आज माणसाने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवला आहे. सारी क्षेत्रे त्याने आपल्या हातात घेतली आहेत. ग्रहताऱ्यांपासून साऱ्यांचा शोध घेतला आहे. इतकेच नाही तर तो चंद्र-मंगळावर जाऊन पोचला आहे आणि तिथे वस्ती करण्याचे स्वप्न बघतो आहे. गगनभराऱ्याही तो मारतो आणि अथांग सागराच्या तळाशी जाऊन तेथील जीवसृष्टीचा अभ्यास करून चुकला आहे. पृथ्वीच्या आणि ग्रहांच्या हालचालचीही सुदूर अशी कल्पनाही तो करू शकतो. भूकंप, वादळ, त्सुनामी, ज्वालामुखीचीही त्याला आधीच चाहूल लागते आहे. देवकणांचा शोधही त्याला लागला आहे. दुनियेचं अंतर कापून दूरस्थ व्यक्तीशी तो क्षणात संपर्क साधू शकतो, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो. त्यामुळे आता त्याला काहीच कठीण वाटेनासे झाले आहे. म्हणूनच की काय त्याला दैव आणि देव या खुळचट कल्पना वाटू लागल्या आहेत. मानवी पेशींचा अभ्यास व प्रतिसृष्टीची निर्मिती करण्याचे स्वप्नही बघू लागला आहे. शरीर विज्ञान व विज्ञानाने भलतीच प्रगती केली आहे. अशी उत्क्रांती करीत असला तरी कधी कधी त्याला दैवापुढे नमावंच लागतं. जन्म-मृत्यूचं एक श्वासाचं अंतर तो दूर करू शकत नाही. जन्माबरोबर मृत्यू हा आलाच. मधली स्टेशनं पार करत मग तो मृत्यूच्या स्टेशनावरच विसावतो. पण ही मधली स्टेशनं पार करणं तेवढं सोपं नाही. ह्य़ालाच जीवन असं नाव आहे जे सुख-दु:खाच्या अनंत धाग्यांनी गुंफलेलं असतं.

अशा अनंत विचारात चारुलता गढून गेली होती. बेलचा आवाज ऐकून ती भानावर आली. सवयीप्रमाणे दार उघडून पतीराजांच्या हातातली बॅग घेऊन यांत्रिकप्रमाणे आत वळली अन् पायाला स्टूलचा धक्का लागला आणि तिच्या लक्षात आलं की आपण घरात दिवाच लावला नाही. देवाचा, तुळशीचा नंदादीपही उजळला नाही. घरभर काळोख दाटला होता. मागोमाग, चंद्रशेखर आत आले. आज काहीतरी बिनसलंय हे त्यांच्या ध्यानात आलं.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर

‘‘अगं, अंधारात काय करत होतीस चारू? तुझा चेहरा असा पडलेला का दिसतो? काय झालं ते आधी सांग?’’ पतीराजांचा काळजीचा स्वर ऐकून ती अधिकच गहिवरली. ती काही नाही असं बोलून गेली, पण टय़ूबलाइट उजळल्याबरोबर तिचा चेहरा सांगून गेला. त्यांनी पुन्हा प्रश्न केला.

‘‘नाही, काही नाही रे. डोकं जरा जड झालं होतं म्हणून विचार करीत बसले, राहिले तुझी वाट पाहात. तू फ्रेश हो. मग मी…’’

‘‘नको. तू आधी फ्रेश हो. मी पाणी आणि चहा आणतो दोघांसाठी. मग शांतपणे बोलू. तापबीप तर नाही ना आला?’’ चारुदत्तांनी काळजीच्या सुरात म्हटले आणि हात लावून ताप नसल्याची खात्री करून घेतली. ती जड पावलांनीच उठली. चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. तुळशीचा, देवाचा दिवा लावून उदबत्ती लावली. त्या प्रसन्न वातावरणात तिचा ताण कमी झाला. देवाला हात जोडून प्रार्थना करून ती शांतपणे बसली, पण मनातले विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. चारुदत्तांनी दोघांचा चहा आणला करून. गरम चहा पोटात जाताच ती थोडी तणावमुक्त झाली. पाच मिनिटे अशीच गेली. त्याने त्यांची कन्या सोनालीची चौकशी केली. चारू म्हणाली, ‘‘ती केव्हाच पळाली खेळायला बराच वेळ झाला. तिलाही घरी बोलवायला हवं. आपण होऊन नाही येणार ही.’’

आता मात्र चारूच्या पोटात शब्द डचमळत होते. सारे काही नवऱ्याला सांगितल्याशिवाय चैन पडणार नव्हते. ती बोलू लागली- ‘‘परवा न मी भाजीबाजारात गेले होते. थंडी असल्यामुळे साऱ्याच भाज्या कशा हिरव्यागार रसरसशीत दिसत होत्या. काय घेऊ अन् काय नाही असं मला झालं होतं. मनसोक्त भाज्या घेऊन झाल्या आणि आता ठेवायला कापडी पिशवी नाही हे पाहून मी मोह आवरला. मी मागे वळले तर काय माझी कॉलेजमैत्रीण नेहा भेटली. लग्नानंतर दोघी प्रथमच भेटत होतो. गप्पांना खूप रंग आला. कॉलेजच्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. तेवढय़ात स्कूटरचा हॉर्न ऐकून आम्ही भानावर आलो आणि आपण रस्ता अडवला हे लक्षात आलं. तिलाही संक्रांतीकरता बरंच काही घ्यायचं होतं. दोन दिवसांनी संक्रांतीचं हळदीकुंकू घ्यायला ये असं आग्रहानं सांगून ती निघून गेली. होकार देत मीही आपली वाट धरली. ठरल्याप्रमाणे मी आज सोनलला घेऊन साडेतीनलाच निघाले. हळदीकुंकू पाचनंतर होते, पण गप्पा मारायला तिने मला लौकरच बोलवले होते. सोनापण मस्त तयार झाली होती वेळेवर.’’

‘‘अच्छाऽऽऽ, परवा तू खूप साऱ्या भाज्या घेतल्यास तेव्हा मला वाटलं तुझी किटी पार्टी वगैरे काही तरी असावं. मी विचारलंही होतं.’’

‘‘हो बरोबर. सवयीप्रमाणे मी खूप साऱ्या भाज्या घेतल्या.’’

‘‘हो पण या साऱ्याचा इथे काय संबंध? आज तू उदास का आहेस?’’

‘‘अरे, ऐक तर खरं पुढे. आम्ही दोघी मायलेकी गेट उघडून आत शिरलो. सुंदरशी रंग भरलेली रांगोळी आमचे हसत स्वागत करत होती. आज घरी हळदीकुंकू आहे असंच जणू सांगत होती. पुढे जऊन बेल वाजवताच एक मध्यम बांध्याची सुंदर तरुणी समोर दार उघडून हसत स्वागत करून आम्हाला आत घेऊन गेली. मी माझी ओळख करून दिली आणि आम्हाला बसायला सांगून ती आत गेली. बहुधा ही नेहाची जाऊ असावी असा माझा तर्क. नेहा तयार होत होती. तोवर मी दिवाणखान्यातून नजर फिरवली. सुंदर कल्पक अशी सजावट केली होती. सारं कसं सुंदर आकर्षक आणि प्रसन्न होतं. मी मनात म्हणाले- छानच आहे नेहाचं सासर?’’

‘‘..इथवर सारं ठीक झालं, पण चिंतेचं हे कारण होतं का?’’

‘‘अरे नाही रे, ऐकून तर घे. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर मला जरा चिंतेचा भास होत होता? काय कारण असावे बरे? वसंतात बहरलेली बोगनवेल ग्रीष्मात सुकावी तसे काहीसे वाटत होते. तेवढय़ात नेहा नटून आणि सुंदर साडी नेसून, दागिने घालून समोर उभी. हे रूप तर वसंतात बहरलेल्या बोगनवेलीचे होते. सौभाग्याचं आणि स्वास्थ्याचं तेज झळकत होतं. बरं झालं तू नव्हतास बरोबर माझ्या. नाही तर-’’ असं म्हणत तिने ओठ दाबला.

‘‘अ, नाहीतर काय? मी फक्त तुझ्यावर फिदा आहे.’’ तो.

‘‘ते मी जाणून आहे रे. तू फक्त माझा आहेस?’’ असे म्हणून तिने लाडिकपणे त्याच्याकडे पाहिले. थोडा ब्रेक मिळाला.

‘‘सोना नेहाच्या मुलीबरोबर खेळत होती. खूप गप्पा रंगल्या. तिच्या सासूबाईही माझी चौकशी करून गेल्या. त्याही एक घरंदाज सुखवस्तू गृहिणी वाटत होत्या. आणि तेवढय़ात आतून त्रासिक हृदयद्रावक आवाज आला. त्याला कारुण्याची छटा होती. माझ्या चेहऱ्यावर गांभीर्य पसरलेले पाहून तीही गंभीर झाली. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले-

‘अगं, तो माझ्या भावजींचा मुलगा आहे. त्याची तब्येत ठीक नसते ना म्हणून तो रडतो, चिडचिड करतो. डॉक्टर वगैरे सारे करून झाले. पण काही उपयोग नाही.’

‘असं काय झालंय एवढं त्याला?’ मी चाचरतच विचारले.

‘आता बाहेर आल्या होत्या त्या ना माझ्या मोठय़ा जाऊबाई. दोघेही बँकेत नोकरीला होते. पण तीन वर्षांपासून वहिनींना मात्र नोकरी सोडावी लागली. रौनकचं सारं करण्यातच त्यांचा सारा वेळ जातो. आम्ही सर्व त्याला राजू म्हणतो.’’

‘पण असं काय घडलंय? तू सारं सांग तरी आता.’ मी म्हणाले.

‘‘अगं त्याची अवस्था अशी आहे की तो उठून चालू शकत नाही. नीट बोलू शकत नाही. सारे विधी जागेवरच करतो. नोकर कंटाळतात हे सारं करायला. आई मात्र आपलं बाळाचं स्वत:च करते. वहिनी नाही टाळू शकत. चिडचिड होते त्यांची. तेवढय़ात आतून आवाज आला. ‘घाणेरडा पोरगा. कितीही स्वच्छ करा. पुन्हा तसाच. दमले तुझी सेवा करून. तेवढय़ाकरताच जन्म दिला आहे मी तुला.’ त्यापाठोपाठ हुंदक्याचा आवाज येत होता.

‘राणी आणि माझी पिंकी साधारण बरोबरीच्या. राणी तीन वर्षांची झाली आणि वहिनींना हवं नकोच्या उलटय़ा सुरू झाल्या. दोघांनाही मुलगा हवा होता. माझे सासू-सासरेपण घरात गोपाळकृष्ण रांगणार म्हणून खूश होते. सारेच वहिनींचे कोडकौतुक करत होते. आई स्वत: त्यांच्याकडे विशेष लक्ष देत. हवंनको ते बघत. या दोघांच्या मनात मात्र सतत शंका. मुलगीच झाली तर? परक्याचं धन. त्यापेक्षा राणी एकटीच बरी. म्हणतात ना संशय पिशाच्च महाझोटिंग. सोनोग्राफी झाली. तसा यांनी डॉक्टरच्या मागे तगादा लावला. ‘काय आहे मुलगा की मुलगी’?

‘अहो, एवढय़ात काय समजणार? कायद्याप्रमाणे आम्ही सांगू शकत नाही. शिवाय मुलगा काय आणि मुलगी काय सुंदर, सुदृढ बालक जन्माला यावं त्यात काही दोष नसावा. हे बघण्यापुरतं सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. तुम्ही आनंदाने स्वागत करा येणाऱ्या जिवाचं. तब्येत सांभाळा? त्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला. नक्कीच मुलगी आहे.

बरेचदा वहिनी डॉक्टरकडे जाते म्हणून सांगून जायच्या, पण त्या कुठे जायच्या कळले नव्हते. सुशिक्षित उच्चभ्रू कुटुंब. धनसंपन्न. शिवाय महिना सुरू झला. काळजीचे कारण नव्हते. हो-ना करत नववा महिना सुरू झाला. वहिनी गर्भभाराने जडावल्या होत्या. पण चेहऱ्यावर मधूनच चिंतेची लकेर उठत होती. आणि सुरेख चेहऱ्याला निस्तेज करीत होती. बाळंतपण होऊन मुलगा झाला. सारे आनंदले. दवाखान्यात एकच नाद- मुलगा, मुलगा झाला. जग जिंकल्याचा आनंद होता तो. भावजी पेढय़ांचा पुडा आणि बुके घेऊन आले. वहिनींचा चेहरा आनंदाने मोहरून  आला होता. प्रसववेदना पळाल्या होत्या. चाइल्ड स्पेशालिस्ट तपासणीला आले. बाळ बराच वेळ रडलेच नाही, डॉक्टरांकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यांच्या प्रयत्नांनी ते रडायला लागले आणि बाकी सर्व हसायला लागले, हा आनंद अल्पावधीपुरताच होता. डॉक्टरांचा उदास चेहरा बोलत होता. बाळाच्या पायात दोष होता. वहिनींना सांगणे तर शक्यच नव्हते. बाहेर बोलवून त्यांनी आम्हा सर्वाना सारा प्रकार सांगितला. पायाची नीट वाढ झाली नव्हती. ते शक्तिहीन होते. भाऊजींच्या हातातला पेढय़ांचा पुडा गळून पडला होता. दैवाने दिले ते कर्माने ओढून नेले होते. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे सत्य साऱ्यांना पटले होते. मुलगी नको म्हणून आणि मुलगीच आहे असे समजून चूपचाप घेतलेल्या औषधांची ती करामत होती. माणसाच्या हातात काहीच नाही. एका जिवाला जगात आणणे किंवा न आणणे हे आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही ते करायला जातो मनुष्य आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. जन्ममृत्यूचं खातं आपलं नाही. अजून त्यावर विजय मिळवायचा आहे. नाहीतर मानवाचा दानव व्हायला वेळ लागणार नाही. दोष आपलाच होता? त्या आता कुणाला दोष देणार?

बोलता बोलता नेहा अवाक्  झाली. आमचे दोघींचेही डोळे पाणावले होते. मी जरा आत डोकावले आणि सुन्नच झाले. मातेची परीक्षाच होती ती. नकळत आपल्याच हाताने आपल्यावर तिने धोंडा पाडून घेतला होता. त्याच्या सेवेत ती डुबून गेली होती. जणू जगच विसरली होती. ते तीन वर्षांचं सुंदर लेकरू एका जागी बसून होतं. मलमूत्र विसर्जनही तिथेच होत होतं. का कोण जाणे पण ते त्रासिक चिडचिडं झालं होतं. एकटेपणा आला असेल त्याला. वहिनी काकुळतीने म्हणत होत्या. ‘अग राणी, येना गं, ह्याच्याशी खेळायला. बिचारा, दिवसभर एकटाच असतो घरात. तू बहीण आहेस ना गं त्याची! तशी राणी फणकारली, चिडली- ‘मी नाही खेळत त्याच्याशी. नुसता एका जागी बसून असतो. ना हसत, ना नीट बोलत, ना खेळत. मला नको असला भाऊ. त्यापेक्षा दवाखान्यातून माझ्यासाठी बहीणच का नाही आणलीस? त्या मिनूची छोटी बहीण बघ कशी छान खेळते तिच्याशी. तिला हळदीकुंकासाठी नटायचे होते.

राणी बाहेर पळाली खरी मनातले सारे भाबडेपणाने बोलत, पण त्यात असत्य काहीच नव्हते. त्या सत्याने मात्र वहिनींच्या काळजाचा तुकडा तोडला होता. घाव घातला होता. दोन्ही डोळ्यांमधून अश्रुधारा वाहात होत्या. त्या अश्रुधारा त्यांच्या पोटच्या गोळ्यावर अभिषेक करीत होत्या.

जन्ममृत्यूचं गणित माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. ते सोडवण्याचा मानवाला अधिकार नाही. हे सत्य वहिनींना पटले होते. आपलाच अट्टहास आपल्याला भोवला होता. आपल्या धर्मग्रंथांनी, संतांनी, गुरूंनी भ्रूणहत्या महापाप म्हणून सांगितले आहे, ते अगदी बरोबर आहे. दोन अश्रुबिंदू डोळ्यांच्या शिंपल्यातून ओघळले आणि संक्रांतीचा गोड सण कडू करून गेले. सारी कहाणी ऐकून चंद्रशेखर सुन्न झाले. चारू उद्गारली ‘दैव जाणिले कुणी’?

डॉ. वसुधा पांडे – response.lokprabha@expressindia.com