कोटय़वधी वर्षांनी सूर्याची आग जेव्हा विझेल अन् राख उडू लागेल, मंदशा राखाडी उजेडात पृथ्वीचा हा तुकडा भिरभिरत राहील, तेव्हा..
मैं सोचता हूँ उस वक्त अगर
कागज़्ा पे लिखी
एक नज़्म कही उडम्ते उडम्ते
सुरज में गिरे
तो सुरज फिर से ज़्ालने लगे!!
हा आहे गुलजार यांच्यामधील कवीचा चिरंतन आशावाद..
गुलजार हा आपल्याला मोहविणारा, पण तितकाच कोडय़ात टाकणारा माणूस आहे. त्याला शोधणे, समजून घेणे हे मोठे कठीण काम. एक तर सिनेमासारख्या क्षेत्रात पन्नास वर्षे वावरूनही स्वत:चे खासगीपण कटाक्षाने जपणारा हा माणूस! सभा-समारंभ, व्याख्याने, परिसंवाद, कवी संमेलने यांत क्वचितच हजेरी लावणारा. फिल्मी पाटर्य़ा, पुरस्कार प्रदान समारंभ, टीव्ही वाहिन्यांवरील चर्चाचे धोबीघाट, एकूणच सारे ‘चमको’ प्रकार- यापासून जाणीवपूर्वक अंतर राखणारा हा कलावंत. कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, दिग्दर्शक अशा किती तरी रूपांतून व्यक्त होणारा, सिनेमा, टीव्ही, साहित्य, बाल साहित्य या सर्व क्षेत्रांत मुक्त संचार करणारा, पण तरीही आपल्याला फारसा न कळणारा-आकळणारा. आजच्या स्किझोफ्रेनिक जमान्यात आपल्या व्यक्तित्वाची एकात्मकता सांभाळणाऱ्या या समग्र रसायनाचे बीज आहे तरी कोठे?
मला वाटते की कवी असणे, ही गुलजारसाहेबांची खरीखुरी व पुरेशी ओळख आहे. कविता ही त्यांची निजखूण. त्यांनी साकारलेली सर्जनाची इतर रूपे हा केवळ त्या कवित्वाचा विस्तार आहे. त्यांचा सिनेमा हीदेखील रजतपटावर रेखलेली एक कविताच असते.
‘डय़ोढी’त (देवडी-उंबरठा) साकारलेली व्यक्तिचित्रे असोत, की ‘रावीपार’मधल्या कथा – त्यांच्या साऱ्या कलाकृती म्हणजे मिताक्षरी कविताच. शिवाय कवी गुलजार व माणूस गुलजार वेगळे नाहीतच. तोच पीळ, तोच स्वत:च्या शर्तीवर, स्वत:च्या पद्धतीने साकार व्हायचा आग्रह. जनरीत, व्यवहार, नफा-तोटय़ाची गणिते यांचा विचार न करता स्वत:ला भावेल तेच करण्याचा स्वभाव.. हे सारे सारे जसे कवितेत आहे, तसेच जगण्यातही. बरे यात प्रदर्शन अजिबात नाही. आपल्या कलाकार असण्याचे नाही, कलंदरपणाचे नाही, की वेगळी वाट चोखाळण्याचेही नाही. आहे ती केवळ सहजता, नितांत सहजता.
म्हणूनच हा कविमाणूस टीकेच्या वादळांची पर्वा न करता आपल्या जन्मगावाला भेट देण्यासाठी पाकिस्तानला जातो, भारत-पाकिस्तान मैत्रिसंघासाठी आपले योगदान देतो, पण पुरोगामी साहित्यिक, कलावंतांच्या वर्तुळात मात्र दिसत नाही. दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्याला फार पूर्वीच मिळायला हवा होता, अशी हळहळ व्यक्त करीत नाही. अगदी ऑस्कर पुरस्कार मिळाला तरी हरखून जात नाही. उलट त्या समारंभाला जाण्याचे टाळतो. कोणी विचारले तर मिश्कीलपणे सांगतो, ‘काय करणार, माझ्याकडे त्या ड्रेसकोडमध्ये बसणारा सूट नाही ना. शिवाय मला आपला काळा कोट उसना देईल असा कोणी वकील मित्रही नाही मला.’
कोणत्याही कवीला समजून घेणे हेदेखील कठीणच काम आहे म्हणा. शिवाय याबाबतीत गुलजारसाहेबांची जातकुळी
‘माझ्या या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका..’
असे बजावणाऱ्या आपल्या आरती प्रभूंशी जुळणारी आहे. त्यांच्यासाठी कविता करणे, साहित्यनिर्मिती ही एक गंभीरपणे करण्याची कृती आहे. काव्यनिर्मिती म्हणजे माणसाच्या दु:खाशी नाते जोडणे.
त्यासोबत येणारे सारे भोग ही कवीची नियती.
ते म्हणतात –
यह शायर जो जनम से साथ है मेरे
इसी ने चांदनी की रेत भर-भर के मेरे सीने में डाली है
हमेशा ज़िंदगी से दर्द चुन चुन कर मेरी आँखो पे मारे हैं
हमेशा भींच कर दाँतों से छीला है मेरी रूह को
इसी ने सांस की ज़्ालती खराशों को कुरेदा है
त्यांच्या आतला हा कवी कधी दु:खाने हताश होऊन त्यांना सांगतो-
‘चल आ, खुद्कुशी कर लें’
पण कविता कवीच्या आयुष्यात केवळ चिरदु:खाचे वरदान घेऊन येते असेही नाही. कधी आयुष्याचे ओझे वाहताना खांदे दुखू लागतात, दिवसभराचा दुस्तर घाट चढताना जीव कोंडतो, तेव्हा-
एक नन्ही-सी मेरी नज़्म मेरे सामने आकर
मुझ से कहती है मेरा हाथ पकडम् कर – मेरे शायर
ला, मेरे कंधों पे रख दे, मै तेरा बोझ उठा लूँ
माणसाच्या दु:खाची ही कविता आहे- मग ते माणसाचे आदिम दु:ख असेल की मानवनिर्मित समाजरचनेतून उद्भवलेले, पण माणूस महत्त्वाचा. कधी व्हॅन गॉगसारख्या प्रतिभासंपन्न व काळाच्या अतिशय पुढे असणाऱ्या कलावंताची वेदना त्यांच्या कवितेतून मुखर होते-
मी कॅनव्हासवर साकारलेल्या झाडाचे बारकावे तर पाहा
परमेश्वराने निर्मिलेल्या त्या झाडापेक्षा माझी निर्मिती कुठेच कमी नाही
प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या कलाकाराचा हा अभिमान आहे. त्याचे दु:खही तितकेच विशाल आहे-
माझ्या पॅलेटवर ठेवलेले ऊन तर आता वाळले
जो सूर्य टर्पेंटाइनमध्ये घोळवून ठेवला होता मी
त्याचं आकाश अंथरण्यासाठी
वीतभर कॅनव्हासही नाही माझ्याजवळ!
मानवी दु:खाचे मूळ शोधणारा गौतम बुद्ध हादेखील कवीच्या मते एक माणूसच. बुद्धत्व प्राप्त झालेला सिद्धार्थ जेव्हा कपिलवस्तूला परततो, तेव्हा त्याच्या मनातले तरंग टिपताना कवी म्हणतात-
मै सिद्धार्थ था,
जब इस बरगद के नीचे चोला बदला था,
बारह साल में कितना फैल गया है घेरा इस बरगद का,
कद भी अब उँचा लगता है,
‘राहुल’ का कद क्या मेरी नाभी तक होगा?
मुझ पार है तो कान भी उसके लंबे होंगे
माँ ने छिदवाये हो शायद
रंग और आँखें, लगता था माँ से पायी हैं
राजकुँवर है, घोडा दौडाता होगा अब,
‘यश’ क्या रथ पार जाने देती होगी उस को?
मराठी साहित्यात आपण साहित्यिकांची सामाजिक बांधीलकी मानणारे व अन्य अशी सरधोपट वर्गवारी करतो. पूर्वीच्या कलावादी व जीवनवादी या वर्गीकरणाचेच हे नवे रूप. गुलजारसाहेबांना आपण यात कुठे बसवणार?
माणसाच्या दु:खाची ही कविता आहे- मग ते माणसाचे आदिम दु:ख असेल की मानवनिर्मित समाजरचनेतून उद्भवलेले, पण माणूस महत्त्वाचा.
त्यांना परंपरेचा अभिमान आहे, पण त्यांची संवेदनशीलता आधुनिक तसेच उत्तर-आधुनिकतेलाही आपल्या कवेत घेते. त्याचे काय करणार? उर्दू काव्यात शारीर प्रेमाचे वर्णन न करण्याचा संकेत आहे, पण गुलजारजींना तो मान्य नाही.
म्हणून ते
दो सौंधे सौंधे जिस्म जिस वक्त एक मुट्ठी में सो रहे थे
अशा वेळी शरीरांच्या मीलनातून स्व-लोप कसा होतो याचे प्रत्ययकारी वर्णन करू शकतात, पण शरीर या माध्यमाची मर्यादाही कवीला माहीत आहे. म्हणून दुसऱ्या एका कवितेत ते म्हणतात-
जिस्म सौ बार ज़्ाले, फिर भी वह मिट्टी का ढेला
रूह एक बार ज़्ालेगी तो कुंदन होगी..
आत्म्याचे हे बावनकशी सोनेपण त्यांच्या कवितेत वारंवार येते. त्यांच्या दृष्टीने मृत्यू ही शोक करण्याची बाब नाहीच. ते आहे केवळ एक स्थित्यंतर. तेही कशाचाच बाऊ न करता सहजतेने व्हावे. अस्तित्वाच्या साऱ्या खाणाखुणा अशा पुसून टाकायच्या की जीवनाची सुरकुतीही मृत्यूच्या स्वच्छ, पवित्र चेहऱ्यासोबत जायला नको.
खयाल रखना कहीं कोई ज़िंदगी की सिलवट
न मौत के पाक साफम् चेहरे के साथ जाएं
हा ‘साक्षीभाव’ हिंदू तत्त्वज्ञानातील स्थितप्रज्ञतेशी व ‘वासांसि जीर्णानी’शी नाते सांगतो, तसेच बौद्ध व सुफी तत्त्वज्ञानाशीही त्याचे जवळचे नाते आहे, पण कोणत्याही संघटित धर्मविचाराशी किंवा पारंपरिक ईश्वर संकल्पनेशी त्यांच्या मनाचा सांधा जुळत नाही.
‘फम्सादात’ (दंगे) या कवितेत ते प्राण वाचविण्यासाठी एका प्रार्थनागृहात आश्रय घ्यायला आलेल्या एका समूहाचे वर्णन करतात. सारे अस्तित्व पणाला लावून ते सारे जण ईश्वराची करुणा भाकतात. त्याला शेकडो नावांनी पुकारतात, पण त्यांच्या हाकेला प्रतिसाद लाभत नाही, इहलोकातून नाही की परलोकातून. ईश्वर किंवा पोलीस कोणीच त्यांना वाचवायला येत नाही. अखेर-
सब के सब भून गये आग में, और भस्म हुये
मौजज़ा कोई भी उस शब ना हुआ ..
त्या रात्री कोणताही चमत्कार झाला नाही.. हे भीषण वास्तव कवी इतक्या शांतपणे मांडतो की, आपण पांघरलेल्या समजुतींच्या चिंध्या चिंध्या होतात.
गुजरातचा नरसंहार, पॅलेस्टाइनमध्ये नागरी वस्तीवर होणारे हल्ले यांविषयीच्या गुलजारसाहेबांच्या कविता इतक्या प्रभावी आहेत की, आपण त्यामुळे केवळ सुन्न होऊन जातो. सरदार सरोवर प्रकल्पासारख्या विकासाच्या नावावर केल्या जाणाऱ्या र्सवकष विनाशामुळे केवळ आदिवासीच बेघर व विस्थापित होणार नसून एक संपूर्ण सभ्यता, परंपरा, नातीगोती, शेजारपाजार सर्वच नष्ट होणार आहे याचे भान त्यांची ‘सरदार डेम’ ही कविता वाचून येते व मनात विचार येतो- किती मराठी कवींना हे भान आहे?
हे सारे असले तरी गुलजार या कवीची जनमानसातील प्रतिमा आहे ती प्रेमरंगात आकंठ बुडालेल्या एका रोमँटिक कवीची. गेली पन्नास वर्षे गुलजारसाहेबांच्या चित्रपटगीतांनी भारतीय उपखंडातील कोटय़वधी रसिकांना प्रेमाचे विविध रंग उलगडून दाखविले आहेत.
‘मेरा गोरा अंग लई ले, मोहे श्याम रंग दई दे
छुप जाउंगी रात ही में, मोहे पी का संग दई दे’
असे विनविणाऱ्या १९६१ सालच्या ‘बंदिनी’मधील मुग्धेपासून ते थेट २००६च्या ‘ओंकारा’तील ‘बीडी जलाई ले जिगर से पिया’ अशी सरळ हाक देणाऱ्या आणि तुझ्यात आग नसेल तर जा पडोसी के चुल्हे से आग लई ले असे त्याला सुनावणाऱ्या) नर्तिकेपर्यंत प्रेमाची विविध रूपे त्यांच्या गीतांतून साकार झाली आहेत. त्यांच्या कवितांमध्ये तर प्रेमाच्या त्याहून अधिक सूक्ष्म, तरल छटा चितारल्या आहेत. (गुलजारसाहेबांच्या कवितेत प्रतिमा नसतात, तर ती पूर्ण कविताच आपल्याला प्रतिमांच्या रूपात भेटते, असे अनेकदा होते. त्यावर मी त्यांना एकदा विचारले होते की- तुम्ही मुळात कवी आहात की चित्रकार? त्यावर त्यांचे उत्तर होते- ‘‘मला संवेदना जाणवते, दिसते ती बिंबांच्या, प्रतिमांच्या रूपात. मी फक्त शब्दांच्या मदतीने चित्र काढण्याचा प्रयत्न करतो.’’)
प्रेमात रुसवेफुगवे तर चालतातच; पण कधी कधी प्रियेचा घुस्सा जरा जास्तच वाढतो. इतका की त्यामुळे कवी दुखावला जातो. तेव्हा तिला न दुखावता, पण स्वत:चा आब राखून तो म्हणतो-
ज़्ारा आवाज़्ा का लहजा तो बदलो
ज़्ारा मद्धिम करो इस आँच को सोना
कि जल जाते हैं कँगुरे नरम रिश्तों के!
ज़्ारा अल्फाज़्ा के नाखून तो तराशो
बहुत चुभते हैं जब नाराज़्ागी से बातें करती हो!!
त्यांची अशीच एक गोड कविता आहे. कवी आजारी आहे. अगदी जखमी अवस्थेत. वेदनांनी तळमळतोय. अशा वेळी तिने त्याला पाहायला आपल्या मैत्रिणीला पाठवले आहे. ही त्याच्या जखमेवर घातलेली फुंकर समजायची की त्यावर मीठ चोळणे? पण कवी तिला दोष न देता आधी आपल्या अवस्थेचे वर्णन करतो व अखेरीस म्हणतो-
तुम ने भेजा तो है सहेली को
जिस्म के ज़्ाख्म देख जायेगी
रूह का दर्द कौन देखेगा?
असा हा चिरतरुण, परंपरेशी नाळ जुळलेला. तसेच नव्याचाही खुलेपणाने स्वीकार करणारा कवी. त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे हा कवित्वाचा, ताठ मानेने जगण्याचा सन्मान आहे. आज सर्वत्र हताशा व ग्लानीने भरलेल्या वातावरणात कविता कशासाठी करायची, असा प्रश्न कोणाही कवीपुढे पडतो, पण गुलजारसाहेबांचा कवितेच्या सामर्थ्यांवरील विश्वास दांडगा आहे. आपल्या एका कवितेत ते लिहितात की-
कोटय़वधी वर्षांनी जेव्हा सूर्याची आग जेव्हा विझेल अन् राख उडू लागेल, मंदशा मातकट- राखाडी उजेडात पृथ्वीचा हा तुकडा भिरभिरत राहील, तेव्हा..
मैं सोचता हूँ उस वक्त अगर
कागज़्ा पे लिखी
एक नज़्म कही उडम्ते उडम्ते
सुरज में गिरे
तो सुरज फिर से ज़्ालने लगे!!
गुलजारसाहेबांच्या या चिरंतन आशावादाचे काही कण आपल्या सतत कुरकुरणाऱ्या सिनिकल झोळीत पडोत!!