गुलजारजींच्या कवितेचे वेगळे असे एक स्थान आहे. धर्म, जात, स्त्री-पुरुष अशा कोणत्याच बंधनात या कविता अडकत नाहीत. त्यांच्या कविता मनाच्या अंतरंगाचा ठाव घेतात. यांच्या कवितेचे तेज काही औरच, अगदी पैलू पाडलेल्या हिऱ्यासारखे.

सर्वप्रथम गुलजारजींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
गुलजारजींचा जन्म पाकिस्तानातला, त्यांचे लेखन उर्दूतले पण मराठी भाषा आणि संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली. अनेक मराठी कवितांना त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्यांच्या अनुवादाद्वारे. त्यांच्या कविताही इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
उर्दूत गुलजार म्हणजे बगिचा, तोपण फुलांनी बहरलेला. गुलजारजींच्या कविता म्हणजे रसिकांसाठी कवितांचा गुलजार, म्हणजेच कवितेचे बहरलेले उद्यान. अशाच काही निवडक कवितांचा नजराणा रसिकांना ‘गुलजारांची कविता’ या पुस्तकात मिळतो. तब्बल ५१ कवितांनी बहरलेल्या या उद्यानात फेरफटका मारायचा असेल तर हे पुस्तक म्हणजे पर्वणी ठरेल.
या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे गुलजारजींच्या मूळ कविता आणि अनुवादित कविता एकाच वेळेला वाचून त्याचा आस्वाद घ्यायला मिळणे. उर्दू भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व त्यांच्या कवितेतून पाहावयास मिळते. खरी कसोटी लागली आहे ती अनुवादकारांची. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि अनुराधा मोहनी यांनी ही जबाबदारी अतिशय चपखलपणे पेलली आहे. प्रत्येक कवितेचा अनुवाद अनुभवताना त्याचा प्रत्यय येतो. या मंडळींना गुलजार नावाचे हे गूढ उमगले आहे हे नक्की.
अगदी पहिलीच कविता वाचताना गुलजार हे काय रसायन आहे याची कल्पना रसिकांना येईल. कवितेचे नाव आहे ‘रुह देखी है कभी’ म्हणजेच ‘आत्मा पाहिलाय कधी?’ पहिली ओळच अंतर्मुख करणारी आहे. प्रत्येक कविता वाचताना रसिकांचे मन विचारांच्या लाटांवर स्वाधीन होणारच आणि लाटा म्हटल्या की मन हेलकावे खाणार आणि हेलकावे खाणारे मन शांत नाही राहणार. हीच तर गुलजारजींच्या कवितेतली खरी मार्मिकता आहे.
‘आत्मा पाहिलाय कधी?’ आत्मा अनुभवलाय? जितं जागतं शुभ्र धुकं लपेटून घेताना श्वास घेणाऱ्या या धुक्याची कधी जाणीव झालीय?’ प्रत्येक ओळीत प्रश्न आणि जिथे प्रश्न तेथे उत्तर शोधण्याची धडपड रसिक मन जरूर करणार.
असाच एक प्रश्न ‘शिकायत’ (आत्म्याची ठसठस) या कवितेत गुलजारजी विचारतात..
तू पाठवलं तर आहेस मैत्रिणीला
शरीराच्या जखमा पाहून जाईल ती
आत्म्याची ठसठस कोण पाहणार?
अशी अनेक कवितारूपी कोडी या पुस्तकात अनुभवायला मिळतील आणि ही कोडी सोडवता सोडवता वाचक देहभान विसरून नाही गेले तर नवलच.
वर वर सध्या सरळ भासणाऱ्या कविता कधी मनाला चटके लावून जातील कळणार नाही. ‘अखेरची विनंती’ (जनाजा) ही कविता वाचताना हे प्रकर्षांने जाणवेल.
‘शुभ्र शय्येवर एक प्रेत पडलंय
ज्याला पुरायचं विसरून लोक निघून गेलेयत
जणू माझं दफन-कफन याच्याशी
त्यांचं काही देणं घेणं नव्हतंच.’
आत्मा हा तर गुलजारजींच्या कवितेचा आत्माच. बहुतांश कवितांमधून हा डोकावतोच. ‘छाँव छाँव’ (ऊन-सावली) या कवितेत ते म्हणतात-
‘सावली-सावलीतून जात होतो मी
स्वत:ला सांभाळून
विचार होता की आत्म्याला एक सुंदरसं शरीर द्यावं
ज्यावर नसेल कोणती सुरकुती वा डाग
नाही उन्हाचा दाह, नाही कसल्या जखमा
ना होणार जखम, ना शिवेल दु:ख
अशा एखाद्या कोऱ्या कँुवाऱ्या सकाळीचं
शरीर घालून द्यावं आत्म्याला..’
आणि ‘आमीन’ (आमेन) या कवितेत ते म्हणतात-
तुझी अस्मिताही दे, स्वतं: नाहीयेस तू
आत्म्यावर जडवलेला देहाचा देखणा दागिना
तोही दे.
दुआ मागून झाल्यावर ‘आमेन’ म्हणून
आत्माही दे.
पाऊस आणि कवीचे नाते हे अतूट, मग गुलजारजी याला अपवाद कसे ठरतील. त्यांच्या ‘मेंड’ (पाऊस) या कवितेत पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी आहे. अगदी साधे, सरळ, सोपे शब्द पण अतिशय मार्मिक अशी ही कविता.
‘खरुने आपल्या शेतातली सुकी माती
सुरकुतलेल्या हातात धरून
भिजल्या डोळय़ांनी पुन्हा वर पाहिलं
मस्तीत गरजताहेत ढग
आज झडझडून पाऊस पडेल.
फक्त पाऊसच नाही तर ‘पतझड’ (पानगळ)
सर्दी थी और कोहरा था (थंडी आणि धुकं), बारिश आने से पहले (पाऊस येण्यापूर्वी) या कवितांमध्ये निसर्गही आपल्या भेटीला येतो.
गुलजारजींच्या कवितेतून सगळे रस पाझरतात, मग प्रेमरस कसा अलिप्त राहील? त्यांच्या ‘बेखुदी’ (स्व-लोप) या कवितेतील खालील ओळींवरून रसिकांना याची प्रचीती येईल.
‘दोन मृद्गंधी देह एकाच मुठीत झोपले होते जेव्हा,
मंदपणे चाललेल्या कानगोष्टींमध्ये
त्यांचे नि:श्वास गुरफटले होते जेव्हा,
सुदूर मिटलेल्या किनाऱ्यांवर जणू
थंडगार श्रावण बरसत होता.
जागा होता फक्त एकच आत्मा..’
अनेक मर्मभेदक कवितांचाही या पुस्तकात समावेश आहे. जसे की ‘खाली पडा है ये मकान’ (रिकामं पडलेलं घर)
‘रिकामंच पडलंय हे घर कित्येक दिवसांपासून
छपरात एक खिंडार आहे जेथून कधी कधी
उन्हाचा एक कवडसा येतो आणि परत जातो.’
म्हणजे एक घर रिकामं आहे, रितं आहे आणि दुसऱ्या कवितेतलं ‘मकान’ (घर) पडकं आहे.
‘सुकलेल्या जखमांवरून खपली पडावी,
तसं प्लॅस्टर ढासळतं याच्या भिंतीवरून,
एका पायावर उभे राहून सारे खांब थकून गेलेत,
सुट्टय़ा चिल्लर दातांप्रमाणे प्रत्येक बाजूने हलतात विटा’
अक्षरश: मन हेलावून टाकणाऱ्या कविता.. या पुस्तकातील प्रत्येक कविता वाचकांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारी आहे. उदा.
‘खानाबदोश’ (तुझ्या खांद्याचा आसरा), ‘खामोशी’ (स्तब्ध विश्व), ‘शिलन’ (सुगंधी ऊद), ‘लँडस्केप’ (बोल काही), ‘पोट्र्रेट ऑफ अ प्रॉस्टिटय़ूट’ (तुडवलेली पायवाट), ‘मसिहा’ (देवदूत), ‘तलाश’ (शोध) आणि अशा अनेक..
(क्रूस) ‘सलीब’ ही कविता वाचताना तर मन अक्षरश: घायाळ होतं, पिळवटून निघतं.
माझा खांदा सोलवटून निघालाय, परमेश्वरा!
माझा उजवा खांदा,
आणि पाईनच्या लाकडाचा हा क्रूस
इतका अवजड आहे की खांदा बदलताही नाही येत
जरा हात लावून तो क्रूस थोडा वर उचलून घे
गुलजारजी शब्दांचे शिल्पकार आहेत. त्यांच्या कविता शब्दांचा मारा नाही करत, तर मोजक्याच शब्दांचे कवितारूपी शिल्प तयार होते.
गुलजारजींचा वाचकवर्गही विशिष्ट आहे. ज्यांना गुलजारजींच्या कविता उमगतात आणि तेच या कवितांना पचवू शकतात. त्यांच्या कवितेचे वेगळे असे एक स्थान आहे. धर्म, जात, स्त्री-पुरुष अशा कोणत्याच बंधनात या कविता अडकत नाहीत. त्यांच्या कविता मनाच्या अंतरंगाचा ठाव घेतात. गुलजारजींचे कार्यक्षेत्र कविता, गीते, दिग्दर्शन इ. मध्ये पसरले आहे. पण त्यांच्या कवितेचे तेज काही औरच, अगदी पैलू पाडलेल्या हिऱ्यासारखे.
या पुस्तकाच्या निमित्ताने गुलजारजींच्या मूळ कविता आणि त्यांचा मराठी भावानुवाद एकत्रित प्रकाशित झाला आहे. त्यामुळे मराठी रसिकांसाठी हा एक अभूतपूर्व नजराणाच म्हणावा लागेल.
ग्रंथालीने हे पुस्तक रसिकांसमोर सादर केले आहे. सतीश भावसार यांची मुखपृष्ठ/मांडणी चोख आहे. मुखपृष्ठावरील गुलजारजींचे छायाचित्र प्रत्येक कविता वाचताना डोळय़ासमोर येईल असेच आहे.
रसिकांनी जतन करावी अशी ही अनोखी भेट. ‘गुलजारांची कविता’
गुलजारांची कविता : अनु.- रवींद्र रुक्मिणी, पंढरीनाथ, अनुराधा मोहनी.
प्रकाशन : ग्रंथाली; मूल्य : रु. १२५/-.

Story img Loader