संस्कृती
निजामाची मालमत्ता मानल्या जाणाऱ्या ‘गुलशन महल’ या वास्तूने अनेक चढउतार पाहिले आहेत. तिथे चित्रपट संग्रहालय करण्याच्या घोषणेला  सिनेसृष्टीच्या शताब्दी वर्षांच्या  पूर्ततेच्या काळात तरी वास्तवाचे कोंदण लाभेल का?
अगदी अलीकडेच एका इंग्रजी वर्तमानपत्रात ‘गुलशन महल ही इमारत पाडण्यात आली’ या आशयाची बातमी वाचली. ‘गुलशन महल इतिहासजमा झाली!’ या जाणिवेने मनात असंख्य प्रश्न आले. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ‘हेरिटेज लिस्ट’मध्ये नोंद केलेल्या महत्त्वाच्या इमारतीचा असा अचानक विध्वंस का करण्यात आला? आम्हाला कारणं माहीत नाहीत, पण कोणा वजनदार विकासकाचा या मोक्याच्या जागेवर डोळा असेल का? किंवा चित्रपट विभागाच्या नवीन इमारत प्रकल्पात चटई क्षेत्राचा काही घोटाळा असेल का? किंवा आजच्या खासगीकरणाच्या युगात कोणी विकासकाने पीपीपीच्या माध्यमातून मोठा प्रकल्प पुढे ढकलला असेल का? सांस्कृतिक-वारसा संकल्पनेच्या विरोधी आणि व्यापारीकरणाच्या प्रवृत्तींचाच अंतिम विजय झाला असेल का? गुलशन महल का गेली?
गेल्याच वर्षी मे २०१२ मध्ये भारतीय सिनेसृष्टीचा शतकोत्सव साजरा करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी अभिमानाने जाहीर केलं होतं की गुलशन महल इथे चित्रपट संग्रहालय स्थापन करण्यात येईल. त्यांनी त्यासाठीचा निधीही मंजूर केला आणि संग्रहालय मे २०१३ पर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन टाळ्यांच्या कडकडात दिलं होतं. आम्हीही तसंच होईल याची स्वप्नं बघत होतो! त्यामुळे ‘गुलशन महल जमीनदोस्त झाल्या’च्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मी दुखावलो, चिडलो आणि वैफल्यग्रस्त झालो होतो! पण या बातमीची प्रत्यक्ष शहानिशा करायचे ठरवलं.

इथल्या बऱ्याच रात्री या संगीत आणि नृत्याच्या मफिलींनी रंगलेल्या असत. त्यासाठी मूळ इमारतीच्या बाहेर उत्तरेला एक खास संगीत नृत्यसभागार तयार केलेलं होतं. सभोवतालचा परिसर हिरवागार होता आणि इमारती सभोवतालचा भाग उद्यानरचनेच्या अनेक वैशिष्टय़ांनी सुशोभित होता.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

मुंबईतील माझ्या समविचारी मित्रांशी, ओळखीच्या पत्रकारांशी लगेचच संपर्क साधला. त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन या बातमीची तपासणी करायची विनंती केली. जागेची छायाचित्रं काढायला सांगितली. मला गुलशन महलचा ‘आँखो देखा हाल’ हवा होता. तरीही त्यात दोन-तीन दिवस गेले. सुरक्षिततेच्या कारणाखाली तिथे प्रवेश मिळत नव्हता.  अस्वस्थता वाढत होती. शेवटी बाजूच्या इमारतीतील एका रहिवाशाने खिडकीतून पाहून गुलशन महल सुरक्षित उभी असल्याची खात्री दिली. पाठोपाठ एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने प्रत्यक्ष तिथे जाऊन माहिती तर मिळवलीच, पण छायाचित्रंही पाठवून दिली. गुलशन महलमध्ये चित्रपट संग्रहालय होणारच,  संलग्न परिसरात नवीन प्रदर्शन कक्ष, सभागृह वगरे समर्पक विकासाची कामं सुरू असल्याची खातरजमा त्याने केली होती.
मी एक दीर्घ सुस्कारा सोडला. तरीही एक जाणवलं की, माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला होताच! मात्र पाठोपाठ गुलशन महलच्या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या सुमारे २० वर्षांपूर्वीच्या आठवणी मनात दाटून आल्या.
१९९४ चा सुमार होता. आकाशवाणीच्या बांधकाम विभागाने आमच्याशी संपर्क साधला होता. डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरील (पेडर रोड) चित्रपट विभागाच्या आवारातील एका जुन्या इमारतीसंबंधी त्यांना आमचा सल्ला हवा होता. ही जुनी, पडीक इमारत त्यांच्या नवीन इमारतीच्या प्रकल्पाला बाधा आणत होती. इमारतीची संपूर्ण दुर्लक्षामुळे दुर्दशा झालेली होती. बरीच पडझड होती. आत कचरा साचलेला होता. एका सुंदर वास्तूची शान नाहीशी झाली होती, संपूर्ण रया गेली होती. तरीही मी मात्र प्रथमदर्शनीच या वास्तूच्या प्रेमात पडलो. प्राथमिक सर्वेक्षणानंतर मी सुचवलं की, इमारत सांस्कृतिक वारसा म्हणून अतिशय महत्त्वाची आहे आणि तिचं संवर्धन, जीर्णोद्धार करणं कठीण आहे, पण प्रयत्न केला तर तिला पूर्वीचं वैभव मिळवून देणं शक्य आहे.
पुढील काही कालावधीत आम्ही प्राथमिक संशोधन सुरू केलं, मुख्य म्हणजे या इमारतीचा इतिहास माहीत करून घेणं. चित्रपट विभागातील या इमारतविषयक कागदपत्रं, जुनी छायाचित्रं, तिथल्या गोदामातील जुनाट वस्तूंचा शोध, विविध वाचनालयातील संदर्भ, पुरातत्त्व विभागातील संदर्भ इत्यादी शोधाशिवाय जनतेकडून काही माहिती मिळेल या आशेने आम्ही इंग्रजी, िहदी आणि मराठी वर्तमानपत्रातून आवाहनही केलं. सुरुवातीला थोडीफारच माहिती मिळाली. पण नंतर बऱ्याच दिवसांनी या इमारतीच्या मूळ मालक कुटुंबीयांतील एक ज्येष्ठ गृहस्थ मला भेटायला आले. ते इंग्लंडहून आले होते. आमचं वर्तमानपत्रातील आवाहन आणि या इमारतीचा जीर्णोद्धार होण्याची शक्यता वाचून हरखून गेले होते. त्यांचा जन्मच या इमारतीत झाला होता आणि बालपण तिथेच गेलं होतं. नासीर अली जयराझभाई त्यांचं नाव. त्यांच्याकडून या इमारतीबद्दल खूपच महिती मिळाली आणि संपूर्ण परिसराचे बरेच बारकावे समजले.
अगदी अचूक ऐतिहासिक माहिती नाही, पण काहीसा प्रकाश पडला. ही इमारत आणि परिसर गुलशन आबाद किंवा गुलशन महल म्हणून ओळखला जात होता. ही संपूर्ण मालमत्ता मूळची निझामाच्या मालकीची होती, असा समज आहे. सुमारे दोनशे वर्षांहून अधिक पुरातन अशा या इमारतीचा वापर १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात खोजा समाजातील पीरभाई या श्रीमंत आणि धार्मिक व्यापारी कुटुंबाकडे आला होता. १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी ही संपूर्ण मालमत्ता वारसा हक्काने कासम अली जयराजभाई यांच्याकडे आली. त्यांच्या कुटुंबीयांचा इथला रहिवास हा व्यावसायिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजलेला असायचा. यातील बऱ्याच बठका मध्यवर्ती असलेल्या प्रशस्त दिवाणखान्यात व्हायच्या. त्याला दरबारखाना असंही म्हटलं जायचं. इथल्या बऱ्याच रात्री या संगीत आणि नृत्याच्या मफिलींनी रंगलेल्या असत. त्यासाठी मूळ इमारतीच्या बाहेर उत्तरेला एक खास संगीत नृत्यसभागार तयार केलेलं होतं. सभोवतालचा परिसर हा विविध वनस्पतींनी युक्त अशा वनराईसारखा हिरवागार होता आणि इमारती सभोवतालचा भाग उद्यानरचनेच्या अनेक वैशिष्टय़ांनी सुशोभित केलेला होता. तिथे फुलझाडं होती, हिरवळ होती, कारंजी होती, पश्चिमेच्या बाजूला सज्जास्वरूप हिरवळीचं पटांगण होतं. तिथून अरबी समुद्राचा देखावा दिसे. खंबाला टेकडीवरील या मोक्याच्या जागेवरून पश्चिम मुंबईचा रम्य परिसर दूपर्यंत दिसायचा.
स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा झाली त्याच सुमारास ही संपूर्ण जायदाद भारत सरकारने ताब्यात घेतली आणि नंतर ती केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे देण्यात आली. त्यानंतर ती चित्रपट विभागाला देण्यात आली आणि काही वर्षांतच त्यांचं कार्यालय तिथे उभं राहिलं. हे बांधकाम आणि मालमत्तेच्या देखभालीचं काम आकाशवाणीच्या बांधकाम विभागातर्फे सांभाळलं जायचं, त्यामुळे त्यांचंही कार्यालय तिथेच गुलशन महलच्या समोरच आलं. बाजूलाच एक उपाहारगृह आलं. परिसरातील हिरवाई आणि उद्यानांची वाताहत झाली. थोडय़ाच दिवसांत गुलशन महलचं रूपांतर कर्मचाऱ्यांच्या मनोरंजन केंद्रात झालं! दरबारखान्याचं रूपांतर बॅडमिंटन हॉलमध्ये झालं! इतरही खोल्या अशाच वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जायला लागल्या. या चित्रविचित्र वापराने गुलशन महलच्या अंतर्गत सजावटीची दुर्दशा झाली. आता ही इमारत तशी महत्त्वाची नसल्याने तिच्या देखभालीकडे संपूर्ण दुर्लक्षच झालं, इमारतीची पडझड सुरू झाली. पुढे तिचं रूपांतर गुदामामध्ये करण्यात आलं. अवस्था आणखी खालावली आणि तिला ‘भूत बंगला’ नाव पडलं. माणसं तिथे फिरकेनात. गुलशन महल अनाथ, पोरकी झाली!

आमच्यासाठी गुलशन महल ही केवळ एक सांस्कृतिक-वारसा इमारत नव्हती, तर हे मुंबईसाठी एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, अनोखं वास्तू-व्यक्तिमत्त्व होतं!

आम्ही या इमारतीसह लगतच्या परिसराच्या सर्वागीण, संतुलित, संवेदनाक्षम विकासाची प्रकल्प संकल्पना बनवली. यात इमारतीचा जीर्णोद्धार, पूर्वीसारखीच अंतर्गत सजावट, पूर्वीसारखी उद्यानरचना होती आणि या इमारतीचं ‘चित्रपट-वारसा संग्रहालय’ (Films Archives Museum) करायचं असा संकल्प होता. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ही वास्तू आणि लगतचा परिसर कसा असेल हे चित्र मनचक्षूंपुढे आणून ते प्रत्यक्षात उतरवण्याचं स्वप्न आम्ही उभं केलं. दिल्लीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव भास्कर घोष यांच्यासमोर आम्ही संकल्पना-प्रकल्पाचं सादरीकरण केलं. त्यांनाही संकल्पना आवडली, त्यांनी खूप कौतुक केलं, संकल्पनेला तिथेच मंजुरी दिली आणि त्यापुढे जाऊन गुलशन महलच्या जीर्णोद्धारासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला. पुढील प्रक्रिया आकाशवाणीच्या बांधकाम विभागाने स्पर्धा, निविदा माध्यमातून सुरू केली. आमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि कळकळीमुळे असेल कदाचित, पण आम्ही स्पर्धा / निविदा प्रक्रियेत यशस्वी ठरलो आणि प्रकल्प सल्लागार / वास्तुतज्ज्ञ म्हणून आमची नेमणूक झाली.
आम्ही पहिली प्रक्रिया सुरू केली, इमारतीच्या तपशीलवार नोंदींची. इमारतीची मोजमापं घेऊन अचूक आराखडे बनवण्यात आले, अगदी बारीकसारीक तपशिलांचेही अचूक आराखडे करण्यात आले. अनेक वेळा त्यासाठी मोडतोड होऊन पडलेल्या सामानाचा अभ्यास करावा लागला. छायाचित्रांद्वारेही सर्व तपशिलाची नोंद केली. इमारतीत वापरलेल्या विविध आणि वैशिष्टय़पूर्ण बांधकाम साहित्याचंही परीक्षण करण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमारतीचा पाया, बांधकाम, संपूर्ण आधार-संहितेचं काळजीपूर्वक परीक्षण करून तांत्रिक तपासणी करण्यात आली. हे सर्व काम आमच्या कार्यालयातील साहाय्यकांनी तिथेच, जागेवरच, हस्तसाहाय्याने केलं. त्या वेळी संगणकाचा वापर तेवढा प्रचारात नव्हता!  आमची अपर्णा गोयल सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत त्या ‘भूत बंगल्यात’ एकनिष्ठेने बारीकसारीक तपशिलांची रेखाचित्रं आपल्या चित्रवहीत काढत असायची. सुमारे वर्षभर पडझड झालेली गुलशन महल इमारत हेच आमचं प्रकल्प कार्यालय झालं होतं!
वर्षभरात जीर्णोद्धाराचे आणि काहीशा पुनर्रचनेचे आराखडे तयार झाले. इतक्या कालावधीत मूळ इमारतीत काही बदल केल्याचं लक्षात आलं होतं, त्यांची पुनर्रचना करणं आवश्यक होतं. तसंच या मूळच्या निवासी इमारतीचं रूपांतर आता आम्ही संग्रहालयासारख्या सार्वजनिक इमारतीत करणार होतो. त्या अनुषंगानेही काही अंतर्गत बदल आम्ही केले. गुलशन महलचं लाकूड काम, लाकडी जिने, रंगचित्र-काचांच्या खिडक्या, दरवाजांचं कोरीव काम, अंतर्गत सजावटीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचं कलाकुसरीचं काम, ईशान्येकडील जिन्याचा उंच आणि कमानींनी सजवलेला मनोरा हे सर्व वैशिष्टय़पूर्ण होतं आणि त्यांचं काळजीपूर्वक जतन आणि संवेदनाक्षम नूतनीकरण करणं आवश्यक होतं. बरंचसं लाकूडकाम जीर्ण झालेलं होतं, तरीही आम्ही सुमारे ७०% लाकडाचा पुनर्वापर केला. दगडी काम, जमिनीवरील आणि भिंतींवरील रंगीत, विविध रचनांच्या फरश्या यांना काळजीपूर्वक, शास्त्रीय पद्धतीने साफ करणं आणि अनेक ठिकाणच्या तुटलेल्या फरश्यांच्या जागी तशाच फरश्या बनवून घेणं हे सर्व किचकट आणि श्रमाचं काम आम्ही आवडीनं केलं.

शेवटी व्हायचं तेच झालं! संवेदनाहीन वापर आणि व्यापारीकरण यांमुळे इमारतीच्या अंतर्गत भागाचं खूप नुकसान झालं. अतिशय काळजीपूर्वक केलेल्या कलाकुसरीच्या कामाचा विध्वंस झाला. फरश्या तुटल्या, खिडक्या-दरवाजांचं कोरीव काम नष्ट झालं, रंगचित्र-काचखिडक्या फुटल्या

एका दृष्टीने गुलशन महलचं भाग्य उजळलं होतं! या प्रकल्पाशी संबंधित सर्वजणच संघभावनेने, निष्ठेने, आपुलकीने आपापलं योगदान देत होते. त्यात वरिष्ठ सरकारी अधिकारी होते, तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी होते, कंत्राटदार जोशी आणि त्यांचे कर्मचारी, कुशल कारागीर आणि मजूर होते. सारे जणच गुलशन महलशी एकरूप होऊन, संवेदनक्षमतेने या महत्त्वाच्या सांस्कृतिक-वारसा वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी झटत होते. आमच्या ‘द डिझाइनर्स’च्या संघाने आमचे स्थापत्य अभियंते अरुण सामंत यांच्यासह पाच वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी अथक श्रम केले, केवळ गुलशन महलच्या प्रेमाखातर. आमच्यासाठी गुलशन महल ही केवळ एक सांस्कृतिक-वारसा इमारत नव्हती, तर हे मुंबईसाठी एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, अनोखं वास्तू-व्यक्तिमत्त्व होतं!
गुलशन महल प्रकल्पाला इंडियन हेरिटेज सोसायटीचा पुरस्कार मिळाला. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आíकटेक्ट्सने जागतिक सांस्कृतिक वारसा दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिषदेत या प्रकल्पाचं भरभरून कौतुक करण्यात आलं. विविध माध्यमांनी, वर्तमानपत्रांनी प्रकल्पाची वाखाणणी केली. गुलशन महलला गतवैभव प्राप्त झालं, पण अंतर्गत सजावट, उद्यान रचना, संग्रहालयाचं काम अपुऱ्या निधी कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं. तोपर्यंत भास्कर घोष यांची बदली इतरत्र झालेली होती! संपूर्ण नूतनीकरण झालेली इमारत उद्घाटन समारंभानंतर बंदच राहिली! पण पुन्हा एकदा अचानक गुलशन महलचं ‘भाग्य’ उजळलं! चित्रपट विभागाच्या कार्यालयाला भेट देणाऱ्या कुणा सिने-निर्मात्याच्या बेरकी डोळ्यांत गुलशन महल भरली. त्याने संचालकांना गुलशन महल इमारतीचा चित्रपटांसाठी नेपथ्य (२ी३) म्हणून वापर करण्याचं सुचवलं.
सूचना फायद्याची आणि कोणालाही मोह पाडणारी होती. नाहीतरी इमारत कुलपात पडून राहिली होती. तिचा फायदेशीर वापर होण्याची संधी चालून आली होती  आणि गुलशन महलमध्ये अचानक ‘जान’ आली. प्रसिद्ध नट-नटय़ांचे पाय गुलशन महलमध्ये थिरकायला लागले. त्यांचे नाटय़मय संवाद दरबारखान्यात घुमायला लागले. संगीत लहरी विहरायला लागल्या! चित्रपट विभागाला गुलशन महलच्या रूपाने ‘सोन्याचं अंडं देणारी कोंबडी’ मिळाली होती. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’सारख्या प्रसिद्ध चित्रपटाचं भागश: चित्रीकरण इथेच झालं! आणि शेवटी व्हायचं तेच झालं! संवेदनाहीन वापर आणि व्यापारीकरण यांमुळे इमारतीच्या अंतर्गत भागाचं खूप नुकसान झालं. अतिशय काळजीपूर्वक केलेल्या कलाकुसरीच्या कामाचा विध्वंस झाला. फरश्या तुटल्या, खिडक्या-दरवाजांचं कोरीव काम नष्ट झालं, रंगचित्र-काचखिडक्या फुटल्या, इमारतीच्या अंतर्गत भागाची दैना झाली. शेवटी अनेकांच्या निषेधामुळे चित्रीकरण बंद करणं भाग पडलं.
नवीन व्यवस्थापनाने आता गुलशन महल येथील चित्रपट संग्रहालयाचा प्रकल्प पुन्हा मनावर घेतला. त्यानिमित्ताने २०१० मध्ये गुलशन महलची पुन्हा डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली. गुलशन महलला पुन्हा आधीचा दिमाख काहीसा प्राप्त झाला. आताच्या बातमीप्रमाणे चित्रपट संग्रहालय आणि इतर आनुषंगिक विकासकामांना चालना मिळाली असून कोलकात्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमतर्फे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.
आता आम्ही वाट पाहत आहोत या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेची!