असहिष्णुता किंवा विचारशून्यता म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर इतरत्र कुठेही पाहण्याची गरज नाही. फक्त आरसा घेऊन कुणीही त्यात स्वत:ला निरखावे, असेच आजूबाजूचे वातावरण आहे. ज्या ज्या माध्यमातून म्हणून माणूस व्यक्त होऊ शकतो, ती सारी माध्यमे हा समाजाचा आरसाच आहेत, असे म्हणायचे तर सध्या या आरशात जे दिसतेय ते भयावह आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची झालेली हत्या असो किंवा मग गेल्याच आठवडय़ात कॉ. गोिवद पानसरे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला असो, या दोन्ही घटना आणि नंतर व्यक्त झालेला संताप, चीड आणि प्रतिक्रिया सारे काही आपल्याला समाजाची सद्य:स्थिती सहज सांगून जातात. त्यासाठी आपण फक्त मेंदू शाबूत ठेवून पाहायला आणि समजून घ्यायला हवे.
हत्या मग ती कुणाचीही असो, ती निर्घृण आणि निंदनीयच असते; पण ज्या वेळेस समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीची हत्या होते तेव्हा तो एक प्रकारे निकोप सामाजिक आयुष्य जगू पाहणाऱ्या अख्ख्या समाजाच्याच हत्येचा प्रयत्न असतो. व्यक्तीची हत्या करता येते, पण विचार कायम राहतात, विचारांची हत्या करता येत नाही यांसारखी वाक्येही आता गुळगुळीत झाली आहेत. समाजातील प्रतिगामी शक्तींना त्याचे फारसे काही वाटेनासे झाले आहे, किंबहुना म्हणूनच अशा हल्ल्यांना आता सुरुवात झालेली दिसते; पण समाजावर अशी वेळ येते तेव्हाच त्या समाजाचाही कस लागत असतो. तो समाज कसा व्यक्त होतो, त्यावरून समाजाची मानसिकताही कळत असते. दोन्ही हत्यांनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये तर निषेध, संतापाचा आगडोंबच उसळल्यासारखी स्थिती आहे; पण सध्या कुणीही उठावे आणि सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये वाट्टेल तसे व्यक्त व्हावे, असेच दिवस आहेत. त्यामुळे चीड आणि संताप आणणाऱ्या अशा या घटना असल्या तरी अनेकांच्या प्रतिक्रिया या केवळ ‘उचलली जीभ..’ अशाच स्वरूपाच्या आहेत. त्या प्रतिक्रिया व्यक्त करताना तर अनेकांनी आपली राजकीय धोबीपछाड खेळीही खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अन्यथा सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘विरोधकांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला तर त्यात चूक काय?’ असे म्हणाले नसते. वातावरणाचे गांभीर्य राहिले बाजूला, इथे तर राजकारणाचे डाव खेळले जात आहेत. दुसरीकडे समृद्ध विचारांचे संस्कार, समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचे संस्कार आपल्यावर झालेलेच नाहीत. बहुधा असेच या अनेकांच्या प्रतिक्रिया सुचवत होत्या. अनेकांनी गोडसेंचे गोडवे गाणाऱ्यांवर हल्ला चढविला आणि त्याच शक्ती यामागे असल्याचे निदानही केले. ते करताना वापरलेले शब्द आणि भाषा पाहिली तर लक्षात असे येईल की, आयुष्यात टिपेचा संघर्ष करावा लागलेल्या डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात, अशी भाषा कधीही वापरलेली नाही. आपली भाषा हिंसक होते आहे, आपला तोल सुटला आहे, याचे भानही अनेकांना राहिले नव्हते. माणसाचा तोल सुटतो तेव्हा त्याचे पहिले लक्षण त्याच्या देहबोलीत व भाषेत पाहायला मिळते. विचारांचा संघर्ष विचारांनीच करा, असे सांगणाऱ्या डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांनंतर हे व्हावे हेही तेवढेच खेदजनक होते.
राज्य सरकारबद्दल तर काय बोलावे? कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार सुरू होते तेव्हा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथे नवीन पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन समारंभामध्ये हजर होते. राज्यातील महनीय व्यक्तीचे निधन नव्हे, तर हत्या झाली आहे आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाच्या समारंभात असावे, हा तर औचित्यभंगच होता. हा समारंभ पुढे ढकलणे मुख्यमंत्र्यांना सहज शक्य होते. असे असतानाही त्यांनी समारंभास उपस्थित राहण्यास पसंती दिली. त्यामुळे कॉ. पानसरे यांच्या चाहत्यांच्या भावनांचा कडेलोट होणे, तेवढेच साहजिक होते.
खरे तर राज्याला तरुण तडफदार असे नेतृत्व मिळाल्यामुळे जनतेमध्ये एक वेगळा चांगला संदेश गेला होता. मुख्यमंत्रिपद त्यांना बहाल झाले त्याही वेळेस काही अनुभवी मंत्री बाशिंग बांधून तयार होते. अखेपर्यंत त्यांनी प्रयत्नही करून पाहिले, बहुजन कार्डही वापरले. राज्याचे नेतृत्व करायचे तर अनुभव महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी सांगून पाहिले. त्या सर्व युक्तिवादांना श्रेष्ठींनी थारा दिला नाही आणि नेतृत्वाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली; पण तरुण मुख्यमंत्री मग नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनाला उपस्थित राहताना अनुभवात कमी पडले. औचित्यभंग होतो आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही, की ‘छोटी छोटी बातें होती रहती है,’ असे म्हणत त्यांनी ते पुरेशा गांभीर्याने घेतले नाही?
गेल्या आठवडय़ातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे आरआर आबांचे निधन. ‘छोटी छोटी शहरों में’ या वाक्याने आबांना पुरते बदनाम केले. ते गेले आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले होते का किंवा मग ते नेमके काय म्हणाले होते याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. माणूस असतो तेव्हा आपल्याला अनेकदा त्याची किंमत कळत नाही. असे का होते? गरिबीतून वर आलेल्या आबांचे उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचणे हा खरे तर भारताने स्वीकारलेल्या लोकशाही प्रक्रियेचाच विजय होता. अशी संधी तळागाळातील व्यक्तीला केवळ लोकशाहीमध्येच मिळू शकते. कॉ. पानसरे यांच्यावर ज्या प्रतिगामी शक्तींनी हल्ला चढवला अशी शंका आहे, त्यांना ही लोकशाहीच त्यांच्या मार्गातील अडथळा वाटते आहे. म्हणूनच लोकशाहीचे योगदान आणि महत्त्व आपण वेळीच समजून घ्यायला हवे.
गेल्या वर्षभरात तळागाळातील समाजाशी नाळ असलेले लोकनेते आपण गमावले. प्रथम गोपीनाथ मुंडे गेले आणि आता आरआर आबा. ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व तावूनसुलाखून येते, असा आजवरचा अनुभव होता. मुंडे, आरआर आबा हे त्यातील शेवटचे असावेत. कारण आता राजकारण खूप बदलले आहे. आता अनेक जण करिअर म्हणून राजकारणात उतरत आहेत. करिअर म्हणून राजकारणात उतरून त्यांनी प्रोफेशनल पद्धतीने काम करायलाही काही हरकत नाही; पण आताशा सर्वच पक्षांमध्ये येतो आहे तो धंदेवाईकपणा. धंदेवाईक राजकारण्यांची संख्या सर्वच पक्षांमध्ये वेगाने वाढते आहे. साहजिकच आहे की, अशा परिस्थितीत तळागाळाशी नाळ जोडलेले आरआर आबांचे जाणे चटका लावून जाते.
सर्वच पक्षांची तळागाळातील समाजाशी असलेली नाळ तुटते आहे. या पाश्र्वभूमीवर नवी दिल्लीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कोरी राहिलेली पाटी हेच बदललेले समीकरण सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच वेळेस ‘आप’ला मिळालेले यश हे सर्वच स्तरांतील समाजवर्गाशी जोडलेले नातेही पुरते स्पष्ट करते आहे. खरे तर गेल्या खेपेसही अरिवद केजरीवाल यांच्यावर जनतेने तोच विश्वास व्यक्त केला होता; पण त्यांचीच विचारशून्यता आडवी आली आणि मग दिल्ली तर हातची गेलीच, पण लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा ‘आप’टीबारच झाला. तरीही देशातील एकाच बाजूला झुकणारे वातावरण पाहून दिल्लीकरांनी संतुलन साधण्यासाठी ‘आप’ली पसंती स्पष्ट केली. आता तरी केजरीवाल यांना लागलेले विचारशून्यतेचे ग्रहण सुटेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या महिन्याभरातील या तिन्ही महत्त्वाच्या घटनांमध्ये केंद्रस्थानी आहे तो तळागाळातील सामान्य माणूस. सध्या इंटरनेटचे मुक्तपीठ झालेल्या वातावरणात त्याचा तोल ढळतो आहे. समोरच्याचे म्हणणे किमानपक्षी ऐकून घ्यावे, ही पहिली पायरीही तो विसरत चालला आहे, हेच पहिल्या म्हणजे कॉ. पानसरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याच्या वेळेस लक्षात आले. हे विसरणे दोन्ही बाजूंचे आहे. हल्लेखोरांचे तर आहेच आहे, पण त्यानंतर व्यक्त झालेल्या हिंसक प्रतिक्रियांचेही आहे. केव्हा, काय, कुठे व कसे करायचे याचे भान राहिले नाही, की मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीकडूनही औचित्यभंग कसा होतो हेही याच वेळेस पाहायला मिळाले. हे सारे विचारशून्यतेचेच लक्षण आहे. तळागाळातील व्यक्तीशी असलेली नाळ तुम्हाला किती प्रेम आणि मानसन्मान देते ते आरआर आबांकडे पाहून लक्षात येते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस शोकाकुल झालेली जनता न बोलता खूप काही सांगून गेली आणि याच जनमनाशी नाते जुळले की, ती तुम्हाला कुठे नेऊन ठेवते त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘आप’ले केजरीवाल! या सर्वामध्ये समान धागा आहे तो सामान्य जनतेशी जोडलेल्या नाळेचा, प्रगतिशील विचारांचा. केजरीवालांचे उदाहरण तेवढे सकारात्मकतेकडे जाणारे आहे. फक्त आता त्यांनी विचारांशी असलेली नाळ घट्ट ठेवावी आणि विचारशून्यता टाळावी, इतकेच!
विनायक परब