दागिने आवडत नाहीत असं म्हणणारी स्त्री विरळाच. म्हणूनच तर दागिन्यांच्या डिझाइन्समध्ये दरवर्षी सातत्याने नवनवे प्रकार येत असतात. या वर्षीच्या दागिन्यांच्या डिझाइन्सवर एक नजर-

दागिने आणि स्त्री यांचे अतूट नाते आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिच्यासाठी बनवल्या जाणाऱ्या चेन, पैंजणपासून हा प्रवास सुरू होऊन तिच्या अखेरच्या श्वासासोबत दागिन्यांबाबतच्या तिच्या हौसमौजेपर्यंत येऊन थांबतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, जगाच्या पाठीवर कुठल्याही देशातील कोणत्याही स्त्रीला विचारा, दागिने आवडत नाहीत, असे उत्तर देणारी स्त्री सापडणे मुश्कीलच. त्यातही आयुष्यभर हे दागिने तिला तिच्यासाठीच हवे असतात, असे काही नाही. शाळेत जाणाऱ्या छोटुलीला तिच्या बाहुलीला सजवायला पण दागिने हवे असतात, कॉलेजला जाणाऱ्या तरुणीला स्वत:ला नटायला जितके आवडते, तितकेच तिच्या खोलीतल्या तिच्या हक्काच्या कोपऱ्याला सजवण्यात पण तिला आनंद मिळतो. मग या कोपऱ्याला सजवण्यासाठी दागिन्यांपेक्षा इतर उत्तम गोष्ट काय असू शकते? संसारात व्यग्र आई आपल्या मुलीच्या लग्नाची स्वप्ने पाहात, तर उतारवयात आलेली आजी नातीकडे आपली आठवण राहावी म्हणून दागिने जमवत असते.
पण अशा या दागिन्यांची कहाणी असते विविधरंगी, विविधढंगी. आजीचा दागिना म्हणजे अस्सल सोनं. त्याकाळच्या दागिन्यांमध्ये आणि प्रेमामध्ये भेसळीचा मागमूस नसायचा ना. आईच्या दागिन्यांमध्ये मुलीपेक्षा तिच्या भावी सासरी काय आवडेल याचा हिशोब मांडलेला असतो. तर मुलीच्या दागिन्यांमध्ये तिच्या वयाला साजेशी बेपर्वाई, बिनधास्त वृत्ती दिसून येते. स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या अंगावर सजलेल्या दागिन्यांकडे नीट निरखून पहिले तर, ‘हर गहना कुछ कहता है’ हे तुम्हाला नक्की पटेल.
काळ बदलतो आणि त्यासोबत या दागिन्यांचे स्वरूपसुद्धा बदलते. पूर्वी सोन्याचे दागिने म्हणजे स्त्रीचा जीव की प्राण असे. आपली आयुष्यभराची पुंजी गोळा करून आई-वडील मुलीला तिच्या लग्नासाठी चार दागिने बनवून देत. त्यानंतर हिरे, प्लॅटिनम यांनीसुद्धा सोन्याची जागा घेतली. आज व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, अँटिक गोल्ड, कुंदन, खडे असे कित्येक पर्याय तरुणींसमोर आहेत. त्याच्या जोडीला गोल्ड प्लेटिंग, आर्टिफिशियल दागिनेसुद्धा आहेतच की. काळानुसार या दागिन्यांनी आपले स्वरूपसुद्धा बदलले आहे. पूर्वी पारंपरिक नक्षीकाम, देवी-देवतांचे कोरीव काम इथपर्यंत मर्यादित असलेली दागिन्यांवरची नक्षी आज उंबरठा ओलांडून खूप पुढे गेली आहे. आजघडीला सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांना खूप पर्याय मिळू लागले आहेत. तरुणी आपल्या पसंतीनुसार त्यावर नक्षीकाम करून घेऊ लागली आहे. आजकाल सिम्पल ड्रेसवर भरीव काम केलेल्या दागिन्यांना तरुणी जास्त पसंती देत आहेत. दीपिका पदुकोन, विद्या बालन, सोनम कपूर, किरण खेर, सोनाक्षी सिन्हा, काजोलसारख्या कित्येक बॉलीवूड अभिनेत्री आपल्या सिम्पल आणि सोबर आउटफिट्सवर ओव्हर द टॉप ज्वेलरी मिरवताना दिसतात. या दागिन्यांमधील विविधतेमुळे एकच ड्रेस वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने घालण्याचे स्वातंत्र्यसुद्धा मिळते. त्यामुळे या दागिन्यांचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे.
पेशवाईच्या काळात आपल्याकडे छत्तीस विविध पद्धतींचे दागिने घडवले जायचे असे म्हटले जाते. त्यांची नावे आज कोणाला फारशी आठवत नसतील, पण आज त्यांना बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. काहीं जुन्या दागिन्यांना आज नवीन नावे मिळाली आहेत किंवा एक-दोन दागिन्यांचा मेळ घालत नवीन प्रकारचे दागिनेही बाजारात आले आहेत. बांगडय़ा, पाटल्या, हार, पैंजण, कमरपट्टा, कानातले यांची जागा ब्रेसलेट्स, अँकलेट्स, पेंडेंट्स, इअरकफ्स, थमरिंग्स अशा विविध दागिन्यांनी घेतली आहे. दागिन्यांवरची नक्षीसुद्धा सध्या कात टाकू लागली आहे.
पूर्वी केसांमध्ये मांगटिक्का घातला जायचा. तोही सर्व थरातल्या सर्व समाजांमध्ये असायचा असे नाही. मारवाडी, गुजराती समाजात मांगटिक्का मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. आता त्याची जागा हेडगिअर्सनी घेतली आहे. ‘आउटहाउस’ ब्रान्डच्या कबिबा आणि सशा यांनी त्यांच्या कलेक्शनमध्ये सुंदर हेडपीसेसचा समावेश केला आहे. नेहमीच्या नेकपीसेस्ना एक बदल द्यायचा असेल, तर हे हेडपीसेस एक उत्तम पर्याय ठरू शकतात. केसांचा बन बांधून त्यात हेडपीसेस् खोवण्याची फॅशन सध्या इन आहे. नेहमीच्या नेकपीसेस्ना किंवा कुंदन हारांनासुद्धा हेडपीस म्हणून सध्या खोवण्यात येतात.
इअररिंग्स म्हटले की, नेकपीस किंवा हारासोबत येणारे डूल हे समीकरण आता बदलले आहे. कित्येकदा वेगळ्याच नेकपीसवर वेगळ्या प्रकारचे इअररिंग्स घातले जातात. सध्याच्या ट्रेंडनुसार या इअररिंग्सला खूप पर्याय मिळू लागले आहेत. त्यातील गाजत असलेला प्रकार म्हणजे ‘इअरकफ्स’. कानाच्या आकाराच्या या इअरकफ्समुळे कुठल्याही पार्टीमध्ये सर्वाचे लक्ष आधी तुमच्या कानांकडे जाणार हे नक्की असते. अगदी फुलांपासून ते ‘लव्ह’, ‘फ्रेंड्स’ अशा शब्दांपर्यंत विविध प्रकारचे इअरकफ्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. एका कानात इअरकफ्स आणि दुसऱ्या कानात छोटेसे स्टड घालून नेकपीसला रजा देता येते. याशिवाय हे इअरकफ्स वेस्टर्न आणि इंडियन अटायरवर मॅच होतात, त्यामुळे त्याची काळजी करायची गरजसुद्धा नसते. इअररिंग्सना दुसरा पर्याय म्हणून सध्या एका कानातल्याऐवजी एका कानात तीनचार वेगवेगळ्या प्रकारचे स्टड्स घातले जातात.
पारंपरिक नथीमध्येसुद्धा बरेच पर्याय आले आहेत. डिझायनर फाल्गुनी मेहताच्या मते, ‘नथीचा आकार प्रत्येकीच्या चेहऱ्याच्या आकारावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक चेहऱ्याला विविध प्रकारची नथ शोभून दिसते.’ मध्यंतरी कान फेस्टिव्हलला सोनम कपूर आणि विद्या बालनने घातलेल्या नथीने जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
सध्या रॅम्पवर आणि रॅम्पच्या बाहेरही नेकपीसेस्ना हद्दपार करायच्या कारवाया सुरू असल्या तरी त्यांना फारसे यश मिळालेले नाही. नेकपीसमध्येसुद्धा सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक चोकर, माळांसारखे प्रकार जिथे अजूनही आपले स्थान टिकवून आहेत, तिथेच त्यांच्या आकारामध्ये, उंचीमध्ये विविध बदल केले गेले आहेत. नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमध्ये डिझायनर प्रियदर्शनी राव हिने गुडघ्यापर्यंत लांब माळा मॉडेल्सना दिल्या होत्या. त्यामुळे नेकपीस लार्जर देन लाइफ होत आहेत. गळ्याच्या आकारापेक्षा मोठे नेकपीस सध्या पाहायला मिळत आहेत. कित्येकदा नेकपीस आणि कमरपट्टा जोडून त्याला बेल्टचा लुक देण्याचा प्रयत्न डिझायनर्स करतात. तुमच्या प्लेन ड्रेसवर हे नेकपीस खुलून दिसतात. एकतर नेकपीस नाहीतर इतर ज्वेलरी असा पर्याय सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. फार क्वचित प्रसंगी हेवी नेकपीससोबत इतर ज्वेलरी घातली जाते.
बांगडय़ांची जागा आता कडे, ब्रेसलेट्स, हॅण्ड हार्नेस यांनी घेतली आहे. एखाद्दुसरे कडे त्यासोबत बांगडय़ा किंवा चारपाच ब्रेसलेट्स एकत्र घालण्याचा प्रघात सध्या पाहायला मिळतो. याशिवाय ‘हॅण्ड हार्नेस’ हा एक नवीन पर्याय सध्या पाहायला मिळतो. यामध्ये ब्रेसलेट आणि अंगठी यांना एकत्र जोडले जाते. फुलपाखरू, फुले अशा एलिगन्ट आकारांपासून ते थेट रॉक चिक लुकपर्यंत विविध आकारांमध्ये हे हॅण्ड हार्नेस पाहायला मिळतात. नेहमीच्या अंगठय़ांनीसुद्धा आपले रूप पालटले आहे. आता थमरिंग्स, मिड-फिंगर रिंग्स, टू-फिंगर रिंग्स असे विविध पर्याय बाजारात पाहायला मिळतात. एकाच वेळी दोन बोटांमध्ये घालता येणारी टू-फिंगर रिंग सध्या गाजते आहे. याशिवाय बाजूबंद पण कात टाकताना दिसताहेत.
कमरपट्टा घालण्याची हौस प्रत्येकीला असतेच. पूर्वी पाहायला मिळणारे हेवी कमरपट्टे जाऊन आता त्याजागी एलिगंट, बारीक कमरपट्टे पाहायला मिळत आहेत. कुंदन, हिरे वापरून या कमरपट्टय़ांना नाजूकपणा आणि नजाकतता आणली जाते. यामुळे तुमची कंबर कितीही बारीक किंवा जाड असू देत हे कमरपट्टे तुम्हाला खुलून दिसतात.
पैंजणांची जागा फार पूर्वीच अँकलेट्सनी घेतली आहे. पण आता अँकलेट्स नाजूक राहिलेले नाहीत. कित्येकदा तीनचार इंचाचे अँकलेट्ससुद्धा पायामध्ये मिरवताना तरुणी तुम्हाला पाहायला मिळतील. या अँकलेट्समध्येसुद्धा खूप पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
आजची तरुणी बदलत चालली आहे. तिला पारंपरिक दागिने आवडत असले तरी त्यातही तिला नावीन्य हवे आहे. रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना सोन्याचे दागिने मिरवणे शक्य नसते, त्यामुळे आर्टिफिशिअल ज्वेलरीचा पर्याय त्यांना प्रिय वाटतो. त्यात गोल्ड प्लेटेड ज्वेलरीमध्येसुद्धा आता खूप विविधता पाहायला मिळते. ‘अपला ज्वेलर्स’च्या सुमित सोहनीच्या मते, ‘आजची तरुणी दागिने निवडताना केवळ आपल्या लग्नाचा किंवा सणसमारंभाचा विचार करत नाही. तिला ऑफिसला जाताना, पार्टीला जातानासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायचे असतात. त्यासाठी पारंपरिक दागिन्यांमध्ये मर्यादा येतात. त्यामुळे कित्येक जणी सध्या कुंदन, जडावू दागिन्यांचा पर्याय निवडताना सध्या दिसतात.’ तरुणींची हीच मागणी लक्षात घेऊन सध्या अशा विविध प्रकारचे दागिने तयार करणाऱ्या ज्वेलरी डिझायनर्सची फौज बाजारात पाहायला मिळत आहे.
दागिने बनवताना सर्वात महत्त्वाची असते ती त्यामागची इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा. पारंपरिक दागिन्यांमध्ये ठरावीक आकार आणि नक्षी पाहायला मिळते. पण आता यात बरेच बदल करण्यात आले आहेत. नेहमीच्या फुलांच्या, देवी-देवतांच्या नक्षीतसुद्धा आता बरेच बदल करण्यात आले आहेत. डिझायनर नित्या अरोराने मागच्या वर्षी नेहमीच्या फुलांच्या आणि फुलपाखरांच्या नक्षीचा भन्नाट वापर करत आपल्या कलेक्शनमधून समलिंगी नात्यांचा पुरस्कार केला होता. त्याचबरोबर पक्ष्यांचे, प्राण्यांचे, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या विविध सजीव-निर्जीव वस्तूंचे आकार तुम्हाला दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. मध्यंतरी पोपटापासून ते हत्तीपर्यंत कित्येक प्राण्यांचे आकार ज्वेलरीमध्ये पाहायला मिळत होते. अगदी एरवी अशुभ मानले जाणारे घुबडसुद्धा ज्वेलरीमध्ये दिमाखाने मिरवत होते. डिझायनर मृणालिनी चंदेद्राच्या मते, ‘आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण दागिने घडवू शकतो. यामुळे तोचतोचपणा पण टाळला जातो आणि आपल्याला वॉडरोबमध्ये चॉइस मिळतो.’ तिच्या कलेक्शनमध्ये पिंजऱ्यापासून ते खुर्चीपर्यंत कित्येक विविध आकाराचे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. कानामध्ये पिंजऱ्याच्या आकारातील मोठे इअररिंग्स घातलेली मॉडेल यंदा तिच्या कलेक्शनची आकर्षण होती. भौमितिक आकार आणि वेलींची नक्षीसुद्धा मोठय़ा प्रमाणात दागिन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या पारंपरिक देवदेवतांच्या किंवा मंदिरांच्या नक्षीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेला ‘आम्रपाली’ ब्रॅण्डसुद्धा या नक्षीला नावीन्याची मोहर लावताना दिसतो.
या आकारांसोबतच हे दागिने आता थ्रीडी किंवा ओबडधोबडसुद्धा झाले आहेत. पूर्वी दागिने त्यांच्या नजाकतीसाठी ओळखले जायचे. आपल्याकडील ठुशीसारखे प्रकार आकाराने मोठे असले तरी त्यात प्रमाणबद्धता होती. पण आता कित्येक डिझायनर्स दागिन्यांना ‘रॉ’ लुक देणे पसंत करतात. ‘अपला ज्वेलर्स’च्या सुमितच्या मते, त्याने कलेक्शन करताना नैसर्गिक दगड, त्यांची रचना यांपासून प्रेरणा घेतली होती. त्यामुळे त्या दगडांमधील असमानता, ओबडधोबडपणा त्याच्या दागिन्यांमध्ये उतरला होता. सोन्याचे दागिने बनवूनसुद्धा त्यात असा प्रयोग करणे यात धोका असला तरी सध्याची तरुणी हा धोका स्वीकारून प्रयोग करायला उत्सुक असते, असे तो सांगतो. थ्रीडी ज्वेलरीचीसुद्धा सध्या लाट आहे. अगदी अंगठय़ांमध्येसुद्धा वेगवेगळे टॉवर्सचे आकार बनवून त्यांना थ्रीडी लुक दिला जातो. यासोबतच फुले, पेझ्ली, सूर्य, चंद्र या आकारांनासुद्धा थ्रीडीचा लुक दिला जातो. थ्रीडी दागिन्यांना पसंती देणारी डिझायनर सुहानी पिट्टी सांगते की, ‘नेहमीच्या दागिन्यांना जडाऊ, मीनाकारीच्या साहाय्याने थ्रीडी लुक देता येतो. त्याचबरोबर या प्रकारच्या दागिन्यांवर टेक्श्चरसोबतसुद्धा खेळण्याची मुभा मिळते.’ यामुळे दागिन्यांना रॉक लुक मिळतो आणि कुठल्याही अटायरवर ते सहज मॅच होतात.
दागिने बनवण्याच्या मटेरिअलमध्येसुद्धा आता बरेच बदल झाले आहेत. सोने, चांदीची जागा व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, अँटिक गोल्डनी घेतली आहे. एक काळ होता, जेव्हा काळसर सोनेरी रंगाच्या सोन्याला जास्त महत्त्व नसे. पण आज अँटिक गोल्डला तरुणी जास्त पसंती देत आहेत. नेहमीच्या पिवळ्या झळाळीपेक्षा थोडीशी काळसर झळाळी असलेले हे दागिने जास्त गॉडी पण वाटत नाहीत. हे दागिने साडी किंवा अनारकलीजवर शोभून दिसतातच, पण गाऊन्सवरसुद्धा हे दागिने घालण्याचा ट्रेंड सध्या आला आहे. प्लॅटिनमसुद्धा कित्येकींना आज आकर्षित करत आहे. प्लॅटिनम दागिन्यांमधील नाजूकपणा रोज ऑफिसला जाताना घालाव्या लागणाऱ्या फॉर्मल्सवर खुलून दिसतो. त्यामुळे कॉर्पोरेट विश्वातील कित्येक तरुणी प्लॅटिनमला पहिली पसंती देतात. पण सोन्यापेक्षा तुलनेने महाग असलेल्या प्लॅटिनमचा एकतरी दागिना आपल्याकडे असावा अशी इच्छा धरून इतर काही नाही पण दोघांच्या लग्नाच्या अंगठय़ा तरी प्लॅन्टिनमच्या असाव्यात असा विचार करणारी जोडपीसुद्धा कमी नाहीत. गुलाबीसर छटा असलेले रोझ गोल्ड पण कित्येकींना आकर्षित करत आहे.
दागिना म्हणजे फक्त सोने हे समीकरण केव्हाचे हद्दपार झाले आहे. आज कुंदनचा पर्याय कित्येक जणी आपल्या लग्नाच्या दागिन्यांमध्येही निवडत आहेत. त्यामुळे कुंदनच्या दागिन्यांमध्ये सध्या प्रचंड वैविध्य आहे. यासोबत विविध खडय़ांचा वापरही सध्या दागिन्यांमध्ये वाढला आहे. मोठमोठय़ा आकारातील, रंगांचे खडे सर्रास ज्वेलरीमध्ये वापरले जात आहेत. हे खडे नेहमीच गोल आकारातील असतील असे नाही. चौकोनी, त्रिकोणी, आयताकार किंवा ओव्हल आकाराचे खडेसुद्धा सध्या दागिन्यांमध्ये वापरले जात आहेत. तुमच्या पार्टीवेअरला कंटेम्पररी लुक द्यायला हे नेकपीस कामी येतात. यशिवाय खडय़ांच्या अंगठय़ा, ब्रेसलेट्ससुद्धा पाहायला मिळतात. एकाच दागिन्यात वेगवेगळ्या रंगाचे खडे वापरल्यामुळे वेगवेगळ्या आउटफिट्सवर हे तुम्हाला घालता येतात. तसेच या नेकपीसना लेस, सॅटिन फॅब्रिक लावून त्यातला एलिगन्स जपण्याचा प्रयत्नही डिझायनर्स करत आहेत. या खडय़ांना चेन्स, स्टड्सची जोड दिली जाते. डिझायनर मेहेक गुप्ता तिच्या लार्जर देन लाइफ नेकपीसेस्साठी प्रसिद्ध आहे. खडे, स्टोन्स, हिरे यांसोबत गोल्ड प्लेटिंगचा वापर करत ती मोठमोठय़ा आकाराचे नेकपीस घडवते.
हिऱ्यांच्या बाबतीतसुद्धा खूप विविधता पाहायला मिळते. पूर्वी सोन्यामध्ये लुकलुकणाऱ्या सफेद हिऱ्यांची जागा आता वेगवेगळ्या रंगांच्या हिऱ्यांनी घेतली. हिऱ्यांचे आकारही बदलले आहेत. छोटय़ा नाजूक हिऱ्यांऐवजी आता मोठे डोळ्यात भरणारे हिरे वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. मोठय़ा हिऱ्याची एक अंगठी हातात घातल्यावर तुम्हाला इतर कुठल्याही दागिन्याबद्दल विचार करायची गरज भासत नाही. त्यामुळे अशा अंगठय़ांना आता प्रचंड मागणी आहे. याशिवाय हिरे आणि कुंदन यांच्या कॉम्बिनेशन असलेल्या नेकपीसेस्लासुद्धा सध्या मागणी आहे. रोझ गोल्ड किंवा व्हाइट गोल्डमध्ये बनवलेले डायमंड इअररिंग्स कॉर्पोरेट पार्टीज, मीटिंग्समध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जातात.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मोत्यांच्या दागिन्यांनासुद्धा प्रचंड मागणी आली आहे. डिझायनर्स आपल्या कलेक्शनमध्ये विविध रंगांच्या प्रेशिअस बिड्सचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. मोती, सोने असो किंवा हिरे, स्टोन्स असो किंवा प्लॅटिनम सर्वासोबत खुलून दिसतात. तसेच कॉर्पोरेटपासून ट्रेडिशनल लुकपर्यंत सर्व लुक्सवर खुलून दिसतात. त्यामुळे कित्येक तरुणी मोत्याच्या दागिन्यांना पसंती देत आहेत.
दागिन्यांमध्ये इतके बदल होण्यामध्ये सध्याचे असुरक्षित वातावरणसुद्धा तितकेच जबाबदार आहे. सोन्याचे दागिने नजरेत येतात, चोरी होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यापेक्षा दिसायला खोटे दिसणारे, हाताळायला सोपे असे दागिने तरुणी निवडत आहेत. तसेच ‘मिरवायला दागिने घालायचे’ ही संकल्पना मागे पडून मोजकेच पण आपल्या लुकला पूर्ण करणारे दागिने तरुणी निवडत आहेत. यामुळे त्यांची दागिन्यांची हौससुद्धा पूर्ण होते आणि भरपूर चॉइससुद्धा मिळत आहे.

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Story img Loader