साधारण ४ इंचाच्या पसरट कुंडीत सहजपणे वाढवता येणारी आणि सर्व कुंडी पाना-फुलांनी वेढून टाकणारी वनस्पती म्हणजे ग्लॉक्सिनिया. मोठी मोठी, अनेकरंगी फुले देणारे अनेक प्रकार ग्लॉक्सिनिया या वनस्पतीमध्ये उपलब्ध असतात. गर्द हिरवी आणि थोडीशी केसाळ पानेही शोभिवंत दिसतात. या वनस्पतीला साधारण बटाटय़ासारखे कंद असतात. अभिवृद्धी कंदांपासून किंवा पानांपासूनही करता येते. ग्लॉक्सिनियाचे शास्त्रीय नाव आहे Sinningia speciosa.
वाढवण्यास अत्यंत सोपी आणि रोग आणि कीटक यांस सहसा बळी न पडणारी ग्लॉक्सिनिया घरातील बागेची शोभा वाढवण्यास मदतच करते; कारण हिला कडक ऊन सोसवत नाही. ज्याला आपण अर्धवट सावली म्हणतो (semi shade), तसली जागा तिला मानवते. सकाळचे किंवा संध्याकाळचे कोवळे, तिरके ऊन मिळाल्यास उत्तमच असते. खिडकीजवळील जागेत हिला ठेवावे. ग्लॉक्सिनियाला कोरडय़ा वातावरणापेक्षा थोडेसे दमट वातावरणच जास्त मानवते. त्यामुळे ग्लॉक्सिनियाची कुंडी एखाद्या पसरट व उथळ थाळीत पाणी भरून त्या थाळीच्या मध्यभागी ठेवल्यास हवा असलेला दमटपणा लाभू शकतो. ग्लॉक्सिनियाची दमट वातावरणाची गरज लक्षात ठेवून ते कधीही, जास्त काळ, वातानुकूलित खोलीत ठेवू नये. कारण वातनुकूलित खोलीतील वातावरण खूपच शुष्क असते आणि ते ग्लॉक्सिनियाला बिलकूल मानवत नाही.
लागवडीसाठी बागकामाची माती आणि शेणखत प्रत्येकी एक भाग व कोकोपीट अर्धा भाग असे मिश्रण करावे. शेणखताबद्दल पालापाचोळ्याचे किंवा गांडूळखतही चालू शकते. काही वेळा नर्सरीतून आणलेले रोप फक्त कोकोपीटमध्ये लावलेले असते. कोकोपीटची पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. जर कोकोपीट कायमच खूप ओला राहिला तर ग्लॉक्सिनिया कुजून मरून जाईल. कधी कधी कोकोपीट वरवर वाळल्यासारखे दिसत असले तरीही, ते पिळल्यास त्यातून बऱ्याच प्रमाणात पाणी बाहेर पडते. म्हणूनच जर विकत घेतलेले रोपटे जर कोकोपीटमध्ये लावलेले असेल तर त्याची पुनर्लागवण ही उपरोक्त माती मिश्रणात करणेच श्रेयस्कर ठरते आणि काही कारणांनी जर ग्लॉक्सिनिया कोकोपीटमध्येच ठेवायचे असल्यास आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी. कोकोपीट हे माध्यम जरी वनस्पतीजन्य असले तरी त्यातून मिळणारी, वनस्पतींना उपयुक्त अशी अन्नद्रव्ये अगदीच कमी पडतात. मग ही अन्नद्रव्ये पुरवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर हा अटळ होतो.
ग्लॉक्सिनियाची पाने थोडीशी केसाळ असल्याने, त्यांवर धूळ साचण्याचे प्रमाण जरा जास्तच असते. साचलेल्या धुळीने झाडाची शोभा कमी होतेच, पण त्याचबरोबर श्वसनक्रिया आणि प्रकाश संश्लेषणास लागणाऱ्या हवेची वानवा होऊ शकते; कारण हवा शोषून घेण्यासाठीची पानामागील छिद्रेही धुळीमुळे बंद होऊ शकतात. हे टाळण्यास दिवसातून एकदा तरी ग्लॉक्सिनियावर पाण्याचा पंपाद्वारे फवारा देणे चांगले असते.
नंदन कलबाग