घारापुरी बेटावर इ. स. ४५० ते ७५०च्या आसपास पाशुपत शैव साधकांच्या उपासना निवासस्थानासाठी शिवस्थानाची निर्मिती करण्यात आली. कालौघात झिजलेल्या, खंडीत झालेल्या या प्राचीन लेणींचा महाशिवरात्रीच्या निमित्ताने रसास्वाद..
आसेतुहिमाचल पसरलेल्या भारतीय समाजातील सर्व स्तरांमध्ये आणि समाजाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या माणसातही ज्याची लोकप्रियता उदंड आहे असा देव म्हणजे महादेव शंकर. सौराष्ट्रात सोमनाथ, श्रीशैल्यावर मल्लिकार्जुन, उज्जनमध्ये महाकाल, नर्मदातीरी ओंकारेश्वर आणि अमलेश्वर, परळीला वैद्यनाथ, सह्यद्रीत भीमाशंकर, सेतुबंधाला रामेश्वर, औंढय़ानागनाथाला नागेश्वर, वाराणसीत विश्वेश्वर, गोदावरीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, हिमालयात केदारनाथ आणि वेरुळजवळ घृष्णेश्वर ही त्याची बारा प्रसिद्ध ठाणी. या ज्योतिर्लिगांखेरीज स्वयंभू लिंगे, स्थापित लिंगे यांची तर गणतीच नाही. खुद्द मुंबई आणि परिसरात घारापुरी, अंबरनाथ, जोगेश्वरी गुंफा, मंडपेश्वर, कौपीनेश्वर, बाबुलनाथ, वाळकेश्वर अशी अनेक प्राचीन अर्वाचीन शिवस्थाने आहेत. मुंबईनजीकच्या या सर्व स्थानांत प्राचीनता आणि भव्यततेच्या कसोटीत घारापुरीचा क्रमांक प्रथम आहे.
जगभर एलिफंटा लेणी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या गुहा अरबी सागरात गेट वे ऑफ इंडियापासून
११ कि.मी. लांब असलेल्या घारापुरीच्या बेटावर आहेत. एकूण साठ हजार स्क्वेअर फुटात पसरलेल्या अनेक लहान-मोठय़ा गुहा घारापुरी बेटावर आहेत. त्यापैकी काही बौद्ध आणि काही पाशुपत आहेत. तसेच काही उपासनेसाठी आहेत, तर काही निवासी गुहा आहेत. या गुहा नेमक्या कोणी निर्माण केल्या, याबद्दल सबळ पुरावा नाही. परंतु पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते इसवी सन ४५० ते ७५० दरम्यान कळचुरी राजवंशाच्या आश्रयाखाली पाशुपत शैव साधकांच्या निवासासाठी आणि उपासनेसाठी या गुहा बांधल्या असाव्यात. काळाच्या ओघात मूर्तीची झीज तर झाली आहेच. त्याशिवाय, पोर्तुगीजांच्या ताब्यात हे बेट होते तेव्हा येथील शिल्पांचा त्यांनी नेमबाजीसाठी उपयोग केला. त्यामुळे बहुतांशी शिल्पे खंडित स्वरूपाची आहेत. तथापि जे अवशेष दृष्टीला पडतात त्यावरून अनुमानाने ही शिल्पे पूर्ण करून न्याहाळावीत. पौराणिक पाश्र्वभूमी आणि पाशुपत विचारप्रणाली लक्षात घेऊन येथील सर्वात मोठी गुहा, म्हणजे गुहा क्रमांक १ मधील शिल्पांचे रसास्वादन आपण करणार आहोत.
महाभारतात आणि पुराणात पाशुपत सांप्रदायी लोकांचे उल्लेख सापडतात. गुजरातेतील कायावरोहण म्हणजे सांप्रतच्या कारवण या क्षेत्री एका ब्राह्मणाच्या मृतदेहात शंकराने प्रवेश करून तो संजीवित केला. पुढे हा अवतार लकुलीश या नावाने प्रसिद्धी पावून त्याने पशुपत शैव मताचा पुरस्कार केला अशी सांप्रदायिक मान्यता आहे. ही घटना इसवीसनाच्या पहिल्या शतकात घडली असावी. पशुपती शंकर या संप्रदायाचे परम आराध्य आहे. संसार दु:खमय असून जीवनाचे अंतिम उद्दिष्ट ‘दु:खान्त’ साधणे होय असे ते मानीत. या सांप्रदायात आरंभीच सर्वसंगपरित्याग करीत नाहीत. आचार्याकडून दीक्षा ग्रहण करून आधी गृहस्थाने सांसारिक कर्तव्य करीत त्रिकाळ स्नान, भस्मधारण, शिवपूजन, योग इत्यादींचे परिशीलन करावे. मग त्याने आचार्याच्या सान्निध्यात त्यांच्या घरी राहावे. त्यानंतर देवळात आणि नंतर गुहेत राहावे. मंत्रजप, ध्यान आणि अहंकाराचे उच्चाटन इत्यादी करीत सर्वात शेवटी पूर्ण विरक्ती बाणविण्यासाठी स्मशानात राहावे, असा त्यांचा क्रम आहे. या क्रमातील देवालयवास आणि गुहावास यांचे एकत्रीकरण साधण्यासाठी घारापुरीच्या गुंफांची निर्मिती झाली असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गुहा क्रमांक १ला दक्षिण वगळता इतर तीन दिशांतून प्रवेश करता येत असला, तरी तिचा उत्तर दिशेकडील प्रवेश लवकर दृग्गोचर होतो. पूर्वेकडील प्रवेशानजीक एक लहान गुहा आहे. तिथे सप्तमातृका, गणेश, कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. तसेच एक लहान शिवमंदिरही आहे. पश्चिमेस एक खोलीवजा गुहा आहे, जिच्याबद्दल फार काही सांगता येणार नाही. गुहा क्रमांक १ मध्ये पूर्व-पश्चिम अक्षावर अंमळ पश्चिमेकडे एक गर्भगृह आहे. याला चार द्वारे असून प्रत्येक द्वारावर दोन विशालकाय द्वारपाल आहेत. या गर्भगृहात एक शिवलिंग आहे. गुहेच्या तीनही प्रवेशद्वारांवर आणि दक्षिणेच्या भिंतीवर प्रचंड शिल्पे कोरलेली आहेत. याच शिल्पांमधून आपल्याला पशुपत मताचे हृदयंगम दर्शन घडते.
पाशुपत मत असे सांगते की, शिवतत्त्वाची अभिव्यक्ती निष्कल (अमूर्त), सकल-निष्कल (मूर्तामूर्त) आणि सकल (मूर्त) रूपात होत असते. शिवलिंग हे शिवाचे निष्कल रूप होय. पंचमुखलिंग स्वरूप म्हणजे मुखादी अवयव शिवलिंगावर असले की याला सकल-निष्कल रूप म्हणतात. त्यानंतर शिव, शक्ती, धाम, लीला इत्यादीच्या रूपाने शिवाची अभिव्यक्ती होते. याला सकल रूप म्हणतात.
यापैकी तिन्ही प्रकार पहिल्या गुहेत विद्यमान आहेत. गुहेतील गर्भगृहात निष्कल शिवलिंग आहे. आणि दक्षिणेस मध्यभागी प्रचंड असे पंचमुख महेशमूर्तीचे शिल्प आहे जे जगभर ‘त्रिमूर्ती’ या नावाने प्रसिद्धी पावले आहे. यातली गोम अशी आहे की पाच मुखांतील तीन मुखे आपल्याला दिसतात. एक मुख मागील बाजूला असल्यामुळे कोरलेले नाही तर पाचवे मुख ऊध्र्वदिशेला अव्यक्त असल्याने कोरलेले नाही.
ही सकल निष्कल मूर्ती आहे. सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान (मायेचे आवरण घालणे) आणि अनुग्रह या पंचकृत्यांसाठी अनुक्रमे सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या पंचमूर्ती शिव धारण करतो. तत्पुरुष ते ईशान या मुखांना अनुक्रमे पूर्वादी चार दिशा आणि ऊध्र्व दिशा बहाल केलेल्या आहेत. पूज्य आणि पूजक यांमधील दिशेला पूर्व समजावे या सूत्रानुसार आपल्याला तत्पुरुष, अघोर आणि वामदेव यांच्या मुखांचे दर्शन घडते. सद्योजात आणि ईशान दिसत नाहीत.
तत्पुरुषाचे कार्य स्वस्वरूपाला मायिक आवरणाने लपविणे असे असल्यामुळे आधी त्याला शरण जाऊन मायेचे पटल बाजूला व्हावे, अशी भावना शैवाचायाची असावी. तत्पुरुष मूर्तीची मुद्रा ध्यानस्थ आहे, त्याच्या हातात ज्ञानाचे प्रतीक असलेले बीजपूरक फळ आहे. दुसरा हात मात्र खंडित झाला आहे; कदाचित हा अभयमुद्रा दाखवीत असावा.
या मुखाच्या डावीकडे असलेले मुख वामदेवाचे आहे. याची चर्या स्त्रीसदृश आहे. सर्वच मूर्तीचे अधरोष्ठ मोठे असले, तरी वामदेवाचा अधरोष्ठ अंमळ अधिकच मोठा आहे. त्याच्या भालावर कुरळ्या बटा आहेत. शिरोभूषणे, कर्णभूषणे नाजूक आहेत. हातात कमळ धरलेले आहे. ‘मंगलायतनं देवं युवानमतिसुंदरम्’ असे त्याचे आगमोक्त वर्णन आहे. वामभागी विराजमान असलेल्या अंबिकेच्या सहाय्याने जो जगताचे चालन करतो त्याला वामदेव म्हणतात.
तत्पुरुषाच्या उजवीकडे अघोरमुख आहे. अघोर हा विनाशाचा द्योतक आहे. त्याचे मुख विकराळ असून झुपकेदार मिशा आणि दाढी यांनी युक्त आहे. त्याच्या केसात नरकपाल आणि नाग दिसतात तसेच त्याच्या कर्णकुंडलाच्या स्थानी आणि हातातही नाग दिसतो. अघोर हा सर्व पाश तोडणारा आहे. दिसताना भयावह, परंतु साधकांचे हित करणारा म्हणून त्याला अघोर म्हणतात.
सद्योजात हा सृष्टिकर्ता आहे. पाशुपत भिक्षूंना त्याच्याशी काहीच कर्तव्य नसल्याने त्याला अव्यक्तच ठेवला असावा.
ईशान अनुग्रह करणारा आहे. हा स्वस्वरूपाचे ज्ञान करून देतो. स्वरूप हे रूपातीत आहे, आकाशावत् आहे म्हणून ईशान अव्यक्त आहे. अशा प्रकारे महेश मूर्तीचे रहस्य आपण जाणून घेतले आहे.
अन्य शिल्पांचा विचार विविध पद्धतींनी केला जाऊ शकतो. विदुषी स्टेला क्रॅम्रिश यांनी असा विचार मांडला की समोरासमोरील शिल्पात रासामधील विपरीत भाव दिसतो आणि त्यामुळे अघोर आणि घोर अशा देवाच्या दोन्ही बाजू स्पष्ट होतात. देव या दोन्ही रूपांनी भक्तांचे रक्षण करतो असे म्हणता येईल. अघोर मंत्राचे हे जणू मूर्त प्रकटीकरण आहे. परंतु या शिल्पांचे थोडा शास्त्रीय आणि भावनिक दृष्टिकोन वापरून वेगळे विश्लेषण करता येईल. यात प्राक्संस्थ म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे हा मुख्य क्रम आणि उदक्संस्थ म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे हा अनुक्रम ठेवून आपण या शिल्पांची संगती लावणार आहोत.
महेश मूर्तीच्या पश्चिमेकडील पहिले शिल्प गंगावतरणाचे आहे. या शिल्पात शिवासमोर नतमस्तक झालेला भगीरथ आहे. अनेक सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवता हा चमत्कार पाहायला आले आहेत. त्रिपथगामिनी गंगा तीन शिरांसह कोरलेली आहे आणि चतुर्भुज शिव तिला मस्तकी धारण करीत आहे असे दिसते. इथे विशेष बाब म्हणजे उमासतीची प्रतिक्रिया दाखवण्यात शिल्पकाराचे दिसलेले कौशल्य. सतीला एकीकडे आपल्या पतीच्या शक्तीचे कौतुक आहे, पण शंकरावरच्या अबाधित अधिकारामध्ये आता तिची वाटेकरीण आलेली आहे, इतकेच नव्हे तर ती त्याच्या डोक्यावर बसलेली आहे. ती सवतीमत्सराने फणफणत जरा दूर, शंकराकडे किंचित पाठ फिरवून उभी आहे. तिचा मत्सर घालविण्यासाठी शिवाने आपल्या डावा हात तिच्या हनुवटीला लावला आहे (अर्थात हे अवशेषांवरून दिसते). ही एकच कृती शिवशक्तीमधील स्नेहबंधन अगदी तरलतेने दर्शवून जाते.
पूर्वजांच्या उद्धारासाठी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली आणि तिचा ओघ झेलण्यासाठी शंकराला प्रसन्न केले. ब्रह्मलोकातील आपले वास्तव्य सोडून पृथ्वीवर यायला गंगा अनुत्सुक होती. तिने भगीरथाला सांगितले की माझा प्रचंड ओघ शिवासकट सर्व पृथ्वी वाहून नेईल. पूर्ण शक्तीनिशी तिने स्वत:ला शिवावर लोटले. परंतु शंकराने अगदी लीलया त्याच्या जटेमध्ये तिला धारण केले. तिच्या गर्वाचे खंडन झाले.
रागावलेल्या उमेला शंकर जणू सांगतोय, ‘‘शिव: शक्त्यायुक्तो यदि भवति शक्त: प्रभावितुं न चेदेवो देवं न खलु कुशल: स्पन्दितुमपि।’ जिथपर्यंत शिव शक्तियुक्त होत नाही तिथपर्यंत तो श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. शिवाच्या मनोगताचे सूत्र अर्धनारीश्वराच्या शिल्पात उलगडते. या शिल्पात उजवा भाग पुरुषाकृती आणि डावा भाग ललनाकृती आहे. शरीर दृष्टय़ा तर फरक स्पष्ट आहेच. परंतु मुखावर अध्र्या बाजूला पुरुषी भाव आणि अध्र्या बाजूला स्त्रीभाव खुबीने साकारले आहेत. शक्तीचा ओठ शिवापेक्षा अधिक मोठा आहे. शिवाचा नेत्र शांत तर शक्तीचा प्रफुल्लित वाटतो. त्यांचे केशसंभार, आभूषणे यांतून अर्धनारीश्वराचे सौंदर्य खुलत गेले आहे. याही शिल्पात देवी-देवतांची मांदियाळी आजूबाजूला दिसते.
अखिल विश्व हे शिवशक्तीचा विलास आहे. शिवाचे व्यक्त शरीर, इच्छा, क्रिया आणि ज्ञान या त्याच्या शक्ती, त्याचे ऐश्वर्य हे सर्व शक्तीमुळे आहे. शक्तीच्या हातातील दर्पणात शिव जगद्रूपाने प्रतिबिंबित होतो. तो तिच्यापासून सर्वथा अभिन्न आहे. असे असताना उमेने राग धरू नये असे शिवाचे म्हणणे आहे.
शिव-शक्ती मूलत: अभिन्न असूनही लीलेसाठी भिन्नरूपे धारण करतात. पश्चिम द्वाराकडील पार्वती परिणयाचे शिल्प या सूत्राला पुढे नेते. या शिल्पात शिवाला कल्याणसुंदर म्हणतात. तो सर्व अलंकारांनी युक्त आहे आणि त्याला उजव्या हाताने देवीचे पाणिग्रहण करायचे आहे. पार्वती नाजूक आणि सलज्ज मुद्रेची असून देवाच्या हाती तिने हात दिलेला आहे. तिच्या मागे आनंदी हिमालय आहे. तिथेच द्विहस्ता लक्ष्मी आणि तिच्यामागे अमृतकलश घेतलेला चंद्र आहे. समोरील बाजूस पुरोहित म्हणून ब्रह्मदेव असून त्याच्या मागे विष्णू आहे. अन्य दिव्य स्त्रीपुरुष आकाशातून पुष्पवृष्टी करून हा प्रसंग साजरा करीत आहेत.
सतीने दक्षयज्ञात आत्मदहन केल्यावर तिने हिमालयाच्या घरी अवतार घेतला. मध्यंतरीच्या काळात तारकासुराने सर्व देवता आणि मानव यांना त्रस्त केले होते. केवळ शिवाचा पुत्र तारकासुराला पराजित करू शकणार होता. सतीच्या निधनानंतर शिव ध्यानरत झाला होता. तेव्हा हर प्रयत्नाने त्याचे मन वळवावे यासाठी देवतांनी खटाटोप चालविला. इथे पार्वती उपवर झाली. लहानपणापासून तिचे मन शिवावर जडले होते. त्याला मिळविण्यासाठी तिने दुर्धर तप मांडले. तिची परीक्षा पाहण्यास शिवाने तिला इंद्र आणि विष्णूच्या रूपात दर्शन देऊन वैभवाचे प्रलोभन दाखविले. पण पार्वती त्याला भुलली नाही. मग वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून शिवाने स्वत:ची यथेच्छ निंदा केली. शिवाचा तऱ्हेवाईक स्वभाव, त्याचे वैराग्य, त्याचे विचित्र सवंगडी इत्यादीबद्दल तो खिल्ली उडवू लागला. पार्वतीला त्याचा राग येऊन त्याला ती शाप देणार इतक्यात शिवाने स्वत:चे रूप प्रकट केले आणि तिला प्रसन्न होऊन इच्छित वर दिला. अशा रीतीने शिव-शक्ती पुन्हा एकत्र आले.
या कथेत शिव आणि पार्वती हे गुरू-शिष्यांसाठी रूपक आहेत. परीक्षा पाहणारा गुरू हा शिव असून संशयरहित झालेला शिष्य ही पार्वती आहे. शिवदीक्षा हा विवाह आहे. सामान्य जीवन सोडून साधना मार्गावर अग्रेसर होण्यासाठी दीक्षेनंतर शिष्य तयार होतो.
विवाहोत्तर शिवपार्वतीचा सारीपाट रंगतो. याचे शिल्प पूर्वाद्वारावर आहे. कधी शिवाची सरशी तर कधी पार्वतीची. चार फासे हे चार दिशा आणि चार युगे यांची प्रतीके आहेत. सर्व ब्रह्मांडात आणि अनादिकालापासून हा खेळ चालू आहे. सृष्टीचे सृजन होते त्यावेळी शिव हरतो. आपले निर्गुण रूप तो शक्तीच्या स्वाधीन करतो. तिला आपल्या कर्तृत्वाची जाणीव होते. ती शिवाकडे काहीच ठेवीत नाही. त्याचा म्हातारा बैलसुद्धा ती जिंकून घेते. या शिल्पात शिव हरला आहे. नंदीला पार्वतीच्या सख्या घेऊन जात आहेत. शिव पार्वतीची विनवणी करीत आहे, पण ती ऐकत नाही असे हे शिल्प आहे.
या रूपकात जीवाची शिवापासून परिच्छिन्नता दर्शविलेली आहे. ऐहिक प्रगतीसाठी जीव देवाकडून सर्व भौतिक वस्तू मागतो आणि त्या खटाटोपात देवाला विसरतो. साधनेत सिद्धींचे विघ्न निर्माण झाले किंवा अहंकार बळावला की ध्येयापासून शिष्य कसा दूर जातो हेही त्यात दर्शविले आहे, असे वाटते.
सर्जन आणि विसर्जन या निसर्गचक्राचे अनुकरण उपासना क्रमातही पाहायला मिळते. यंत्रपूजेत मध्यबिंदूतील देवतेपासून क्रमाक्रमाने बाहेरील आवरणांचे ध्यान अथवा पूजन करणे याला सृष्टिक्रम असे म्हणतात; तर बाहेरील आवरणातून क्रमाक्रमाने मध्य बिंदूकडे जाणे हा संहारक्रम आहे. सृष्टिक्रमात देवत्व प्रसरण पावते. देव, त्याची अर्धागिनी, त्याचे सहचर, त्याचे धाम आणि लीला यांचे चिंतन हा सृष्टिक्रम होय. भक्तिमार्गात अशा चिंतनाला प्राधान्य असते. योग आणि ज्ञानाचा मार्ग याहून विपरीत आहे. पूजा, जप, ध्यान, प्राणायाम इत्यादींनी सुरुवातीला बा’विश्वातून भावविश्वात प्रवेश करणे आणि त्या भावविश्वाचा नाश करून, वृत्तींचा निरोध करून निष्कलाशी तादात्म्य पावणे हा संहार क्रम आहे. पुढील दोन शिल्पे संहार क्रमाची द्योतक आहेत.
पश्चिम द्वारावर उत्तरेकडील भिंतीवर अंधकासुरसुदानाचे शिल्प आहे. रौद्र रसाच्या या शिल्पात अघोराचे भयंकर रूप दिसते. त्याचे दात विक्राळ आहेत, चर्या संतप्त आहे. अनेक शस्त्रांसह त्याचे हात सज्ज आहेत. त्याने त्रिशुळावर अंधकाला उचलले आहे आणि त्याचे रक्त साठविण्यासाठी कपाल धारण केले आहे. अंधकासुराबरोबर गजासुराचाही नि:पात करून त्याचे चामडे तो नाचवीत आहे, हे एका कोपऱ्यात हत्तीचे दिसणारे मस्तक सुचविते.
पार्वतीने एकदा शिवाचे नेत्र झाकले तेव्हा सूर्य, चंद्र आणि अग्नी या तिन्ही ज्योती लोपल्या आणि सर्वत्र अंधकार पसरला. या तमातून एक बालक जन्मला. अंधकासुर नावाने हा बालक प्रसिद्ध झाला. त्याने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेवाने तो नाकारताच त्याने असे म्हटले की, त्यास त्रलोक्यावर जय मिळवता यावा आणि ज्या वेळी तो स्वत:च्या आईवर मोहित होईल तेव्हा त्याचा अंत व्हावा.
असा वर प्राप्त करून त्याने सर्वत्र हाहाकार माजविला. सर्व सृष्टी त्रस्त झाली, पण कोणाचे काहीच चालेना. मग एक दिवस हिमालयातील गुहेत क्रीडा करणाऱ्या शिव-पार्वतींना अंधकाच्या दूतांनी पाहिले. तिच्या सौंदर्याचे वर्णन त्यांनी अंधकासमोर केले. तो तिच्यावर मोहित झाला आणि तिला त्याने लग्नाची मागणी घातली. शंकराने ही मागणी धुडकावल्यावर अंधकाचे आणि अघोरशिवाचे युद्ध झाले. अंधकाच्या अंगातून पडणाऱ्या रक्तबिंदूंमधून त्याच्यासारखे आणखी अंधक तयार झाले. त्यांचा नाश करण्यासाठी आणि अंधकाचे रक्त पिण्यासाठी शिवाने सप्तमातृकांची निर्मिती केली. शेवटी शंकराने त्रिशुळाच्या अग्रावर अंधकाला उचलले. शिवपुत्र असल्याने तो मरेना. भैरवाच्या नेत्राग्नीने त्याचे पाप दग्ध झाले आणि तो शिवस्तुती करू लागला. अस्थिपंजर उरलेल्या अंधकाला पुन: पार्वतीने पुत्र रूपाने स्वीकारून त्याला भृंगी असे नाव दिले. तो शिवगणांचा मुख्य बनला. अशा रीतीने अंधकाच्या तमोगुणाचा नाश झाला.
अंधकासुराचे आख्यान हे मनोलयाचे आख्यान आहे. रजोगुणाच्या आश्रयाने जीव कार्य करतो. विधायक कार्ये सत्वोन्मुख रजोगुणाने होतात आणि विध्वंसक कार्ये तमोन्मुख रजोगुणाने होतात. या दोन्ही कार्याचा मूळ स्रोत मन आहे. संकल्प विकल्प यांचा नाश करून पुढे निर्विकल्प स्थिती प्राप्त होते. यानंतर मनाचा केवळ निरुपद्रवी सांगाडा उरतो. हे या कथेतून सुचवायचे आहे.
आता पूर्वप्रवेशाच्या उत्तरेकडच्या भिंतीवर असलेल्या रावणानुग्रहाच्या शिल्पाकडे जाऊ या. या शिल्पात सर्वात खाली रावण, मग कैलासावर बसलेले उमामहेश्वर (पार्वती खंडित आहे), भृंगी इत्यादी शिवगण दिसतात. शंकराच्या डाव्या हाताखाली एक खुजा पुरुष दिसतो, ज्याच्या डोक्यातून वर आलेले त्रिशुळाचे पाते दिसते. हा आयुध पुरुष आहे. असाच एक पुरुष उजवीकडे आहे. देवांची आयुधे, आभूषणे ही सचेतन असतात असे पुराणात उल्लेख आहेत, त्याचेच हे शिल्पमय रूप.
रावणाला त्याच्या आईसाठी कैलास लंकेला न्यायचा होता म्हणून त्याने त्याची दहा डोकी आणि वीस हात लावून कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. इथे शिव-पार्वतीचे भांडण होऊन पार्वती रुसून निघाली होती. तेवढय़ात कैलास हादरू लागला. भयभीत होऊन पार्वतीसह सर्व शिवगण शंकराकडे धावले. शंकराने सहज आपला पायाचा अंगठा कैलासावर दाबला. त्याच्या प्रचंड आघाताने रावण कैलासाखाली चिरडला गेला. तो गयावया करून स्तोत्र म्हणू लागला. पार्वतीचा राग शमून ती पुन्हा शंकराजवळ आल्याने शंकर प्रसन्न झाला. त्याने रावणाला सोडविले आणि त्याला वरदान दिले.
रावणानुग्रह हे मदहरणाचे शिल्प आहे. ईश्वराकडून मिळालेल्या वैभवाचा, सिद्धींचा गर्व होऊन जर कोणी त्याच्याशी तुलना करू पाहील तर त्याचे गर्वहरण खचित होईल, असा संदेश इथे साधकाला मिळतो. या गर्वहरणातून ईश्वराचा गुप्त अनुग्रहच साधकाला मिळतो. याचबरोबर, ईश्वराला विमुख झालेल्या जीवरूपी पार्वतीची दैना होऊन पुन: तिला त्यालाच शरण जावे लागते हा उपदेशदेखील इथे अनुस्यूत आहे. अहंकाराचे उच्चाटन हे पाशुपतांच्या चर्येचे एक विशेष अंग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आता उत्तर द्वारावरील दोन शिल्पांची चर्चा करू. पश्चिम भिंतीवर नटराज आहे. हे एक आगळे शिल्प आहे. नर्तकाच्या गिरकीचा आवेश मूर्तिकाराने कौशल्यपूर्णतेने इथे साकारला आहे. शिल्पाची डावी बाजू किंचित आत गेलेली आहे. याचे कारण की नटराज उजवीकडून डावीकडे गिरकी घेत आहे. संपूर्ण शिल्प त्याच्यासमवेत गिरकी घेईल असा भास होतो.
शिवदीक्षा घेऊन साधना मार्गावर अग्रेसर झालेला शिष्य मद, मत्सर, काम, क्रोध, चांचल्य यांना जिंकत मनोनाश साधत शिवसायुज्यतेकडे निघाला आहे. सृष्टी आणि लय यामध्ये त्याला ईश्वराचे आनंद तांडव दिसते आहे. तो नि:शंक आहे आणि त्यामुळे नटराजाप्रमाणे त्याच्या मनात आनंदोर्मी उचंबळत आहेत. पशुपातांमध्ये नृत्य करून अचानक थांबणे आणि खाली बसून हुडूक्कार करीत मनोनाश साधणे असा साधनेचा भाग होता. हे सूत्र पुढील शिल्पात दिसते.
हे शिल्प योगीश्वराचे आहे. या शिल्पात कमलासीन शिव पद्मासनात ध्यानस्थ बसलेला आहे. ब्रह्मादी देवता, सिद्ध, चारण, नाग इत्यादी त्याचे दर्शन घेतात. या शिल्पाची खूप वाताहत झालेली आहे. परंतु असेच शिल्प पश्चिमेकडील लेण्यात असल्यामुळे त्यावरून हे लकुलीशाचे शिल्प आहे असे शिल्पतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
समाधिसुखाचा अनुभव, शिवसायुज्य आणि त्या योगे ‘दु:खान्त’ हे साधकाचे अंतिम उद्दिष्ट आहे याची जाणीव य शिल्पातून होते. असा साधक त्रलोक्यात वंद्य होतो असेही इथे प्रतीत होते.
जयाची शिवनामीं भक्ती।
तयाचीं पापें सर्व जळतीं ।
आणि चुके पुनरावृत्ती ।
तो केवळ शिवरूप ।
ही सर्व शिल्पे पाहणे एक भावानुभूती आहे. या शिल्पांकडे तासन्तास पाहत राहणे, त्यांच्या सौंदर्यात हरवून जाणे हीसुद्धा चतुरपणे योजलेली एक साधना असू शकेल. या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक कलावंताने, साधकाने, अभिमानी भारतीयाने घारापुरीच्या चिरंतन शिवकीर्तनाला अवश्य यावे.
शिवमहिम्नातील हा श्लोक घारापुरीच्या वर्णनाला साजेलसा आहे. ‘हे शंकरा, तुझ्या महिमेचा पार जेथे ब्रह्मादिकांना लागत नाही आणि त्यांची वाणी तुझे वर्णन करण्यास थिटी पडते, मग तुझ्या वर्णनाचा मी केलेला प्रयत्न अपुरा पडावा यात नवल ते काय? तेव्हा जसे तू त्यांचे अपूर्ण स्तवन स्वीकारतोस तसाच माझासुद्धा प्रयत्न तू गोड मानून घे.’
शेखर खांडाळेकर