सोन्याचे आकर्षण हे सार्वत्रिक, सार्वकालिक व सर्वदेशीय आहे. सोन्यासाठी युद्धे लढली गेली, देश पादाक्रांत केले गेले, हजारो-लाखो लोक केवळ एका देशातून नाही तर एका खंडातून दुसऱ्या खंडात सोन्याच्या शोधात धावत राहिले. काही वेळा सोन्यामुळे नवीन शहरे, प्रदेश उदयाला आले, तर काही वेळा सगळी माणसे सोन्याच्या शोधात निघून गेल्यामुळे गावेच्या गावे ओस पडली. काही तज्ज्ञ सांगतात की, माणसाला ज्ञात होणारा सर्वात पहिला धातू म्हणजे सोने. काहींच्या मते मात्र तांबे पहिला तर सोने दुसरा. उं१ल्लीॠ्री टी’’ल्ल वल्ल्र५ी१२्र३८ च्या अ‍ॅलन क्रॅम्ब यांनी ‘ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ मेटल्स’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, सोने मानवास इसवीसनापूर्वी सहा हजार वर्षे ज्ञात झाले व मानवास ज्ञात होणारा तो सर्वात पहिला धातू. पण विकिपिडियामध्ये ‘टाइमलाइन ऑफ केमिकल एलिमेंट्स डिस्कव्हरीज’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार तांबे हा माणसास माहीत होणारा सर्वात पहिला धातू (इ.स.पूर्वी ६००० ते ९००० वर्षे) तर सोने आपल्याला माहीत होणारा दुसरा धातू (इ. स.पूर्वी ५५०० ते ६००० वर्षे).
सोने किंवा तांबे हे माणसास ज्ञात झालेले पहिले धातू होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध विज्ञान लेखक आयझ्ॉक अ‍ॅसिमोव्ह यांनी ‘ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री’ या १९७०च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात केले. अ‍ॅसिमोव्ह यांचे म्हणणे असे की, मानवाला सापडलेले जे धातू आहेत त्यात फक्त सोने आणि तांबे हे दोनच धातू असे आहेत की जे कधी कधी शुद्ध स्वरूपात लगडीसारखे किंवा तुकडय़ाच्या स्वरूपातसुद्धा मिळू शकतात. (कॅलिफोर्निया, नॉर्थ कॅरोलिना, ऑस्ट्रेलिया येथे सुरुवातीला जे सोने मिळाले ते सहज जमिनीलगत, नदीकाठी लगडीच्या रूपात मिळाले होते.) अर्थात सोन्याचे महत्त्व तो मानवास ज्ञात होणारा पहिला किंवा पहिल्या धातूंपैकी एक असल्यामुळे किंवा धातुशास्त्रात त्याचा प्रथम उपयोग झाला म्हणून नाही. सोन्याचे महत्त्व आहे त्याच्या गुणधर्मात, त्याच्या सौंदर्यात व त्याच्या दुर्मीळतेत. सोने हा सौंदर्य आणि दुर्मीळतेचा मिलाप आहे. त्याची घनता इतकी विलक्षण आहे की आत्तापर्यंत काढून झालेले सर्व १.६५ लाख टन सोने हे एखाद्या इमारतीच्या काही खोल्यांत मावू शकेल असे म्हणतात.
सोने हा सौंदर्य व दुर्मीळतेचा मिलाप आहे असे म्हटले जात असले तरी ते एवढेही दुर्मीळ नाही की ते माणसाला उपलब्धच होत नाही. आपल्याला खाणींतून अनेक धातू मिळतात. त्यामध्ये बॉक्सॉइट म्हणजे अ‍ॅल्युमिनियम हे सर्वात जास्त प्रमाणात मिळते तर प्लॅटिनम हे सर्वात कमी प्रमाणात मिळते. सोने हे साधारण या दोन्हींच्या मध्यावर आहे असे म्हणता येईल.
पण सोन्याच्या दुर्मीळतेमुळे किंवा मर्यादित उपलब्धतेमुळे सोने शोधणे हाच खरे म्हणजे एक मोठा उद्योग झाला आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने मोठमोठय़ा कंपन्या या उद्योगात कार्यरत आहेत. पण पूर्वीच्या काळी राजा स्वत:च सोने मिळवण्यासाठी, नवीन प्रदेशजिंकण्यासाठी युद्धमोहिमा आखायचा.
राजे आणि सम्राटांची सोन्याबद्दलची ही मानसिकता असेल तर सामान्य माणसांबद्दल काय सांगायचे? सामान्य लोकांना अर्थात सोन्याचे आकर्षण होतेच. पण ते दबलेले होते. कारण त्याची उपलब्धताच खूप कमी होती. पण कोलंबसने अमेरिका शोधली आणि सोने सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. अमेरिका खंडातील अनेक भाग विविध खनिजांनी समृद्ध आहेत, हे युरोपातील धाडसी दर्यावर्दी लोकांना समजले व युरोपातून लोकांचे तांडेच्या तांडे तिकडे जायला लागले. इसवीसन १६९० ते १७००च्या दरम्यान पोर्तुगीजांना दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणात सोने आढळले व पोर्तुगालमधील सर्वसाधारण लोक मोठय़ा संख्येने अटलांटिक समुद्र पार करून ब्राझीलला गेले. सोन्यासाठीची ही पहिली झुंबड म्हणायला हरकत नाही. नक्की किती लोक या झुंबडीत सामील झाले त्याची माहिती नाही. सोने मिळण्याचे काम कष्टाचे असल्यामुळे काहींनी त्यांच्याबरोबर गुलामसुद्धा नेले होते.
इतिहासकार टिमोथी ग्रीन यांनी १७०२ सालच्या दरम्यान ब्राझीलहून सात ते आठ टन सोने हे नाणी किंवा अशुद्ध रूपात लिस्बन म्हणजे पोर्तुगालच्या राजधानीत पाठवले गेले असे म्हटले आहे. म्हणजेच कित्येक हजार लोक तेथे सोने मिळवण्याच्या मोहिमेवर होते असे म्हणता येईल.
आता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोने काढले जाते व नव्याने कुठे सोने मिळत आहे असे कळले की मोठमोठय़ा कंपन्या रीतसर सरकारकडून परवानगी घेऊन खाण खणतात. पण पूर्वी तंत्रज्ञान प्रगत नव्हते. भांडवल कमी होते. प्रदेश ओसाड होते. तेव्हा एखाददुसरी व्यक्ती वा गट सोन्याच्या शोधात जात असे. आश्चर्य म्हणजे तेव्हा दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नसताना एखाद्या ठिकाणी सोने मिळत असल्याचे कळल्यावर काही महिन्यांत तेथे लोकांची झुंबड उडत असे.
आतापर्यंत जगात विविध ठिकाणी सोन्यासाठी झुंबडी उडाल्या आहेत. इंग्लिशमध्ये त्याला गोल्ड रश असे म्हणतात. पैकी काही अल्पकाळासाठी होत्या, तर काही दीर्घकाळ चालल्या. गोल्ड रश हा शब्दप्रयोग प्रथम सोन्यासाठी उडालेल्या झुंबडीसाठी वापरला गेला असला तरी आता तो अल्पावधीत मोठय़ा प्रमाणात पैसे मिळवून देणाऱ्या कुठल्याही नवीन व्यवसायामागे उडालेल्या झुंबडींकरिताही वापरला जातो.
इ.स. १६९० पासून इ.स. २००० पर्यंत जगात ५० पेक्षा जास्त ठिकाणी झुंबडी उडाल्या आहेत. पैकी कॅलिफोर्निया व ऑस्ट्रेलिया येथे उडालेल्या झुंबडी मोठय़ा होत्या.
या झुंबडींचे वैशिष्टय़ म्हणजे जेथे त्या उडाल्या, त्या भागात कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था नव्हती. हम करे सो कायदा होता. तेथे कोणीही जाऊ शकत होता. भांडवल नसले तरी तेथे यश मिळण्याची शक्यता होती. काहींना अल्पावधीत यश मिळाले तर खूप कष्ट करूनही यश मिळाले नाही असेही झाले. तेथे वापरले गेलेले तंत्रज्ञान मात्र सामान्य प्रतीचे होते. या झुंबडीमध्ये सर्व थरांतील माणसे सामील झाली. कॅलिफोर्निया वा इतर ठिकाणी उडालेल्या झुंबडीत ही गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की तेथे कोणी उच्च-नीच नव्हते. अपवाद फक्त गुलामांचा. कारण काही गुलामांचे मालक गुलामांकडून काम करून घेत. पण तेव्हासुद्धा असे दिसून आले की काही गुलामांनी स्वत:च्या कष्टाच्या जोरावर एवढे सोने व पैसे मिळवले की ते त्यांच्या मालकाला देऊन त्यांनी स्वत:ची गुलामीतून सुटका करून घेतली.
झुंबडीत सामील झालेले सगळे कसे एका पातळीत होते ते दर्शवणारे एक गमतीदार उदाहरण म्हणजे काही धर्मगुरूंचे. तेसुद्धा आपले नेहमीचे काम सोडून सोने मिळवण्यासाठी इतर लोकांबरोबर सोन्याच्या खाणीवर गेले होते. पण कालांतराने तेथे एवढी माणसे आली की चर्च व सिनेगाँग उभारले गेले व हे धर्मगुरू मग तेथे काम करू लागले.

या झुंबडींचे वैशिष्टय़ म्हणजे त्या दीर्घकाळ टिकल्या नाहीत. तिथे मिळणारे उत्पन्न कमी झाल्यावर किंवा बडय़ा कंपन्या तेथे आल्यावर या झुंबडी ओसरल्या.

कॅलिफोर्नियाच्या झुंबडीत ज्या वर्तमानपत्रात सोने मिळत असल्याची बातमी प्रथम प्रसिद्ध झाली, त्या वर्तमानपत्रातील वार्ताहर, संपादक व इतर कामगार सगळेच ते वर्तमानपत्र सोडून सोने शोधायला गेले व ते वर्तमानपत्रच बंद पडले! जहाजावरील कर्मचारी जहाज बंदराला लागल्यावर सरळ सोनेभूमीवर जात व जहाजावर कोणी खलाशीच नाही अशी स्थिती व्हायची.
ऑस्ट्रेलियात जी झुंबड उडाली, तेथेही हाच प्रकार. सरकारी सेवेतील लहान-मोठे अधिकारी अगदी पोलिसांसकट काम सोडून सोने शोधायला गेले.
या झुंबडींचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या दीर्घकाळ टिकल्या नाहीत. तिथे मिळणारे उत्पन्न कमी झाल्यावर किंवा बडय़ा कंपन्या तेथे आल्यावर त्या झुंबडी ओसरल्या. सोन्यासाठी विविध ठिकाणी आतापर्यंत ज्या झुंबडी उडाल्या, तेथे हा पॅटर्न दिसून आला आहे. तेथे सुरुवातीला सोन्याची उपलब्धता जास्त असल्यामुळे अगदी सामान्य तंत्रज्ञान वापरूनदेखील बऱ्याचजणांना सोने मिळवता आले. कमी भांडवलात केवळ एक-दोन व्यक्तींच्या वा गटाच्या जोरावर सोने मिळाल्यामुळे फायदाही खूप झाला.
सहजपणे मिळणाऱ्या सोन्याचे प्रमाण कमी होत गेल्यावर मात्र मग अधिक प्रगत तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. जास्त भांडवल लागायला लागले व मग केवळ मोठय़ा कंपन्याच तेथे काम करू शकतील अशी परिस्थिती निर्माण होऊन झुंबडी ओसरत गेल्या.
सोन्यासाठी झुंबड उडालेल्या भागात असे दिसून आले की, सोने पूर्णपणे काढून झाल्यावर लोक तिथून निघून जातात व तो भाग पुन्हा ओसाड बनतो. कॅलिफोर्नियात जेथे जगातील सर्वात मोठी व काही वर्षे चाललेली झुंबड उडाली होती, तो भाग आता निर्मनुष्य आहे व पर्यटनासाठी गेलेले लोकच तेथे जास्त करून दिसतात.
आता बडय़ा खासगी वा सरकारी कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोठय़ा प्रमाणात भांडवल टाकून सोने मिळवत असल्या तरी सोन्यासाठी उडणाऱ्या झुंबडी कमी झाल्या नाहीत.
ब्राझीलमध्ये १९७०च्या दरम्यान काही ठिकाणी सोने मिळाल्यावर मोठी झुंबड उडाली. सर्वसामान्य माणसे सोने मिळत असलेल्या परिसराकडे धावत सुटली. काही ठिकाणी अजून सोने मिळते, पण सोने मिळवण्यासाठी ती माणसे वापरत असलेले तंत्रज्ञान पर्यावरणाच्याच नाही तर त्या लोकांच्या तब्येतीच्या दृष्टीनेदेखील घातक आहे असे सांगितले जाते. ब्राझील सरकारचे म्हणणे आहे की, या लोकांचा सामाजिक स्तर असा आहे की ते दुसरे कुठलेही काम करू शकत नाही. जर त्यांना सोने मिळवण्यापासून रोखले तर त्यांना उपासमारीलाच तोंड द्यावे लागेल.
ब्राझीलप्रमाणे कोंगो, सिएरा लिओन व घाना आदी आफ्रिकेतील देशांत आजदेखील हजारोंच्या संख्येने लोक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सोने मिळवण्याच्या प्रयत्नत आहेत. काही ठिकाणी सोन्याप्रमाणेच इतर काही धातू व हिरे मिळवले जातात.
जगात सोन्यासाठी सर्वात मोठी झुंबड उडाली ती १८५०च्या दरम्यान कॅलिफोर्नियात व त्यानंतर लगोलग ऑस्ट्रेलियात. तसेच नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, कोलेरेडो, दक्षिण आफ्रिका, क्लॉडिक येथे. पैकी नॉर्थ कॅरोलिनाची झुंबड तुलनेने लहान होती. पण येथेच अमेरिकेत पहिल्यांदा सोने मिळाले. त्यानंतर इतर अनेक ठिकाणी सोन्याचा शोध घेतला जाऊ लागला व सोन्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढले. प्रगत देशांनी ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’चा स्वीकार केला व त्यांच्या चलनाची सांगड त्यांच्याकडील सोन्याच्या साठय़ाशी घातली. सोन्याला जगाच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान मिळाले.
(सौजन्य- ‘सोन्याच्या शोधात’ आरती प्रकाशन, डोंबिवली या पुस्तकातील संपादित अंश)

Story img Loader