‘आपले मराठी अलंकार’ हे डॉ. म. वि. सोवनी यांचं पुस्तक म्हणजे मूळचा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध आहे. त्याचं नंतर पुस्तकात रूपांतर करण्यात आलं आहे. सोवनी यांना हा अभ्यास करावासा वाटला त्याला कारण ठरला तो १९६२ चा सुवर्ण नियंत्रण कायदा. या कायद्यामुळे सोन्याच्या व्यवहारांवर कडक र्निबध आले. त्यापोटी महाराष्ट्रातल्या गावोगावच्या सोनारांनी आपल्याजवळ पडून असलेले जुने दागिने मोडून वितळवून त्यांचं लगडीत रूपांतर केलं. त्यामुळे प्राचीन काळापासून जे दागिने चालत आले होते, त्यांचं डिझाइन लयाला गेलं. त्यानंतर पुण्यात जोशी-अभ्यंकर खून सत्रानंतर तर चोरीच्या भीतीपोटी दागिन्यांबाबत सार्वजनिक पातळीवर बोलणंच बंद झालं. अशा घडामोडींच्या काळात सोवनी यांना वाटायला लागलं की, जुने दागिने, त्यांचं डिझाइन, त्यांची नावं ही सगळी माहिती अशीच काळाच्या पडद्याआड गेली तर लोकांना ते कळणारच नाही. १९८० साली निवृत्त झाल्यावर त्यांनी या विषयावर पीएच.डी. करायचा निर्णय घेतला. १९८३ आणि ८४ ही दोन र्वष त्यांनी पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांमधून दागिन्यांचे वाङ्मयीन तपशील मिळवले आणि १९८५ पासून पुढे तीन र्वष महाराष्ट्रभर भ्रमंती करून नोंदलेल्या प्रत्येक दागिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दागिन्याचा शोध घ्यायचा, तो मिळाला की पाहायचा, हाताळायचा आणि त्याचं चित्र काढायचं असा त्यांचा पाच वर्षे क्रम सुरू होता. यातून त्यांना तीनशेहून अधिक दागिन्यांची रेखाचित्रे काढता आली. याचा अर्थ त्यांना तेवढेच दागिने पाहता- हाताळता आले. त्यांच्या या अभ्यासातून आपल्या दागिन्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने दस्तावेजीकरण झालं आहे. आपले दागिने कोणते, ते कसे होते, त्यांची नावं काय होती, याची माहिती पुढच्या पिढय़ांसाठी उपलब्ध करून देणं हे खूप मोठं काम सोवनी यांनी केलं आहे. आदिमानवावस्थेतून माणसाची प्रगती होताना अलंकार घालणं ही संकल्पना कशी विकसित होत गेली हे मांडतानाच त्यांनी रत्नं, त्यांचं महत्त्व, अलंकार हे विविध देवतांची शुभचिन्हं कशी आहेत, अलंकार हे अशुभ निवारणासाठी कसे वापरले जातात, त्यामागची कल्पना काय होती, हे मांडलं आहे. स्त्रियांच्या, पुरुषांच्या अलंकारांची तपशीलवार माहिती त्या अलंकारांच्या रेखाचित्रांसहित दिलेली आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधला प्रदेश असल्यामुळे मराठी संस्कृतीत या दोन्हीकडच्या चालीरीतींचा, रूढीपरंपरांचा संगम दिसतो, तसाच तो दागिन्यांच्या बाबतही कसा दिसतो, हे सोवनी यांनी आपल्या पुस्तकातून सोदाहरण मांडलं आहे. त्यांच्या या अभ्यासातून दोन सोन्याचे मणी आणि काळा पोत असा दागिने मंगळसूत्र म्हणून घालायची पद्धत आली ती बारा-तेराव्या शतकातल्या मुस्लीम आक्रमणानंतर. त्याआधी लग्नविधी, लग्नपूर्व विधीत वेगवेगळ्या दागिन्यांची आपली अशी समृद्ध परंपरा होती. आज मराठी संस्कृतीची खास ओळख असलेली नथदेखील मूळची मराठी सोडाच भारतीयदेखील नाही, ती पद्धत बाहेरच्या देशांमधली आणि ती साधारण दीडेक हजार वर्षांपूर्वी आपल्याकडे आली आणि इथेच रूढ झाली हे वाचून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.
जुन्या अलंकारांचा शोध घेताना सोवनी यांना लोकांचे कसकसे अनुभव आले हे प्रकरण तर मुळातून वाचण्यासारखं आहे. काही ठिकाणी संबंधित लोकांनी स्वत:च्या जबाबदारीवर धोका पत्करून सोवनी यांच्या अभ्यासाला हातभार लावला. सोवनी चित्तांग या पारंपरिक पण आता कालबाह्य़ झालेल्या दागिन्याच्या शोधात होते. तर एका बँक अधिकाऱ्यांनी त्यांना चित्तांग दाखवला. बँकेतली वर्दळ कमी झाल्यावर त्यांनी एका कपाटातून एक थैली काढली. तिच्यावरचं लाखेचं सील उघडलं. सोवनी यांना तो दागिना हाताळू दिला. त्याचं चित्र काढू दिलं. तेवढा वेळ ते अधिकारी तिथे थांबले. सोवनी यांचं काम झाल्यावर त्यांनी तशाच दुसऱ्या थैलीत तो दागिना ठेवला. पुन्हा लाखेनं ती थैली सील केली आणि कपाटात ठेवून दिली. ही म्हटलं तर नियमबाह्य़ गोष्ट होती. पण सोवनी यांच्या अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या अधिकाऱ्यांनी तो धोका पत्करला होता. याउलट एका बडं प्रस्थ असलेल्या कुटुंबात सोवनी यांना दागिने बघायला, डिझाइन काढायला परवानगी दिली गेली. घरातले सगळे दागिने त्यांच्यासमोर आणून ठेवले गेले. आणि दुसऱ्या मिनिटाला सगळे दागिने पुन्हा उचलून आत नेले गेले आणि पुन्हा केव्हा तरी या असं सांगण्यात आलं. सोवनी यांना घरी नेऊन दागिने दाखवण्याच्या निमित्ताने दागिन्यांचं प्रदर्शनच मांडण्याचा तो प्रकार होता. तरीही सोवनी यांनी आपली चिकाटी न सोडता दागिन्यांची माहिती गोळा करण्याचं काम थांबवलं नाही. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळेच आपल्या पारंपरिक दागिन्यांची सचित्र माहिती आज पुस्तकाच्या रूपात पुढच्या पिढय़ांना उपलब्ध झाली आहे.

4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Story img Loader