हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली ५० वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांना या वेळचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हा हा ‘आपल्या माणसा’चा गौरव आहे, अशीच भावना समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमधून, सगळ्या थरांमधून उमटली. समाजमान्यता, अनेक पुरस्कार, गौरव, यश या सगळ्या पाश्र्वभूमीवर स्वत:मधलं निखळ माणूसपण जपणाऱ्या गुलजार यांच्याविषयी-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगी सर्वसुखी असा कोण आहे, हा प्रश्न स्वामी रामदासांनी मला विचारला असता तर मी एका क्षणात त्या माणसाचं नाव त्यांना सांगितलं असतं. गुलजार!
त्याला फाळके पुरस्कार मिळालाय म्हणून मी त्याचं नाव घेत नाही. पाली हिलच्या पंचतारांकित, झुळझुळीत भागात त्याचा बंगला आहे म्हणून मी त्याला सर्व सुखी मानत नाही. एका कवीचा बंगला तिथे असावा ही गोष्ट अक्षरांच्या राज्यात लुडबुडणाऱ्या माझ्या जिवाला अभिमान, आनंदाची वाटत असली तरीही मला तो सुखाचा निकष वाटत नाही. संधिकाळात त्याच्या सर्वस्पर्शी प्रतिभेचं वसंतवैभव टिकून आहे याचं मला सादर कौतुक वाटतं. पण सर्वसुखी असण्याचं ते एकमेव कारण नाही. सुखी कसं राहावं हे गुलजारला कळलं आहे म्हणूनच तो सुखीच नाही, तर सर्वसुखी आहे. सुखाचं वरदान कुणी ‘वरून’ घेऊन येत नाही. पैशाप्रमाणेच सुखदेखील प्रयत्नानं मिळवावं लागतं, आणि यशाप्रमाणेच ते कष्टानं टिकवावं लागतं. जपावं लागतं.
गुलजारला हे जमलं आहे. एरवी मोजायलाच गेलं तर दु:खी असण्याची भरपूर कारणं त्याच्यापाशी आहेत. सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे, हा नियतीक्रम त्यालाही चुकलेला नाही. इतक्या लहानपणी त्याची आई जग सोडून गेली, की तिचा चेहराही त्याला आठवत नाही. भरीस भर म्हणून तिचा साधा फोटोसुद्धा उपलब्ध नाही. आई गेल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई काही सिनेमातल्यासारखी वाईट्टवाईट्ट दुष्ट नव्हती. पण सख्ख्या आईच्या वात्सल्याचा गोडवा त्या पालनपोषणात नव्हता. कोरडय़ा कर्तव्याचा तो व्यवहार होता.
सावत्र आईशी राहोच, सख्ख्या पित्याशीही गुलजारचा सूर जुळला नाही. घरातल्या व्यापार, उद्योगधंद्यात लक्ष घालून सुखानं राहण्याऐवजी कविता करण्याचे दरिद्री डोहाळे का लागावेत, हे पित्याला कळत नव्हतं आणि लेकाला पुस्तकं, लेखक आणि कविता यांच्याच जगात राहायचं होतं. त्यापायी घर सोडून मुंबईला यावं लागलं आणि एका गॅरेजच्या छपराखाली राहून तिथेच काम करण्याचं भणंग जिणं त्यानं मान्य केलं. घर आणि गाव तुटण्याचं दु:ख गुलजारला नवं नव्हतं. फाळणीनं आधीच त्या दु:खाशी भेट घडवली होती.
एवढय़ा इमानानं साथ करणाऱ्या दु:खाला गुलजारनं झिडकारलं नाही; मात्र त्याला त्यानं डोक्यावर चढवून ठेवलं नाही किंवा तो त्याला शरण गेला नाही. उलट त्याला कडेवर उचलून घेऊन त्यानं आधार दिला. त्याला जगायला शिकवलं. ते सहन करण्याची शक्ती मिळवण्यासाठी त्यानं व्यसनांना जवळ केलं नाही. ते त्याला सहज शक्य होतं. गॅरेजच्या आसपास ‘गम गलत’ करण्याचे सगळे उतारे हजर होते. अशिक्षित, असंस्कारित सहकाऱ्यांचा दिवस-रात्रीचा संग होता. कलावंताच्या तोऱ्यात तो त्यांच्यापासून फटकून राहिला नाही. तोही त्यांच्याबरोबर रात्री पत्ते खेळत होता. बाटलीतल्या सोमपेयाची चव घेत होता.
पण ते त्याचं जीवन नव्हतं. ती जीवनाशी ओळख होती. ती करून घेत गुलजारनं आपली कला समृद्ध केली. ‘कोशिश’ मधल्या असरानीच्या व्यक्तिरेखेत त्या मस्त पण दिशाहीन दिवसांचं प्रतिबिंब उमटलं आहे. पत्त्यांच्या खेळातली ती सांकेतिक भाषा, पत्तेबहाद्दरांचा तो अड्डा, तिथलं स्त्री-पुरुषांचं स्वैर जीवन गुलजारनं फक्त एका दृश्यात यथार्थपणे पण मर्यादा न सोडता उभं केलं आहे. लेखक बनण्याचं भांडवल त्यानं या दिवसांत गोळा केलं. मात्र तिथल्या सर्व रंगांत रंगून जाताना त्याचं भान हरवलं नाही तोल गेला नाही.
फक्त जिवंत राहण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी जगणाऱ्या त्या माणसांमध्ये मिळूनमिसळूनच नव्हे तर त्यांच्यापैकी एक बनून राहणारा गुलजार नेमानं ‘इप्टा’मध्ये जात होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळी विषमता मोडून काढून नवा समाज निर्माण करण्याची स्वप्नं बघणाऱ्या कवी-लेखक-नाटककार आणि नट यांच्या संगतीत रमत होता. गॅरेजमध्ये राहतानाही तो कथा, कविता लिहीत होता. तिथल्या त्याच्या ‘कुटुंबीयांना’ आपल्या ‘रायटर’चा अभिमान होता. कविता करताना गुलजारनं गॅरेजच्या कामात कधी कुचराई केली नाही. तिथल्या यांत्रिक कामालाही त्यानं आपला ‘टच’ येऊन वेगळी रंगत आणली. त्याच्याकडे मोटारींच्या स्प्रेपेंटिंगचं काम होतं.
रंगाचे चार-दोन हात मारून संपवण्याच्या त्या कामात गुलजारनं वैशिष्टय़ं दाखवली. रंगांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवून त्याच रंगांना तो नवं रूप द्यायचा. ‘कॉम्बिनेशन्स बनवण्यात माझा हात धरणारा कुणी नव्हता,’ असं गुलजार तुम्हाला सांगतो तेव्हा एक लक्षात येतं. अशा अभिमानानं तर तो आपल्या एखाद्या कवितेबद्दलही बोलत नाही! कदाचित त्याच्याकडून इतरांना किंवा त्यालाही अपेक्षित नसलेलं काम जमल्याचा तो आनंद असावा.
गॅरेज आणि ‘इप्टा’ या दोन ध्रुवांवरच्या जगाचे कवडसे ‘नमकहराम’मध्ये सोमूच्या व्यक्तिरेखेत लोभसपणे उतरले आहेत. वकिली शिकणारा, सर्वसाधारण परिस्थितीतला सोमू त्या परिस्थितीचा हीनगंड न बाळगता श्रीमंत विकीबरोबर जिवाभावाचं नातं जोडतो. दोघे बरोबर अभ्यास करतात आणि उनाडक्याही! कोठीवर गाणं ऐकायला जातात, तिथे एका गलेलठ्ठ इसमाशी पंगा घेतात आणि अशी धाडसी न् चावट संध्याकाळ रंगवण्यासाठी मदत करणारं सोमरसपानही करतात. पुढे विकीला त्याच्या बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी सोमू एका सामान्य कामगारांचं सोंग घेऊन त्याच्या फॅक्टरीत काम करू लागतो. या निमित्तानं कामगारवस्तीत राहताना सोमू तिथल्या माणसांबरोबर देशी दारूचाही स्वाद घेतो; होळी साजरी करताना भांग पितो. मात्र कामगारांमध्ये फूट पाडून सच्छिल कामगार नेत्याला हरवण्यासाठी स्वत: रचलेलं कारस्थान पुढे त्याला स्वत:लाही पटत नाही. मैत्रीखातरच हे वाकडं काम असलं तरीही!
हीच खळबळ बहुधा ‘गोलमाल’च्या शीर्षकगीतामध्ये ‘सीधे रस्ते की ये टेढी सी चाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है’ या ओळींमध्ये व्यक्त झाली आहे.

तो लेखक म्हणून जगत नसतो आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो. सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकला आणि आता तो रोज इंटरनेट वापरतो. ई-मेल्स पाठवतो. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्याचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे.

‘नमक हराम’मध्ये दिसलेलं तरुणाईचं मदभरं आणि श्रमिकवर्गाच्या खडतर तरीही भविष्यकाळाबद्दलच्या भीतीला फाटय़ावर मारणाऱ्या निर्भय आनंदी वृत्तीचं हिंदीत याला ‘फाकेमस्ती’ असा छानदार हेतूपूर्वक काढलेल्या चित्रपटांमध्येही कधी दिसलं नाही. घनघोर दारिद्रय़ आणि त्याखाली चिरडत राहणाऱ्या जीवनाचं चित्रण करताना बरेचसे ‘कामगारपट’ भडक, भेसूर आणि नाटकी होतात. गुलजार तेच दाहक वास्तव हास्यविनोदाच्या अंगानं प्रभावीपणे दाखवतो. त्यात खेळकरपणा आहे आणि वास्तवही आहे. कारण लेखकानं ते स्वत: अनुभवलं आहे. त्याचा अस्सलपणा हास्यविनोदाच्या प्रसंगामध्ये आणि संवादामध्ये दबून जात नाही. ‘आनंद’मधला लेखक सरकारी पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जातो, पण गाडीभाडय़ासाठी त्याला सायकल विकावी लागते. याही प्रसंगी गुलजार अश्रुधुराचं नळकांडं न फोडता हास्यधारा उडवणारा पाइप हातात ठेवतो. ‘लेखकांचे सायकलवरून फिरण्याचे दिवस संपले’ असं एक सुखवस्तू सद्गृहस्थ म्हणतो, तेव्हा पुरस्कारविजेता लेखक हसत हसत त्याला दुजोरा देताना आपलं ‘वास्तव-रहस्य’ उघड करतो.
गुलजारची दु:खाशी दोस्ती ती हीच! दु:खानं डोळे गाळण्याऐवजी तो त्या क्षणातही हसू शोधतो. दु:खाला जवळ केलं म्हणून तो सुखाला आपल्या घराचं दार बंद करत नाही. दु:ख आणि वेदना हे त्याचे नातलग आहेत. सुख आणि हास्य हे त्याचे मित्र आहेत. नातलग निवडता येत नाहीत; मित्रांची निवड करता येते. मात्र मित्रांच्या सहवासासाठी उत्सुक असलेला गुलजार नातलगांकडे दुर्लक्ष करत नाही. त्यातही तो नातलगांपासून वेगळा राही; पण नातं कधीही तोडणार नाही. त्याचा राखीशी (प्रेम) विवाह झाला तेव्हा दोघांच्या चाहत्यांना कवीला कविता भेटल्याचा आनंद झाला. (चाहते म्हणजे काय बोलावं.. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणजे हाच नमुना. असो.) दुर्दैवानं हा विवाह टिकला नाही; पण राखी आणि गुलजार यांनी वेगळं राहणं पत्करलं तरी घटस्फोट घेतला नाही की एकमेकांवर चिखलफेक केली नाही. आज तो गजबजलेल्या पाली हिलवर एकटा राहतो; ती कर्जतजवळच्या फार्महाऊसवर एकटी राहते. पण दोघांच्याही एकटेपणाला कारुण्याची किनार नाही. स्वेच्छेनं दोघं एकटे राहतायेत आणि एकटेपण आनंदानं जगतायेत. जमेल तेव्हा लेकीच्या निमित्तानं एकत्र येतात, राहतात. मात्र विवाहातून घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाशी वयपरत्वेसुद्धा तडजोड दोघांना मंजूर नाही.
याला म्हणतात इमान! याला म्हणतात स्वातंत्र्याचं प्रेम! गॅरेजपासून इप्टापर्यंत आणि इप्टापासून बिमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जीपर्यंत गुलजारनं मारलेली मजल हा एखाद्या चित्रपटाचा विषय होईल. नव्हे, ते ‘रेडीमेड स्क्रिप्ट’च आहे. यशापासून अधिक यशाकडे जाणारा हा प्रवास सुखापासून अधिक सुखाकडे मात्र झाला नाही. वैवाहिक जीवनातलं अपयश हा या संस्मरणीय प्रवासातला जीवघेणा अपघात ठरला. (की तो विवाह हाच अपघात होता?) त्या अपघातात जबर जखमी होऊनही गुलजारनं त्याचं कधी प्रदर्शन मांडलं नाही. ‘आंधी’मध्ये दिसलेलं नायक-नायिकेचं विभक्त जीवनानंतरचं नातं हे राखी-गुलजार नात्याचा ट्रेलर होता का? माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर ‘आंधी’ हा राखी-गुलजार यांच्या विवाहाच्या आधीची चित्रपट असावा. तसं असो की नसो, आणि तिथून स्वत:च्या चित्रपटांच्या दिग्दर्शनापर्यंत गुलजारनं केलेलं राखीचं वर्णन या नात्याचा आदस आहे, त्याची शान आहे. त्यानं म्हटलं आहे, ‘शी (राखी) इज द शॉर्टेस्ट लाँग स्टोरी इन माय लाइफ!’
दु:ख, देवता, कारुण्य, इतकंच काय संताप आणि संघर्ष यांनादेखील गुलजार हास्यविनोदाची झालर लावतो. कारण भूतकाळाबद्दल पश्चात्ताप, खेद, खंत त्याला रुचत नाही. फ्लॅशबॅक ही त्याच्या चित्रपटांची खासियत आहे; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र भूतकाळाला तो बेडी बनू देत नाही. ‘किनारा’मध्ये नायकाचा काका (डॉ. लागू) गुलजारची ‘फिलॉसॉफी’ सांगताना म्हणतो, ‘दुख मुझे भी है, लेकिन मैं इसका मेडल छाती पर लगाएं नहीं फिरता!’ बस्स, तोच गुलजार आहे!! प्रसंगी प्रिय माणसाचा सहवास तो संपवतो; पण त्याबद्दल कटुता मनात ठेवत नाही किंवा लेखनातून अथवा दिग्दर्शनातून तिचे फूत्कार टाकत नाही. ‘परिचय’सारख्या चित्रपटातून मुलाचा बापाशी येणारा वैचारिक संघर्ष दिसतो. तरीही मुलगा आपल्या मुलांना हेच सांगतो की, ‘तुम्हारे दादाजी उसूलों के पक्के थे’. बाप मुलाचं तोंड पाहत नाही, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या निराधार मुलांना आपल्याकडे घेऊन येतो. आजोबांच्या कठोर शिस्तीमागे या मूळच्या चांगल्या, पण संस्कार नसलेल्या मुलांना माणूस बनण्याची कळकळ असते, हेही दाखवायला गुलजार विसरत नाही.
पित्याची भूमिका गुलजारला कळते, मात्र त्याची सहानुभूती नेहमीच बंडखोर मुलाच्या पाठीशी असते. ‘मेरे अपने’मधल्या प्रस्थापित समाजरचनेशी चुकीच्या मार्गानं बंड करणाऱ्या दोन टोळ्यांमधल्या तरुणांची मानसिकता त्यानं अत्यंत सहृदयपणे रंगवली आहे. त्याच संवेदनशीलतेत दहशतवादी बनवल्या जाणाऱ्या तरुणांची कथा अन् व्यथा त्यानं ‘माचिस’मध्ये सांगितली आहे. लहान मुलांचं आणि स्त्रियांचं मन त्याच्याइतकं कुणीच जाणत नाही. पडद्यावरच्या लहान मुलांना त्यानं त्यांचं बालपण परत मिळवून दिलं. त्याआधी त्या बापडय़ांच्या कोवळ्या खांद्यांवर बापाची दारू सोडवण्याची किंवा दुरावलेल्या आई-बापांना एकत्र आणण्याची जबाबदारी असायची. ‘परिचय’मधून गुलजारनं मुलांची या बालमजुरीतून सुटका केली आणि त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे वागण्याबोलण्याचं, दंगामस्ती करण्याचं स्वातंत्र्य दिलं. ‘जंगल जंगल पता चला है, चड्डी पहेन के फूल खिला है’ या त्याच्या गाजलेल्या गाण्यामध्ये मुलांबद्दलची त्याची वृत्ती स्पष्ट झाली आहे. गाण्याच्या वयाप्रमाणे भाषा वळवण्याचं त्याचं कसब थोरच आहे. मुलांबद्दल त्याच्या ममत्वात रुपेरी व प्रत्यक्ष असा भेदभाव नाही. पडद्यावरचा लहान मुलांवर प्रेम करणारा गुलजार आपल्या लेकीच्या (मेघना) प्रत्येक वाढदिवसाला तिच्यासाठी खास पुस्तक लिहायचा. ती त्याच्याकडे राहायला यायची तेव्हा तिची वेणी घालायचा.
त्याची ही एकतानता स्त्रियांच्या बाबतीत मात्र दिसत नाही. ‘मीरा’, ‘खुशबू’, ‘आंधी’मधून तो चाकोरीबाहेरच्या बंडखोर स्त्रियांची बाजू मांडताना दिसतो. मात्र ‘दूरियां’, ‘किताब’, ‘आंधी’ आणि ‘हुतूतू’ यांसारख्या काही चित्रपटांत नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांबद्दल आणि खास करून राजकारणातल्या स्त्रियांबाबतची त्याची विचारसरणी पारंपरिक वाटते. त्याचे नजीकचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी एकदा स्पष्टच म्हटलं होतं की, तो अत्यंत पुरोगामी मनाचा प्रेमिक आणि पिता, पण अत्यंत प्रतिगामी पती आहे.’’
मात्र आधुनिक किंवा करीअरिस्ट स्त्रीचं चित्रण करताना तो किंचित कठोर (किंवा पुरुषी) झाला तरी कर्कश न एकसुरी होत नाही. त्याचे खुसखुशीत संवाद आणि कल्पकतेनं योजलेले प्रसंग त्याचा कोणताही चित्रपट प्रेक्षणीय करतात; मग तो तुम्हाला पटो की न पटो. गुलजार या माणसाचंही तसंच आहे. त्याचे काही दृष्टिकोन रुचोत वा न रुचोत, तो लेखक, दिग्दर्शक, कवी म्हणून आपल्याला आवडतो, तसा माणूस म्हणूनही आवडतो. आज हिंदी- मराठी जिथे नव्याने पिढीला कळत नाही, त्या दिवसांत तो खुशाल उर्दूमध्ये गाणी लिहितो आणि नवीजुनी पिढी ती डोक्यावर घेते. ‘हम ने देखी है उन आंखो की महकती खुशबू’ ही भाषेची आणि प्रतिभेची उंची दाखवणारा गुलजार ‘कजरा रे कजरा रे’ किंवा ‘बिडी जलायके’ हे आयटम साँगही लिहू शकतो. मात्र त्यातही ‘जिगर मां बडी आग रे’ ही ठिणगीदेखील येऊन जाते. ‘गुलजार ब्रँड’चा विनोदही इथे न चुकता हजर असतो. बिडी पेटवण्यासाठी तुझ्या घरात सोय नसेल तर ‘पडोसीसे’ ती पेटते, हा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडणारा सल्लाही हे गाणं ऐकवतं.
काही झालं तरी जगलं पाहिजे- मिळेल तेवढं, मिळेल तिथून सुख मिळवलं पाहिजे. ते सुख किती काळ टिकणार आहे, हा मुद्दा नाही. महत्त्वाचं आहे ते सुख! बिडी नव्हे!! तिच्यापासून मिळणारं सुख. (एरवी ‘स्मोकिंग इज इंजुरस टू द हेल्थ’ हे कॅन्सर- सत्य गुलजारही जाणतो. म्हणूनच तर ‘स्मोकिंग’ नावाच्या चित्रपटात त्यानं ‘जब भी सिगरेट जलती है तो मैं जलता हूं’ हे सुरेख गाणं लिहिलं आहे.) ‘बावर्ची’मध्ये तर गुलजारनं ठायीठायी सुखाची ‘रेसिपी’ सांगितली आहे. खुशी के गाने फुलजो के तरह होते है, जो जल्दी चमकते है और जल्दी खतम होते है. दर्दभरे गीत अगरबस्ती के तरह होते हैं, देर तक जलते रहते है’- ‘बावर्ची’ नव्या-जुन्या गाण्यांतला फरक असा नेमकेपणानं सांगतो, तर दुसरीकडे ‘जो खुशी दुसरे का काम करने में मिलती है, वह अपना काम करनेमें नहीं’ हा कौटुंबिक शांतीचा मंत्र सांगतो. ती सुभाषितंदेखील सहजपणे, बोलण्याच्या ओघात येऊन जातात. अजिबात कृत्रिम नसतात, ओढूनताणून आणलेली नसतात. याच चित्रपटात मोठय़ा वयाच्या माणसांमध्ये चाललेली तू- तू- मै मै आपण पाहतो. आपल्या कपडय़ांकरिता दिलेली साबणाची वडी दुसऱ्यांकरिता वापरू नकोस, हा बाईसाहेबांनी कामवालीला दिलेला धडाही आपण पाहतो. जीवनातल्या या विसंगतीच्या दर्शनानं ताप होत नाही. साखर लावून दिलेली ही कडू गोळी आपल्याला आपल्या मनाच्या आरशात बघायला लावते. ‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे ‘आनंद’चं तत्त्वज्ञान ‘लेक्चर’ वाटत नाही, मनाला भिडतं, त्याचं कारण हेच जगावं कसं हे आनंद स्वत:च्या उदाहरणावरून सांगत असतो.
पडद्यावरच्या आपल्या मानसपुत्रांकरवी गुलजार खुबीनं सुखी जीवनाचे मूलमंत्र सांगत असतो आणि त्याच्या स्वत:च्या जीवनातूनही हे सत्कार्य तो करतो- पंचाहत्तराव्या वर्षी गृहस्थ एकटा राहतोय, पण किती साधेसोपे सरळपणानं. स्वभावत:च तो ‘लोनर’- एकांडा आहे. स्वातंत्र्य त्याला अति प्रिय आहे. त्याच्या घरात स्त्री नाही, तरीही त्याचं घर लखलखीत स्वच्छ असतं. सोबतीला त्याला स्त्री काय, कुणीच लागत नाही. नोकरांची फौज उभी करण्याचं आणि ‘मॅनेज’ करण्याचं कौशल्य त्याच्यापाशी आहे. वृत्तीनं तो उर्दू आणि बंगाली असला तरी जन्मानं शीख आहे, हे विसरून चालणार नाही. धाडस, व्यापार आणि अखंड उद्योग, ही त्या माणसाची वैशिष्टय़ं गुलजारकडे आहेत. गॅरेज ते कॅमेरा हे उद्दिष्ट साधताना त्यानं भरपूर पैसा मिळवला आणि राखला. म्हणूनच आज तो पाली हिलच्या पॉश वस्तीत राहतो आहे. पैसा आणि नाव मिळवताना त्यानं दर्जाशी कधी तडजोड केली नाही.
निसर्गनियमानुसार प्रत्येक मोठय़ा माणसालाही कधी ना कधी थांबावं लागतं. चित्रपटनिर्मितीची गणितं आणि भाषा बदलल्यावर गुलजारही थांबला आहे, पण त्याची लेखणी अद्याप पूर्वीच्या जोमानं आणि टवटवीत काम करते आहे. आता तो पटकथा- संवाद लिहीत नाही, पण गाणी लिहितोच. चित्रपटाकडून तो आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळला आहे. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता तो आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालतो आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद करतो आहे.
तो लेखक म्हणून जगत नसतो आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो. सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकला आणि आता तो रोज इंटरनेट वापरतो. ई-मेल्स पाठवतो. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्याचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्याला उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. त्याची सुगरण असलेली पत्नी राखी ही लेक मेघना आणि जावई येतात तेव्हा गुलजारलाही बोलावून बंगाली फिशकरी मनसोक्त खाऊ घालते. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे नाही म्हटलं तरी दु:ख आहेच. पाककलेबद्दलसुद्धा त्याला किती बारकाईनं माहिती आहे, जाण आहे, हे माहीत करून घ्यायचं असेल तर ‘बावर्ची’ पाहावा. त्यात कच्च्या केळ्यांचे, सुरणाचे काप यांची रेसिपी त्यानं बावर्चीकरवी सांगितली आहे. एका कवितेत त्यानं पौर्णिमेच्या चंद्राला रोटीची उपमा दिली आहे. ते संघर्षांचे आणि अर्धपोटी राहण्याचे दिवस होते. मात्र त्या दिवसांतही एक जुनापाना रेडिओ जवळ होता आणि क्रिकेटची कॉमेंटरी ऐकायला मिळत होती, याचं त्याला जास्त महत्त्व वाटतं. आता टीव्हीवर क्रिकेट मॅच पाहण्याचा आनंद तो लुटतो. त्यासाठी एखाद्या दिवशी, कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे कामाला बुट्टी मारतो. हा अर्थात एरवी कवी असूनही तो कमालीचा सुशिस्त आणि सुनियोजित आहे. कवीचं कलंदरपण त्यानं जीवनाला लागू केलेलं नाही. मात्र कवी बनण्यासाठी सुखासीन जीवनाची चौकट मोडावी लागली, तेव्हा तो डगमगला नाही. तरीही योग्य वेळी तो चौकटीत परतला. ‘नॉर्मल’ असण्याशी त्याचं कवी असूनही भांडण नाही. म्हणूनच सुखानं, मानानं जगतो आहे. तो इतका स्वयंपूर्ण अन् स्वावलंबी आहे की, तो कुणाही शिवाय सुखानं जगू शकेल. कविता ज्याच्याबरोबर अष्टौप्रहर असते, त्याला सोबतीची गरज काय!