वर्षभर या ना त्या कामात मी बिझी असतो. पण, आमच्या घराच्या गणपतीचे दीड दिवस मात्र मी राखून ठेवतो. या दोन दिवशी मी अजिबातच काम करत नाही. संपूर्ण वेळ बाप्पा आणि बाप्पासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी देतो. या दिवसांमध्ये फोनही मी शक्यतो बंदच ठेवतो. नातेवाईक, आप्तेष्टांची भेट होते. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. पूर्वी आम्ही गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजींना बोलवायचो. पण, नंतर असं लक्षात आलं की आजकाल गुरुजी मंडळी त्यांच्या कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांची आणि आमची वेळ जमून येत नाही. जमून आलीच तरी प्रतिष्ठापनेची पूजा उरकली जाते. ही गोष्ट मला खटकते. गणपतीला आपण एवढय़ा श्रद्धेने, आदराने घरी आणणार आणि त्याची प्रतिष्ठापनाच जर व्यवस्थित होणार नसेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता आम्ही घरातलेच एकत्र बसून प्रतिष्ठापनेची सगळी तयारी करतो. आमच्याकडे शाडूची मूर्तीच असते. मी आमच्या मूर्तिकाराला मूर्तीसाठी वापरायचे रंग हे नैसर्गिक असू दे, त्यात कोणतंही रसायन नको, असं सांगितलंय. सजावटीत घरातल्या सगळ्यांचाच मोठा सहभाग असतो. माझे आई-बाबा, बायको दीप्ती, तिचे आई-बाबा, आमच्या दोघांची भावंडं असं प्रत्येक जण या सजावटीत सहभागी होत असतो. प्रत्येकाच्या कल्पना, क्रिएटिव्हिटी सगळ्याचा समतोल राखून बाप्पासाठी आरास आणि सजावट केली जाते. खरं तर या दिवसांमध्ये खाण्याची मजा असते. पण, मी गोड खाणं खूप कमी केलंय. मात्र मोदक अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळूच शकत नाही. त्यामुळे जरा बेतानेच, पण मोदकांवर ताव मारतो.
श्रेयस तळपदे

देवाचं आदरातिथ्य
आमच्या घरच्या गणपतीची ६३ वर्षांपासूनची परंपरा आहे. माझ्या बाबांच्या जन्मापासून बाप्पा आमच्या घरी येतोय. गणेशोत्सवाचं एक वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे इतर अनेक सणांना लोक मंदिरांमध्ये देवाचं दर्शन घ्यायला जातात. हा एकच सण असा आहे की, या सणात देव स्वत:च भक्तांच्या घरी येतो. ‘अतिथी देवो भव’ असं आपली संस्कृती सांगते. घरी आलेल्या पाहुण्यांना देवासारखं वागवण्याची आपली संस्कृती आहे. तर मग देवच जर आपल्या घरी आला तर तो आनंद नक्कीच वेगळा असतो. मला गणेशोत्सवात असंच वाटत असतं. वर्षांतले दोन दिवस मी अजिबात काम करत नाही. गणपतीचे दोन दिवस. माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे तयारीचा एक दिवस आणि गणपतीचे हे दोन दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचे असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी आमच्या घरी जवळपास हजारहून अधिक माणसं येतात. या दोन दिवसांतही मी खूप बिझी असतो. पण, ते फक्त बाप्पासाठीच. वर्षभर भेटता न आलेले काही नातेवाईक बाप्पाच्या निमित्ताने आवर्जून भेटायला येतात. मागच्या वर्षीपासून इको-फ्रेंडली गणपतीची आम्ही सुरुवात केली आहे. तसंच गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत होतो. पण, त्यातही आता बदल केलाय. गणपतीची पंचधातूची मूर्ती तयार करून घेतली आहे. गणेशोत्सव साजरा करताना आम्ही पर्यावरणाचंही तितकंच भान ठेवलंय. सजावटीचा फारसा झगमगाट कधीच नसतो. त्यामुळे बाप्पाचं स्वागत आमच्याकडे वाजतगाजत होत नसलं तरी आनंदाने आणि प्रसन्नतेने होतं. कारण मनापासून आणि श्रद्धेने त्याचं आदरातिथ्य केलं तरी ते धूमधडाक्यात केल्यासारखंच असतं असं मला वाटतं. लोकांनी एकत्र जमावं, भेटावं हा मूळ उद्देश आमच्या घरी गणपतीच्या दिवसांत सफल होतो, याचा मला आनंद आहे.
स्वप्निल जोशी

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

फक्त बाप्पासाठी
गणेशोत्सव माझा सगळ्यात आवडता सण. वर्षभर इतर कोणत्याही सणांना मी सुट्टी वगैरे घेणार नाही, पण गणपतीच्या वेळी सगळी कामं बाजूला ठेवून हमखास सुट्टी घेतो. हे सगळे दिवस खास बाप्पासाठी राखून ठेवलेले असतात. कितीही काम असलं तरी गणपतीच्या दिवसांमध्ये सुट्टी हवी असल्यामुळे आधीचे दिवस जरा जास्त काम करून तेव्हाच संपवतो. त्यामुळे कामाचं दडपण मनात न ठेवता गणपतीचे दिवस एन्जॉय करता येतात. गौरी विसर्जनापर्यंत माझ्या घरी गणपती असतो. त्यामुळे कधी पाच, सहा तर कधी सात दिवस बाप्पा आमच्या घरात असतो. आरास, सजावट, कोणत्या दिवशी काय कार्यक्रम करूया याची चर्चा आणि या सगळ्यासाठी केलेलं जागरण हे माझं सगळ्यात आवडीचं. खरं तर मी अलिप्त राहणं पसंत करतो, पण या सणात मला अनेकांना भेटावंसं वाटतं, त्यांच्यात मिसळावंसं वाटतं. गणेशोत्सव असतोच असा. आता गेल्या दोन वर्षांपासून प्रियाही घरी आलीय. त्यामुळे उत्साहात आणखीच भर पडलीय. तिची खूप मदत असते. सजावटीत ती अनेक गोष्टी सुचवत असते. वर्षभर नातेवाईकांना भेटणं होत नाही. पण, बाप्पाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. सगळे भेटल्यावर घरातला माहोल खूपच मस्त असतो. रोज नैवेद्याला काय करायचं, गोड पदार्थ काय, या सगळ्यावर चर्चा सुरू असते. रोजच्या रोज सकाळ-संध्याकाळ वेगवेगळा स्वयंपाक असतो. म्हणजे चटणी-कोशिंबीरपासून ते भाजी, आमटीपर्यंत त्यात वैविध्य असतं. उकडीचा मोदक, बेसनाचा लाडू, अळूचं फदफदं हे या सणातले हायलाइट्स असतात असंच मला वाटतं. आणि एरव्ही डाएटवर असणारा मी त्या दिवसांमध्ये या सगळ्यावर ताव मारतो. त्या भरलेल्या ताटाकडे बघून मन प्रसन्न होतं.
उमेश कामत

सार्वजनिक गणेशोत्सव आवडीचे
मला सार्वजनिक गणशोत्सव जास्त आवडतो. माझ्या घरी दहा दिवस गणपती असतो. पण, मला नेहमीच सार्वजनिक मंडळांचं अप्रूप वाटत आलं आहे. लोकमान्य टिळकांनी जो उद्देश ठेवून गणेशोत्सव सुरू केला होता तो उद्देश सगळी सार्वजनिक मंडळं जपतात. म्हणून मला सार्वजनिक मंडळांचे गणपती आवडतात. अशा मंडळांमध्ये गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम होत असतात. आणि अशा कार्यक्रमांमधून अनेकांना चांगलं व्यासपीठ मिळतं. मी स्वत: अशा कार्यक्रमांमधून परफॉर्म केलंय. तिथून माझा आत्मविश्वास वाढत गेला. या उत्सवाच्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावं, भेटावं, एकमेकांशी बोलावं, नाती जपावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू असतो. या उत्सवामुळे मंडळांमधली एकी बघून आनंद होतो. आमच्या घरच्या गणपतीची बरीचशी तयारी आई करते. उत्सवाच्या सुरुवातीच्या आधीच्या दिवसांमधली लगबग, सजावटीची तयारी, जागून केलेली आरास, मित्रमंडळींसोबत केलेला दंगा हे सगळं मी खूप एन्जॉय करते. गणपतीच्या आधी घराला रंग काढू या किंवा वेगळा रंग देऊ या, मूर्ती कोणती आणायची वगैरे सगळ्यावर चर्चासत्रच होत असतं. बाप्पाची प्रतिष्ठापना ते विसर्जन असे सगळे दिवस मी एन्जॉय करायचे. पण, आता शूटमुळे इतका वेळ देणं जमत नाही. मी मुंबईत आणि घर पुण्यात असल्यामुळे सगळे दिवस तिथे राहणं शक्य होत नाही. पण, जेव्हा जाते तेव्हा या सणाचा मनसोक्त आनंद घेते. आरती, मंत्रपठण, भजन या सगळ्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होऊन जातं आणि घराला वेगळंच रूप प्राप्त होतं. बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य केले जातात. त्याच्याबरोबर आमचीही खाण्याची चंगळ असते. मला मात्र डाएटमुळे स्वत:वर फारच कंट्रोल ठेवावा लागतो. पण मोदकांशी नो कॉम्प्रमाइज..
प्राजक्ता माळी

Story img Loader