चित्रपटसृष्टी म्हणजे झगमगाट, गॉसिप, मेकअप, एवढंच नव्हे तर इथे सणदेखील तेवढय़ाच उत्साहाने, गांभीर्याने साजरे होतात. राज कपूर यांच्यापासून सुरू झालेला आरके स्टुडिओचा गणेशोत्सव हे याचं ठळक उदाहरण आहे.
‘शोमन’राज कपूरने आपल्या निर्मिती व दिग्दर्शनीय चित्रपटांतून भारतीय लोकसंस्कृती, लोकगीत-संगीत-नृत्याचे दर्शन घडवतानाच प्रत्यक्षातही भारतीय परंपरा, मूल्ये, संस्कृती यांची जपणूक केली..
चेंबूर येथील ‘आर.के. स्टडिओ’ या भव्य वास्तूमधील श्रीगणेशोत्सव हे त्यासंदर्भातील सर्वात मोठे उदाहरण होय.
‘राज कपूरचा सिनेमा’या विषयाचा शोध घेताना अथवा अभ्यास करताना त्याच्या निर्मिती-दिग्दर्शनातील ‘आग’ या चित्रपटापासूनचे विषय, त्याच्या नायिका, त्या नायिकांचे ‘पटकथेच्या गरजे’नुसार व राज कपूरच्या ‘शैली’नुसार मुक्तछंदातले रूपेरी दर्शन, त्याच्या चित्रपटातील गीत-संगीत-नृत्य, त्याच्या चित्रपटातील मनोरंजनातून प्रबोधन यापलीकडे जाऊन बघताना असे दिसते की, पडद्यावरचा व प्रत्यक्षातील राज कपूर यांचे एकमेकांशी खूप चांगले नाते जुळते. प्रत्यक्षातील विविधरंगी आयुष्यातून राज कपूरला पडद्यासाठीच्या कामगिरीसाठी कल्पकता-कल्पनास्फूर्ती मिळत असावी..
आर. केची ‘पार्टी’, आर.के.ची होळी व त्याच आर.के.चा श्रीगणेशोत्सव हे त्यामधील तीन महत्त्वाचे घटक होत.
आर.के.च्या पहाटेपर्यंत रंगणाऱ्या ‘ओल्या पार्टी’तून ग्लॅमर व गॉसिपचा न थांबणारा ओघ सुरू राहिला तर होळीतून मस्ती-मौज-मोकळीक यांचे बेधुंद रंग उधळत राहिले. राज कपूरच्या निधनानंतर ‘कपूर खानदाना’च्या पाटर्य़ा खूपच खासगी स्तरावर गेल्या (अन्यथा पूर्वी आर. के.चे प्रसिद्धी प्रमुख बनी रुबेन हे आम्हा पत्रकारांना त्या पार्टीचे आवर्जून आमंत्रण देत, ‘राम तेरी गंगा मैली’च्या यशाच्या पार्टीची चव आजही जिभेवर आहे) आर.के.ची होळीदेखील कपूर खानदानाच्या ‘पुढील पिढी’ने बंद केली.
गणेशोत्सव मात्र सुरू आहे..
मुंबईतील ‘चित्रपट स्टुडिओ’तील श्रीगणेशोत्सवात प्रतिष्ठेचे अथवा मानाचे गणपती दोन! एक परळ येथील राजकमल स्टुडिओतील व दुसरा अर्थातच आर. के. स्टुडिओचा. यापैकी राज कमल स्टुडिओत ‘नवरंग’ चित्रपटापासून चित्रपती व्ही. शांताराम यांनी श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू केली, ती आजदेखील सुरू आहे. व्ही. शांताराम अत्यंत शिस्तबद्ध असल्याने राजकमलच्या गणपतीची विसर्जनाची मिरवणूकदेखील सभ्यता पाळूनच होऊ लागली.
राज कपूर म्हणजे एकूणच मोकळं-ठाकळं व भरभरून जीवनाभुव घेणारे व्यक्तिमत्त्व! त्या गुणाचा प्रभाव आर. के.च्या सणांवर पडणे स्वाभाविक आहे. १९४८ साली आर. के. स्टुडिओची प्रतिष्ठापना झाली व काही वर्षांंतच तेथे ‘श्रीगणेशोत्सव’ सुरू झाला. भव्य कपूर खानदान, आर. के.च्या चित्रपटाचे तंत्रज्ञ व स्टुडिओतील कामगार असे तीनही घटक त्यासाठी एकत्र येऊ लागले. तात्पर्य, कसलाही भेदभाव न होता आर. के.तील गणेशोत्सव सुरू झाला व आजही तीच परंपरा कायम आहे. सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज कपूर या गणपतीची पूजा करत (आजच्या पिढीला सांगायचे तर रणबीर कपूरचे ते पणजोबा). श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे कपूर कुटुंबीय येथे हजर राही. पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर राज कपूरने तर त्याच्या निधनानंतर रणधीर कपूरने पूजेची ती प्रथा कायम ठेवली. राज कपूरसोबत त्याची पत्नी कृष्णा कपूर असे. रणधीरसोबत पूर्वी त्याची पत्नी बबिता असे. लहानपणी लोलो अर्थात करिष्मा कपूर व बेबो अर्थात करिना कपूर यांनीदेखील येथे पूजेचा आनंद घेतला. ऋषी कपूरचा नीतू सिंगशी विवाह झाला. मग त्यांना रणबीर व रिद्धीमा ही मुले झाली. कपूर खानदान वाढत गेलं. शम्मी कपूर आणि शशी कपूर यांचंही कुटुंब वाढत गेलं. त्यांची पत्नी, त्यांची मुले असा गोतावळा वाढत राहिला. दुसऱ्या बाजूने कृष्णा कपूरचा भाऊ प्रेमनाथ, मग त्याची मुले प्रेम, किशन व मोन्टी असा हा परिवार वाढत राहिला. काही वर्षांंतच रणधीरशी बिनसल्याने बबिता दोन मुलींना घेऊन वसरेवा येथे राह्य़ला गेली. दोन्ही मुली मोठय़ा झाल्या व स्टारही झाल्या, पण आपल्या ‘घरच्या अर्थात आर.के. स्टुडिओतील गणपतीच्या दर्शना’साठी त्या आवर्जून येतात. ऋषी कपूरदेखील आपल्या कुटुंबासह पाली हिल येथे राहायला गेला. पण तोदेखील कुटुंबासह गणपती पूजनाला आर.के. स्टुडिओत येतो. धाकटा राजीव कपूर या स्टुडिओपासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावरील आर. के. कॉटेजमध्ये राहतो.
गेल्या काही वर्षांत तर राज कपूरची तीनही मुले व नातू रणबीर आपण ‘कपूर’ आहोत हे विसरून आणि आपले ‘स्टार’पण बाजूला ठेवून आर.के. स्टुडिओच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात, झांजा वाजवतात, एखादा ठेका पकडतात, गणपती बाप्पा मोरया म्हणतात. ही ‘बातम्यांच्या शोधा’मध्ये असणाऱ्या वृत्त वाहिन्यांची हुकमी बातमी झाली आहे. अर्थात, चेंबूर परिसरातील रस्त्यावरचे हे कपूर खानदान ‘कव्हर’ करणे खूप सोपे असते. ‘अंजाना अंजानी’ चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीच्या दिवसांत प्रियांका चोप्रादेखील ‘कपूर अॅण्ड कपूर’सोबत या गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील झाली. याप्रसंगी ते ‘स्टार’ नसतात, तर ते गणेशभक्त असतात. विशेषत: रणबीर तर त्यात तल्लीन झाल्याचे जाणवते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत आर.के. स्टुडिओत होणाऱ्या कोणत्याही चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरणातील कलाकार या गणपतीचे दर्शन घेतात, आशीर्वाद मागतात, ही सहजभावना झाली. आर.के.च्या गणपतीबाबत हिंदी चित्रपटसृष्टीच्या जवळजवळ चार पिढय़ांना कल्पना आहे, हे विशेष!
१९७३ साली श्रीगणेशोत्सवानंतर ‘बॉबी’च्या प्रदर्शनाची तारीख (२८ सप्टेंबर) असल्याने राजेश खन्ना व डिंपल या पती-पत्नीने याच आर.के. स्टुडिओतील गणपतीचे आवर्जून दर्शन घेतल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे. राजेश खन्ना तेव्हा प्रचंड लोकप्रिय असल्याने त्याच्या दर्शनासाठी स्टुडिओबाहेर गर्दी उसळलीच.
आर.के. स्टुडिओत चित्रीकरणाची वर्दळ वाढल्याने राज कपूरने पुणे जिल्ह्य़ातील लोणी येथील आपल्या ‘राज कपूर फार्म’वर चित्रीकरण सुरू करताना तेथेही छोटासा गणपती आणणे सुरू केले.
आर.के. स्टुडिओच्या भव्य व आल्हाददायक वास्तूत प्रवेश करताच सर्वप्रथम समोरच त्याची कार्यालयीन इमारत व मिनी चित्रपटगृह आहे. त्याच्या पुढे गेल्यावर समोरच या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते.
हिंदी चित्रपटाचे विश्व म्हणजे, मुहूर्तापासून प्रीमियपर्यंत झगमगाट, मोठय़ा मोठय़ा बाता, ‘गल्ला पेटी’वरचे उत्पादनाचे वाढीव आकडे, छान-शान खरे-खोटे हसणे, गुलाबी-बदामी फोटो एवढेच नव्हे तर येथे सणदेखील गांभीर्याने साजरे होतात. त्यामुळे आर.के. स्टुडिओच्या गणपतीची परंपरा टिकून आहे.