मथितार्थ
खूपच नाखुशीने ज्युडोच्या वर्गाला आलेल्या गणूला आता मात्र हळूहळू त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकापाठोपाठ एक मिळत असल्याचा भास होत होता. खरे तर तो तसा नाखुशीनेच आला होता ज्युडोला. त्याला त्यात बिलकूल स्वारस्य नव्हते. म्हणून तर ‘तू पण जाणार का तुझ्या बेस्ट फ्रेंड जयेशबरोबर ज्युडोला?’ असे बाबांनी विचारले त्या वेळेस त्याने स्पष्ट नकार दिला होता; पण जयेश म्हणाला की, तू माझ्याबरोबर ज्युडोला आलास तरच मी तुझ्याबरोबर सांगशील तिथे येईन, त्यामुळे गणूला दुसरा पर्याय नव्हता. मगाशी तो ज्युडोच्या वर्गाला पोहोचला तेव्हाही त्याच्या मनातला गोंधळ कायम होता. बाबांकडून त्यांच्या बोनसच्या पैशांतून दिवाळीसाठी स्मार्टफोन घ्यायचा, टॅब्लेट घ्यायचा, की ली वाइसची जीन्स घ्यायची? तर दुसऱ्या बाजूला मनात असे वाटत होते की, दिवाळीच्या सुट्टीत भरपूर सारे खेळ खेळण्यासाठी गेमिंग कन्सोलच घ्यावे. म्हणजे घरच्या घरीच गेम्स खेळता येतील. हे सारे विचार मनात फेर धरून होते, आणि त्याच वेळेस सावंत सरांचे शब्द त्याच्या कानावर पडले.. आणि तिथून खरी सुरुवात झाली. सर सर्वाना सांगत होते.. ‘तुम्ही हे लक्षात घ्या की, इतर सर्वसाधारण मुलांपेक्षा तुम्ही वेगळे आहात, कारण ते ज्युडोचा गेम व्हिडीओवर किंवा मोबाइलवर गेम म्हणून खेळतात, तुम्ही प्रत्यक्षात खेळताय. व्हिडीओ गेम किंवा मोबाइल गेम खेळून स्नायू पीळदार होत नाहीत किंवा शरीरही सुदृढ होऊ शकत नाही. त्यासाठी मैदानावर जाऊन वेगवेगळे खेळ खेळायला हवेत. मैदानावरचे खेळ खेळताना आनंद तर मिळतोच, त्याच वेळेस ताणतणावही दूर जातात आणि सुदृढ शरीराचा बोनसही मिळतो. सुदृढ शरीर असलेला माणूसच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची क्षमता राखतो, कारण सुदृढ शरीराबरोबर येते ते सुदृढ मन. ते दिसत नाही, पण ते असते आणि तुमच्या साऱ्या क्षमता ते जोखते. ते मन तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे कधी मेणाहूनही मऊ असते तर कधी वज्राहूनही कठोर आणि रामदासांनी सांगितल्याप्रमाणे अचपळ आणि प्रसंगी ब्रह्मांड भेदून पलीकडे जाण्याची क्षमता असलेले, पण तेही शरीराप्रमाणे सुदृढ आणि चांगले असेल तरच त्याच्या सर्व क्षमतांनुसार ते व्यवस्थित काम करते आणि त्याची सुरुवात त्याचा वास ज्या कुडीमध्ये असतो त्या आपल्या शरीराच्या सुदृढतेपासून होते.’
एरवी दूरवर इतर कुणाचेही भांडण झाले तरी ते आपल्या अंगलट येऊ नये म्हणून पळ काढणाऱ्या आणि आपल्या छोटेखानी अंगकाठीमुळे स्वत:बद्दलच कणव बाळगणाऱ्या गणूसाठी सावंत सरांची पुढची वाक्ये मात्र मनाला उभारी देणारी होती. ते सांगत होते.. ज्युडो या जपानी शब्दाचा अर्थ आहे ‘जेंटल वे’. यातील सर्वात पहिले तत्त्व आपल्याला स्वसंरक्षण शिकवते. कितीही उंचीही आणि कितीही वजनाच्या माणसाला तुम्ही या ‘जेंटल वे’ने सहज सामोरे जाऊ शकता, एवढेच नव्हे तर त्याच्यावर मातही करू शकता. केवळ चांगली उंची आणि भरदार शरीराचीच माणसेजिंकू शकतात हा भ्रम आहे. या ज्युडोमध्ये तुम्ही तुमच्यातील त्रुटी किंवा दोष (एखाद्याची उंची कमी असणे) याचा वापर प्रतिस्पध्र्याविरोधात अस्त्र म्हणूनही करू शकतो.. हे सांगत असतानाच त्यांनी त्यांचे म्हणणे प्रत्यक्षात ज्युडोमधील काही डावपेच दाखवत सप्रमाण सिद्धही करून दाखवले. तो वर्ग संपला तेव्हा काहीही न करताच गणूलाही आत्मविश्वास आल्याचा भास झाला. त्याला वाटले की, त्याच्याच अंगावर मूठभर मांस चढले आहे. वर्ग संपताच निर्णयही झाला होता आणि प्रार्थनेमध्ये ‘आरोग्यम् धनसंपदा’ का म्हणतात तेही त्याला उमगले होते!
सुदृढ आरोग्यासाठी सर्व बालगोपाळांना शुभेच्छा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा