वर्षभर चाललेलं गीतरामायण अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. गमतीची गोष्ट म्हणजे त्याचे जाहीर कार्यक्रम करावेत, अशी कोणतीच योजना बाबूजींच्या मनात नसावी, मात्र तो योगही जुळून आला. २८ मे १९५८ या दिवशी माझी व आनंदची मुंज होती. त्यासाठी आमच्या ‘पंचवटी’मध्ये कलाकार, साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. अशातच अण्णांना बाळ चितळेंनी सुचवलं, की ‘एवढे कलाकार जमल्येत तर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन जाऊ दे’.. अण्णा म्हणाले, ‘अरे इथे सुधीरही आहे की, गीतरामायणच करूया की’.. झालं, अण्णांचं निवेदन आणि बाबूजींचं गायन, असा तो कार्यक्रम रंगला. कार्यक्रम अर्थातच निमंत्रितांसाठी होता, तरी तो सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकांची एवढी गर्दी उसळली की पुणे-मुंबई मार्गावर मोठी कोंडी झाली. बाबूजींच्या पहिल्या जाहीर गीतरामायणाला अशी भरभरून दाद मिळाली.
या महाकाव्याच्या निमित्ताने आम्हाला विलक्षण अनुभव येत गेले. नऊ वर्षांपूर्वी पुण्यात ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे या कलाकृतीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. ‘दैवजात दु:खे भरता’ हे गाणं झाल्यानंतर प्रेक्षकांमधील एक जण उभं राहून काहीतरी सांगू इच्छित होता, आम्ही त्याला रंगमंचावर बोलावलं, त्याने जे सांगितलं ते ऐकून अवघं प्रेक्षागार थक्क झालं. कोल्हापूरला राहणाऱ्या त्या प्रेक्षकाचे वडील पक्षाघातामुळे अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होते, या कार्यक्रमातील गाणी त्याने मोबाइलद्वारे वडिलांना ऐकवली आणि त्यानंतर ते धडपडत उभे राहिले.. आनंदाने चकित झालेल्या त्या व्यक्तीच्या घरच्यांनी त्यांना लगेचच दूरध्वनीवरून ही वार्ता कळवली होती..
अगदी गेल्या वर्षी कौटुंबिक सहलीनिमित्त गोव्यात गेलो असताही अशीच माहिती समजली. गीतरामायणाच्या ध्वनिमुद्रिका आल्यानंतर साधारण ६०साली पणजीत सिनारी बंधू यांचे ध्वनिमुद्रिकांचे एकमेव दुकान होते. त्यांच्या दुकानासमोर प्रथमच जेव्हा ही गीतं लावली तेव्हा ती ऐकण्यासाठी समोरच्या पटांगणात तुडुंब गर्दी झाली. तेव्हा मांडवी नदीवर पूल नसावा, त्यामुळे पलीकडच्या गावातील लोकांनी तक्रार केली, आम्हालाही गाणी ऐकवा.. तेव्हा तेथे मोठाले कर्णे बसवून त्या गावातील लोकांच्या श्रवणभक्तीचीही सोय करण्यात आली. तेव्हापासून तेथे याप्रकारे गीतरामायण ऐकण्याचा प्रघातच पडला. ही गीते तेथे एवढी लोकप्रिय झाली की गोव्यातील काही गावांतील जत्रा या गीतांनी सुरू होऊ लागल्या. अतिशयोक्ती वाटेल, मात्र आजही ही प्रथा सुरू आहे.
कोठे गेलो आणि लोकांना समजलं की आम्ही गदिमांची मुलं आहोत, की अनेक जण अगदी वयस्कर मंडळीही आमच्या पाया पडतात. ही गदिमांचीच पुण्याई आहे, त्यांच्या पोटी जन्माला आलो, त्यांच्या प्रतिभेचे आविष्कार जवळून पाहाता आले, हे आमचं भाग्यच. हे महाकाव्य आता पुढच्या पिढीत आलं आहे. बाबूजींचा मुलगा म्हणजे प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके आता गीतरामायणाचे कार्यक्रम करतो, त्याचंही पहिलं जाहीर गीतरामायण आमच्या माडगूळच्या गदिमा विद्यालयात झालं. माझा लहान भाऊ आनंदही गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात गीतरामायण सादर करत आहे. मीही लेखन, मुलाखती, जाहीर कार्यक्रम, तसेच गदिमा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गदिमांची व गीतरामायणाची थोरवी अभिमानाने सांगत असतो.
रामायण जसं कालातीत आहे, त्याप्रमाणे गीतरामायणालाही अंत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा