मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गीतरामायणाचा नुकताच हीरक महोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त ‘लोकप्रभा’च्या वाचकांनी जागवलेल्या गीतरामायणाच्या काही आठवणी-

कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचे ‘गीतरामायण’ हे कथाकाव्य पुस्तकरूपात प्रसिद्ध होऊन सत्तावन्न वर्षे झाली. त्या आधी सुमारे तीन वर्षे ही गीते पुणे आकाशवाणीवर गाजत होती. दर आठवडय़ाला एक अशी सुमारे वर्षभर ही छप्पन्न गीते प्रसारित झाली व त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. श्रोत्यांच्या आग्रहावरून ती पुन्हा एकदा प्रसारित करावी लागली. त्यानंतर गावोगावी या गीतांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. खेडोपाडी ही गीते पोचली, लोकांच्या ओठी बसली. सुशिक्षित मराठी माणसाची एक पिढी ही गीते ऐकता ऐकता मोठी झाली.
मुळात रामकथेची लोकमानसावर जबरदस्त मोहिनी आहे. सहस्रके उलटली तरी ती तशीच टिकून आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी रामकथा दूरदर्शनच्या पडद्यावर साकार झाली तेव्हा सादरीकरणाचे, अभिनयाचे, पटकथेचे, संवादांचे असे सगळे दोष पोटात घालून लोकांनी तिला उदार आश्रय दिला. लोक भक्तिभावाने, शुचिर्भूत होऊन दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसू लागले. धूपदीप लावून पडद्याची पूजा करू लागले. रामकथा चालू असताना चित्रपटगृहे ओस पडू लागली.
बरोबर हेच वातावरण साठ वर्षांपूर्वी गीतरामायणामुळे महाराष्ट्रात निर्माण झाले होते. मराठी लोकमानसाला रामकथा पुन्हा हवी होती, नव्या रूपात हवी होती. ती गरज गेय रूपातल्या गीतरामायणाने पूर्ण केली.
गीतरामायणाच्या यशात कवीचा वाटा किती आणि संगीत-दिग्दर्शक सुधीर फडके आणि सर्व गायक-गायिका यांचा वाटा किती यावर खूप वादविवाद झाले. त्या काळी आकाशवाणीमुळे ही गीते घरोघरी पोचली आणि त्यांच्या सुश्राव्यतेमुळेच लोकप्रिय झाली, हे निर्विवाद. ही गाणी एकदा ओठी रुळल्यावर हळूहळू सुरांमागच्या शब्दांची ताकद लोकांच्या लक्षात येऊ लागली आणि त्यातला आशय मनांत ठसला. आज साठ वर्षांनंतर सूर काहीसे विरून गेले आहेत आणि शब्द मात्र मागे उरले आहेत, असेच जाणवते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे सुंदर कल्पना आणि अमर सुभाषिते ही या गीतरामायणात ठायी ठायी विखुरली आहेत. यातली काही गीते ही रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील, ही बोरकरांची भविष्यवाणी ही खरी ठरताना आपण पाहतो आहोत.
पुस्तक
हे पुस्तक भारत सरकारच्या पब्लिकेशन्स डिव्हिजन, माहिती व नभोवाणी मंत्रालयातर्फे प्रकाशित झाले होते. काही किरकोळ मुद्रणदोष सोडले तर पुस्तकाची आखणी आणि मुद्रण अतिशय नेटके व देखणे होते. मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट पद्मा सहस्रबुद्धे यांची होती. मुखपृष्ठावरील जांभळय़ा आणि काळय़ा रंगाच्या पाश्र्वभूमीवर जाड काळय़ा रेषांनी साकारलेल्या अवनतमस्तक सीतेच्या अमूर्त चित्रापासूनच या काव्याची वेगळी प्रकृती जाणवत राहते. जाड काळय़ा पाश्र्वभूमीवर तुटक कोरे अवकाश व ते जोडणाऱ्या अथवा विभागणाऱ्या तुटक काळय़ा रेषा अशा मांडणीतून सर्व चित्रे साकारली आहेत. त्यामुळे आपोआपच कथेतील पात्रांचे अतिमानवीपण सूचित होते. रावणवधानंतर श्रीराम सीतेला सांगतात, ‘दश दिशा मोकळय़ा तुजसी, नच माग अनुज्ञा मजसी, सखि, सरलें तें दोघांमधलें नातें.’’ अलिप्त धीरगंभीर श्रीराम आणि ‘मी हे काय ऐकतेय’ अशी स्तंभित, दु:खाकुल विमनस्क सीता हे केवळ सपाट काळय़ा-पांढऱ्या रंगांतले चित्र या गीताला अगदी समर्पक ठरले आहे किंवा, गर्भवती सीता मनातील इच्छा व्यक्त करताना म्हणते, ‘‘मज उगा वाटते वना विहारा जावें’’ या पाश्र्वभूमीवर निरागस मुग्ध सीतेचे केवळ मुख व समोर विस्तारलेले काळे आकाश, ही दोन्ही चित्रे या दृष्टीने पाहण्यासारखी आहेत. पद्माताईंच्या चित्रांमुळे पुस्तकाच्या आस्वादात
मोठी भर पडली आहे.

book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Raj Thackeray, emblem, Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून होणार निवड
gulab puris controversial ganpati decoration
गुलाब पुरींच्या गणपतींच्या वादग्रस्त देखाव्याबाबत उत्सुकता
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
tasty Bundi modak
बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बुंदीचा मोदक; नोट करा साहित्य आणि कृती
ladki bahin yojana shri ram mandir drug side effects topic in ganeshotsav themes
लाडकी बहीण योजना, श्रीराम मंदिर,अमली पदार्थांचे दुष्परिणाम; गणेशोत्सवातील देखाव्यांत वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी


कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांनी रामायणातील सर्व प्रमुख पात्रे गीतांच्या काही मोजक्या चरणांमध्ये जिवंत केली आहेत. त्यांची प्रासादिक शब्दकळा प्रसंगातील भावभावनांप्रमाणे बदलते. त्यांच्या समर्पक उपमा आणि रूपकांनी वाचक स्तिमित होतो. ‘कुशलव रामायण गाती’ या पहिल्याच गीतातील ‘ज्योतीने तेजाची आरती’ किंवा ‘सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव’ अशा ओळींतून त्यांची प्रतिभा दिसून येते.

कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांच्याविषयी काय लिहावे? रामायणातील सर्व प्रमुख पात्रे त्यांनी गीतांच्या काही मोजक्या चरणांमध्ये जिवंत केली आहेत. त्यांची प्रासादिक शब्दकळा प्रसंगातील भावभावनांप्रमाणे बदलते. त्यांच्या समर्पक उपमा आणि रूपकांनी वाचक स्तिमित होतो. ‘कुशलव रामायण गाती’ या पहिल्याच गीतातील ‘ज्योतीने तेजाची आरती’ किंवा ‘सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव’ अशा ओळींतून त्यांची प्रतिभा दिसून येते.
अयोध्येमध्ये अश्वमेध यज्ञाच्या वेळी जमलेल्या लोकांसमोर कुशलव रामकथेचे गायन करीत आहेत अशी सुरुवात करून या कथेमध्ये हळूहळू विविध पात्रांच्या तोंडून रामचरित उलगडत जाते व शेवटही राजसभेत मुनी वाल्मीकी कुशलवांना रामायण गाण्याची आज्ञा करतात असा होतो. जिथून सुरुवात केली त्याच बिंदूवर शेवट झाल्याने रामकथेचे एक वर्तुळ अथवा आवर्तन पूर्ण झाले असे वाटते पण पूर्णविराम झाला आहे असे वाटत नाही. जणू या रामकथेची अशी आवर्तने पुन:पुन्हा वेगवेगळय़ा स्वरूपात होतच राहणार आहेत, जणू ही रामकथा पुन:पुन्हा अवतरणार आहे.
रचना
रामायणातील प्रमुख पात्रांचे स्वभाव विशेष, त्यांचे परस्परसंबंध, राग, लोभ, हर्ष, खेद या सर्व भावना या गीतांतून प्रकट होतात. तसेच वीर, करुण, उदात्त अशा नवरसांचा परिपोषही गीतांतून दिसतो. मूल नसल्यामुळे कौशल्येच्या मनात ठसठसणारा सल ‘उगा कां काळीज माझे उलें, पाहुनी वेलीवरचीं फुलें’ असा हळुवारपणे प्रकट झाला आहे, तर त्राटिकावधासाठी विश्वामित्र श्रीरामांना उद्युक्त करतात तेव्हाचे गीत ‘मार ही त्राटिका रामचंद्रा, दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी, वर्तनीं दर्शनीं ही अभद्रा’ असे घणाघाती आणि वीरश्रीपूर्ण झाले आहे. ऊर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांच्या तोंडी असलेले रामराज्याभिषेकाच्या वेळी सीतेच्या भाग्याचे कौतुक करणारे गीत ‘आनंद सांगू किती, सीता वल्लभ राम व्हायचे उद्या अयोध्यापती’ असेच जिवंत उतरले आहे. अलीकडच्या हिंदी चित्रपटात ‘वाह वाह रामजी, जोडी क्या बनाई’ म्हणून आनंदविभोर होऊन नाचणाऱ्या धाकटय़ा बहिणीच्या आनंदाशी या गीतात व्यक्त झालेल्या भगिनीप्रेमाचे स्थळकाळाची बंधने ओलांडून थेट नाते जुळते. मानवी नातेसंबंधांतली कालातीतता टिपता येणे हे ग. दि. माडगूळकरांचे यश आहे. रामाला राज्यपदावरून हटवण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे दिसताच लक्ष्मणाचा झालेला चडफडाट, कैकेयीबद्दलची घृणा, कौसल्येविषयी आदर, विषयधुंद पित्याविषयी तिरस्कार इतके सर्व ‘रामाबिण राज्यपदी कोण बैसतो, घेऊनिया खड्ग करीं, मीच पाहतो’ या गीतात समर्थपणे व्यक्त झाले आहे. गीतरामायणात लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांच्या तोंडी दोन दोन तर शबरी, शूर्पणखा, अहल्या, जटायू, सुग्रीव, कुंभकर्ण यांच्या तोंडी एक एक गीत आहे पण इतक्या अल्प शब्दांतूनही प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे उभे राहिले आहे. शिवाय कथेचा ओघ अखंड राखण्यासाठी आणि कथानक पुढे सरकवण्यासाठी या गीतांचा खुबीने उपयोग करून घेतला आहे. गीतांच्या सुरुवातीस गद्य निवेदन आहे पण ते अगदीच अल्प. कदाचित आकाशवाणीची वेळमर्यादा लक्षात घेऊन ते अतिशय संक्षिप्त ठेवले असावे परंतु त्यामुळे गीतरामायणाच्या काव्यप्रकृतीला अधिक उठाव मिळतो. गद्याचे प्रमाण कमीत कमी ठेवून पद्याद्वारेच कथानक पुढे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यातून दिसतो.
श्रीराम
श्रीराम-जानकी या दोघांच्या तोंडी एकूण पंधरा गीते आहेत. श्रीरामाच्या तोंडचे पहिले गीत वनवासात लक्ष्मणास पर्णकुटी बांधण्याची अनुज्ञा देतानाचे आहे. त्यानंतर भरताला अयोध्येस परतण्याचा उपदेश करणारे सुप्रसिद्ध ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत येते. श्रीरामाची धीरगंभीरता, तरुण वयातच असलेला निर्मोही विरक्तपणा, दृढनिश्चय, कर्तव्यकठोरता या सगळय़ांचे सुंदर चित्रण या गीतात झाले आहे. ‘यथा काष्ठं च काष्ठं च’ हे उपनिषदातील सुप्रसिद्ध वाक्य त्यातील गहनगूढ तत्त्वज्ञानासहित इथे अगदी सोपे आणि सहजसाध्य होऊन अवतरले आहे. ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हां नाहीं गांठ, क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा’ इतके सुंदर रूपांतर ग. दि. माडगूळकरच करू जाणोत. सीताहरणानंतरचा श्रीरामाचा विलाप, दु:खविव्हल आणि विरहव्याकुळ अवस्था ‘कोठे सीता जनकनंदिनी’ आणि ‘ही तिच्या वेणिंतील फुलें, लक्ष्मणा तिचींच हीं पाऊलें’ या दोन गीतांतून आपल्या हृदयाला भिडते.
त्यानंतर वालीवध, अंगदशिष्टाई ही गीते प्रासादिक असली तरी कथानक पुढे नेण्यासाठीच प्रामुख्याने ती योजली आहेत. संपूर्ण रामकथा छपन्न गीतांत बसवण्याचे आणि दर आठवडय़ाला गीतलेखन, संगीत नियोजन, ध्वनिमुद्रण अशा धावपळीचे बंधन असल्याने कित्येक ठिकाणी अशी ओढाताण जाणवते. गेय वृत्तांमध्ये बसवण्यासाठी ऱ्हस्व-दीर्घाची ओढाताणही करावी लागली आहे. काही शब्द ओढूनताणून योजावे लागले आहेत. उदा. ‘कधीं नव्हे तें मळलें अंतर’ यातला ‘मलिन झाले’ या अर्थीचा ‘मळले’ असा गीतात न शोभणारा शब्दप्रयोग किंवा ‘पेंगुळल्या आतपांत जागत्या कळय़ा, ‘काय काय’ करित पुन्हा उमलल्या खुळय़ा’ अशा तऱ्हेची कृत्रिम यमके आणि शब्दयोजना एरवीच्या प्रासादिक आणि ओघवत्या शैलीला बाधा आणतात. कथानक जोडण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापराव्या लागल्या आहेत. कुशलव हे प्रमुख निवेदक आहेतच. शिवाय भाट-चारण, अयोध्येचे पौरजन, निषादराजाचे नावाडी, सेतुबंधाच्या वेळी वानरसेना, रावणवधाच्या वेळी स्वर्गातील गंधर्व-अप्सरा यांच्या तोंडी काही समूहगीते टाकावी लागली आहेत. ही कसरत किंवा तडजोड अटळ होती. पण ही गीते रचतानादेखील ‘वृंदगान’ म्हणून त्यांची वेगळी प्रकृती लक्षात यावी अशा तऱ्हेने रचना झाली आहे.
जानकी
गीतरामायणातले सीतेचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार आहे. माडगूळकरांनी यातल्या सीतेला एक वेगळेच परिमाण दिले आहे. ‘निरोप कसला माझा घेतां, जेथें राघव तेथें सीता’, ‘तोडितां फुलें मी सहज पाहिला जातां, मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा’, ‘याचका, थांबुं नको दारांत, घननिळांची मूर्त वीज मीं, नकोस जाळूं हात’ ‘रघुवरा, बोलत कां नाही?’, ‘डोहाळे पुरवा, रघुकुल तिलका माझे’ वगैरे सीतेच्या तोंडी असलेली आठ गीते स्त्रीसुलभ मानवी भावना व्यक्त करतात. त्यात अलौकिक असे काहीही दाखवलेले नाही. श्रीरामाची प्रतिमा ही सतत ‘प्रभू’ रामचंद्र म्हणून उमटत राहते. सीता मात्र मानुषी, या भूमीतली, खरीखुरी भूमिकन्या वाटते. तिचा स्त्रीसुलभ उल्हास, लज्जा, मोह, क्रोध, पतिभक्ती, पतिनिष्ठा, पतीच्या सामर्थ्यांवरील दृढ विश्वास आणि शेवटी गर्भवती परित्यक्तेची वेदना, उद्वेग हे सर्व आपल्या मनाला थेट भिडते. ‘मज सांग लक्ष्मणा, जाऊं कुठे’ या गीतात ‘जें शाश्वत, त्याचा देंठ तुटे’ ही मुळापासून खुडले जाण्याची, उन्मळून पडण्याची भावना मनाला पीळ पाडते. या एका ओळीतून अनेक संदर्भ मनात जागे होतात. सीतेची गर्भवती अवस्था, नाळ तुटण्याचे दु:ख, बेंबीच्या देठातली वेदना आपल्याला प्रचंड झंझावातासारखी हलवून जाते. आपल्यालाच नव्हे तर धरणीलाही. ‘चरणींच्या धरेसी कंप सुटे.’ धरणीसुद्धा थरथरते. धरणी ही सीतेची माता. सीता तिच्या कुशीतून निघालेली. तनुजेचे दु:ख मातेला जितके जाणवेल तितके दुसऱ्या कोणासही नाही. ‘अडखळे अंतिचा विपळ कुठें’, ‘फळ धरी रूप, हे सुमन मिटे’ यातून सीतेची अगतिकता आणि आयुष्य संपवण्याची इच्छा आर्ततेने व्यक्त झाली आहे. ‘मी नच जाया, नव्हे कन्यका’, ‘पुनर्जात मीं, आता माता’ या ओळींतून स्त्रीच्या आयुष्याची कर्मकहाणीच उलगडत जाते. कन्यका, जाया ही रूपे अथवा सन्मान तिचे नव्हेतच. माता हेच तिचे खरे रूप आणि मातृत्व हेच इतिकर्तव्य हे सनातन सत्य प्रखरपणे आपल्यासमोर उभे राहते. व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिविकासाच्या आग्रहाच्या आजच्या काळात मनाला एक विषण्णता येते.
याआधीही रामाने लंकेमध्ये सर्वासमक्ष तिला ‘सखी, सरलें तें दोघांमधलें नातें’ असे म्हणून झिडकारले होतेच. त्या वेळी तिला ‘लीनते, चारुते, सीते’ असे संबोधणारा राम ‘पतिव्रते’ असे मात्र म्हणाला नव्हता. तेव्हाही तिने अग्निदिव्य करून स्वत:ची शुद्धता सिद्ध केली होती. या सर्व खटाटोपातली व्यर्थता, स्वत:ला सतत सिद्ध करीत राहावे लागण्यातली अपमानास्पद विफलता ‘अग्नि ठरला असत्यवक्ता, पतिव्रता परि मी परित्यक्ता’ या ओळीतून नेमकी व्यक्त झाली आहे.
‘आणखी ओंठिं ना शब्द फुटे’ अशा अवरुद्ध, घुसमटलेल्या, दु:खाच्या स्तरावर ही रामकथा संपते आणि वाचक सुन्न होऊन जातो. या कथेमध्ये सीतेला धरणीने पोटात घेण्याचा प्रसंग नाही. कदाचित, ‘झाली एवढी अवहेलना पुरे झाली, आता आणखी दु:ख वर्णन करण्यास शब्द नाहीत.’ असे तर कवीला म्हणायचे नसावे ना? किंवा, रामकथा संपली पण सीतेचे दु:ख तसेच भळभळते, अश्वत्थाम्यासारखे चिरंजीव राहिले आहे, असेही कवीला सुचवायचे असावे.
शेवटी वाल्मीकी ऋषी कुशलवांना रामकथा गाण्याची आज्ञा करतात. जिथून सुरू झाली त्याच आवर्तामध्ये ही कथा सापडते. सर्व तेच, तसेच पुन्हा घडेल, प्रभूही पुन:पुन्हा अवतार घेतील, पण सीतेची जखम तशीच भळभळती राहील..