भाग्य
आपण सिनेमात, नाटकात मजेशीर गोष्टी घडलेल्या पाहतो आणि म्हणतो की, छे असं कुठं घडतं का? उगीच आपलं काही तरी दाखवतात झालं. पण काहींच्या आयुष्यात असं घडतं की त्यांचं आयुष्यच बदलून जातं. ७० वर्षांपूर्वी सदू आपलं कोकणातलं गाव, आई-वडील, भावंडांना सोडून मुंबईत आला होता. त्याला कारण भयंकर गरिबी. वडील लोकांची शेती करत. आई शेतावर मजुरीला जात असे. मजुरी फारच कमी मिळत असे. तेवढी मजुरी इतक्या माणसांना दोन वेळच्या अन्नाला पुरी पडत नसे. एक वेळ भाताची पेज व एक वेळ भात, पातळ आमटी, मग कपडय़ाला पैसे कुठून आणणार? फाटके कपडे घालून सदू शाळेत जाऊ लागला.
पण शाळा शिकून सदूला काय नोकरी मिळणार त्यापेक्षा आतापासून हाताखाली जमीन कशी कसायची हे शिकवावं. लोकांच्या गाई-म्हशी कशा चरवायला न्यायच्या हे शिकला तर तेवढाच संसाराला हातभार लागेल. एक वेळ तरी पोटभर खायला मिळेल आणि वडिलांनी सदूची शाळा सोडवली. तो दिवसभर वडिलांच्या हाताखाली जमिनीवर राबायचा. मोटेचे पाणी काढायचा. हे सगळं बघून सदूच्या आईला वाटलं की, एवढय़ा लहानपणापासून त्याला कामाला लावण्यापेक्षा त्याला मुंबईला पाठवलं तर? तिथे सर्वाना काम मिळतं आणि पगार पण कोकणातल्यापेक्षा दुप्पट मिळतो. तसं तिचा लांबचा भाऊ मुंबईत राहत होता आणि घरी पैसे पाठवायचा.
तिने नवऱ्याला सांगितलं की सदूला आपण मुंबईला पाठवू. थोडे दिवस माझ्या भावाकडे राहील मग कुठं तरी खोली घेऊन राहील. तसं सदूला मुंबईला पाठवलं व भावाला निरोप दिला की सदूला कुठे तरी कामाला लाव. दूरच्या मामाचं गाडय़ा दुरुस्त करायचं गॅरेज होतं. त्यानं सदूला आपल्या हाताखाली घेतलं. एका वर्षांत सदू गाडय़ा धुऊन रिपेअर करू लागला. तिथेच गॅरेजमध्ये तो राहायचा. जेवणखाणं, कपडे सगळं मामाच करायचा. वर १० रुपये मनिऑर्डरने बहिणीकडे पाठवू लागला. बघता बघता दोन-तीन वर्षे गेली आणि एके दिवशी एक युरोपिअन बाई आपली शेव्हरलेट गाडी घेऊन आल्या. सदू लगेच पुढे होऊन गाडीत काय खोट आली ते पाहू लागला. मामाने त्या बाईंना सांगितले की, हा माझा भाचा तुमची गाडी दुरुस्त करून ठेवेल.
२-४ दिवसांनी सदूने गाडी स्वच्छ धुऊन दुरुस्त करून तयार ठेवली होती.
त्यांना सदूचं काम आवडलं. त्यांनी मामाला विचारलं की हा मुलगा माझ्याकडे काम करील का? माझी बेकरी आहे त्याला मी सर्व शिकवून तयार करेन. आम्ही दोघेच असतो- तरी घरातलं पण थोडं काम शिकवीन. तुझा भाचा म्हणतोस तर हा प्रामाणिक असणार, मामाने विचार केला की, या बाईंमुळे सदूचं भलंच होईल. गॅरेजमध्ये मी त्याला किती पगार देणार?
सदू बाईंच्या बेकरीत कामाला लागला. घरी पण चहा बनवणं, कपडे इस्त्री करणं, बेडशीट बदलणं हे मन लावून करू लागला. ब्रेड, बिस्किटे, केक करू लागला. राहायला घरातलीच खोली दिली, चांगले कपडे दिले. वर २५ रुपये मनिऑर्डरने आईला पाठवू लागला. सर्व व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक बाईंच्या नवऱ्याला हार्टअॅटॅक येऊन तो परलोकवासी झाला. त्यातच ४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. बाईंनी ठरवलं की आता एकटीच राहण्यापेक्षा इंग्लंडला परत जावं. त्यांनी आपल्या वकिलाला बोलावले, सर्व कामगारांना हजर राहण्यास सांगितले. वकिलाला कागदपत्र तयार करण्यास सांगून असं जाहीर केलं, सदूने प्रामाणिकपणाने, प्रेमाने घर व बेकरी सांभाळली म्हणून मी तीन मजली दगडी घर व बेकरी सदू दाजी ताम्हणकरला बक्षीसपत्राद्वारे देत आहे आणि त्या इंग्लंडला परत गेल्या.
सदाशिवने आई-वडील, भावंडांना बोलावून घेतलं. त्याचं हे वैभव बघून त्यांना फार आनंद झाला. सदूचं भाग्य असं उजळलं.
बेकरी उत्तम चालली आहे. आता त्याची मुलं व नातवंडं सांभाळतात. सदाशिव त्याची पत्नी पार्वती आता सुखात आहेत. प्रामाणिकपणाचं फळ इतकं चांगलं मिळेल हे सदाशिवला पण वाटलं नव्हतं.
कथा-त्रिदल
आपण सिनेमात, नाटकात मजेशीर गोष्टी घडलेल्या पाहतो आणि म्हणतो की, छे असं कुठं घडतं का?
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व गोष्ट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Response lokprabhaexpressindia com