lp48मराठी सिनेमांमध्ये चमक दाखवल्यानंतर अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी ‘अग्ली’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच हिंदूी सिनेमात साकारलेल्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेचं प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतल्या दिग्गजांकडून गिरीश यांचं कौतुक होतंय.

अनुराग कश्यप हे हिंदूी इंडस्ट्रितलं बडं नाव. या दिग्दर्शकाचे सिनेमे बॉलीवूडमध्ये वेगळा ट्रेंड घेऊन आले. त्या सिनेमांचा चाहता वर्गही मोठाच. काहीतरी वेगळं बघायला मिळणं, रहस्य, प्रभावी मांडणी ही त्याच्या सिनेमांच्या प्रेमात पडण्याची कारणं. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमाने तर वेगळी उंचीच गाठली. त्यानंतर ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमातल्या एका फिक्शन फिल्मव्यतिरिक्त अनुरागचा दिग्दर्शक म्हणून सिनेमा आला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात त्याचा ‘अग्ली’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा उत्तम. कथा, पटकथा, संवाद, अभिनय, संकलन या सगळ्याच बाबतीत सिनेमा उजवा ठरतो. सिनेमात प्रामुख्याने लक्षात राहतो तो इन्स्पेक्टर जाधव; अर्थात गिरीश कुलकर्णी हा मराठी अभिनेता. मराठी सिनेसृष्टीत नाव कमवल्यावर ‘अग्ली’ च्या निमित्ताने गिरीश यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. अस्वस्थ करणाऱ्या सिनेमात या कसदार अभिनेत्याने इन्स्पेक्टरची भूमिका चोख बजावली आहे. पहिल्याच हिंदी सिनेमातल्या भूमिकेला प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतल्या दिग्गजांकडून मिळणारी वाहवा गिरीश यांच्यासाठी भारावून टाकणारी आहे.
सिनेमा सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा ते वीस मिनिटांत गिरीशची एंट्री होते. मुंबईतल्या एका पोलीस स्टेशनमध्ये आपली मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन एक माणूस आणि त्याचा मित्र येतो. तिथे असलेल्या इन्स्पेक्टर जाधवांसोबत त्या दोघांचा पहिला सीन लक्षात राहणारा आहे. मुलगी कशी हरवली याचं वर्णन करताना तक्रार घेऊन आलेल्या दोघांसोबत इन्स्पेक्टर जाधव म्हणजे गिरीश कुलकर्णीने केलेला अभिनय कौतुकास्पद आहे. हरवल्याचं वर्णन ते मोबाइलवर फोन करणाऱ्याचा फोटो कसा येतो इथवर चर्चा आणण्याचं चोख काम गिरीश यांनी केलंय. पहिलाच हिंदी सिनेमा आणि तोही अनुराग कश्यपचा असल्यामुळे त्यांचा मिळालेला अनुभव हा खास होता असं ते सांगतात. ‘अनुराग कश्यपशी पूर्वपरिचय होताच. त्यांच्या कास्टिंग डिरेक्टरने या सिनेमाच्या ऑफरसाठी मला फोन केला. मुख्य भूमिकाच हवी असा माझा अट्टहास नव्हता. पण, मिळालेली भूमिका महत्त्वाची हवी असं माझं म्हणणं होतं. छोटी-मोठी भूमिका करायची नव्हती. हे माझं मत मी त्यांनाही सांगितलं. त्यानंतर अनुरागचा फोन आला आणि मग हा सिनेमा करायचं ठरलं. अनुरागसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. सिनेमा या माध्यमाबाबत पूर्ण जाण असलेला तो दिग्दर्शक आहे. सिनेमाचं माध्यम त्याला गवसलंय. ही जाण असल्यामुळेच तो त्याच्या संपूर्ण टीमला काम करण्याचं स्वातंत्र्य देतो. त्याच्यासोबत काम करताना हा गुण जाणवला. वेगळ्या धाटणीचे सिनेमे करणाऱ्या या दिग्दर्शकासोबत काम करणं म्हणजे बरंच काही शिकण्याचा अनुभवच होता’, असं गिरीश सांगतात.
‘वळू’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’ अशा अनेक सिनेमांमधल्या गिरीश यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. त्याचप्रमाणे ‘अग्ली’मधलीही इन्स्पेक्टर जाधव या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. याबाबत ते सांगतात, ‘माझ्या ‘अग्ली’ या सिनेमातल्या इन्स्पेक्टर जाधव या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. प्रेक्षक या चित्रपटाबाबत उत्सुक होतेच. पण, आता माझी भूमिका बघून मलाही वेगवेगळ्या ठिकाणहून कौतुकाचे फोन, मेसेजेस येतात. सोशल नेटवर्किंग साइट्सवर काही जण खूप चांगल्याप्रकारे व्यक्त होताहेत. अशा प्रकारचं कौतुक झाल्यामुळे निश्चितच मला आनंद आहे.’ चित्रपट तसा अस्वस्थ करणारा आहे. लहान मुलीच्या किडनॅपिंगची कथा सिनेमात मांडलेली आहे. तिचा शोध घेण्याचा प्रवासही उत्कंठावर्धक रेखाटलाय. इतर सिनेमांप्रमाणे किडनॅपिंग आणि नंतर किडनॅप झालेली व्यक्ती सापडणं याकडे न झुकता सिनेमा वेगळ्या वळणाकडे जातो. प्रेक्षकांची उत्सुकता चित्रपटाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत टिकवून ठेवण्याचं कसब अनुरागने या सिनेमात चांगलंच दाखवलंय. प्रेक्षकांप्रमाणेच गिरीश यांनाही चित्रपट अस्वस्थ करतो. ‘मीही अनेकांप्रमाणे सिनेमा बघून अस्वस्थ झालो. शेवटी मीही एक माणूस आहे. सिनेमाचा प्रभाव खूप गडद आहे. तुमच्या निबरपणाला तो अस्वस्थ करतो. वरकरणी आपण किती चांगले आहोत, असं सोंग आणलं तरी आतून आपण कसे खचत चाललोय याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे अर्थात मीही अस्वस्थ झालोच’, गिरीश स्पष्ट कबूल करतात.
बॉलीवूडमध्ये झळकण्याचं स्वप्नं पूर्ण झालं की, तिथेच स्थिरावण्याची इच्छा बळावू लागते. एक हिंदी सिनेमा केल्यानंतर ऑफर्सची रांग लागेल, अशा आविर्भावात अनेक जण असतात. गिरीश मात्र याला अपवाद आहे. ते सांगतात, ‘हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स अजून तरी माझ्याकडे आलेल्या नाहीत. मुळात एका हिंदी सिनेमात काम केल्यानंतर पुढच्या ऑफर्स मिळणं ही अपेक्षा चुकीची आहे. मीही तशी अपेक्षा केली नव्हती. पण, हिंदूी सिनेसृष्टीतल्या लोकांनी माझ्या कामाची नोंद घेतली आहे. माझ्या कामाचं कौतुकही केलंय. तुमच्यासोबत काम करायला आवडेल असंही काही जण म्हणालेत.’ अनुराग कश्यपचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे. तो प्रोफेशनल असला तरी साधेपणाने काम करतो. बॉलीवूडमध्ये येण्याचं अनेक कलाकारांचं अंतिम ध्येय असतं. यामध्ये अनेक मराठी कलाकारही आहेत. पण, मराठी कलाकार हिंदूीमध्ये गेले आणि तिथेच रुळले की, पुन्हा मराठीकडे वळायला त्यांना वेळ लागतो अशी साधी तक्रार मराठी प्रेक्षकांमधून येत असते. याबाबत गिरीश यांचं असं मत आहे, ‘कोणत्याही कलाकाराला वेगवेगळ्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कामं करण्याची आस असते. आपलं काम चांगलं कसं होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. असंच कलाकारांचं असावं. अभिनय करताना भाषा महत्त्वाची ठरू नये. भूमिका कशी आहे याला महत्त्व दिलं जावं. मीही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असतो. माझ्यासाठी भाषेपेक्षा भूमिका महत्त्वाची आहे.’
सध्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांच्या प्रमोशनमध्येही स्पर्धा सुरू असते. सिनेमा जवळ आला की, तेच कलाकार सगळ्या चॅनल्सवर दर दोन दिवसांनी झळकत असतात. हिंदी सिनेमामध्ये एखादा मराठी कलाकार असेल, तो कलाकार साकारत असलेली व्यक्तिरेखा महत्त्वाची असेल तरी त्या कलाकाराला प्रमोशनसाठी नेलं जात नाही, हा मुद्दा मध्यंतरी चर्चेचा बनला होता. यानिमित्ताने गिरीश यांचंही मत जाणून घेतलं. ते सांगतात, ‘सिनेमांचं प्रमोशन करणं हे आता खूप गरजेचं झालं आहे यात वाद नाही. कारण, अनेक सिनेमे येत असतात. त्यात ‘आमचा सिनेमा बघा’ असं सांगणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रमोशन करणं हा आता सिनेमाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. हिंदी सिनेमातल्या मराठी कलाकारांना प्रमोशनसाठी पुढे आणलं जात नाही. यामागे व्यावसायिक दृष्टिकोन असतो. बॉलीवूडच्या चेहऱ्यांना राष्ट्रीय ओळख असते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय चॅनल्सवर दाखवणं सोयीचं असतं. कोणामुळे चांगलं प्रमोशन होईल, कशा प्रकारे करता येईल याबाबत मार्केटिंग टीमही अभ्यास करत असते. या टीमला सिनेमासाठी जे योग्य वाटतं ते केलं जातं. त्यामुळे इथे मराठीचा मुद्दा येण्याचं कारण नाही. कमीपणा तर अजिबातच नाही. हिंदी कलाकारांनाच प्रमोशनसाठी नेणं ही एक व्यावहारिक सोय आहे.’
मराठीमध्ये ‘विहीर’, ‘वळू’, ‘देऊळ’ असे लोकप्रिय सिनेमे दिल्यानंतर गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी दोघे ‘हायवे’ सिनेमा घेऊन येताहेत. या सिनेमाविषयी इंडस्ट्रीत चर्चा आहे. हुमा कुरेशी आणि तिस्का चोप्रा या दोघींचं या सिनेमामधून मराठी सिनेमात पदार्पण होतंय. मराठी अभिनेत्रींपेक्षा हिंदी अभिनेत्रींना सिनेमासाठी निवडण्यामागचं कारण विचारलं असता गिरीश म्हणाले, ‘सिनेमातल्या हिंदी व्यक्तिरेखांसाठी त्या दोघींची निवड केली आहे. त्यांचं हिंदीपण जपण्यासाठी हिंदी अभिनेत्रींना सिनेमात घेण्यात आलंय. सिनेमात मुक्ता बर्वे, रेणुका शहाणे, सुनील बर्वे ही कलाकार मंडळीही आहेत. सिनेमा एप्रिलपर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे.’ त्यांच्या आणखी एका सिनेमाची नुकतीच घोषणा झाली. ‘जाऊन द्या ना बाळासाहेब’ हा विनोदी सिनेमा ते घेऊन येताहेत. यामध्ये लेखन, अभिनयासह गिरीश यांनी दिग्दर्शनही केलं आहे. ‘अग्ली’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये श्रीगणेशा झालाय. हिंदीसह मराठीतही येणाऱ्या त्यांच्या आगामी सिनेमांविषयी प्रेक्षक आणि इंडस्ट्री उत्सुक आहे.

Story img Loader