आज रविवार, चिंतनच्या बाबांना सुट्टी असल्यामुळे सगळी कामे आरामात चालली होती. चिंतनच्या आईने चहा आणून माधव पुढे ठेवला. ‘अगं, चिंतन कुठे गेलाय? दिसत नाहीये घरात.’ या प्रश्नाचं उत्तर चिंतनच्या आईने द्यायच्या पूर्वीच चिंतनची आजीच मध्ये बोलली.
‘कसा दिसणार तुला चिंतन, तुझा सूर्योदयच दहा वाजता झालाय. माधवा, अरे कसं रे झोपू शकता इतक्या उशिरापर्यंत. ते जाऊ दे, चिंतन खाली गेलाय खेळायला मित्रांबरोबर.’
‘अगं, आई म्हणणं तुझं बरोबर आहे. पण ऑफिसचं काम इतकं असतं की मेंदू थकून जातो. ठरवूनसुद्धा लवकर उठता येत नाही. पण आता मी ठरवलंय सकाळी लवकर उठायचं आणि बाबांबरोबर मॉर्निग वॉकसाठी जायचं.’
‘मॉर्निग वॉक ना जा हो जा. आधी ते स्पोर्ट शूज शोधा. मोठय़ा उत्साहाने अगदी ऑनलाइन मागवलेत असेच धूळ खात पडलेत.’ असं म्हणत कपबशी घेऊन चिंतनची आई किचनमध्ये निघून गेली.
‘काय गं आई, आज तुम्ही माझी शाळा घ्यायचं ठरवलं आहे का?’
‘तसं नाही रे माधवा, तू रात्री उशिरा घरी येतोस तेव्हा चिंतन झोपलेला असतो आणि सकाळी लवकर जातोस तेव्हाही तो झोपलेलाच असतो. अरे, थोडातरी संवाद नको का बाप-लेकांमध्ये. अशानं काय संस्कार करणार आहात तुम्ही मुलांवर.’
‘अगं आई, संस्काराचं म्हणशील तर तुम्ही आहात त्याचे आजी-आजोबा संस्कार करायला. ते बघ, बाबासुद्धा आलेत. काहो, बाबा चिंतन मस्त तयार होतोय ना तुमच्या संस्कारांमध्ये. प्रश्नच नाही. शेवटी नातू कुणाचा आहे.’ चिंतनचे आजोबा खो खो हसत म्हणाले, ‘अरे माधव, पण आज तुला आमच्याशी बोलायला कसा काय वेळ मिळाला? नाहीतर नेहमी तुम्ही आपले प्रेजेन्टेशन किंवा कॉन्फरन्स कॉलमध्ये बिझी असता.’
‘अहो बाबा, बोलायचं असतंच पण नाही जमत. आणि हो उद्यापासून मीसुद्धा येणार आहे तुमच्याबरोबर मॉर्निग वॉकसाठी. आईला सांगितलंय मी आत्ताच. हो ना गं आई.’
‘हो रे बाबा, हुशार आहेस. बाप-लेकांमध्ये संवाद असावा असं मी सांगितल्यावर स्वत:च्या बापाशी संवाद साधलाय, तुझ्या आणि चिंतनमधल्या संवादाचं काय? जा बोलाव त्याला.’
चिंतनला बोलावण्यासाठी माधव गॅलरीत गेला. सोसायटीच्या आवारात मुलांचा गलबला चालला होता. जोश्यांच्या केदारने नवीन स्विफ्ट गाडी घेतली होती. त्याच्या गाडीची पूजा वगैरे चालली होती. हे सर्व गॅलरीतून बघताना माधवला फार गंमत वाटत होती. पूजा संपल्यावर केदार सर्व मुलांना म्हणाला, ‘चलो बच्चे कंपनी गाडीत बसा, मस्त एक फेरी मारून येऊ. येताना पार्टी..’ प्रत्येकाने आपली फर्माइश सांगितली आणि सर्व मुलं वानरासारखी पटापट गाडीत चढली. पण चिंतन मात्र चढला नाही.
चिंतनला पाहून केदार म्हणाला, ‘अरे चिंतन, कसला विचार करतोस चल बस गाडीत. मस्त धमाल करू. ये.’ क्षणभर विचार करून चिंतन म्हणाला, ‘नको, मी नाही येत.’ असं म्हणून लगेच उडय़ा मारत घरी आला. खाली घडलेला सर्व प्रकार माधव वरून पाहत होताच. चिंतन घरात येताच माधव त्याला म्हणाला, ‘चिंतूशेठ, पटकन तयार हो, आपल्याला फिरायला जायचंय. मीही आवरून येतो.’
‘पाच मिनिटात तयार होतो बाबा,’ चिंतन म्हणाला. दोघही तयार होऊन निघणार तेवढय़ात आजी म्हणाली, ‘अरे, माधवा कुठे निघालात दोघं बापलेक?’
‘अगं आई, तूच म्हणालीस ना मघाशी की बाप-लेकांमध्ये संवाद व्हायला हवा. चांगला सुसंवाद करून येतो आम्ही दोघे.’
आजी म्हणाली, ‘कमाल आहे बाबा तुझी.’ माधवने गाडी काढली. वरळी सी लिंकवरून फेरफटका मारला. येताना चिंतनला विचारलं, ‘चिंतूशेठ काय खाणार?’ ‘बाबा मला पिझ्झा आणि आईस्क्रिम हवंय.’ माधव हसून म्हणाला, ‘जो हुकूम मेरे आँका.’ माधवने गाडी हॉटेलकडे वळवळी. मस्त पार्टी झाली दोघांची. चिंतनची स्वारी भलतीच खुशीत होती.
घरी परत येताना, माधवने चिंतनला विचारलं, ‘चिंतू बेटा आज मी तुला पार्टी का दिली असेल सांग बरं?’
‘कारण आज तुम्हाला सुट्टी आहे आणि गेला आठवडाभर तुम्ही मला वेळ देऊ शकला नाहीत म्हणून,’ चिंतन निरागसपणे म्हणाला. माधव त्याच्या या मुग्ध उत्तराला हसला व म्हणाला, ‘तुझं उत्तर अगदीच चूक नाही; पण आजच्या ट्रीटचं दुसरंही एक कारण आहे.
मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. मघाशी सोसायटीतली सगळी मुलं केदारदादाच्या गाडीत बसून गेली तेव्हा तुला नाही वाटलं जावंसं?’
‘बाबा मला एकदा वाटलं होतं जावं म्हणून; पण नंतर विचार केला नको जायला, त्यापेक्षा तुमच्याबरोबर घरात खेळावं, म्हणून मी घरी आलो.’
माधव हसला व म्हणाला, ‘शाब्बास चिंतन, आज तू तुझ्या भावनांना, इच्छेला आवर घातलास. मोहाचे क्षण समोर असताना तू त्यांना नाकारू शकलास. स्वत:वर नियंत्रण ठेवलंस. सर्व मित्र मजा करायला जात असतानासुद्धा तू तुझ्या मोहावर छोटासा विजय मिळवलास, त्याचंच हे सेलिब्रेशन आहे असं समज. तुझ्या भावी आयुष्यातसुद्धा पुढे मोहाचे अनेक क्षण येतील, त्या वेळीसुद्धा त्यांना बळी न पडता योग्य निर्णय तू घेशील. याचा मला विश्वास वाटतो. चल निघूया आपण, आई वाट पाहात असेल तुझी.’
विश्वास गुरव – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा