गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्षयात्रेने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.. मुंबईमध्ये उसळलेली ९२-९३ची जातीय दंगल, त्यानंतरची बॉम्बस्फोट मालिका या पाश्र्वभूमीवर मुंडे यांनी एकहाती महाराष्ट्र पिंजून काढला. या साऱ्याला यश कितपत येईल, याविषयी अनेकांच्या मनात साशंकता होती, कारण गाठ शरद पवार यांच्यासारख्या बलाढय़ नेत्याशी होती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप-सेना युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन आणि स्वत: गोपीनाथ मुंडे यांना सत्तापरिवर्तनाची ठाम खात्री होती. राज्यातील चित्र काय आहे, त्याची माहिती मुंडे स्वत: पत्रकारांना वेळोवेळी देत होते. पण फार कमी जणांचा त्यावर विश्वास बसत होता. कारण महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता जाऊ शकते, याचा विचार त्यावेळेस कुणी स्वप्नात करणेही अशक्य होते.. आज मुंडे यांच्या कारकीर्दीकडे पाहताना वाटते की, त्यांचे जीवन हीच एक संघर्षयात्रा होती आणि त्या यात्रेला एक धक्कादायक आकस्मिक असा विराम मिळाला आहे.
मंगळवारची सकाळ उजाडली तीच मुंडेंच्या धक्कादायक अकाली निधनाच्या बातमीने आणि थेट दोन गोष्टींची आठवण अतिशय तीव्रतेने झाली. पहिली आठवण होती ती प्रमोद महाजन यांची. मुंडे यांच्या पाठीशी राजकारणात ठामपणे उभे राहणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते, त्यांचे घनिष्ट मित्र आणि मेव्हणे प्रमोद महाजन यांचे निधनही असेच धक्कादायक पद्धतीने झाले होते. ती सकाळही अशीच उजाडली आणि महाराष्ट्रावर मळभ दाटले होते..
पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच ज्या दोन नेत्यांसोबत जवळून काम करण्याचा योग आला त्यात महाजन आणि मुंडे होते. १९९२-९३च्या जातीय दंगलीतील मुंडेंसोबतच्या सर्व आठवणी या त्यांच्यातील कणखर नेतृत्वाची खरी ओळख करून देणाऱ्याच आहेत. देवनार— गोवंडी परिसरामध्ये दोन पोलिसांची अक्षरश: तुकडे तुकडे करून ते देवनार डंपिंग ग्राऊंडच्या एका टोकाला टाकण्यात आले होते. तिथे जाणारा मार्ग हा दंगल उसळलेल्या एका विशिष्ट जमातीच्या वस्तीमधून जाणारा होता. त्या घटनेला दोन दिवस उलटले होते. पण त्या दोन दिवसांत तिथपर्यंत जाणे हे पोलिसांसाठीही अतिशय धोकादायकच होते, ही वस्तुस्थिती होती. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. मुंडेंनी त्या परिसरात जाण्याचा निर्णय घेतला. दादर टीटीला त्यांच्या गाडीत बसून प्रवासाला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात दंगलीची भीषणता ते वर्णन करत होते. देवनारला पोहोचल्यानंतर मुंडेंनी घटनास्थळी जाण्याचा आपला मानस पोलिसांकडे व्यक्त केला तेव्हा पोलिसांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती अतिशय धोकादायक आहे, त्यामुळे जाणे टाळणेच अधिक चांगले हे पोलीस परोपरीने पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस मुंडे म्हणाले, अहो, मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मीच अशा प्रसंगी शेपूट घालून कसे चालणार. मी त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणारच. तुम्हाला यायचे असेल तर या अन्यथा मी चाललो.. अन् ते चालायलाही लागले. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याला एकटे टाकणे पोलिसांना परवडणारे नव्हते अखेरीस पोलीसफाटाही मुंडेच्यासोबत त्या तणावग्रस्त भागातून जाऊ लागला. दंगलीचे ते पराकोटीचे तणावग्रस्त वातावरण, कुठूनही कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता.. या वातावरणात न डगमगता पुढे जात होते ते मुंडे. अखेरीस पोलिसांचे अक्षरश: तुकडे केलेल्या त्या ठिकाणी सारे पोहोचले तेव्हा दुर्गंधी पसरलेली होती. पोलिसांनाही राहवले नाही.. दोन-तीन पोलिसांना भावना अनावर झाल्या होत्या. तेव्हा मन कणखर ठेवून त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारेही मुंडेच होते. एका पोलिसाने तर त्यांच्याच खांद्यावर डोके टेकत भावनांना वाट करून दिली होती.. पण त्या दिवशी मुंडे तिथे पोहोचले नसते तर पोलिसांना तिथे पाहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागले असते.
असेच कणखर मुंडे नंतर पाहायला मिळाले ते उपमुख्यमंत्री असताना परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस. संमेलनाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पत्रकारांशी गप्पागोष्टी सुरू होत्या. रात्री साधारण पहाटे दोन वाजता अंबेजोगाईला हॉटेलवर पोहोचलो आणि साडेतीन वाजण्याच्या सुमारास परळीला रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची बातमी कळली. पहिला फोन मुंडेंना केला होता गाडीसाठी. कारण अंबेजोगाईवरून घटनास्थळी तातडीने पोहोचणे आवश्यक होते. त्यांनी पाठवलेली अम्बेसेडर पाचच मिनिटांत हॉटेलवर आली. त्यावेळेस मी ‘सांज लोकसत्ता’साठी काम करत होतो. सकाळीच ऑफिसमध्ये बातमी देणे आवश्यक होते. माझ्यासोबत मुंबईहून निघणाऱ्या आणखी एका सांज दैनिकाचा छायाचित्रकार गाडीतून निघाला. आम्ही पोहोचलो तेव्हा समोरचे चित्र भीषण होते. अर्धे कापून निघालेले मृतदेह लटकत होते किंवा इतस्तत: पसरलेले होते.. रक्ताचा दर्प भरून राहिलेला होता. एक रेल्वेगाडी दुसऱ्या रेल्वेगाडीवर चढल्याने हा अपघात झाला होता. आणि रात्री झोपेतच प्रवासी डब्यासह अक्षरश: कापले गेले होते. छायाचित्रण करणाऱ्या त्या छायाचित्रकाराला घेरीच आली. उलटी येते आहे, असे वाटू लागले.. तेव्हा त्याला पाठीवर थोपटून धीर देणारेही मुंडेच होते. ते म्हणाले, अरे अशा वेळेस हातपाय गाळून कसे चालेल. आपले काम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करता आले पाहिजे. युद्धप्रसंगी केलेले कामच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. एरवी तर ते करणारे तर अनेक जण असतात. अशाच वेळेस माणसाचा कस लागतो.
मुंडेंच्या नेतृत्वाचा कस लागण्याचे असे प्रसंग नंतर राजकारणात अनेकदा आले. खास करून प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर.. मुंडेंच्या डोक्यावरचे छत्रच हरपले होते. पण मुंडे काही केवळ महाजनांच्या पाठबळावर मोठे नव्हते झाले. ते खऱ्या अर्थाने जमिनीशी नाते असलेले लोकनेते होते. आजही त्यांच्या इतका ग्रामीण महाराष्ट्र माहीत असलेला दुसरा नेता शरद पवार वगळता इतर कोणीही नाही. मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते. राज्यातील सर्व जिल्ह्यंमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडलेली होती. म्हणूनच महाजन यांच्यानंतर त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती उद्भवल्यानंतरही ते डगमगले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हे निमित्त साधून त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न दस्तुरखुद्द भाजपमधूनच झाला पण त्याप्रसंगीही मुंडे खंबीर राहिले. ओबीसी नेतृत्वाचे बळ त्यांनी सर्वपक्षीय पद्धतीने दाखवून दिले. मातोश्रीनेही मुंडेंच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला.. नंतर लाट ओसरली आणि मुंडे यांना थेट दिल्लीत नेतृत्व मिळाले. दिल्लीतील नेतृत्व ही एक वेगळ्या प्रकारची तडजोड आणि कोंडीही होती. पण तेही मुंडेंनी झेलले.
महायुतीच्या वतीने प्रतिक्रिया देताना सर्वानीच त्यांचा महायुतीचे शिल्पकार असा उल्लेख केला. ते खरेच आहे, लोकसभा निवडणुकांच्या सुमारे दोन वर्षे आधीपासून मुंडे मनसेला सोबत घेण्याविषयी बोलत होते. सेना-भाजपमध्येही त्यांना त्या बाबत टीकेचे लक्ष्य करण्यात आले. पण तरीही ते त्यावर ठाम होते. सुरुवातीला मुंडे एकाकी होते. नंतर भाजप नेतृत्व आणि इतर मान्यवर नेतेही मुंडेंच्याच मार्गावरून जाताना पाहायला मिळाले.
येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे मुख्यमंत्री म्हणून येणार की, केंद्रातच राहणार हा कळीचा प्रश्न लोकसभा निवडणुकांनंतर मोठय़ा प्रमाणावर चर्चिला गेला. त्यांच्या अखेरच्या मुंबई भेटीत त्याबाबत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला त्यावेळेस मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री महायुतीचाच असेल आणि तो कोण हेही महायुतीच ठरवेल. मध्यंतरी काळात मुंडेंकडे एक जबरदस्त राजकीय परिपक्वता आली होती. दरम्यान, एकदा लोकसत्ता आयडिया एक्स्चेंजच्या निमित्ताने मुंडे एक्स्प्रेस टॉवर्समध्ये आले होते. तेव्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आदर्श प्रकरणात झालेली काँग्रेसची कोंडी याबाबत प्रश्न विचारला असता ते पटकन बोलून गेले.. सत्तेत असताना आपल्याच माणसांमुळे आपली राजकीय कोंडी कशी होते ते मी समजू शकतो. आम्हीही सत्तास्थानी होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची झालेली अडचण आणि करावी लागणारी कसरत कदाचित मीच अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो. ग्रामीण भागाशी नाळ घट्ट जुळलेला मंत्री ग्रामीण विकास खात्याला केंद्रात लाभल्याने ‘अच्छे दिन’ अपेक्षित होते.. पण कदाचित ते नियतीला मान्य नसावे. एका लेखकाने म्हटले आहे, अ ड्रीम डझन्ट बिकम रिअलिटी थ्रू मॅजिक. इट टेक्स डिटरमिनेशन, परस्पिरेशन, हार्ड वर्क अ‍ॅण्ड लिटील लक.. यातील सर्व काही मुंडेंनी दाखवून दिले, पण अपेक्षित भाग्याचा क्षण येता येता राहून गेला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde