संथपणे चाललेल्या ज्येष्ठातली संध्याकाळ! सहा वाजले तरी रस्ताभर उन्हं पसरलेलीच होती. ‘तो’ मात्र आतुरतेने ‘ते’ कधी येतील याची वाट पाहात होता. त्याच्या पर्णसंभारात लपलेल्या घरटय़ातून पाखरांची धावपळ सुरूच होती. इतक्यात रस्त्यापलीकडून ‘ते’ येताना दिसले. त्याला माहीत होतं आता ते पारावर टेकतील आणि विचारतील, ‘काय वडोबा, सगळं ठीक आहे ना?’ आणि त्यांची वाट बघत असलेले पवार आजोबा म्हणतील, ‘काय म्हणाला तुमचा वड तुम्हाला?’ आणि हसत हसत ते म्हणतील, ‘अहो आजोबा, हाच नाही तर प्रत्येक झाड माझ्याशी बोलतो.’
पण आज पवार आजोबा अजून आले नव्हते. त्यामुळे ते पारावर टेकले आणि म्हणाले, ‘‘वडोबा, चार दिवसांवर वटपौर्णिमा आली. उद्यापासून सर्वाचे उपास सुरू होतील. संकल्पासाठी देवळात जाऊन तयारी करायला हवी. त्यामुळे आता निवांतपणा नाहीच.’’ ते देवळाकडे वळले आणि पवार आजोबांची हाक आली, ‘‘गुर्जी, केव्हा आलात पुण्याहून? आणि आल्या आल्या देवळात कुठे निघालात. टेका जरा पारावर.’’
‘‘आजोबा, परवाच्या पूजेची तयारी करायची आहे, त्यामुळे देवळात जायलाच हवं.’’ गुरुजी.
‘‘पुण्यात लेकीची भेट झाली की नाही?’’ आजोबा गुरुजींच्या मागे मागे जात म्हणाले.
‘‘झाली ना! आता तिला नोकरीपण छान लागली आहे. त्यामुळे संध्याकाळी माझं कीर्तन संपलं, की रोज भेटायला येत होती.’’ बोलत बोलत ते दोघं देवळात गेले.
माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं गाव. तिथे गेली तीन पिढय़ा दुधाचा व्यवसाय करणाऱ्या पाटील अण्णांची मोठी वाडी!! अण्णांनी वाडीतल्या कृष्णाच्या देवळात पुजाऱ्याचं काम करायला आपल्या गावच्या गोडशे भटजींना बोलावले. गावाकडच्या भाऊबंदकीला कंटाळलेल्या गोडशांनीदेखील पाटील अण्णांचे आमंत्रण लगेचच स्वीकारले. आपल्या बायको-मुलासह अण्णांच्या गावाला राहायला आले. गावाकडून आणलेले पैसे गोडश्यांनी विश्वासानी अण्णांना दिले आणि अण्णांनीपण रस्त्यापलीकडच्या दहा गुंठे जागेवर गोडशांना चार खोल्यांचे घर बांधून दिले. हळूहळू मुंबईच्या लोकांनी तिथे फार्म हाउससाठी जागा घ्यायला सुरुवात केली. आणि गोडशांकडेच घरचं घरगुती जेवण आजूबाजूला प्रसिद्ध होऊ लागलं. माथेरानला चढून जाणारी मंडळी नाश्त्यासाठी गोडशांच्या घरी थांबू लागली. गोडसेकाकांचा मुलगा मंदिराबरोबर अण्णांच्या वाडीचीही देखभाल करू लागला. आता गुरुजी म्हणजे गोडशांची तिसरी पिढी!! गोड गळ्याची देणगी लाभलेले गुरुजी लहान असल्यापासून देवळात होणाऱ्या कीर्तनकारांना साथ करू लागले. अण्णांच्या मोठय़ा सूनबाईशी म्हणजेच वहिनींशी गुरुजींची खास गट्टी. त्यांना रामायण, महाभारत, हरिविजय वाचून दाखवण्यामुळेच गुरुजींना वाचनाची आवड लागली होती. पण गुरुजींचे मन खरं म्हणजे रमायचे झाड, पक्षी यातच!! गुरुजींचा जन्मच मुळी वटपौर्णिमेचा. त्यामुळे त्यांच्या आजीने अण्णांकडून वडाला मोठा पार बांधून घेतला होता. अर्थातच त्यामुळे वड आणि गुरुजी यांचं एक अतूट नातं तयार झालं होतं.
देवळात आरती करूनच गुरुजी पारावर येऊन बसले. पौर्णिमा जवळ आल्यामुळे समोरच्या तगरीवर जणू वरच्या आभाळाचं प्रतिबिंबच पडलं होतं. हवेत अचानक गारवा आला होता. बहुधा वरती डोंगरावर पाऊस पडला असावा, कारण वाऱ्याबरोबर मातीचा सुवास तरंगत आला होता. पवार आजोबांसारखी आणखीही काही मंडळी गुरुजींची वाटच बघत होती. आता नेहमीप्रमाणे गप्पांचा, भजनाचा फड रंगणार होता, पण का कुणास ठाऊक पवार आजोबांना काही तरी सांगायचे आहे असे गुरुजींना वाटत होते. गुरुजींनी आपुलकीच्या स्वरात आजोबांना म्हटलं, ‘‘काय पुन्हा लेकाशी भांडण वाटतं?’’
‘‘नाही हो! ती भांडणं काय आपल्या पाचवीलाच पुजली आहेत. त्याच्या संसारात आपली लुडबुड होते ना. त्यामुळे तो सतत तिरसटल्यासारखाच वागत असतो. जाऊ दे झालं.’’ पवार आजोबा बोलता बोलता थबकले आणि गुरुजींना म्हणाले, ‘‘काही तरी वेगळंच कानावर येतंय. पाटील अण्णांचा नातू ही वाडी विकतोय म्हणे!!’’
गुरुजींनी दचकून आजोबांकडे पाह्य़लं. ‘‘इथे काही तरी बंगल्यांची सोसायटी होणार आहे म्हणे!’’ आजोबा कुजबुजले.
‘‘हल्ली जमिनीत गुंतवणूक करण्याचे फॅड निघालंय नां! पक्ष्यांना बेघर करून डोंगर बोडके करून कसली गुंतवणूक?’’ गुरुजी अस्वस्थपणे आजोबांना म्हणाले आणि घरी जायला निघाले. मंडळी पेटीवर सूर लावत होती, पण गुरुजी थांबले नाहीत.
घरी आल्यावर ‘जेवायचं नाही’ असं सांगून नेहमीप्रमाणे गुरुजी अंगणातल्या खाटेवर पडले. पाठोपाठ त्यांची बायको आली आणि ‘‘काय हो बरं नाहीय का?’’ म्हणाली.
‘‘नाही गं, खूप दमलोय, उद्यापासून दोन दिवस झाडांची उस्तवारी, पूजेची तयारी. त्यामुळे पडतो आता!!’’ गुरुजींनी सुचलं ते उत्तर दिलं आणि दिवसभर स्वैपाकाच्या रगाडय़ानी थकलेल्या त्यांच्या बायकोनी ते पटवून घेतलं.
समजलेल्या बातमीमुळे आलेली अस्वस्थता गुरुजींच्या नकळत त्यांच्या डोळ्यांतून वाहू लागली. आजूबाजूची शांतता त्यांना असह्य़ झाली. पारावरची मंडळीपण पांगली होती. गुरुजी तडक आपलं पांघरूण-उशी घेऊन रस्ता ओळंगून वाडीकडे निघाले. दुरून त्यांना ‘तो’ एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा वाटत होता. जवळ गेल्यावर त्याच्या पारंब्यातून झिरपणाऱ्या चंद्रकिरणांनी पारावर नक्षीदार सावली पडली होती. ते आल्यावर झाडावर थोडीशी पाखरांची फडफड झाली, पण ती तेवढय़ापुरतीच!!
‘तो’ तर जशी त्यांची वाटच बघत होता. ‘वडोबा, ज्याची चाहूल गेली वर्षभर लागली होती ते अगदी समोर येऊन ठाकलं की!!’ गुरुजी वडाशी बोलत असतानाच गार वारा सुटला आणि गुरुजींचा तिथेच डोळा लागला. पण स्वप्नात मात्र त्यांना वडावर पिकलेली लालचुटूक फळं खायला आलेले पोपटांचे थवे, गुलमोहराखाली फोटो काढण्यासाठी रेंगाळणारी मुलं, अण्णांच्या दारात बहरलेला सोनचाफा, नदीजवळच्या नारळीच्या बागेत गप्पा मारत बसलेले त्याचे आजोबा आणि अण्णा दिसत होते.
‘‘सत्यवान, अरे सत्या.’’ हाक ऐकून गुरुजी उठून बसले. कारण अशी हाक मारणाऱ्या आता फक्त वहिनीच होत्या.
‘‘वहिनी, अजून उजाडलंपण नाही. अंधारात इथे का आलात?’’ गुरुजींनी वहिनींना पारावर बसवलं.
‘‘वय झालं आता माझं, झोप येत नव्हती म्हणून बाहेर आले. तर पारावर कोणीतरी झोपलेलं आहे असं दिसलं म्हणून पुढे आले. बघते तर काय तू! लोकांनी वडाच्या फांद्या तोडू नयेत म्हणून रखवाली करतोयस की काय?’’ वहिनींनी हसत हसत विचारलं.
‘‘नाही हो वहिनी, घरी झोप येत नव्हती म्हणून इथे येऊन पडलो.’’
‘‘नाहीतर तुला या वडाचं भारी कौतुक!’’ वहिनी.
‘‘मग आहेच तसा तो देखणा!’’ गुरुजी उठता उठता म्हणाले.
‘‘पण खरं सांगू सत्या, सळसळणाऱ्या पिंपळाची सर वडाला नाही.’’ वहिनींनी नेहमीसारखं गुरुजींना चिडवलं.
‘‘चल आता घरी, चहा टाकते. किती दिवसांत निवांत गप्पा मारायला आला नाहीस. सारखा कीर्तनांच्या दौऱ्यावर!’’
गुरुजी निमूटपणे त्यांच्या मागे चालू लागले.
‘‘वहिनी, इतकी र्वष झाली; पण तुमच्या हातच्या चहाची चव काही बदलली नाही. अप्रतिम चहा!’’ गुरुजी वहिनींशी गप्पा मारून थोडे सुखावले होते.
‘‘वहिनी, वाडी विकायचं चाललं आहे का?’’ गुरुजींनी धीर करून विचारलं.
‘‘सांगितलं ना त्या पवारांनी तुला.’’ वहिनी म्हणाल्या.
‘‘अरे बाबा, फक्त जागा मोजायला माणसं बोलावली होती. केवढं मोठं कुटुंब अण्णांचं. आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी. त्यांची मुलं, नातवंडं. तुझ्या लेकीबरोबर माझा नातूदेखील इंजिनीअर झाला ना. त्यांनीच माणसं बोलावली होती.’’
‘‘वहिनी, म्हणजे वाडी विकणार नाही ना?’’ गुरुजींनी पुन्हा तेच विचारलं. ‘‘ही काळी जमीन किती देतेय. आंबा, फणस, नारळ, वर्षभराचे सर्वाना तांदूळ. वहिनी, विकून वाटणीला येणाऱ्या पैशापेक्षा हे महत्त्वाचं नाही का?’’
‘‘अरे बाबा आता इथे राहायला कोणी तयार नाही. आणि इथे राहणारे आम्ही सगळे झालो म्हातारे. त्यामुळे वाटण्यासुद्धा वेळच्या वेळी व्हायला हव्यात नां!’’ वहिनी विषय बदलून बोलत होत्या, पण गुरुजी काय ते समजले होते. वहिनींना मात्र सत्याचा चेहरा बघून काळजी वाटू लागली. आणि त्यांनी ठरवलं की, उद्या सकाळीच गुरुजींच्या लेकीला अश्विनीला फोन करून हे सर्व सांगायचं.
त्यानंतर पौर्णिमेपर्यंतचा वेळ सगळ्यांचाच गडबडीत गेला. अश्विनीपण आली होती. त्यामुळे गुरुजीपण खुशीत होते.
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अश्विनी वहिनींना भेटायला गेली. त्याबरोबर वहिनींनी तिला हळूच विचारले, ‘‘सांगितलं नाहीस नां मी तुला बोलावलं आहे ते?’’
‘‘नाही हो वहिनी, पण मी मात्र तुम्हाला भेटायला येणारच होते. तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. अजून मी आई-बाबांनापण बोलले नाहीय. पहिल्या तुम्ही! कारण आज मी जी काही आहे ती तुमच्यामुळेच!’’ अश्विनी भारावून बोलत होती.
‘‘पुरे आता, सांग काय ते,’’ वहिनी म्हणाल्या.
‘‘वहिनी, मी लग्न ठरवलंय. मुलगा डॉक्टर आहे. आम्ही दोघेही पुण्यातच जागा घेणार आहोत. आणि दोघांच्या आईवडिलांना आमच्याबरोबर रहायला बोलावणार आहोत. कारण तोही एकुलता एक आहे आणि त्याचे आई-वडील कोल्हापूरला राहतात.’’ अश्विनी एका दमात सगळं बोलून गेली. आणि वहिनींनी कौतुकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. वहिनीची काळजीच मिटली होती. ‘‘कधी करते आहेस लग्न?’’
‘‘दिवाळीनंतर आणि लगेचच आई-बाबांना घेऊन जाईन.’’ अश्विनी.
‘‘अश्विनी, वाडी विकायचा तुझ्या वडिलांनी जसा धसकाच घेतला आहे. आणि त्यांच्या तो वड, इतर झाडं जर बांधकामात तोडली गेली तर..’’ वहिनींच्या बोलण्यातली काळजी अश्विनीला कळली.
पावसाळा संपला आणि वाडीभोवती निळे पत्रे लागले. पत्रे लावल्या दिवशी गुरुजी वहिनींकडे गेले. ‘‘हे काय आहे वहिनी?’’
‘‘अरे बाबा, ज्याला वाडी विकली ना त्यांनी लावले पत्रे. पण तू असा धापा का टाकतो आहेस? धावत आलास का?’’ वहिनींनी विषय बदलला. पण उत्तर न देता गुरुजी पारावर येऊन बसले. पवार आजोबा त्यांची जणू वाटच बघत होते.
‘‘बघा मी म्हणत नव्हतो वाडी विकताहेत ते! आता झाडांच्या बुंध्याशी काताचं पाणी टाकतील, नाहीतर इंजेक्शन देतील. पटापट झाडं नाहीशी होतील बघा तुम्ही,’’ पवार आजोबा बोलता बोलता थबकले. गुरुजींना श्वास घ्यायला त्रास होत होता.
वहिनींनी लगेच अश्विनीला बोलावून घेतले. तीपण भावी नवऱ्यासह आली. गुरुजींच्या सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्ट्स सर्व नॉर्मल! अश्विनीनी ठरवलं, आधी बाबांना पुण्याला न्यायचं नंतर लग्नाचं बघू!
‘‘बाबा, आता दिवाळी झाली की आपण पुण्याला जायचं. आता तुम्ही दोघं इथलं सर्व आवरायला लागा. आई, दसऱ्यानंतर खाणावळ बंद करून टाक.’’ अश्विनी सूचना देऊन पुण्याला परतली.
पण दसऱ्यापासून गुरुजींची तब्येत ढासळतच जाऊ लागली. त्यांच्याकडे बघून त्यांच्या बायकोलापण काळजी वाटू लागली. वहिनींच्या सांगण्याप्रमाणे ती काहीबाही घरगुती उपचार करत होती. वहिनी आणि पवार आजोबा अगदी रोज हजेरी लावत होते. मधूनच पवारांच्या मदतीने गुरुजी पारापर्यंत जाऊन येत असत.
शेवटी जायचा दिवस उजाडला. सकाळपासून गुरुजी खुशीत होते. त्यामुळे पवार आजोबा आल्यावर, ‘‘चला जरा दर्शन घेऊन पारावर टेकून येऊया,’’ असं त्यांनी म्हटल्यावर सगळ्यांनाच बरं वाटलं. वहिनी तर ‘चल पटकन् चहा टाकते आणि पारावर आणते’ असं म्हणून लगबगीने पुढे गेल्या.
गाभाऱ्यात जरा विसावून गुरुजी पाराकडे निघाले. पारावर त्यांना भेटायला रोजची मंडळी आलेलीच होती. पारावर बसायच्या ऐवजी गुरुजींनी आपले डोके पारावर टेकवले. दोन मिनिटं झाली तरी गुरुजी उठेनात म्हणून आजोबांनी हाक मारली. वहिनीपण चहा घेऊन आल्या, ‘‘सत्या, चहा घेतोस ना?’’ असं म्हणून वहिनींनी त्यांना हात लावला, पण सत्यवान वडाच्या झाडाखाली निष्प्राण होऊन पडला होता. गुरुजींनी त्यांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्या पद्धतीने शोधलं होतं.
ललिता छेडा – response.lokprabha@expressindia.com
तो आणि ते
संथपणे चाललेल्या ज्येष्ठातली संध्याकाळ! सहा वाजले तरी रस्ताभर उन्हं पसरलेलीच होती.
Written by दीपक मराठे
First published on: 04-09-2015 at 01:12 IST
मराठीतील सर्व गोष्ट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story