गुलजार हे व्यक्तिमत्त्व बहुपेडी. कवी, दिग्दर्शक, कथा-पटकथा-संवादकार अशी या प्रतिभावान कलाकाराची अनेक रूपं. मात्र त्यातही सर्वात लक्षवेधी ठरतो तो त्यांच्यातील गीतकार. त्यांच्या गीतांतील प्रतिमा व रूपकं थक्क करणारी. आयुष्यातील वळणांवर त्यांचे शब्द वेळोवेळी भेटतात. त्यांच्या शब्दकळेनं हिंदी चित्रपटसृष्टीला श्रीमंत केलं आहे.

गुलजारना गीतकार होण्यात काडीचं स्वारस्य नव्हतं, असं सांगितलं तर खरं वाटणार नाही, मात्र, काव्यातल्या मुक्तछंदाप्रमाणे स्वैर असलेल्या या कलाकाराला सुरांच्या साच्यात आपले शब्द बसवणं पसंतच नव्हतं. त्यांना रस होता तो दिग्दर्शनात आणि त्यासाठी ते बिमल राँय यांच्याकडे साहाय्यक म्हणून उमेदवारी करू लागले. तो सिनेमा म्हणजे अर्थातच, ‘बंदिनी’. या सिनेमातील एकच गाणं बाकी होतं. तेवढय़ात सचिनदेव बर्मन आणि गीतकार शैलेंद्र यांचं काहीतरी बिनसलं आणि गाडी अडली. गुलजार यांची काव्यप्रतिभा ठाऊकअसल्याने बिमलदांनी त्यांनाच हे गीत लिहिण्यास सांगितलं, गुलजार यांनी प्रथम नकार दिला, मात्र नंतर ते तयार झाले आणि सहज लिहूनही गेले, ‘मोरा गोरा अंग लैले मोहे शामरंग दैदे, छूप जाऊँगी रातही में, मोहे पी का संग दैदे’.. लता मंगेशकरांच्या स्वरातील ते गाणं रसिकांना कमालीचं आवडलं. त्यापूर्वी त्यांनी मोजकी चित्रपटगीते लिहिली होती, मात्र या गीताने कलाटणी दिली. योगायोगाने आणि अपघाताने एका दर्जेदार गीतकाराचा जन्म झाला.
पुढे तीनच वर्षांंनी शैलेंद्र यांचा अकस्मात मृत्यू झाला, सत्तरनंतर बदललेल्या संगीतप्रवाहात साहिर लुधियानवी यांनी लेखणी काहीशी आवरती घेतली. जुन्या पिढीतील गीतकारांपैकी सातत्याने लिहीत होते ते केवळ मजरुह सुलतानपुरी आणि टाँपचे गीतकार होते अर्थातच, आनंद बक्षी. गुलजार यांचं वैशिष्टय़ हे की या नव्या-जुन्यांमध्ये त्यांनी सुवर्णमध्य साधला. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे, त्यांची शब्दयोजना. त्यांची शब्दकळा संपूर्ण वेगळी होती. चित्रपटगीतांमध्ये जी साचेबद्धता असते, ‘दिल, प्यार, इश्क, याद, मिलना-बिछडना…’ या तोचतोचपणाला त्यांनी फाटा दिला. स्वत:च्या अटीवर मोजकंच परंतु चांगलं लिहीन, या आग्रहामुळे ते वेगळे ठरले, मी उगाच गीतकार का झालो, असा प्रश्नही त्यांना पडला नाही. गीतकार गुलजारमुळे त्यांच्यातील कवीला मान खाली घालण्याची वेळ कधीच आली नाही.
‘बंदिनी’नंतर त्यांनी ‘बिबी और मकान’, ‘दो दुनी चार’, ‘आशीर्वाद’, ‘राहगीर’, ‘खामोशी’, ‘आनंद’, ‘सीमा’ या सिनेमांसाठी गाणी लिहिली. यातील अनेक गीते लक्षवेधी ठरली. विशेषत: ‘मैने तेरेलियेही सातरंग के सपने चुने, ना जिया लागे ना’ (आनंद) आणि ‘हमने देखी है उन आँखोंकी महेकती खूशबू, तुम पूकारलो, वो शाम कूछ अजीब थी’ (खामोशी) ही गीते. ‘हमने देखी है’च्या धृवपदात त्यांनी लिहिलेल्या ‘सिर्फ एहेसास है ये रुहसे महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो’ या ओळींमुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसलं. ‘वो शाम’मध्येही त्यांची प्रतिभा फुलून आली. या दोन्ही गाण्यांच्या चाली एवढय़ा गोड आहेत की शब्दांकडे दुर्लक्ष व्हावं, मात्र तसं होत नाही. गाणं संपल्यानंतरही गुलजार यांचे शब्द आठवत रहातात. ‘मैने तेरेलियेही’मधील ‘छोटी छोटी बातों की है यादें बडी, भूले नही बिती हुई एक छोटी घडी’ ही पंक्ती म्हणजे खास गुलजार टच. शंकर-जयकिशन आणि गुलजार ही तशी दोनं टोकं, मात्र ‘सीमा’मधील ‘जबभी ये दिल उदास होता है जाने कौन आसपास होता है’ या गीतामुळे ही दोन टोकं जुळून आली आणि हे सदाबहार गीत जन्माला आलं.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण

मेरा कुछ सामान…
‘बंदिनी’मध्ये ‘मोरा गोरा अंग लै ले’ या गाण्याच्या वेळी गुलजारना दादा बर्मन यांचा सहवास लाभलाच, मात्र त्या निमित्ताने त्यांची पंचमशी घट्ट मैत्री झाली. नेहमी पांढरा झब्बा-पायजमा घालणऱ्या गुलजारना पंचम प्रेमाने ‘सफेद कौव्वा’ म्हणत असे तर पंचमच्या टिपिकल बंगाली चेहरेपट्टीला उद्देशून गुलजार यांनी त्याला ‘गुरखा’ असं नाव ठेवलं होतं. ‘इजाजत’मधील ‘मेरा कुछ सामान’ या गीताच्या मुक्तछंदातील ओळी वाचून पंचम रागावला होता, ‘उद्या तू मला पेपरची हेडलाइन आणून देशील आणि चाल लावायला सांगशील’, असं तो गुलजारना म्हणाला. मात्र पंचमने त्या शब्दांना अप्रतिम चाल लावली, या दोघांनी दिलेल्या गाण्यांपैकी हे गाणं पंचमचं विशेष आवडतं होतं.

गुलजार यांच्यातील गीतकाराला खऱ्या अर्थाने वाव मिळाला तो म्हणजे ‘मेरे अपने’पासून. दिग्दर्शक या नात्याने हा त्यांचा पहिला सिनेमा. स्वत:च्या सिनेमांमध्ये मनाजोगते लिहिण्याचे स्वातंत्र्य त्यांनी पुरेपूर उपभोगले आणि त्यानंतर सुरू झाली उत्तमोत्तम गीतांची एक प्रदीर्घ मालिका. ‘कोई होता जिसको अपना’ हे किशोरकुमारचं एक हटके सॅड साँग आहे. खर्जातील या गीताला सलील चौधरी यांनी लावलेली चालही अप्रतिम आहे, आणि गुलजार यांचे शब्द तर थेट काळजातच घुसतात. प्रेमभंगातून आलेला एकाकीपणा आणि जीवनातील अस्थिरता यामुळे खचलेला नायक मूकपणे ‘पास नही तो दूरही होता, लेकीन कोई मेरा अपना’ असं म्हणतो तेव्हा गुलजार यांना दाद द्यवीशी वाटते. हे गाणं केवळ पाश्र्वभूमीवर वापरून गुलजार यांनी नायकाचं दु:ख आणखी गडद केलं आहे. याच सिनेमातील ‘हालचाल ठीकठाक है’ या गाण्यात त्यांनी तत्कालीन ढासळत्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा चांगलाच उपहास केला आहे. त्याच्या पहिल्या अंतऱ्यात ‘आबोहवा देशकी बहोत साफ है, कायदा है कानून है इन्साफ है, अल्लामियाँ जाने कोई जिये या मरें, आदमी को खून-वून सब माफ है’ या शब्दांतून त्यांनी राजकारण्यांवर ओढलेले कोरडे आजही कालबाह्य़ झालेले नाहीत.
‘मेरे अपने’नंतर ‘परिचय’ या सिनेमाच्या निमित्ताने त्यांची आणि राहुलदेव बर्मनची जोडी जमली. ‘मुसाफिर हूं यारों’ हे या जोडीचं पहिलं गीत. यात गुलजार यांनी ‘मै मुसाफिर हूं यारों’ असं लिहिलं होतं, चालीच्या सोयीसाठी पंचमने त्यातील ‘मै’ काढून टाकला आणि ते गीत ध्वनिमुद्रित केलं. गुलजार-पंचम कॉम्बोने या सिनेमात कमाल केली. ‘मुसाफिर हूं यारो, सारे के सारे, बिती ना बिताई रैना, मितवा बोले मिठे बोल’ अशी सरस गाणी या जोडीने दिली. यानंतर ‘मौसम’चा अपवाद वगळता स्वत:च्या सिनेमासाठी गुलजार यांनी प्रामुख्याने पंचमलाच पाचारण केलं. त्या सिनेमांच्या नावांवर ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी तो आगळावेगळा आविष्कार लक्षात येतो. खूशबू, आंधी, किताब, किनारा, घर, अंगूर, नमकीन, इजाजत, लिबास..! आणि गुलजार यांचं दिग्दर्शन नसलेले, परंतु गीतकार गुलजार व पंचमच्या संगीताने नटलेले सिनेमे म्हणजे देवता, गोलमाल, खुबसुरत, मासूम, सितारा, बसेरा, जीवा..! या सिनेमांतली गीतं आज चमत्कारच वाटतात, त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार-संगीतकारांच्या यशस्वी जोडय़ांमध्ये गुलजार-पंचम या जोडीचा क्रमांक खूप वरचा लागतो.
‘आंधी’मध्ये या दोघांचीही प्रतिभा ओसंडून वाहताना दिसते. बर्मन बाप-बेटे दरवर्षी दुर्गापूजेसाठी विशेष स्वररचना करत असत. एकदा तशी एक रचना गुलजार यांनी ऐकली आणि त्यांनी पंचमला सांगितले, ‘‘ही चाल तिकडे वापरू नकोस, माझ्यासाठी राखून ठेव.’’ गुलजार यांनी ती चाल ‘आँधी’मध्ये वापरली व ते अजरामर गीत म्हणजे ‘तेरेबिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं..’ गुलजार चालीवर गीत लिहू शकत नाहीत, त्यांच्या शब्दांना मीटर नसतं वगैरे वगैरे आरोप त्यांच्यावर जी मंडळी करतात, त्यांच्यासाठी हे गीत म्हणजे खणखणीत उत्तर आहे. पंचमने आधीच रचलेल्या सुरावटीवर त्यांनी एवढे अप्रतिम, आशयगर्भ व सिनेमातील प्रसंगाला साजेसे शब्द लिहिले आहेत! या गीतातील पहिली ओळ सर्वसाधारण वाटते, मात्र त्याच ओळीचा संदर्भ घेत ही नायिका ‘तेरेबिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं’, असं म्हणते तेव्हा शब्दांचा व अर्थाचा हा खेळ पाहून म्हणजे ऐकून थक्क व्हायला होतं. नऊ वर्षांच्या विरहाचं दु:ख ही नायिका व्यक्त करते, तिला दिलासा देण्यासाठी नायकाच्या तोंडी असलेल्या अंतऱ्यात तर गुलजार यांनी कमालच केली आहे. ‘तुम जो कह दो तो आज की रात चाँद डुबेगा नहीं, रात को रोक लो’ असं तो म्हणतो आणि नंतर वास्तवाचं भान राखत पुढे ‘रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं’, असं म्हणून त्या भेटीतील विफलताही सांगून जातो. ‘इस मोडसे जाते है हे गीत’, गीत नसून कविताच आहे. ‘पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदों मे, तिनकों के नशेमन तक इस मोडसे जाते है..’ हे शब्द विलक्षणच. ‘तुम आ गये हो नूर आ गया है’ असं सांगताना पुढच्या ओळीत ‘नहीं तो चिरागों से लौ जा रही थी आणि त्यानंतर जिनेकी तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी,’ असं म्हणून ते नायक-नायिकेचं उत्कट प्रेम व्यक्त करतात. ‘तुम आ गये हो’ हे एक टिपिकल प्रेमगीत आहे, मात्र पंचम-गुलजार जोडीच्या परीसस्पर्शामुळे ते असाधारण प्रेमगीत ठरतं. असंच एक वेगळं युगुलगीत म्हणजे ‘किनारा’मधील ‘नाम गूम जाएगा..’ यातही ‘मेरी आवाज ही पहेचान है अगर याद रहे’ हे वैश्विक सत्य गुलजार सहज सांगून जातात.

गुलजारांची बालगीतं…
गुलजार यांच्यात एक लहान, खोडकर मूलही दडलं आहे. त्यांनी लिहिलेली ‘लकडी की काठी, ओ पापडवाले पंगा ना ले’ ही सिनेमांतील बालगीते लोकप्रिय झालीच, मात्र ‘जंगल बुक’साठी त्यांनी लिहिलेलं ‘जंगल जंगल बात चली है..’ हे गीत आजही सर्वाच्या स्मरणात आहे. ‘सूरमयी आखियों मे नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे, निंदीया के उडते पाँखी रे, आखियों मे आजा साथी रे..’ हे ‘सदमा’मधील अंगाईगीतही मनाचा ठाव घेतं.

गुलजार यांच्या स्वभावातील मिश्किली त्यांच्या पात्रांमध्येही उतरते. ‘घर’मध्ये नायिकेचं प्रणयाराधन करताना नायक म्हणतो, ‘आपकी आँखों मे कुछ महेके हुए से राज है, आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है..’ यावर ती नायिका म्हणते, ‘‘आप की बातोंमे फिर कोई शरारत तो नहीं, बेवजह तारिफ करना आपकी आदत तो नहीं, आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है..’ ही गम्मत गुलजारच करू जाणे. हाच खेळकरपणा ‘सून सून सून दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है’ या ‘खुबसूरत’मधल्या गाण्यात दिसतो. ‘शोले’मध्ये बसंतीच्या मावशीकडे गेलेला जय वीरूचे एकेक दुर्गुण नकळतपणे सांगून जातो, तो प्रसंग प्रेक्षकांना आजही हसवतो. ‘सून सून दीदी’मध्ये गुलजार यांनी तीच गम्मत केली आहे. ‘अच्छे घरका लडका है पर हकहकलाता है.. नंतर ‘पान चबाता है जब थोडी पिकर आता है, पिता है जब जुए मे वो हारके आता है’ हे शब्द गुदगुल्या करतात. यातच पुढे ‘उसका बस चले तो जेल भी तोडके आएगा सिटी एक बजा दोगी तो दौडके आयेगा’ हे शब्द धमाल उडवून देतात.
या प्रतिभेचं आणखी एक रूप म्हणजे दु:खभरी, कारुण्याने भरलेली गीते. ‘मौसम’मधील ‘रुके रुकेसे कदम’चा पहिला अंतरा आठवा, ‘सुबह न आयी कई बार निंदसे जागे, के एक रातकी ये जिंदगी गुजार चले..’ गैरसमज आणि अहंकारामुळे नायक-नायिका दुरावल्येत. नायक म्हणतो.. ‘‘हजार राहे मुडके देखीं कहींसे कोई सदा न आयी’ त्यावर ती म्हणते, ‘बडी वफासें निभायी तुमने हमारी थोडीसी बेवफाई..’ राखीशी झालेल्या बेबनाची डूब गुलजार यांनी या गीताला दिलीय असं वाटत रहातं. ‘घरोंदा’ बसविण्याचं स्वप्न भंगलेला नायक एकटाच भटकतोय..’ एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में खाबोदाना ढुंढता है, आशियाना ढुंढता है..’ दिवस-रात्र खायला उठल्येत.. ‘दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुआँ, इन सुनी अंधेरी आँखों मे आँसूकी जगा आता है धुआँ, जीनेकी वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढुंढता है..’ ‘यारा सिली सिली’मध्येही तेच दु:ख.. ‘बिरहा की रात का जलना, ये भी कोई जीना है, ये भी कोई मरना…’ सावलीसुद्धा सोडून गेल्ये.. ‘पैरो मे न साया कोई, सरपे ना साई रे, मेरे साथ जाए ना मेरी परछाई रे, बाहर उजाला है, अंदर वीराना..’
काळ बदलला, कदाचित त्यामुळेच गुलजार यांनी स्वत:ला मिटून घेतलं. ‘चप्पा चप्पा चरखा चले, छोड आए हम, पानी पानी रे, जिया जले जान जले, कजरा रे, सपने मे मिलती है’ सारखी गीतं त्यांचं अस्तित्व दाखवून देतात. विशाल भारद्वाजसारखा संगीतकार-दिग्दर्शक आजही त्यांच्याकडून आवर्जून गाणी लिहून घेतो. गुलजार यांचं महत्त्व कमी झालेलं नाही, प्रतिभाही आटलेली नाही, मात्र संवेदनशीलतेला दाद देण्याएवढीही संवेदनशीलता उरली नाही, हेच खरं..तरीही त्यांनी जे दिलं पुरुन उरलं आहे..
‘तुम आ गये हो, नूर आ गया है’ असं त्यांच्यासाठीच म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही.