एक, दोन नाही तर सहा दशकं उलटल्यानंतरही गीतरामायणाची महती कमी झालेली नाही, उलट दिवसेंदिवस ती वाढत आहे. ही गोष्ट अचंबित करणारीच, मात्र अशा महान कलाकृतीची निर्मिती होणे, हा माझ्या मते ईश्वरी संकेतच असावा. अनुभूती म्हणा किंवा दृष्टांत म्हणा स्वत: गदिमांना दोन वेळा याचा प्रत्यय आला होता. त्यांना सुरुवातीपासून दैनंदिनी लिहिण्याची सवय असल्याने याची नोंद सापडते. १९५२च्या जानेवारीत वडिलांच्या श्राद्धासाठी माडगूळला गेलेले अण्णा त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आमच्या इंजिनच्या मळ्यावर असणाऱ्या विहिरीत मनसोक्त डुंबले, त्यानंतर ते काठावर तसेच ऊन खात पडून राहिले. यात त्यांचा डोळा लागला. या सुप्तावस्थेत पश्चिम क्षितिजावरून एक तेजोमय गोळा आपल्या दिशेने झेपावत असल्याचा त्यांना भास झाला, या वेळी समोर असलेली शाळूची कणसेही सुवर्णमय झाल्याचे त्यांना जाणवले. दचकून जागे झालेल्या गदिमांना हा दैवी दृष्टांतच वाटला, लवकरच आपल्या हातून काहीतरी लोकविलक्षण साहित्य लिहून होणार आहे, अशी त्यांची खात्री पटली. त्यानंतर उज्जन येथे साहित्य संमेलनासाठी गेलेल्या अण्णांनी महाकालेश्वर मंदिरात श्री शंकराचे दर्शन घेतले, त्या वेळी तेथील पुजाऱ्याने केलेल्या सूचनेवरून त्यांनी शंकर-पार्वतीला कौल लावला आणि आश्चर्य म्हणजे तेथेही त्यांच्या बाजूने कौल लागला. ‘माझ्या हातून एखादी अजरामर कलाकृती निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना त्यांनी त्या वेळी केली. हा त्यांच्या श्रद्धेचा भाग होता, मात्र त्यानंतर दोनच वर्षांत काय घडले पाहा. पुणे आकाशवाणीमध्ये केंद्र संचालक या नात्याने रुजू झालेले त्यांचे परमस्नेही सीताकांत लाड यांनी अण्णांना आग्रहाची सूचना केली, ‘या केंद्रासाठी तुम्ही काहीतरी सातत्यपूर्ण उपक्रम करा’.. त्या दोघांच्या विचारमंथनातून गीतरामायणाच्या कल्पनेचा जन्म झाला. रामायण हा विषय प्रथमपासून अण्णांच्या भावविश्वचा एक भाग होता. लहानपणीच श्रीधर कवी यांचं हरीविजय, रामविजय त्यांनी आत्मसात केलं होतं, पुढे मोरोपंतांनी लिहिलेली १०८ रामायणेही त्यांनी मुखोद्गत केली. तुलसीदासांचे रामचरितमानसही त्यांनी अभ्यासले. नसानसांत भिनलेल्या या विषयाने लाड यांच्या सूचनेनंतर उसळी घेतली आणि पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे. राममय झालेले गदिमा एकापाठोपाठ एक अप्रतिम गीत लिहीत गेले आणि बाबूजींनी त्या गीतांचं सोनं केलं. गदिमा एवढे सिद्धहस्त की आधी माहीत असल्याप्रमाणेच ते एकेक गीत लिहीत गेले. ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ या गीताचा अपवाद वगळला तर एकाही गीतासाठी ते अडले नाहीत, असं आई सांगत असे. आम्ही सर्व भावंडं तेव्हा लहानच होतो, तरीही त्या काळातील ते भारलेपण आम्हाला जाणवायचं. गीतरामायणासाठी अनेक गायक-गायिकांनी पाश्र्वगायन केलं. मात्र बालपणातील लतादीदींना जिचा आवाज आवडत असे, त्या आमच्या आईच्या वाटय़ाला यातील एकही गाणं येऊ नये, याचं मला फार आश्चर्य वाटतं.
वर्षभर चाललेलं गीतरामायण अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. गमतीची गोष्ट म्हणजे त्याचे जाहीर कार्यक्रम करावेत, अशी कोणतीच योजना बाबूजींच्या मनात नसावी, मात्र तो योगही जुळून आला. २८ मे १९५८ या दिवशी माझी व आनंदची मुंज होती. त्यासाठी आमच्या ‘पंचवटी’मध्ये कलाकार, साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. अशातच अण्णांना बाळ चितळेंनी सुचवलं, की ‘एवढे कलाकार जमल्येत तर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन जाऊ दे’.. अण्णा म्हणाले, ‘अरे इथे सुधीरही आहे की, गीतरामायणच करूया की’.. झालं, अण्णांचं निवेदन आणि बाबूजींचं गायन, असा तो कार्यक्रम रंगला. कार्यक्रम अर्थातच निमंत्रितांसाठी होता, तरी तो सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकांची एवढी गर्दी उसळली की पुणे-मुंबई मार्गावर मोठी कोंडी झाली. बाबूजींच्या पहिल्या जाहीर गीतरामायणाला अशी भरभरून दाद मिळाली.
या महाकाव्याच्या निमित्ताने आम्हाला विलक्षण अनुभव येत गेले. नऊ वर्षांपूर्वी पुण्यात ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे या कलाकृतीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. ‘दैवजात दु:खे भरता’ हे गाणं झाल्यानंतर प्रेक्षकांमधील एक जण उभं राहून काहीतरी सांगू इच्छित होता, आम्ही त्याला रंगमंचावर बोलावलं, त्याने जे सांगितलं ते ऐकून अवघं प्रेक्षागार थक्क झालं. कोल्हापूरला राहणाऱ्या त्या प्रेक्षकाचे वडील पक्षाघातामुळे अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होते, या कार्यक्रमातील गाणी त्याने मोबाइलद्वारे वडिलांना ऐकवली आणि त्यानंतर ते धडपडत उभे राहिले.. आनंदाने चकित झालेल्या त्या व्यक्तीच्या घरच्यांनी त्यांना लगेचच दूरध्वनीवरून ही वार्ता कळवली होती..
अगदी गेल्या वर्षी कौटुंबिक सहलीनिमित्त गोव्यात गेलो असताही अशीच माहिती समजली. गीतरामायणाच्या ध्वनिमुद्रिका आल्यानंतर साधारण ६०साली पणजीत सिनारी बंधू यांचे ध्वनिमुद्रिकांचे एकमेव दुकान होते. त्यांच्या दुकानासमोर प्रथमच जेव्हा ही गीतं लावली तेव्हा ती ऐकण्यासाठी समोरच्या पटांगणात तुडुंब गर्दी झाली. तेव्हा मांडवी नदीवर पूल नसावा, त्यामुळे पलीकडच्या गावातील लोकांनी तक्रार केली, आम्हालाही गाणी ऐकवा.. तेव्हा तेथे मोठाले कर्णे बसवून त्या गावातील लोकांच्या श्रवणभक्तीचीही सोय करण्यात आली. तेव्हापासून तेथे याप्रकारे गीतरामायण ऐकण्याचा प्रघातच पडला. ही गीते तेथे एवढी लोकप्रिय झाली की गोव्यातील काही गावांतील जत्रा या गीतांनी सुरू होऊ लागल्या. अतिशयोक्ती वाटेल, मात्र आजही ही प्रथा सुरू आहे.
कोठे गेलो आणि लोकांना समजलं की आम्ही गदिमांची मुलं आहोत, की अनेक जण अगदी वयस्कर मंडळीही आमच्या पाया पडतात. ही गदिमांचीच पुण्याई आहे, त्यांच्या पोटी जन्माला आलो, त्यांच्या प्रतिभेचे आविष्कार जवळून पाहाता आले, हे आमचं भाग्यच. हे महाकाव्य आता पुढच्या पिढीत आलं आहे. बाबूजींचा मुलगा म्हणजे प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके आता गीतरामायणाचे कार्यक्रम करतो, त्याचंही पहिलं जाहीर गीतरामायण आमच्या माडगूळच्या गदिमा विद्यालयात झालं. माझा लहान भाऊ आनंदही गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात गीतरामायण सादर करत आहे. मीही लेखन, मुलाखती, जाहीर कार्यक्रम, तसेच गदिमा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गदिमांची व गीतरामायणाची थोरवी अभिमानाने सांगत असतो.
रामायण जसं कालातीत आहे, त्याप्रमाणे गीतरामायणालाही अंत नाही.
कालातीत! – श्रीधर माडगूळकर
एक, दोन नाही तर सहा दशकं उलटल्यानंतरही गीतरामायणाची महती कमी झालेली नाही, उलट दिवसेंदिवस ती वाढत आहे.
आणखी वाचा
First published on: 28-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geet ramayan