घुमान इथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे संत शेख महंमद साहित्य ऐक्य दिंडी नेण्यात आली होती. त्याबाबत..

संत साहित्य ही मराठी वाङ्मयाची पाच शतके मध्यधारा होती आणि आधुनिक साहित्यिकांवरही त्याचा प्रभाव होता. तरीही त्याचा स्वतंत्र कप्पा करून तो अडगळीत टाकण्याचे वाङ्मयीन समीक्षकांचे गेल्या शतकातील प्रयास संकुचित दृष्टीचे आणि आंग्लाळलेल्या विचारव्यूहाचे दर्शक होते. असे ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढलेल्या ‘अभिजात’ या स्मरणिकेचे संपादक सदा डुम्बरे म्हणतात. पुढे ते म्हणतात, ज्या संमेलनाचे निमित्त कारणच संत नामदेव आहेत त्याचे अध्यक्षपद डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे यावे हा उचित न्यायच झाला. यालाच पूरक अशा आणखी एका योगायोगाचा उल्लेख करणे अप्रस्तुत ठरू नये. डॉ. मोरे हे संत तुकारामांचे वंशज आणि वाङ्मयीन वारसदारही. आपल्या अभंगांमुळे आणि प्रतिभसंपन्न व अनुभवाधिष्ठित कवित्वामुळे जागतिक साहित्यात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या तुकोबांचे वाङ्मयीन प्रेरणास्थान आहेत ते संत नामदेव. विठ्ठलाला साक्षी ठेवून त्याच्यासह स्वप्नात येऊन तुकोबांना कवित्व करण्याच आदेशच नामदेवांनी दिला आहे. आपण सुरू केलेले परंतु अपूर्ण राहिलेले कार्य तुकोबांनी तडीस न्यावे, हा नामदेवांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या मंदिरावर कळस चढविला. घुमानमध्ये जिथे बाबा नामदेव समाधिस्त झाले अशी शीख समाजाची अढळ श्रद्धा आहे तिथे नामदेवांच्या चरणी लीन होऊन त्यांचे एक कोटी अभंग पूर्ण करण्याचे वचन तुकोबांनी पूर्ण केले आहे, असे गुज कथन करण्याची संधी तुकोबांचे वंशज म्हणून डॉ. मोरे घेऊ शकतात.
राष्ट्रकारणात महाराष्ट्राने नेहमीच स्वत:ला देशाच्या केंद्रस्थानी पाहिले, देशाचे वैचारिक नेतृत्व करण्याची आकांशा बाळगली. प्रादेशिकवादी विचार टाळून मराठी माणूस विचाराने, भावनेने आणि कृतीनेही सतत ‘अखिल भारतीय’ राहिला, याचे बीजारोपण नामदेवांनी सात-आठशे वर्षांपूर्वी केले. त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही धर्माचे लोक होते. नामदेवांचे समाधीस्थळ हेही देशातले एकमेव असे स्थान आहे, जिथे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा एकाच ठिकाणी आहेत. या तिन्ही समाजांमध्ये नामदेवांचे स्थान किती उच्च आहे हेच यातून दिसते.
या एकात्मतेचा परिणाम म्हणूनच लुधियाना जिल्ह्यतील सरवरपूर या खेडय़ात १९४७ साली भारत-पाक फाळणीच्या निमित्ताने उद्भवलेल्या दंगलीत दंगलखोरानी एक मशीद पाडली होती. ती मशीद शीख बांधवांनी ६३ वर्षांनंतर बांधून दिली. या घटनेबाबत प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी एका इंग्रजी दैनिकात ‘सेक्युलॅरिझमची नवी मांडणी’ हा लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, सय्यद शहाबुद्दीन यांच्या साप्ताहिकाच्या पहिल्याच पानावर त्यांचे संपादक जफरूल इस्लाम खान यांनी एक बातमी दिली होती. माझ्या मते ही बातमी भारतातल्या प्रत्येक महत्त्वाच्या वृत्तपत्राची, टी.व्ही. चॅनेलची हेडलाइन व्हायला हवी होती. मात्र ते साप्ताहिक वगळता ही बातमी इतरत्र कुठेही प्रसिद्ध न झाल्याचे पाहून आपली प्रसारमाध्यमे त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात असल्याच्या भावनेने मला वाईट वाटले. या बातमीचे शीर्षक होते- ‘१९४७ साली पाडण्यात आलेली मशीद शीख बांधवांनी बांधून दिली!’ या बातमीचा गोषवारा मी येथे देतो –
पंजाबातील समराला या छोटय़ा शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरवरपूर या खेडय़ात स्वातंत्र्यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर मुस्लिमांची वस्ती होती. फाळणीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या दंग्यात तेथील बहुतांशी मुस्लीम लोक गाव सोडून पाकिस्तानातील पंजाबात पळून गेले. गावातील एक मशीद दंगलखोरांनी उद्ध्वस्त केली. गेल्याच वर्षी गावातील शिखांनी ही मशीद पुन्हा बांधून देण्याचा निर्णय घेतला.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे जथेदार किरपाल सिंग, स्थानिक आमदार जगजीवन सिंग आणि सर्व गावकऱ्यांनी, नव्याने बांधलेल्या या मशिदीचा शानदार हस्तांतर सोहळा २२ मे रोजी केला. मौलाना हबीबूर रहेमान यांनी लुधीयानवी यांचे खास स्वागत केले. गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गावातील सर्वात ज्येष्ठ मुस्लीम नागरिक, दादा मोहम्मद तुफैल यांच्या हातात नव्याने बांधलेल्या मशिदीच्या चाव्या दिल्या, उपस्थित समुदायाने जल्लोश केला.
ही बातमी वाचल्यानंतर माझी छाती अभिमानाने फुलून आली. माझ्या धर्माचे, पंथाचे लोक गुरू नानकांच्या खऱ्या शिकवणीचे पालन करीत असल्याचे पाहून मन भरून आले. गुरू नानकांचे पहिले शिष्य भाई मर्दाना हे शेवटच्या श्वासापर्यंत मुस्लीमच राहिले, आणि त्यांच्या धर्माचे पालन करण्याची त्यांना पूर्ण मुभा होती. पाचवे गुरू अर्जुन ज्यांनी आदी गं्रथाचे संकलन केले आणि हरमंदिर साहीब (आजचे सुवर्ण मंदिर) बांधले त्याचा शिलान्यास लाहोरचे सुफी संत हजरत मियाँ मीर यांच्याकडून करवून घेण्यात आला होता. महाराजा रणजित सिहांच्या एका पत्नीने दाता गंज बक्ष यांचा संगमरवरी दर्गा बांधला. आज तो लाहोरमधील सर्वात प्रसिद्ध सुफी दर्गा आहे. या सर्व महात्म्यांचे आत्मे या घटनेने किती सुखावले असतील, असे मला वाटते.
अजूनही ही घटना जुनी किंवा शिळी झाली आहे, असे प्रसारमाध्यमांनी समजू नये. वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी आणि टी.व्ही. चॅनेल्सनी सरवरपूरला जाऊन या घटनेला प्रसिद्धी द्यायला हवी. नव्याने बांधलेल्या मशिदीची छायाचित्रे प्रसिद्ध करायला हवीत. मुख्य म्हणजे बाबरी मशीद पाडणाऱ्या  आणि धार्मिक विद्वेषाची गरळ ओकणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी नेऊन हे दाखवायला हवे, की हा देश एक ठेवण्यासाठी कशा प्रकारच्या आंदोलनाची गरज आहे. असे झाल्यास याचे प्ररिणाम खरोखरीच वेगळे होतील.
अजूनही ही घटना जुनी किंवा शिळी झाली आहे असे प्रसारमाध्यमांनी समजू नये. खुशवंतसिंग यांच्या या सल्ल्याने आम्हाला पंजाबला जाण्यास प्रवृत्त केले. ८८ वे अखिल भारतीय मराठी संमेलन घुमान येथे भरते व संत नामदेवांच्या भक्त गणांत हिंदू-मुस्लीम व शीख या तिन्ही धर्माचे लोक आहेत. म्हणून १२ व्या शतकात हिंदू-मुस्लीम एकतेचे कार्य करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा येथील संत शेख महंमद यांच्या नावाची ऐक्य दिंडी न्यावी अशी कल्पना सुचली व आम्ही कामाला लागलो. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी यानी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना फोन करून दिंडीची कल्पना सांगितली. मोरे म्हणाले, चांगली कल्पना आहे. यातून हिंदू-मुस्लीम शीख एकतेचा संदेश जाईल. तुम्ही अवश्य या.’
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे पहिले अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी बाबूमियाँ बँडवाले श्रीगोंद्याचे. त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात साडेतीन वर्षे तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारा मोफत रेल्वे पास त्यांनी घेतला नव्हता. शेती घेतली नव्हती. पेन्शनही स्वीकारली नव्हती. त्यांच्या गावातून म्हणजेच संत शेख महंमद यांच्या दग्र्यातून दिंडीची सुरुवात केली.
२४ मार्च रोजी शारदा विद्या निकेतनचे एक हजार विद्यार्थी. त्यांचे शिक्षक, संस्थाचालक होनराव साहेब, यांच्यासह लेझीम पथक, बाबूमियाँ यांचा बँड त्यांचा नातू चालवतो. तो मंडळाचा कार्यकर्ताही आहे. हमीद सय्यद, मुबारक सय्यद, श्रीगोंदा नगर परिषदेचे उपाध्यक्ष अख्तर शेख यांचा मुलगा अतिफ त्याचे मित्र अशी दिंडी मिरवणुकीने संत शेख महमदाच्या दग्र्यात गेली. शेख महंमद हे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत आहे. त्या यात्रा कमिटीच्या पाटील यांनी भव्य सभा आयोजिली.
मिरजेला सुफी संत मिरासाहेब यांचा दर्गा आहे. तिथे संत शेख महंमद साहित्य ऐक्य दिंडीचे स्वागत झाले. कोल्हापूरची भूमी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याने पुनीत झालेली आहे. करवीर नगरीतून दसरा चौकातून दिंडीची मिरवणूक निघाली. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शुभेच्छा दिल्या. उद्योगपती एम. बी. शेख यांनी दिंडीस मार्गस्थ केले. पुढे पुण्याहून दिंडी घुमानला पोचली.
संमेलनस्थळी गं्रथ दिंडी, कृषी दिंडी व संत शेख महंमद साहित्य ऐक्य दिंडीचे स्वागत करण्यात आले. ४ एप्रिल रोजी मी तसेच हाजी महमद गौरा नाईक, साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे, दिलावर जमादार, मरियम जमादार व गुलाब इनाम वळसंगकर असे सहा जण टॅक्सी करून सामराजवळील सरवरपूरला गेलो. महाराष्ट्रातून मंडळी आली आहेत म्हटल्यावर गावकरी शीख बंधू गोळा झाले. ज्यांनी ही मशीद बांधण्याकामी पुढाकार घेतला, त्या जोगा सिंग यांना बोलावून घेण्यात आले. मशिदीसमोर फोटो काढले. २० जण नमाज पढू शकतील इतकी मशीद बांधली आहे. शेजारी पाण्यासाठी विहीर आहे. मौलानांसाठी छोटी खोली बांधली आहे. हे झाले भौतिक वर्णन पण ६३ वर्षांपूर्वी पाडलेली मशीद शीख बांधवांनी बांधून भारत देशाला राष्ट्रीय एकात्मतेचा ज्वलंत संदेश दिला आहे तो अमोल आहे. ‘हिंदू मुस्लीम शीख इसाई हम सब भाई भाई’ अशी घोषणा मग आपोआप दिली गेली. संत बाबा नामदेवांनी पंजाबात केलेल्या एकतेच्या कामाचे हे फलित आहे. त्यांना व शीख बांधवांना, जोगा सिंगांना सलाम करून आम्ही निघालो.

4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
Muharram is celebrated without any Muslim family in the village where Maruti and Jyotiba temples are located
तळटीपा: गोदाकाठ ते गंगौली !
Religious Reformation Work and Thought
तर्कतीर्थ विचार: धर्मसुधारणा : कार्य आणि विचार

– हुसेन जमादार

Story img Loader