काळासोबत जाणाऱ्या मालिका आज खूप आहेत. पण, पूर्वीच्या काळात घेऊन जाणाऱ्याही काही मालिका सध्या सुरू आहेत. मराठीत ‘जय मल्हार’, ‘संत तुकाराम’ तर हिंदीत ‘जोधा अकबर’, ‘महाराणा प्रताप’, ‘बुद्धा’ अशा ऐतिहासिक, पौराणिक, संतांवरील मालिका सध्या सुरू आहेत. या मालिकांमुळे प्रेक्षकांना इतिहासाची, जुन्या परंपरा-रूढींची माहिती होतेच, शिवाय त्यांचे राहणीमान, जगण्याची पद्धत याचेही दर्शन होते. अशा प्रकारच्या मालिकांमध्ये विशेष आव्हान असतं ते तो काळ उभा करण्याचं. सेट, लोकेशन यामधून तो काळ उभारला जातोच. पण, यातल्या व्यक्तिरेखांमधूनही त्या काळाचं दर्शन होत असतं. व्यक्तिरेखांच्या पेहरावासोबतच त्यांच्या दागिन्यांचाही विशेष अभ्यास केला जातो. कारण त्या काळात असलेल्या दागिन्यांमागे विशेष अर्थ दडलाय. सध्या सुरू असलेल्या मालिकांमध्ये एकेक काळ रेखाटला जातोय. ‘जय मल्हार’मध्ये देवदेवतांचा, पुराणकाळ दिसतोय, तर ‘संत तुकाराम’ या मालिकेतून सतराव्या शतकातला काळ उभा केलाय. ‘जोधा अकबर’मध्ये मुघलकाळ ‘महाराणा प्रताप’मधून सोळाव्या शतकातला राजस्थानचा इतिहास दाखवलाय. या मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या काळात महत्त्वाची भूमिका बजावतात ते दागिनेही. त्यामुळे या मालिकांच्या निमित्ताने मुघलकालीन, पुराणकालीन, ऐतिहासिक दागिन्यांची ओळख होतेय. हे सगळे दागिने जुने असले तरी त्यांचीही लोकप्रियता आज अफाट आहे. राजस्थानी परंपरेचं मोठं दणकट कडं, मण्यांचा कंबरपट्टा, अधिकाधिक खडय़ांचा वापर अशा पद्धतीने ‘महाराणा प्रताप’मधले दागिने दिसतात. तर ‘जय मल्हार’मध्ये सोन्याच्या दागिन्यांचा वापर अधिकाधिक दिसतो. तसंच यामध्ये आकर्षण ठरतात त्या मोठय़ा उंचीच्या माळा. विशेष म्हणजे या माळा केवळ स्त्रीच्याच गळ्यात दिसत नाहीत तर पुरुषांच्या गळ्यातही दिसतात. या माळांची उंची कमी करून तसं बनवून घेण्यासाठीही मागणी असल्याचं म्हटलं जातंय. तसंच म्हाळसाच्या गळ्यातला शृंगार हेही एक वैशिष्टय़ असतं. ‘जोधा अकबर’मधली भव्यता दिसतेच मुळी या दागिन्यांमुळे. डोक्यापासून अगदी पायापर्यंत जोधा दागिन्यांनी मढलेली असते. मुघलकालीन दागिन्यांचे सौंदर्य तत्कालीन वेगवेगळ्या खडय़ांमध्ये आहे. या खडय़ांपासून बनलेले हे दागिने विविध रंगात मालिकेत दिसून येतात.
मराठीमध्ये नुकताच येऊन गेलेला ‘रमा माधव’ हा सिनेमा यातलंच एक उदाहरण म्हणता येईल. पेशवेकालीन दागिन्यांचं सौंदर्य या सिनेमात बघायला मिळतं. या सिनेमाच्या वेशभूषाकार पूर्णिमा ओक या सांगतात की, ‘पेशवेकालीन दागिने त्याकाळी ‘लार्जर दॅन लाइफ’ असे होते, असं म्हटलं जातं. त्यामुळे दागिन्यांमधलीही ती भव्यता सिनेमातून दाखवायची होती. पेशव्यांमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार दागिने बनवायचे होते. त्यामुळे गोपिकाबाई या पेशवे घराण्यातल्या रुबाबदार, कणखर स्त्री होत्या. त्यामुळे तसेच भारदस्त दागिने दाखवणं गरजेचं होतं. आनंदी ही त्यावेळची आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘स्टाइल स्टेटमेंट’ होती. त्यामुळे तिचे दागिने जरा मोठे, आकर्षक, इतरांपेक्षा वेगळे असे बनवले गेले. पार्वती ही खूप साधी, सोज्वळ होती. त्यामुळे तिच्यासाठी पारंपरिक, साधे दागिने निवडले. अगदी डोळ्यात भरतील असे दागिने तिच्यासाठी टाळले. तर रमामध्ये हे सगळे गुण होते. त्यामुळे तिचेही स्वभाववैशिष्टय़ अधोरेखित होतील असे दागिने तयार केले गेले.’
‘रमा माधव’ या सिनेमातून वेगळ्या कथेसोबतच आकर्षण होतं ते यातल्या दागिन्यांचं. पेशवेकालीन दागिन्यांचं सौंदर्य पूर्वीपासून सगळेच बघत आले आहेत. त्या दागिन्यांचे आकर्षण, महती, माहिती अनेक पुस्तकांतून अनेकांच्या वाचण्यात आली आहे. मात्र ते प्रत्यक्ष या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ‘आजकाल छोटे तन्मणी वापरले जातात. पण, पेशवेकाळात त्या तन्मणी दागिन्यातलं पेंडंट म्हणजे पेशव्यांच्या भाषेत ‘खोड’ हे मोठं असायचं. ठसठशीत असे तन्मणी या सिनेमाच्या माध्यमातून दाखवता आले. ब्राह्मणी पद्धतीचे दागिने दाखवणं हा मुख्य हेतू होता. म्हणजे बोरमाळ दाखवायची नव्हती पण, मोहनमाळ हवी होती. आनंदीबाईचं पैंजण, तो तोडा मोठा होता हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. चिंचपेटी आज जी वापरली जाते ती दोन रेषा आणि गादीवर विणलेली नसते. तसंच लटकनही वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात. पण, त्या काळात तीन रेषा, गादीवर विणलेली आणि मग मोठं लटकन असा चिंचपेटी हा दागिना असायचा. हा सिनेमा बघून पूर्वीसारखी चिंचपेटी प्रेक्षकांना आवडू लागली आहे’, असं पूर्णिमा सांगतात. त्यांनी याआधी ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकेतही पेशवेकालीन दागिन्यांवर काम केलं आहे. आताही पुन्हा नव्याने वेगवेगळी पुस्तकं वाचून या सिनेमासाठी दागिन्यांची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. पेशव्यांचे दागिने असं एक स्वतंत्र पुस्तकच आहे. त्यामध्ये त्यांचं राहणीमान, जगण्याची पद्धत, व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्टय़ं अशी सगळ्याची माहिती त्यात आहे. हा अभ्यास काम करताना फायदेशीर ठरल्याचं त्या सांगतात. ‘केवळ स्त्रीचं नव्हे तर पुरुषांच्या दागिन्यांवरही काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांच्या गळ्यातले टपोरे मणी, त्यांची कलगी, बिगबाळ्या, गळ्यातले कंठे, कडे, अंगठय़ा अशा सगळ्यावर अभ्यास केला. नथीमध्ये प्रकार आहेत. ब्राह्मणी नथ आणि उभी नथ यात फरक आहे. ब्राह्मणी नथीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. आणि उभ्या नथीत तो नसतो. ब्राह्मणी नथ पांढऱ्या, डाळिंबी रंगाची असते’, असं त्यांनी सांगितलं. पैंजण, कानातले यातही पेशवाकाळ उभा केला आहे. सोनेरी पट्टीत घुंगरू घट्ट विणलेले असं पैंजण पेशवेकाळाची ओळख पटवतात. तर कानात मोत्याच्या कुडय़ा, बुगडय़ा, टपोरी मोती हे त्या काळात घेऊन जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा