ट्रॅक्टरवरचे लव-कुश
नृसिंहवाडी जवळ कृष्णा पंचगंगेच्या तीरी वसलेलं आमचं कुरुंदवाड. घरी आजोबांनी १९२९ साली संस्थानिकांनी दिलेल्या जागेवर बांधलेलं राम मंदिर. हा झाला इतिहास. माझ्या लहानपणी घरी टेपरेकॉर्डर असणे हीदेखील चैन होती. वडिलांनी टेपरेकॉर्डर घेतला तेव्हा सर्वप्रथम गीतरामायणाच्या कॅसेट आणल्या होत्या.
तेव्हा पूर्वीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. मी चौथी-पाचवीत असताना आमच्या गावी एक गायनाची शिकवणी (गायन क्लास) घेणारे कौलगेकर आडनावाचे गृहस्थ आले. पेटी, तबला, वादन, गायन यात गती असल्यामुळे गावातील गणपती मंदिरात त्यांना राहायला जागादेखील मिळाली. आम्हा लहानांना त्यांनी गाणं शिकवलं. त्याला शास्त्रीय संगीताचा आधार फारसा नव्हता. मात्र गाण्याचे भाव लोकांपर्यंत पोहोचत होते. मीदेखील या क्लासमध्ये जाऊ लागलो.
आता आठवलं की हसू येतं, मात्र मला आणि माझा मित्र मनीष पटवर्धन, आम्हा दोघांना त्यांनी लव-कुश बनवलं होतं. पंचक्रोशीत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आम्ही दोघे करायचो. गीतरामायणाने.
स्वये श्री राम प्रभू ऐकती..
कुश-लव रामायण गाती..
कुश-लव म्हणजे आम्ही दोघं.. धोतर नेसून गळ्यात जानवं, हातात तंबोरे. पुठ्ठय़ापासून बनवलेले. ट्रॅक्टरवर उभं राहून कार्यक्रम व्हायचा. ट्रॅक्टर तीन बाजूंनी बंद समोरून उघडा. समोर गावातील बऱ्यापैकी माईक.
नंतर ते मास्तर निघून गेले. पण गीतरामायण माझ्यात असं रुजलं की ते आजही स्मरणात आहे. घरी टेप आल्यावर पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.
घरी रामनवमीचा उत्सव असायचा. माझी आत्या कीर्तन करायची. राम जन्म होवून पाळणा, आरती झाली की लगेच टेपवर ‘राम जन्मला गं सखी’ लावण्याची माझी धडपड असायची. नंतर मी या सर्वापासून बराच दूर गेलो.
पण गीतरामायणाची मोहिनी अजून उतरली नाही. संपूर्ण गीतरामायण पाठ आहे. गेल्या कित्येक वर्षांत मी देवळातदेखील गेलो नाही, घरच्या देवाला केव्हा नमस्कार केला आठवत नाही. पण गीतरामायणाचे शब्द जसेच्या तसे अजूनही आठवतात.
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर गदिमाचे पेज पाहिले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या. साधे सोपे मात्र आशयपूर्ण शब्द, बाबूजींचे संगीत आणि आवाज. निवेदकाच्या माध्यमातून सारा पट उलगडणे, सारेच वर्णन करण्यापलीकडचे..
– यशवंत जोशी, कुरुंदवाड
वेगळीच अनुभूती
अग्रवाल क्लासमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांची अनेक वर्षे प्राध्यापकी करताना माझं अवांतर विषयांकडे फार लक्ष नव्हतं. गीतरामायणासारख्या महान कलाकृतीची ओळख मला काहीशी उशिरा झाली. त्यापूर्वी गीतरामायणाचे गोडवे गाणारे अनेक जण भेटत असत, यातील अनेकांना त्यातील सर्व गीते मुखोद्गत होती, ते पाहून मला खूप आश्चर्य वाटत असे. मात्र ते ऐकण्याचा योग आला नव्हता. ६२ मध्ये मी प्रथम त्यातील १५ गीते ऐकली आणि थक्कच झालो, त्यानंतर गीतरामायण सादर करणारे वसंत आजगावकर यांच्याकडे सर्व गाणी ऐकता आली. गीत-संगीताच्या या अत्युच्च आविष्कारात मी एवढा मुग्ध झालो, की त्याची गोडी कधी लागली आणि ती सर्व गीते कधी पाठ झाली हे समजलंही नाही. या पाठांतरानंतर मला वेगळीच अनुभूती येऊ लाभली. ही गीते ऐकल्यानंतर लाभणारी मन:शांती वर्णनापलीकडची होती, त्यामुळे हा अनुभव इतरांनाही यावा यासाठी मी त्यावर लेखन करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार २००३मध्ये मी या विषयावर पहिलं पुस्तक हातावेगळं केलं. लिहिताना हात आखडता न घेतल्याने २००८पर्यंत माझ्या नावावर ‘गीतरामायण-व्यक्तिरेखा, गीतरामायणातील सुभाषिते, गीतरामायण, गद्यरूप-गोष्टीरूप आणि गीतरामायण-काही अनुभव’ ही चार पुस्तकं जमा झाली.
– विद्याधर कात्रे, दादर, मुंबई</strong>
निरपेक्ष सादरीकरण
माझं बालपण अहमदनगरमध्ये गेलं. गीतरामायणाचं प्रक्षेपण सुरू झालं तेव्हा मी आठवीत होतो. रेडिओवरून ते नियमित ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र, तेव्हा गाणी ध्वनिमुद्रित करायची सुविधा नसल्याने बाबूजींचं गाणं ऐकायचं, त्याची मनात उजळणी करायची आणि ते लक्षात ठेवायचं अशी सवय मला लागली. त्यामुळे त्यातील सगळी गीते आत्मसात झाली. पुढे नोकरीनिमित्त ठाण्यात आलो. लहानपणीच्या या संस्कारांमुळे गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचं ठरवलं. या साधनेत बाधा येऊ नये, यासाठी कालांतराने नोकरीही सोडली. गीतरामायणामुळे बाबूजींशी जुजबी परिचयही झाला. ते असेपर्यंत या गीतांचं सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण करण्याचं धाडस मी केलं नाही, मात्र २००२ नंतर गीतरामायणाचे प्रयोग मी सुरू केले, यात मी एक पथ्य पाळलं व ते म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय व अपेक्षेशिवाय ते सादर करणं. जाहिरात करण्याच्या फंदातही मी पडलो नाही. केवळ मौखिक जाहिरातीच्या आधारे मुंबई, ठाणे, अलिबाग, रत्नागिरी, नाशिक, बदलापूर आदी अनेक ठिकाणी मी हे कार्यक्रम केले. यात मला पुरुषोत्तम रानडे यांची संवादिनीवर व प्रकाश चितळे यांची तबल्यावर बहुमोल साथ लाभली. काही कार्यक्रमात माझी पत्नी सुजया व मुलगा महेश हेही सहभागी होतात. गीतरामायण साठाव्या वर्षांत प्रवेश करत असताना माझे कार्यक्रम पाचशेच्या आसपास येऊन पोहोचले आहेत, याचा वेगळाच आनंद आहे. ही गीतं गायल्याने मला आनंद मिळतो, ऐकणारेही चार घटका रमतात, याचं समाधान वाटतं.
– सुरेश करमरकर, ठाणे पूर्व
काव्य नव्हे, हा अमृतसंचय!
माझं माहेर दादरचं. वडील सिद्धिविनायक मंदिरात मुख्य पूजारी होते. घरात साहजिकच धार्मिक व सांस्कृतिक वातावरण. गीतरामायण सुरू झालं तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, मात्र बाबूजींनी त्याचे जाहीर कार्यक्रम सुरू केल्यानंतर लहानपणीच ते ऐकण्याचा योग आला. दादर भागात तेव्हा अनेकदा हा कार्यक्रम होत असे. टेपरेकॉर्डर, कॅसेट वगैरे गोष्टी खूप लांबच्या असल्याने गीतरामायणाची जाहिरात कुठे दिसली की ती संधी साधण्यासाठी आम्ही मैत्रिणी धडपडत असू. असंच एकदा कोणत्या तरी पटांगणात हा कार्यक्रम सुरू असलेला आम्हाला दिसला. साक्षात बाबूजी गात होते. आम्ही मैत्रिणी बहुधा शाळेतून परतत होतो, मात्र घरची वाट विसरून आम्ही तेथेच रेंगाळलो आणि रमलो. बराच वेळ झाला, एकापाठोपाठ गीतं सुरू होती, आम्हाला भान राहिलं नाही. घरी पोहोचण्याची वेळ टळल्याने तिकडे बोंबाबोंब सुरू झाली. माझी शोधाशोध करण्यासाठी कोणाकोणाला कुठे-कुठे पिटाळले गेले. अखेर आमच्या एका परिचितांना मी श्रवणभक्ती करताना सापडले. मी लगेचच भीत-भीत घरी परतले. मात्र, आई-वडिलांनी प्रेमळ समज देऊन माझी चूक पोटात घातली. मी गीतरामायण ऐकण्यात दंग झाले होते, याचं त्यांना कदाचित कौतुक वाटलं असेल. आता एवढय़ा वर्षांनंतरही या गीतांतील गोडी कमी झालेली नाही. या महाकाव्याचे वर्णन करताना त्यातल्याच एका ओळीचा आधार घ्यावासा वाटतो.. काव्य नव्हे हा अमृतसंचय!
मनीषा संतोष गोखले, ठाणे पूर्व