हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युगानुयुगांच्या प्रवासात भूस्तरावर बरेच बदल होतात. कुठे होत्याचे नव्हते होऊन जाते, तर कुठे नव्यानेच आणखी काही तयार होते. काही ठिकाणी समुद्राची पातळी उंचावून उंच डोंगर निर्माण होतात, तर कोठे दलदल अथवा माळरानं तयार होतात. अर्थातच हे बदल काही एका झटक्यात होत नाहीत, तर त्यांना लाखो वर्षांचा कालावधी लागतो. अशा अतिसावकाश, संथगतीने झालेल्या बदलांचे अद्भुत नमुने पाहायचे असतील तर अमेरिकेच्या उत्तरेला मोंटॅना व कॅनडा येथे आल्बर्टा विभागाच्या सीमेवरील ग्लेशिअर नॅशनल पार्कमध्ये जावे लागेल.
कॅनडाच्या प्रत्येक विभागात नॅशनल पार्कस् आहेत. त्यापैकी आलबर्टा या भागात वॉटर टन पीस पार्क, बाम्फ, जास्पर, कूटनी, योहो ही ग्लेशिअर पार्कस् जवळजवळ आहेत. पण वॉटर टन पीस नॅशनल पार्कचा काही भाग कॅनडा तर काही अमेरिकेच्या हद्दीत आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी आम्ही ग्लास टॉप ट्रेनने व्हँकुव्हर ते जास्पर हा कॅनेडिअन रॉकीजचा प्रवास केला होता. मागील प्रवासात बँफ येथील रॉकी माऊंटनचा परिसर आम्हाला फारच आवडला. परत येथे यायचेच असे ठरवले, म्हणून कॅलगरी येथून बसचा प्रवास सुरू करून परत तिथेच संपवला. ग्लेशिअर पार्कस् येथून कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विभागातील व्हिक्टोरिया, व्हँकुव्हर येथे भेट देऊन आलो.
कॅलगरी येथून निघाल्यावर आमचा पहिला मुक्काम होता वॉटर टन पीस नॅशनल पार्क. या पार्कचा माँटॅना हा भाग अमेरिकन हद्दीत येतो तरीही कॅलगरी येथून जास्त सोयीस्कर होतो. लाखो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील घडामोडींमुळे तयार झालेल्या रॉकीज्च्या रांगा अलास्का ते मेक्सिकोपर्यंत पसरलेल्या आहेत. कॅनडा येथे ग्लेशिअर माऊंटनच्या जाणाऱ्या रांगांना कॅनेडियन रॉकीज् म्हणतात. या पर्वतराजींमध्ये फार उंच पर्वत शिखरे नाहीत, पण वेगवेगळय़ा प्रकारच्या दगडांचे, आकारांचे, रंगांचे डोंगर झालेले आहेत. १८९५ मध्ये इंग्लिश पर्यावरणवादी चाल्र्स वॉटर टन हा निसर्ग निरीक्षणाकरिता येथे आला असताना हा लेक, सौंदर्य, वन्यप्राणी पाहून प्रभावित झाले. भविष्यात हे सौंदर्य जपून ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी रिझव्र्ह पार्कचा पर्याय सुचवला. पण ही जागा अमेरिका व कॅनडा दोन्ही देशात येत असल्याने मालकी हक्कासाठी लढाया नकोत म्हणून १९९५ साली युनेस्कोने इंटरनॅशनल पीस पार्क असे नामकरण केले. वाहनांची वाहतूक, लोकांची वर्दळ नको म्हणून या पार्कपासून हायवे बराच दूर आहे. शिवाय परिसरात अगदी दोन-तीनच लहान हॉटेल्स व दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्याची सोय आहे.
या परिसरात हरणं, वेगवेगळे पक्षी, कधी तरी अस्वलंही दिसतात. सर्वच पक्ष्यांना व प्राण्यांना येथे अभय असल्याने ते आरामात फिरत असतात. अस्वलांनी कचऱ्याचे डबे उघडू नयेत म्हणून खास क्लिप असलेले तिरके ट्रॅशबिन्स ठेवलेले आहेत. भूगर्भातील हालचालींमुळे समुद्रातून वर येताना त्यातील खनिजांमुळे लाल, पांढऱ्या रंगांचे डोंगर आपल्याला संध्याकाळच्या बोटीतल्या फेरफटक्यात पाहायला मिळतात. पार्कचा काही भाग अमेरिकेच्या हद्दीत येत असल्याने एका डोंगरावर टोकापासून खाली पाण्यापर्यंत एक पांढरी रेषा सरहद्द दाखवते.
माँटॅना भागातील ग्लेशिअर माऊंटनसाठी जाताना आपल्याला हद्दीवरील अमेरिकन इमिग्रेशनमधून तर परतताना कॅनेडियन इमिग्रेशनचे सोपस्कार करावे लागतात. आपली वाट डोंगर कापून केलेल्या रस्त्यावरूनच जाते. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वीपासून इंडियन म्हणजेच रेड इंडियनच्या, फ्लॅट हेड व ब्लॅकफूट अशा दोन जमातींचे वास्तव्य होते. ब्लॅकफूट जमातीच्या लोकांच्या देवाने ‘सन माऊंटन’ येथे येऊन त्यांना शिकार कशी करायची ते शिकवले, म्हणून तो डोंगर पूज्य मानतात. तसेच चीफ माऊंटन या
बहुतेक गोऱ्या लोकांना हायकिंग, ट्रेकिंग, आईस स्केटिंगचा बराच शौक असतो. हा रस्ता त्यांच्या आवडीचा आहे. लोगन पास येथे जाण्याचा रस्ता डोंगराळ भागात अरुंद व वळणावळणांचा असल्याने तेथे मोठय़ा टुरिस्ट बसेसना परवानगी नाही. आज १९३० साली तयार केलेल्या लाल रंगाच्या जॅमर्सचा वापर केला जातो. या मिनी व्हॅनसारख्या असून एका वेळी १७ प्रवासी बसू शकतात. पूर्वी हा चढ चढताना ड्रायव्हर्सना एकसारखा क्लच व ब्रेकचा वापर करावा लागत असे, त्यामुळे त्यांना जॅमर्स म्हटलं जात असे, आजही त्यात काही बदल नाही.
लोगन पास येथील व्हिजिटर्स सेंटरमधून मागे रेनॉल्ड माऊंटनस् तर उन्हाळ्यात बाजूच्या डोंगरावर खुरटय़ा झुडपांवर छोटी छोटी फुलं पसरलेली असतात अशी गार्डन वॉल दिसतात. वाटेवर आपल्याला सेंट मेरीज् लेकमध्ये मध्यावर वाइल्ड गूझ आयलंड, डोंगररांगा उंचबुटक्या असल्याने वाडग्यासारखा आकार असलेल्या त्या भागाला राईस बोल व्हॅली म्हणतात. त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाजवळ कामगार लंचसाठी येत म्हणून तो लंच टाइम क्रीक असे वेगवेगळे पॉइंटस् आपल्याला पाहायला मिळतात. जॅकसन् ग्लेशिअर, मॅनी ग्लेशिअरसह लेक आहेत. हिवाळ्यात मात्र येथे कमालीचा म्हणजे १०० फूट उंचीपर्यंत स्नो पडतो. त्या वेळी तेथे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ८० ते १०० मैल असतो. त्यामुळे तेथील स्नो डिव्हाइड लाइनवर ढकलला जातो, या भागाला बिग ड्रिफ्ट म्हणतात.
सातत्याने आणि हळूहळू होणाऱ्या भू-स्तरांवरील हालचालीत जुने घट्ट खडक नव्या मऊ स्तरांवर चढले, त्या वेळी त्यात जीव-जिवाणूंसकट चेपल्यामुळे त्यांना हिरवट-निळ्या रंगाची झाक आली. काहींमध्ये शंखशिंपले चुरा झाल्याने पांढुरके झाले, तर काही मूळच्या खनिजांमुळे लाल-पिवळे झाले. काही समुद्राच्या लाटांच्या आकाराचे, तर काही लाव्हा थंड होताना मिळालेल्या गारव्यामुळे पावसाच्या थेंबांमुळे जमीन दिसते तसे. काही डोंगर उघडेबोडके तर काही शे-दोनशे वर्षे जुन्या वृक्षांनी मढलेले. सुपीक जमीन असलेल्या प्रेअरीजमुळे गहू, मका यांचे भरपूर उत्पादन असल्याने हा भाग म्हणजे राइस बोल ऑफ कॅनडाच. हजारो मैल पसरलेल्या या रांचेसवर आपली नजर काही ठरत नाही. काही ठिकाणी रांचेसवर फिरण्यासाठी तगडय़ा घोडय़ांची टमटम आहे, काही ठिकाणी पूर्वीच्या बांधणीची हॉटेल्सदेखील आहेत.
कॅलगरी येथून निघाल्यावर दूर दिसणारे रॉकीज् प्रेअरी लॅण्ड नंतर हळूहळू नजदीक दिसू लागतात. भू-स्तरांच्या हालचालींमुळे अगदी केकच्या थरांप्रमाणे, घसरगुंडीसारखे, किल्ल्याच्या तटाप्रमाणे तर काही पृष्ठभाग उंच-सखल होऊन करवतीच्या दातांप्रमाणे असे झाले. त्यामुळे त्यांना ओव्हर थ्रस्ट, डीप स्लोप, डॉग टूथ, कॅस्ट्लेटेड माऊंटन, सॉटूथ अशी नावं मिळाली आहेत. प्रवासात असे डोंगर पाहायला मिळतात. पूर्वी बँफजवळ कॅनमोर प्रांतात आल्बर्ट रॉजर्स हा माऊंटेनिअर डोंगर चढण्यासाठी आला होता, रात्री हिमवादळ झाल्याने त्याला पायथ्याशी तंबूत राहावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी तंबूतून बाहेर आल्यावर त्याला समोरच पांढरीशुभ्र बर्फाच्छादित तीन डोंगरशिखरे दिसली. आपल्या मित्रांना उठवून समोरच तीन नन्स म्हणजेच ख्रिस्ती संन्यासिनी उभ्या आहेत असं सांगितलं, तेव्हापासून त्या डोंगराला थ्री नन्स माऊंटन असं म्हणतात. असे वेगवेगळे नजारे पाहत कॅनडिअन रॉकीज्चं नयनरम्य चित्र कसं असेल या विचारातच आमचा पुढील प्रवास सुरू झाला.
गौरी बोरकर