भारतातल्या मान्सूनचा अभ्यास करत फिरणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट या वर्षी गंगेच्या खोऱ्यात फिरतो आहे. या भागात गंगासागर बेटावरचं जीवनमान आणि मान्सूनचा काय संबंध त्यांना पाहता आलं याविषयी-
गेली चार र्वष ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या प्रकल्पाद्वारे भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फिरून, मान्सून आणि माणूस यांमधल्या वेगवेगळ्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी एक गट भारतभर फिरतो आहे. यामध्ये पावसाचा हवामानशास्त्रीय अभ्यास, पाऊस आणि जैवविविधता आणि पावसाचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम, अशा तीन विस्तृत विषयांवर अभ्यास होणार आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’ हा प्रकल्प ‘सिटिझन्स सायन्स’ या गटाच्या स्वयंसेवी सदस्यांनी मिळून गेली पाच र्वष सतत सुरू ठेवला आहे. या वर्षी त्यांचा प्रवास गंगेच्या खोऱ्यातून होणार आहे.
नागपूरमधल्या नीरी (ठएएफक) या संस्थेकडून गंगेबद्दल माहिती गोळा करून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट कोलकात्याच्या दिशेने झारखंड आणि छत्तीसगढच्या मार्गाने निघाला. कोलकात्याला एक दिवस विश्रांती घेऊन गट, गंगा जिथे समुद्राला मिळते, या गंगासागर या बेटावर जायला निघाला.
गंगासागरच्या मार्गावर दक्षिण २४ परगणा जिल्हा लागतो. या ठिकाणी काकद्वीप आणि गंगासागर ही दोन ठिकाणं आहेत. या जिल्ह्यत जसं आपण प्रवेश करतो तसं आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा, प्रत्येक घरासमोर छोटी तळी दिसायला लागतात. जाताना खांद्यावर कावड घेतलेली अनेक माणसं बघायला मिळाली. बघितल्या बघितल्या ते काय वाहून नेत आहेत हे नक्की लक्षात आलं नाही. त्यात परत तेही कावड मुद्दामहून हलवत घेऊन चालले होते. काही ठिकाणी त्यांची खूप गर्दी दिसली, तेव्हा त्यांच्याशी गप्पा रंगल्या. ते सगळे एका गावामध्ये चालले होते आणि त्या गावामधून छोटे मासे घ्यायला आले होते. तर हे सर्व माशाचे व्यापारी होते हा उलगडा झाला, पण त्यांच्याकडे बघून त्यांचा पेहराव एखाद्या मच्छीमार किंवा शेतकऱ्याचा असावा तसाच होता. इथे सर्व ठिकाणी असाच माशांचा व्यापार चालतो.
फार पूर्वी गंगेचा प्रवाह कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, पटणा, कोलकाता असं करून तो गंगासागरला मिळायचा. हा प्रवाह अनेक वर्षांच्या काळात थोडा थोडा पूर्वेकडे सरकत चालला होता. त्यामुळे आता गंगेचा मूळ प्रवाह हा कोलकात्यामधून वाहत नाही. तो प्रवाह आता बांगलादेशात जातो. बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यावर या गंगेचं नाव ‘पद्म’ होतं. त्यानंतर ही पद्म आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्या मिळून बांगलादेशामधून खाली समुद्राला मिळतात. आता या दोन नद्या, म्हणजे ब्रह्मपुत्रेने आणलेला सगळा गाळ, गंगेने आणलेला सगळा गाळ या ठिकाणी साठला जातो. हा जगातला सर्वात मोठा डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. या त्रिभुज प्रदेशमध्येच सुंदरबन आहे. या प्रदेशाचा ६० टक्के भाग बांगलादेशमध्ये असून ४० टक्के भाग भारतामध्ये आहे.
गंगेच्या पूर्वीच्या प्रवाहामधून सध्या हुगळी नदी वाहते, पण हुगळी ही गंगेच्या तुलनेने अगदीच छोटी नदी आहे. ही गंगेची अगदी छोटी शाखा म्हणूनच ओळखली जाते. ही नदी नंतर नंतर कोरडीही पडायला लागली. ज्या शहरामधून ही नदी वाहते ते शहर पूर्वी वसलं होतं ते गंगेच्या काठावर. हा ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचा असा जुना व्यापारी मार्ग आहे. समुद्राच्या मार्गाने, कोलकाता, मग पटणा असा. काशीमधून जहाजं निघायची ती कोलकात्याच्या मार्गाने इंडोनेशिया, जावा-सुमात्रा या सगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचायची. हा मार्ग साधारण दोनेक हजार र्वष सुरू होता, परंतु १८ व्या शतकामध्ये गंगेचं पात्र बदलायला लागलं आणि त्याबरोबरच या पात्रामध्ये गाळाचं प्रमाण खूप जास्त असल्याने नदीला अडथळा निर्माण होऊ लागला. असं झालं की नदी वेगळा मार्ग शोधते. गंगेचा मार्गही या प्रकारामुळे बदलत गेला. त्यामुळे आता गंगा मुख्य शहरामधून वाहत नसल्याने कोलकाता या शहराचं महत्त्व, जे गंगा नदी असताना होतं, ते कमी होत गेलं. स्वातंत्र्यानंतर आपण इथे फराक्का हे एक मोठं धरण बांधलं. ते बांधताना असं अपेक्षित होतं कीपाणी थोडं मागे सरकेल आणि कोलकात्यामधून वाहायला लागेल आणि यामुळे आपल्याला कोलकात्याचा उपयोग बंदर म्हणून करता येऊ शकेल. पण आपल्याला हवा तसा मार्ग या नदीने घेतला नाही. त्यात परत फराक्का धरणामधून भारत आणि बांगलादेशमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद सुरू झाला.
गंगासागर हे २२४ चौरस किलोमीटरचं बेट कोलकात्यापासून १०० किलोमीटर दक्षिणेला गंगेच्या डेल्टा प्रदेशात आहे. या बेटावर एकूण नऊ पंचायती आहेत. या बेटावर जाण्यासाठी आपल्याला केवळ सागरी मार्गाचाच वापर करावा लागतो. हे बेट लहानसं असली तरी, शाळा-कॉलेज, पेट्रोलपंप यांसारख्या सर्व सोयींनी युक्तआहे. (गेल्या वर्षी ईशान्य भारतामधल्या माजुली बेटावरही हाच अनुभव आला होता.) इथे गंगा नदी जसं जशी सरकत गेली तसा इथे राहणाऱ्या लोकांवरही त्याचा परिणाम होत राहिला. गंगा नदी उत्तरेकडून सर्वशक्तिनिशी येत नसल्यामुळे इथे समुद्राचं पाणी आतमध्ये यायला लागलं. त्यामुळे आधी वर्णन केलेल्या दक्षिण परगणा जिल्ह्य़ातले सर्व नाले समुद्राचं खारं पाणीही वाहून आणू लागले. पूर्ण समुद्र नाही, पण या गोडय़ा पाण्यामध्ये खारं पाणी प्रवेश करतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाणी खारं असल्याने ना ते पिता येणार किंवा ना ते शेतीला वापरता येणार. मग इथल्या लोकांनी करायचं काय? जमीन तर प्रचंड सुपीक आहे, पण उत्पादन तर काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये मान्सून त्यांच्या मदतीला येतो.
जमेची बाब म्हणजे या सगळ्या भागांत मान्सूनचं, पावसाचं प्रमाण खूप चांगलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या सर्व सिस्टम्स इथे पाऊस पाडण्यासाठी अनुकूल असतात. त्यामुळे मेघालयात पाऊस सुरू झाला तरी तो इथेही पडणारच असतो. या पाण्याचा वापर करण्यासाठी इथे काही व्यवस्था करून ठेवल्या आहेत. त्यांनी प्रत्येकाच्या घरासमोर लहान लहान तळी तयार केली आहेत. शतकानुशतके होणारे बदल हेरून माणसाने, निसर्गाने मार्ग बदलल्यावर आपल्या उदरनिर्वाहासाठी शोधून काढलेला मार्ग. ही तळी म्हणजे एक प्रकारे इथली शेतीच आहे. इथे असणारी माती ही गंगेची माती आहे. त्यामुळे ती अतिशय चिकट आहे. त्यामुळे इथे खड्डा केला आणि पाणी ओतलं तरी ते जमिनीत मुरत नाही. या खड्डय़ांमध्ये पावसाळा सुरू झाला की पाणी लगेच भरायला लागतं. कितीही कमी पाऊस झाला तरी ही तळी पटकन भरली जातात. या मातीचा आणि मान्सूनचा उपयोग करून हे पाणी साठवून ठेवायला सुरुवात झाली. एकदा पाणी साठलं, की त्यावर माशांचा व्यापार करता येऊ शकतो. ही तळ्यातली माशांची शेती आता इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनली आहे. यामधून अख्ख्या बंगालमध्ये मासे पुरवले जातात आणि हे संपूर्णपणे मान्सूनवर आधारित आहे. आता भारत सरकारनेही त्यांना मत्स्यबीज द्यायला सुरुवात केली आहे. काही गावांमध्येही माशांची अंडी आणून ती १०-१५ दिवसांसाठी पाळली जातात. इथे मासे जन्माला येतात. मासे जन्माला आले की साधारण दहा दिवसांमध्ये याचे छोटे मासे तयार होतात. मग सागर बेटावरून किंवा इतर ठिकाणहून हे व्यापारी येऊन ते मासे कावडीमध्ये घालून घेऊन जातात. व्यापारी हे मासे घराघरांमध्ये जाऊन विकतात. पुढे हे मासे नऊ महिने पाळले जातात. या नऊ महिन्यांनंतर एक-एक मासा हा आठ ते दहा किलोंचा होतो. या मोठय़ा माशांपैकी थोडे ते स्वत:साठी वापरतात आणि बाकीचे विकतात. या माशांची विक्री करताना पुन्हा त्यांना या कावडीवाल्या व्यापाऱ्यांची मदत होते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे माशांच्या बीजाच्या वाटपापासून ते मासे विकण्यापर्यंत लोकांना रोजगार उपलब्ध होतो. मान्सूनच्या तीन महिन्यांमध्ये माशांच्या वाढीची सर्व प्रक्रिया पूर्ण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दक्षिण परगण्यानंतर गट काकद्वीपला पोहोचला. इथे काही गावांमध्येही हा गट गावागावांमध्ये फिरला. त्याचबरोबर बदललेल्या डेल्टाच्या प्रदेशात खूप मोठय़ा प्रमाणात गाळाची माती साठलेली आहे. इथे शेती होत नाही आणि इथे लोकही राहत नाहीत. तर या मातीच्या भागांमध्ये शेकडोंनी वीटभट्टय़ा आहेत आणि विटा बनविण्याचा व्यवसाय जोरात सुरू असतो. २०१३ सालच्या प्रवासादरम्यान सरस्वतीच्या पात्रातही बदललेल्या मार्गामुळे अशाच वीटभट्टय़ा दिसल्या होत्या. अजून एक लक्षणीय साम्य या भागामधल्या गावांमधल्या स्वयंपाकघरात फिरताना लक्षात येतं. ते म्हणजे सरस्वती नदीच्या पात्रामध्ये ज्या आकाराची मातीची भांडी सापडली होती, तशाच आकाराची भांडी इथले लोक वापरत आहेत. काही ठिकाणी आकार जसाच्या तसा फक्त मातीऐवजी धातूचा वापर केला आहे, पण आकार अगदी सारखा. हे पश्चिम बंगालमधल्या गावांमध्ये जसं दिसलं तसंच पाटण्यामधल्या काही गावांमध्येही दिसून आलं.
काकद्वीपहून सागरद्वीपाकडे जाण्यासाठी फेरी (ऋी११८) मिळणार होती. या बेटाचं एक महत्त्व आहे. गंगा जमिनीवर आली कशी? तर त्याचं कारण घडलं या सागर बेटावर अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. या बेटावर सागर नावाचा राजा होता. या राजाने अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञामध्ये या राजाचा घोडा इंद्राने पळवला. या बेटावरच कपिल मुनी नावाच्या मुनींचा आश्रम होता.
हा घोडा इंद्राने कपिल मुनींच्या आश्रमात आणून बांधला. सागर राजाने त्याचे साठ हजार पुत्र पाठवले. त्यांना हा घोडा या आश्रमात सापडला. घोडा बघून, या पुत्रांना, तो घोडा या मुनींनीच पळवला अशी खात्री झाली. कपिलमुनी ध्यान करीत होते. या सगळ्या गोंधळामुळे त्यांची ध्यानधारणा भंग झाली. या व्यत्ययामुळे ते चिडले, त्यात परत त्यांच्यावर हे असा आरोप करीत आहेत हे ऐकून त्यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी सागर राजाच्या या साठ हजार पुत्रांना भस्म करून टाकलं. हे झाल्यावर सगळ्यांनी त्यांना आपला शाप मागे घेण्याची विनंती केली, पण कपिलमुनी काही केल्या ऐकेनात. यानंतर सागर राजा तिथे आला. त्यानेही या सर्वाना परत जिवंत करण्याची विनंती केली. मुनी म्हणाले की, यांना जिवंत काही करता येणार नाही, पण या सर्वाना मुक्ती मिळू शकेल, पण त्यासाठी तुला गंगेला स्वर्गातून आणावं लागेल. ती इथून वाहू दे. ती इथून, त्यांच्या राखेवरून वाहिली की त्यांना मुक्ती मिळेल. मग हा राजा स्वत: स्वर्गात गेला. त्याने शंकराला विनवणी करून गंगेला पृथ्वीवर आणलं. या पौराणिक कथेमुळेसुद्धा या द्वीपाला फार महत्त्व आलं आहे. इथे कपिलमुनी नसतेच, ते चिडले नसतेच तर गंगा इथे आलीच नसती, असा समज इथे आहे. या ठिकाणी ती सागराला मिळत असल्याने साऱ्या प्रवाहाचं पुण्य इथे येणाऱ्या व्यक्तीला मिळतं असं समजलं जातं. गंगा ज्या दिवशी इथून पहिल्यांदा वाहिली, तो दिवस आहे मकरसंक्रांतीचा. त्यामुळे १४ जानेवारीला या ठिकाणी एक मोठा मेळावा भरतो, तेव्हा या बेटावर दर वर्षी किमान सहा लाख लोक आंघोळीला येतात. या सगळ्या लोकांच्या सोयीसाठी या बेटावर अलीकडच्या काळात काही सुविधा केल्या गेल्या आहेत. इथल्या लोकांना, शेजारीच नदी वाहत असून काही भौगोलिक कारणांमुळे नदीच्या पाण्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यवसायासाठी त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. या पाण्यावर आधारलेला आणखी एक व्यवसाय म्हणजे विडय़ाच्या पानांचा व्यवसाय. या पानांसाठी लागणारी मातीही इथे उपलब्ध आहे आणि भरपूर पाऊसही. त्यामुळे हे उत्पादन त्यांना चांगली किंमत मिळवून देतं.
सागरद्वीप आणि कलकत्ता करून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट उत्तरेकडे गंगेच्या काठाने जायला लागला आहे.
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com