्वथा अजिंक्यपद प्राप्त करून घेतले. पुढे त्याने ब्रह्मा-विष्णू आदी प्रमुख परमेश्वरांना जिंकून कारागृहात ठेवले व तो अखिल ब्रह्मांडाचा राजा झाला. त्या वेळी त्याने सर्वत्र धर्मनाश करून, देवमूर्तीचा विध्वंस केला. सिंधू दैत्याच्या कारागृहात अडकून पडलेल्या देवांनी गणेशाची आराधना केली. तेव्हा पार्वतीच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन तिला वरदान दिल्याप्रमाणे गणेशाने पार्थिव मूर्तीमधून ‘गुणेश’नावाचा अवतार धारण केला. कालांतराने त्याने सिंदुरासुराचा नाश केला. त्याआधी सिंधू दैत्याचा सेनापती महाबलाढय़ कमलासुर याच्याशी श्रीगणेशाचे फार मोठे युद्ध झाले आणि त्यात कमलासुराचा नाश झाला. त्यावेळी कमलासुराला मारण्यासाठी जो त्रिशूळ फेकला, त्याच्या योगाने कमलासुराच्या शरीराचे बरोबर तीन विभाग झाले. त्यापैकी शरीरामध्ये मुख्य असलेल्या मस्तकाचा भाग मोरेश्वर क्षेत्री पडला. कंठापासून नाभीपर्यंतचा भाग राजसदन क्षेत्र (राजूर) येथे पडला आणि नाभीपासून खालचा पायाचा भाग प्रवाळ क्षेत्र पद्मालय येथे जाऊन पडला, अशी आख्यायिका आहे. हीच क्षेत्रं गणेशाची साडेतीन पीठं म्हणून प्रसिद्ध पावली.
महिष्मती नगरीत (राजूर) पडलेला कमलासुराचा गळ्यापासून नाभीपर्यंतचा भाग ‘गुणेशा’च्या शौर्याचे प्रतीक म्हणून राजा वरेण्याने आपल्या राजवाडय़ाच्या आसमंतात बसविला. हा राजवाडय़ाचा भाग म्हणून सर्वजण याला राजापुरी म्हणत असत. गुणेश परत आपल्या राजुरीत आला, त्यामुळे राजा वरेण्य व राणी पुष्पिकेला फार आनंद झाला आणि त्यांनी गुणेशापाशी मोक्षाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुणेशाने योगाचा उपदेश करणारी व उपनिषदांचा भावार्थ सांगणारी ‘गणेशगीता’ त्यांना कथन केली. गणेशगीता कथन केल्यानंतर गुणेश तेथे गुप्त झाला. माघ शुद्ध चतुर्थीला वरेण्य राजाने त्याच्या मूर्तीची येथे यथासांग प्रतिष्ठापना केली आणि कठोर गणेशोपासना केली. राजूरगावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून, त्या ठिकाणाला गड असे म्हणतात. औरंगजेबाने याही मंदिराचा विध्वंस करण्याचे ठरविले होते, पण काही विपरीत घडल्याने त्याने हा विध्वंसक विचार सोडून दिला. हा गणपती नवसाच्या समईला पावतो असे मानले जाते, त्यामुळे तेथील मूर्तीपुढे शंभर ते सव्वाशे समया कायम तेवत असत. पूर्वी ही गणेश मूर्ती अंधाऱ्या गुहेत असल्यामुळे शेकडो समयांच्या ज्योतीमध्ये गणेश मूर्ती फारच विलोभनीय दिसत असे. आता येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथील मूर्तीची स्थापना सिंदुरवध झाल्यानंतर सर्व देवांनी व राजांनी मिळून केली म्हणून याला ‘दैत्यविमर्दन’ असेही एक नाव आहे.
त्रलोक्यवासी सर्वाना सर्वथा अजिंक्य असलेल्या त्रिपुरासुर दैत्याचा नाश करण्याकरिता आरंभीच्या युद्धात पराजित झाल्यानंतर नारदाच्या अनुमतीने श्रीशंकरांनी गणेशाचे आराधन केले. प्रभूच्या त्या कृपाबलाने त्याने त्रिपुरासुराचा नाश केला. त्या प्रसंगी शंकराच्या अनुग्रहाचे जे स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले, तेच ‘रांजणगाव’ होय. शिवाने ही तपस्या दण्डकारण्यामध्ये पद्मासन घालून ‘ॐ ॐ’ या एकाक्षरी मंत्राने जपानुष्ठान केले. त्यावेळी त्यांच्यासमोर एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व प्रकट झाले त्याला पाच मुखे, दहा भुजा होत्या. भाळी चंद्रकोर, गळय़ामध्ये वासुकी नागांच्या माळा होत्या. हजारो सूर्याचे तेज त्याच्या मुखकमळावर विराजत होते. त्या ॐकारस्वरूप गणेशाच्या दर्शनाने शिवांना अत्यानंद झाला. त्यावेळी गणेशाने त्याला सांगितले की, मी सांगतो ते सहस्रनाम संकटनाशक स्तोत्र म्हणून बीजमंत्र उच्चारीत त्रिपुरासुरावर बाण सोड. या मंत्रबाणाने त्याची तिन्ही पुरे भस्मसात होतील आणि त्याचा तात्काळ वध होईल.
ॐकारस्वरूप जिथे प्रकट झाले होते, त्या दण्डकारण्य या पवित्र ठिकाणी महादेवाने सुंदर मंदिर बांधले. त्यामध्ये महागणपतीची प्रतिष्ठापना केली. या गणपतीला पोवळे व मोती म्हणजेच मणी फार प्रिय आहेत. म्हणून महादेवाने येथे सुंदर नगरी वसवली व तिचे ‘मणिपूर’ असे नाव प्रसिद्ध केले. त्रिपुरासुराचा शिवाने वध केला, त्या दिवशी कार्तिक पौर्णिमा होती. तेव्हापासून शिवाचे नाव ‘त्रिपुरारी’ झाले. त्रिपुर+ अरि= त्रिपुरारि. त्रिपुरासुराचा अरि म्हणजे शत्रू. त्रिपुरासुराचा शत्रू तो शिव. त्रिपुरासुराची प्रतीकात्मक त्रिपुरवात करून, सायंकाळी गृहिणी शिवमंदिरात प्रज्वलित करतात. या दिवसात दीपोत्सवही करण्यात येऊ लागला. शिवाने मणिपूर येथे फाल्गुनातील शुद्ध चतुर्थीला गणेश बीजमंत्राने आणि गणेशसहस्रनामाने अनुष्ठाने करून व्रत केले. त्याने नक्त (फक्त प्रदोषकाली जेवण्याचे व्रत) करून तिलमिश्रित अन्नाचे पारणे केले आणि ‘शूराय वीराय गजाननाय लंबोदरायैकवरदाय’ या मंत्राने महागणपतीचे पूजन करून विघ्ननाशासाठी होम केला. चार महिने हे व्रत केल्यावर पाचव्या मासी शिवाने सुवर्णाची गणेशमूर्ती करून तिचे पूजन करून तिलासहित ती दान केली. सागरात प्रवेश करण्यापूर्वी श्रीकृष्णाने हे व्रत केले होते, असे म्हटले जाते.
रांजणगाव गणपती मंदिराचा सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बांधलेला आहे. पेशव्यांचे सरदार पवार आणि शिंदे यांनी येथील ओवऱ्या बांधलेल्या आहेत. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराच्या आत व बाहेर असे गाभारे बांधले आहेत.
गणेशपूरचा गणेशजी
त्रिपुरासूर हा मूळचा देवांशधारी वाचक्नवी मुनींचा पौत्र (नातू) व महागाणपतश्रेष्ठ श्रीगृत्समदांचा पुत्र होय. दोषसंस्कारांच्या बीजामुळे त्याच्या ठिकाणी असुरभाव वाढत होता. तथापि मूळच्या गाणपत संगतीमुळे व गणेशमार्गाची पित्याकडून दीक्षा प्राप्त झाल्यामुळे (गृत्समदांनी त्याला ‘गणानां त्वा’ मंत्राचा उपदेश केला होता.) त्याने प्रत्यक्षात गणेशाची मोठी आराधना करून, खूप ऐश्वर्य प्राप्त केले. त्याने ज्या ठिकाणी गणेशाची आराधना केली आणि वरप्राप्ती झाली त्या स्थळी त्याने गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली, असे सांगितले जाते. ते स्थळ ‘त्रिपुरानुग्रहदगणेशक्षेत्र’ गणेशपूर या नावाने आत्ताच्या बांग्लादेशमध्ये प्रसिद्ध आहे.
गृत्समद ऋषींनी पुष्पकारण्यामध्ये एका पायावर उभे राहून आणि दिवसाकाठी फक्त एक वाळलेले पान खाऊन गणेशाची घोर तपश्चर्या केली, असे सांगितले जाते. पाच हजार वर्षे ही तपश्चर्या झाल्यावर एके दिवशी त्याच्या समोर ऋद्धि-बुद्धिसहित श्रीगणेश येऊन उभे राहिले. गृत्समदाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यावेळी गणेशाने त्यांना ‘ॐगणानां त्वा गणपतिं हवामहे। कवि कवीनामुपश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्!’ (ऋग्वेद २.२३.१) (गणांचा नायक, श्रेष्ठ कवी (ज्ञाता,) सर्वत्र कीर्ती पसरलेला, सर्व मंत्रांचा रक्षक, अशा हे गणपते, आम्ही तुला बोलावीत आहोत. हे आमचे आमंत्रण ऐकून, आमचे संरक्षण करण्याच्या सर्व साधनांसह तू आमच्या निवासस्थानी येऊन राहा.) हा महामंत्र सांगून त्याचे जनकत्व बहाल केले आणि वसिष्ठ, विश्वामित्र यांच्या श्रेणीत त्याची गणना केली. त्या वेळी गणेशाने त्याला वर दिला की ‘फक्त शिव सोडून, बाकी सर्वाना अजिंक्य ठरेल असा पुत्र तुला होईल आणि तोही माझा भक्त असेल.’ हा वर देऊन गणेश अदृश्य झाला. त्या पावन भूमीवर गृत्समदाने सुंदर मंदिर बांधले. त्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. भक्तांना वर देणारा म्हणून त्याचे नाव ‘वरदविनायक’ ठेवले. पुढे गृत्समदाला पुत्रप्राप्ती झाली तोच ‘त्रिपुर’ होय. वरदविनायकाच्या या क्षेत्राला ‘पुष्पक’ क्षेत्र असेही म्हणतात. गृत्समदाने येथे तप केले आणि तो मंत्रद्रष्टा झाला. म्हणून या क्षेत्राला ‘भद्रक’ असेही म्हणतात. सध्या ‘महड’ नावाने हे क्षेत्र ओळखले जाते. १७२५ मध्ये येथील मंदिराचा जीर्णोद्धार कल्याणचे सुभेदार सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला व त्यांनीच पुढे महड गाव विनायकाला अर्पण केले.
काश्मीरचा कश्यपनन्दन महोत्कट
ॐकारस्वरूप गणेशाने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचे सामथ्र्य दिले. एवढी मोठी सृष्टी निर्माण करण्यासाठी सहकार्यासाठी त्याने कश्यप, गौतम, जमदग्नी, भरद्वाज, अत्री, विश्वामित्र आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र तयार केले. त्यामध्ये कश्यप हा प्रजापती सर्वात बुद्धिमान होता. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पृथ्वीनिर्मितीच्या कार्याअगोदर त्याने कश्यपाला एकाक्षर गणेशाचा उपदेश करून त्या मंत्राने अनुष्ठान करण्यास सांगितले. कश्यपाच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येने ॐकार गणेश प्रसन्न झाला. कश्यपाच्या विनंतीवरून त्याच्या घरी ‘कश्यपनन्दन’ म्हणून अवतार घेतला. रौद्रकेतू नावाच्या अत्यंत सात्त्विक ब्राह्मणाच्या पोटी देवान्तक आणि नरान्तक या जुळय़ा पुत्रांनी जन्म घेतला. देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून त्या दोघांनी हिमालयात जाऊन शिवाची उपासना करून एक वर मागून घेतला. त्या दोघांना देव, मानव, दानव, नाग, सर्प, गंधर्व या कोणाकडूनही मरण येणार नाही, तसेच त्यांना त्रिभुवनाची राज्यप्राप्ती होईल असा वर मिळाला. पण या वराचा दुरुपयोग करून या दोघांनी तिन्ही लोकांना त्राही भगवान करून सोडले. या दैत्यांचा वध करण्यासाठी ॐकारने कश्यपपत्नी अदितीच्या पोटी विनायक रूपात जन्म घेतला, असे सांगितले जाते. या विनायकाला ‘कश्यपनन्दन,’ ‘महोत्कट’ आणि ‘विनायक’ असेही संबोधले जाऊ लागले. हा प्रभूंचा कश्यपनन्दन महोत्कट नावाचा अवतार असून ‘विनायक’ या संज्ञेने तो विशेष प्रसिद्ध आहे. या अवतारामध्ये विनायकाने अनेक लीला केल्या आणि शेवटी आपल्या अवतारकार्याला अनुसरून देवान्तक-नरान्तकांचा नाश करून यथापूर्व धर्मस्थापना केली. याच कश्यपाश्रमामध्ये कश्यपांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. आर्षसंज्ञक गणेशक्षेत्रांमध्ये याचा अंतर्भाव होतो. हिमालय हा सर्वात मोठा असलेला पर्वत. महापर्वत. त्याच्याजवळ वराहमूलम क्षेत्री कश्यप-अदिती यांचा आश्रम होता. त्याच ठिकाणी त्यांनी ॐकाराची आराधना केली होती. येथे कश्यपाने पर्वत फोडून सरोवर आटविले आणि सपाट भूप्रदेश निर्माण केला. ‘मीर’ म्हणजे पर्वत. कश्यपाचा म्हणून त्याला कश्यपमीर असे म्हणून लागले. त्याचे पुढे अपभ्रंशाने ‘काश्मीर’ असे नाव पडले. श्रीनगरनजीकच्या बारामुल्ला येथे जी ‘महोत्कट’ गणेशाची मूर्ती आहे, तीच कश्यपाने स्थापन केलेली गणेशमूर्ती आहे. तिचे एक ठाणे श्रीनगरमध्ये असून ‘गणेशजी का मंदिर’ म्हणून ते तिथे प्रसिद्ध आहे.
एके काळी मधू आणि कैटभ नावाचे दोन दैत्य ब्रह्मदेवाची अनेक वर्षे तपश्चर्या करते झाले. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. या राक्षसांनी ब्रह्मदेवाकडून पुढील जन्मी अमर होण्याचा वर प्राप्त केला. तसेच त्यांचा मृत्यू कशात आहे हे जर स्वत:च त्यांनी सांगितले तर श्रीविष्णूंकडून मृत्यू ओढवेल, असेही त्यांना सांगून ठेवले अन् त्यांच्या मृत्यूचे विशिष्ट स्थान त्यांना कानात सांगितले. पुढे हे दैत्य साधू, संत, सज्जन, ऋषिमुनी यांना त्रास देऊ लागले. त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्वजण श्रीविष्णूंकडे आले. कालांतराने, देव आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध झाले, पण देवांना काही यश येईना. नंतर भगवान शिवांच्या सांगण्यावरून विष्णूंनी सिद्धक्षेत्र नावाच्या ठिकाणी ‘ॐ’ या एकाक्षरी आणि ‘गणेशाय नम:’ या षडाक्षरी मंत्राचे अनुष्ठान सुरू केले. तसेच ‘वेदपादस्तव’ स्तोत्राचे पठन केले. श्रीविष्णूंच्या तपामुळे संतुष्ट झालेल्या ॐकाराने त्यांची विनंती मान्य केली आणि आपली चतुरंग सेना घेऊन साक्षात ॐकार रणांगणावर दाखल झाले आणि त्यांनी मधू आणि कैटभ राक्षसांचा पराभव केला. युद्धानंतर यापुढे कुठलाही दैत्य माजला तर त्याचा वध करण्याची सिद्धी श्रीविष्णूंनी ॐकारांकडून मागून घेतली, अशी आख्यायिका आहे.
या सिद्धक्षेत्री प्रकट झालेली गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून, त्याच्याच कृपेने दैत्यांचा वध करण्याची सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्या गणेशाचे नाव ‘सिद्धिविनायक’ असे पडले. हे क्षेत्र दंडकारण्यातील भीमा नदीच्या तीरावर वसले आहे. येथील गणेशमूर्ती गंडकीय पाषाणाची असून गजवक्त्रादी चिन्हयुक्त आहे. हे स्थान सिद्धाश्रम / सिद्धिक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
या मंदिराजवळ महर्षी व्यासांनी यज्ञ केलेली जागा आहे. चिंचवडचे महान साधू श्रीमोरया गोसावी यांनी सिद्धटेकलाच प्रथम गणेश आराधना केलेली होती. केडगावचे नारायणमहाराज यांनीही येथे उपासना केली होती. पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी आपले सेनापतिदल गेल्यानंतर येथे २१ दिवस श्रींची उपासना केली होती आणि आपले सेनापति-पद पुन्हा मिळविले होते. खडर्य़ाच्या लढाईनंतर ते येथेच दिवंगत झाले. येथील देवळाचा आतील गाभारा साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे.
पारिनेर (मध्य प्रदेश)चा मंगलमूर्ती
वेदमंत्रद्रष्टे महर्षी भरद्वाज हे अवंती राजधानीजवळ आश्रम करून राहात होते. त्यांना भूदेवीपासून झालेला पुत्र म्हणजे भौम, शरीराने रक्त वर्णाचा म्हणून ‘अंगारक’ नावाने प्रसिद्ध होता. भरद्वाजांनी आपल्या प्रिय पुत्राला सविधि गणेश उपासना करण्याचा उपदेश केला. नर्मदा नदीच्या किनारी अत्यंत एकांतस्थळी भौमाने मोठय़ा भक्तिभावाने व दृढ निष्ठेने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध करून, निराहार स्थितीत, पद्मासन घालून एक हजार वर्षे गणेशाची आराधना केली. भौमवाराने (मंगळवार) युक्त असलेल्या माघ मासातील कृष्ण चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला प्रभू गणनाथ प्रसन्न होऊन, दश-आयुधांसह, दशभुजाधारी व शुण्डादण्डाने युक्त असे आपले दिव्य स्वरूप प्रकट करून, भौमाला दर्शन देते झाले. त्यावेळी संतुष्ट झालेल्या गणेशाने भौमाला वरदान दिले की, ‘मंगल’ या नावाने तू प्रसिद्ध होऊन, ग्रहमालिकेत प्रविष्ट होशील. स्वर्गलोकांमध्ये अखंड राहशील. भौमवारयुक्त कृष्णचतुर्थी ‘अंगारकी’ चतुर्थी म्हणून प्रसिद्ध होऊन, मला अत्यंत प्रिय होईल आणि तिचे अनुष्ठान करणाऱ्याला बारा चतुर्थी व्रताच्या अनुष्ठानाचे पुण्य लाभेल. या व्रताच्या प्रभावाने तू पुष्कळ काळपर्यंत या अवंतीनगरीचा राजा होऊन, सर्व प्रकारच्या भोगांना प्राप्त होशील. शेवटी वरीलप्रमाणे स्वर्गवास, सुखादी सर्व कामना पूर्ण होतील. नंतर भौमाने अनुष्ठानाच्या ठिकाणी दशभुजांनी युक्त अशी प्रभूची मूर्ती स्थापन केली आणि ‘मंगलमूर्ती’ या संज्ञेने तिची अर्चना केली, असे मानले जाते. सदर क्षेत्रस्थान अवंतीनगराने विभूषित असलेल्या प्रांतात पारिनेर नामक नगरापासून पश्चिमेकडे नर्मदाकिनारी असल्याचे पुराणात वर्णिले आहे. पुढे हा भौम अवंतीनगरीचा अधिपती झाला. ‘मंगल’ आणि ‘कुज’ हीही त्याचीच नावे आहेत. तो रक्तवर्णी असून, त्याला तांबडी फुले प्रिय आहेत. त्याला चार हात आहेत. अवंती तथा उज्जनीमध्येच क्षिप्रा नदीच्या तीरावरच याचा जन्म झाला. त्या ठिकाणी एक शिवालय असून, त्याला ‘मंगळेश्वर’ म्हणतात.
श्रीलक्षविनायकाचे स्थान हे पूर्वी एलापूर नावाच्या नगरीमध्ये होते. ही नगरी शिवपुत्र स्कंदाने स्थापिलेली आहे. वर्तमानकाळात या स्थानास वेरूळ म्हणतात. हे स्थान कोरीव लेण्यासंबंधी सर्वत्र प्रसिद्ध असून शंकराच्या बारा ज्योतिर्लिगांपैकी एक घृष्णेश्वर क्षेत्र म्हणूनही हे प्रसिद्ध आहे.
अशी आख्यायिका आहे की तारकासुर नावाचा कुणी महाबलाढय़ दैत्य होऊन गेला. त्याने अत्यंत उग्र तपश्चरण करून ब्रह्मदेवाची आराधना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याच्या इच्छेनुरूप सर्व प्रकारचे वरसामथ्र्य आणि विद्यमान अशा देवेश्वरादी सर्वापासून अभय दिले आणि सांगितले की जेव्हा कदाचित शंकरापासून पार्वतीच्या ठिकाणी कुमाराचा संभव होईल, तेव्हा मात्र त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल. त्यानंतर अमोघ वरसामर्थ्यांने संपन्न झालेल्या तारकासुर सर्वत्र त्रलोक्यवासी जनांना पीडा देऊ लागला. स्वर्ग-मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांवर आक्रमण करून तेथील देवादिकांना जिंकून, तो महापराक्रमी दैत्य त्रलोक्याचा राजा झाला आणि सर्वत्र धर्मकर्माचा पूर्णपणे नाश करून, स्वत:ची पूजा-अर्चा करविता झाला. म्हणून इंद्रादी सर्व देव शंकराकडे गेले आणि त्याला तारकासुरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. शिवाने आपला पुत्र स्कंद यास तारकासुराशी युद्ध करण्यास पाठविले. त्याला युद्धात यश येईना म्हणून शिवाने त्याला घृष्णेश्वरी जाऊन ॐकार गणेशाची उपासना करावयास सांगितली. पार्वतीने त्याला कानात सांगितले हा ॐकार गणेश पुढील अवतारात तुझा धाकटा भाऊ होईल. ही गोष्ट कळल्यावर स्कंदाला खूप आनंद झाला आणि त्याने घृष्णेश्वर क्षेत्री अन्नपाणी वज्र्य करून, विघ्नहर्त्यां विनायकाच्या तपाची एक लक्ष अनुष्ठाने केली. ॐकार गणेश स्कंदाला प्रसन्न झाला. त्याने स्कंदाजवळ असलेल्या बाणावरून आपला हात फिरवला. तसेच आपले वाहन मयूर त्याच्या स्वाधीन केले आणि ॐकार गणेश अंतर्धान पावला. स्कंदाने मग त्याजागी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. एक लक्ष अनुष्ठानांमुळे तो प्रसन्न झाला होता, म्हणून ‘लक्षविनायक’ नावाने त्याचा जयघोष केला. मयूरावर आरूढ होऊन तो पुन्हा युद्धासाठी गेला. गणपतीने दिलेल्या बाणाने त्याने तारकासुराचा वध केला. पूर्वी येथे एल नावाचा राजा राज्य करीत होता म्हणून या क्षेत्राला एलापूर असे म्हणत असत. छत्रपती शिवाजीमहाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले हे वेरुळचे पाटील होते. एल राजा हा महागाणपत्य श्री गाग्र्यमहर्षीचा शिष्य असून गणेशाचा भक्त होता.
प्रयागचा ॐकार गणेश
गणपती म्हणजे शब्दब्रह्म, जो ॐकार, त्याचे प्रतीक. सृष्टीचा आदीकंद. परब्रह्माचे पहिले व्यक्त स्वरूप. यातील परब्रह्मापासून शुभारंभी आकाश उत्पन्न झाले आणि त्यातून ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राचा नाद घुमला असे मानले जाते आणि त्यातून ‘ॐ’नाद झाल्यानंतर, त्या ॐकाराच्या मनात सृष्टी निर्माण करावी असे आले. या सृष्टीनिर्मितीसाठी ॐकार पुन्हा स्वर्गात आले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची कल्पना ब्रह्मा-विष्णू-महेश यांना सांगितली. सृष्टीसंबंधी जाणून घेण्यासाठी ॐकाराने ब्रह्मदेवाला त्याच्या लंबोदरामध्ये फिरवून सृष्टीची माहिती दिली. नंतर या ॐकार स्वरूपाने आपल्या श्वासोच्छ्वासामधून ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद व अथर्ववेद असे चार वेद निर्माण केले. या चार वेदांनी ॐकार गणेशाची प्रतिष्ठापना केली व त्याची उपासना सुरू केली, असे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील हेच ते प्रयाग-तीर्थस्थान ॐकार गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावले. ब्रह्मदेवाने येथे ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राचा जप केला आणि हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर प्र-याग म्हणजे मोठा गणेशयाग केला. ॐकार स्वरूपाला दक्षिणा म्हणून लाडक्या कन्या रिद्धि व सिद्धि त्याला अर्पण केल्या. या तीर्थक्षेत्राचा उल्लेख स्कंद पुराणात केला आहे. प्रयाग क्षेत्राची महती सांगणारा श्लोक खालीलप्रमाणे आहे तो असा-
ग्रहणां च यथा सूयरे नक्षत्राणां यथा शशी।
तीर्थानामुत्तमं र्तीथ प्रयागाख्यमनुत्तमम्॥
चारही पुरुषार्थाना (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) ढुंढित तिन्ही लोक फिरणारा म्हणून याचे नाव ‘ढुंढिराज’. ढुंढिराज-विनायक-गणपती. काशी विश्वनाथाच्या मंदिरात या ढुंढिराजाची मूर्ती असून ती गंडकी नदीतील काळय़ा पाषाणाची असून ती शेंदूरचर्चित आहे. साक्षात शिवशंकराने त्याची प्रतिष्ठापणा केलेली आहे. काशीमध्ये पुराणोक्त ५६ विनायकांची ठाणी असून, त्या सर्व विनायकांचा ढुंढिराज हा नायक आहे. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रेला पूर्णत्व येऊ शकत नाही, असे मानले जाते.
भस्मासुराचा मुलगा दुरासद नावाचा दैत्य अत्यंत बलाढय़ व विष्ण-ुशिवादी सर्वाना अजिंक्य असा होऊन गेला. त्याने तीनही लोक जिंकून देवांना पदभ्रष्ट केले आणि विशेषकरून काशी क्षेत्रनिवासी लोकांना फारच पीडा दिली. तेव्हा विष्णु-शिवादी देवांच्या प्रार्थनेवरून व आदिशक्तीच्या ध्यानबलाने प्रसन्न होऊन, सर्वात्मा श्रीगणेशाने आदिशक्तीच्या तेजापासून एक परमदिव्य असा अवतार धारण केला आणि दुरासदाचा नाश केला. दैत्यभयापासून काशी क्षेत्राची मुक्तता झाल्याने सर्व देवांनी ते स्थान शंकराच्या स्वाधीन केले. तेव्हा आदिशक्तीच्या व सर्व देवांच्या अनुमतीने शंकराने गणेशमूर्तीची स्थापना करून, त्या ठिकाणी अखंड वास करण्याविषयी गणेशाची प्रार्थना केली. त्याप्रमाणे ढुंढिराज गणेश प्रभू त्या मूर्तीमध्ये अंतर्हित झाले आणि हे काशी क्षेत्र गाणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले, अशी आख्यायिका आहे. ब्राह्मक्षेत्रामध्ये हे अत्यंत श्रेष्ठस्थान म्हणून गणले जाते. तसेच ‘मोक्षस्वानंदपीठ’ म्हणून गाणेश गुरुपीठांमध्येही याचा निर्देश केला जातो. याच काशी क्षेत्रामध्ये दिवोदास नावाच्या राजाने गणेशाची मोठी उपासना केली आहे.
विजयपुरीचा विघ्नराज
कालानल (यमाच्या मदनाग्नीतून निर्माण झालेला असा) किंवा अनलासुर- (अग्नीतून निर्माण झालेला असुर) याने ब्रह्मा-विष्णू-महेश इत्यादी सर्व देवांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यांच्या बंदोबस्तासाठी सर्व देवतांनी ॐकाराची आराधना करण्यास सुरुवात केली, त्या वेळी ॐकार तेथे बालरूपात प्रकट झाले. बालरूपी गणेशाने पुढे अनलासुर राक्षसाला आपल्या सोंडेने पकडून गरागरा फिरवले. त्याला फिरवून, आपटून मारण्याचा बेत होता, परंतु तो जिथे आपटला जाईल तिथे ज्वाला निर्माण होऊन तो प्रकट होई.
कुंभकोणम्मधील श्वेतगणेश
तामिळनाडूतील तेजावर प्रांतात तिरुवळंचुलीया हे क्षेत्र कुंभकोणम्जवळ कावेरी नदीच्या काठावरील कपर्दिकेश्वर महामंदिराजवळ आहे. अशी आख्यायिका आहे की दुर्वास ऋषींनी इंद्राला दिलेल्या शापामुळे इंद्राची सर्व लक्ष्मी निघून जाऊ लागली. दुर्वास ऋषींच्या वाऱ्यालाही कधी लक्ष्मी उभी राहत नसे. ते अत्यंत रागीट होते; परंतु त्यांचे तप:सामथ्र्य पाहून सर्व देव त्यांचा आदर करीत असत. गेलेल्या लक्ष्मीला परत मिळविण्यासाठी विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्व देव-दानवांनी मेरूच्या रवीने आणि वासुकी नागाच्या रस्सीने समुद्रमंथन आरंभले. दुर्दैवाने प्रारंभीच प्रचंड वाफा निघून सागरातून हलाहल विष बाहेर पडू लागले. या विषामुळे समुद्राचे पाणी विषारी होऊन जलचर सृष्टीचा नाश होईल आणि देव-दानवांनाही त्या विषामुळे अपाय होतील म्हणून श्रीशंकराने ते विष पिऊन टाकले. त्यामुळे शिवाचा कंठ निळा पडला आणि सर्व देवदेवता त्याला तेव्हापासून निळकंठेश्वर संबोधू लागले. हाच निळकंठेश्वर हिमालयात बद्रिनाथनजीक स्थिरावला आहे. तेथील भागास निळकंठेश्वर म्हणतात.
विष-उत्पत्तीनंतर त्या समुद्रमंथनातून अक्राळविक्राळ अशा डरकाळय़ा फोडीत काळ्याकुट्ट मांजरावर आरूढ होऊन अवदसा ही विघ्नसंतोषी क्षुद्र देवता बाहेर पडली. ही अवदसा केर, कोळसे व घासलेट अशा ठिकाणी वास्तव्य करीत असते. केरसुणी हे तिचे प्रतीक आहे. ही जरी क्षुद्र देवता असली तरी ती विष्णुपत्नी लक्ष्मीची थोरली बहीण आहे. म्हणून तिला ज्येष्ठा असेही म्हणतात. इकडे देव-दानवांच्या श्रमाचे साफल्य होत नव्हते. त्यांनी देवर्षी नारदांना साकडे घातले. त्या वेळी नारद म्हणाले-‘‘कोणतेही सत्कार्य असो वा मंगलकार्य असो, त्याच्या शुभारंभी गणेशपूजन झालेच पाहिजे. त्या गणेशाच्या सामर्थ्यांपुढे ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे सामथ्र्यही कमकुवत आहे. समुद्रमंथन प्रारंभी गणेशपूजनाचे विस्मरण घडल्यामुळे तुम्हाला या कार्यात यश येत नाही. तेव्हा आता तुम्ही जेथे ही घुसळण करीत आहात तेथे पाण्यावर जो पांढराधप्प फेस निर्माण होत आहे, तो श्रद्धायुक्त अंत:करणाने ओंजळीत घ्या आणि त्याची श्वेत-गणेशमूर्ती करून तिचे पूजन करा आणि पहिल्याप्रमाणे सागरमंथनाचे कार्य सुरू करा.’’ पुढे इंद्रादी देवांनी सागरावर निर्माण होणारा पांढराशुभ्र फेस हातात घेतला व त्याची गणेशमूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना केली. त्याचेच नाव पुढे श्वेत-गणेश असे रूढ झाले. समुद्रमंथनातून विष्णूचा अंश असलेल्या धन्वंतरीची हातात अमृत कलशासहित उत्पत्ती झाली. इंद्राने ते अमृत सुवर्णपात्रात घेऊन श्वेतगणेशाच्या मूर्तीवर त्याचे लेपन केले. त्यामुळे त्या श्वेतगणेशाचे दुसरे नाव ‘सुधागणेश’ असेही प्रचलित झाले. इथे या मूर्तीला ‘वेल्लयीपील्लैयार’ म्हणतात. याचा अर्थ श्वेतगणेश असा आहे. हे गणेशमंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. इंद्राने अहल्येचा अवमान केला होता, तेव्हा तिच्या पतीने त्याला शाप दिला होता. त्या पापाचे क्षालन होण्यासाठी इंद्राने येथे गणपतीची आराधना केली आणि त्यामुळे तो शापमुक्त झाला. या ठिकाणी हेरंड ऋषींचा आश्रम होता. ते महान गणेशभक्त होते. त्यांच्या इच्छेला मान देऊन इंद्राने पुढे ही मूर्ती हेरंड ऋषींच्या आश्रमापाशी आणून तिची प्रतिष्ठापना केली, असे मानले जाते.
अखिल गणेश-गुरुपीठांपैकी धर्मस्वानंदपीठ या संज्ञेने हे क्षेत्र प्रसिद्ध आहे.