मला कुत्रा पाळण्याची कधी आवड नव्हती. तसा छंदही माझ्या मनाला कधी जडला नाही. राखीला थोडीफार कुत्रे पाळण्याची आवड होती. पण तसा विशेष छंद नव्हता. बोस्कीमुळे आमच्या घरात कुत्र्याची आवड निर्माण झाली.
बोस्की शाळेत शिकत असताना तिचा एक शाळेतला मित्र कुत्रे विकत असे. बोस्की एके दिवशी त्या मित्राला आणि दोन निरागस पिलांना घेऊन घरी आली. मला म्हणाली, पप्पा मला कुत्रा पाळायचा आहे. दोन पिल्ले आहेत. मी काय करू ते सांगा? त्या दोन गोजिरवाण्या पिल्लांकडे मी पाहिले. त्यांचे निरागस डोळे मला अस्वस्थ करून गेले. एका पिल्लाला ठेवून घेतले की, दुसरे पिल्लू दुसरीकडे जाणार.
दोघांची ताटातूट होणार. त्या निरागस जिवांची ताटातूट करणे माझ्या जिवावर आले. मनाला पटेना. दोघेही आपापसात. खेळण्यात मग्न होते. मी बोस्कीला सांगितले. आपण दोघांनाही घरी ठेवून घेऊया. बोस्कीचा आनंद गगनात मावेना. एकाचे नाव छोटू ठेवले. दुसऱ्याचे नाव मोटू ठेवले. दहा-बारा वर्षे बोस्कीचे बालपण, छोटू मोटूबरोबर आनंदाने चालले होते. छोटू म्हातारा झाला. आमच्या घरातला एक बुजुर्ग माणूस झाला. त्याची काळजी आमचे कर्तव्य होते. प्रेमाचा तो एक भाग होता. मी नेहमी त्याच्या डोळ्यांत पाहायचो. त्यांचे संपत चाललेले आयुष्य मनाला त्रासदायक वाटायचे. मी ऑफिसमधून आलो तर मोटू दिसला नाही. मोटू कधी कधी बाहेर जायचा. मला वाटले तो खेळायला बाहेर गेला असेल. येईल थोडय़ा वेळाने. कुठे जाणार? खूप दिवस झाले तो आला नाही. गायब झाला. अनेक वर्षे निघून गेली.
वर्तमानपत्रात जाहिरात आली होती. कुणाला तरी बॉक्सर जातीचा कुत्रा विकायचा होता. पण त्याच्याकडेही दोन कुत्रे होते. बोस्कीने दोघांनाही ठेवून घेतले. एक कुत्रा राखीला दिला. एक कुत्रा माझ्याकडे ठेवला. मी त्याचे नाव ठेवले पाली.
पाली मोठा मजेदार आहे. स्वत:त मश्गूल असतो. कुत्र्याला मुलासारखेच घरात सांभाळावे लागते. मुलाकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. तसे कुत्र्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कुत्रा घरातले एक मूल होऊन जातो. पालीबरोबर आमचे दिवस मजेत चालले होते. दीडेक महिना झाला असेल. आम्हाला मोठा धक्का बसला. पालीची चोरी झाली. बोस्कीने स्वत:ला खूप त्रास करून घेतला. बोस्कीला होणारा त्रास पाहावत नसे. बोस्कीला सारखे वाटायचे, पाली कुठे असेल? त्याचे कसे होणार? पालीशिवाय बोस्कीला दुसरे काही सुचत नव्हते. दररोज पालीचा शोध घेणे एवढेच काम बोस्कीने सुरू केले. जिथे जिथे कुत्र्यांचा काळाबाजार चालत असे तिथे तिथे बोस्की जाऊन यायची. दररोज कुठे कुठे पालीचा बोस्कीने शोध घेतला ते ती मला सांगायची. ती ज्या ज्या जागांची नावे सांगायची ते ऐकून मनाला धास्ती वाटे. ती अशा ठिकाणी जाऊन आली की कुणाची जायची हिंमत होणार नाही. पण पालीसाठी बोस्की सगळीकडे जायची. पालीला शोधायचे तिच्या आयुष्याचे एक स्वप्न होऊन बसले. सतत शोध चालू. कुणी काही माहिती दिली की, बोस्की हातातले काम टाकून तिकडे जायची, जे कुत्रे पाळतात अशा लोकांची एक सोसायटी आहे. प्रत्येकाला कुठला कुत्रा आहे. त्याची माहिती एकमेकांना असते. मला हे सगळे जग माहीत नव्हते. मी सगळे शिकून घेतले. बोस्कीने पालीचे अनेक फोटो काढले होते. तिने पालीचे पोस्टर तयार करून घेतले. पाली हिलच्या गल्लोगल्लीत तिने ते सगळीकडे लावले. वृत्तपत्रात तिने एक पालीवर लेख लिहिला. पाली हरवल्यामुळे ती किती अस्वस्थ आहे हे सारे तिने त्यात लिहिले. पालीचा कुठे कुठे शोध घेतला तेही विस्ताराने लिहिले. एके दिवशी पहाटे साडेतीन वाजता एका माणसाचा फोन आला. त्याने फोनवर सांगितले की, मी नुकताच न्यूयॉर्कहून आलो आहे. वृत्तपत्रातील पाली हरवल्याची बातमी वाचली. मला खूप वाईट वाटते. तुमच्या पालीचा शोध मीही माझ्या पद्धतीने घेतो. मला कळले की मी तुम्हाला कळवतो.
कुत्र्यावर एवढे निरपेक्ष प्रेम करणारी माणसे पाहिली की कुत्र्यांचा हेवा वाटतो. कुत्र्यांवर भरभरून प्रेम करणाऱ्या माणसांनी माणसांवर एवढं प्रेम केलं तर? केबल टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र सगळीकडे पाली हरवल्याच्या बातम्या आल्या. पालीला शोधण्यासाठी कुठलीही कमतरता बोस्कीने ठेवली नाही.
आम्हाला बातमी मिळाली की गुरुनानक पार्कच्या जवळ एक टोळी आहे. ती कुत्र्यांना चोरून विकते. तिथेच कुणी तरी पालीला विकले होते. ज्याने पालीला विकत घेतले होते त्याच्या वडिलांची चोरून आणलेले कुत्रे घरी ठेवायची इच्छा नव्हती. त्यांनी मुलाला समजावून सांगितले. वृत्तपत्रातील बातमी त्यांनी वाचली. त्यांचा मला फोन आला. तुमचा पाली आमच्याकडे आहे. तासाभरात माझा मुलगा तुमच्याकडे त्याला घेऊन येईल. आम्हाला क्षमा करा..
आपले चांगुलपण कुठे तरी उपयोगी पडते याचा मला आनंद झाला. पाली आमच्या घरी आला. मी त्याच्या डोळ्यांकडे पाहिले. माणसांविषयीचा संशय त्याच्या डोळ्यांत मला दिसला. माणसावर विश्वास ठेवायला पाली किती तरी दिवस तयार नव्हता. सैरभैर नजरेने तो सगळीकडे पाहत होता. माणसाविषयीचा त्याच्या डोळ्यांत दिसणारा संशय विसरायला तो तयार नव्हता.
किती तरी दिवस बोस्की घराबाहेर जात नव्हती. पालीबरोबर खेळायची, त्याचा सांभाळ करायची. पाली आमच्या घरातलाच सदस्य आहे. त्याला नोकराने हिडीसफिडीस केलेले मला आवडत नाही. पालीशी बोलताना, वागताना, अदबशीर बोललेले मला आवडते. घरातल्या माणसाचा आपण मान ठेवतो तसा पालीचा सगळ्यांनी ठेवला पाहिजे, असे मला वाटते. मी सकाळी फिरून आलो की पालीची दंगामस्ती सुरू होते. माझ्या बुटाच्या लेसशी खेळणे त्याला आवडते. माझ्या गळ्याभोवती असणारा पांढराशुभ्र रुमाल पाली तोंडाने ओढतो. रुमालाशी खेळत बसतो. त्याला ठरावीक बिस्किटच आवडतात. तेवढीच तो खातो. दुसरी बिस्किटे त्याला आवडत नाहीत. जांभळाच्या दिवसात तो जांभळे खातो. माझ्यासारखेच गोड खाणे त्याला आवडते. आइस्क्रीम त्याला आवडते. ठक्करसिंग, जॉयबरोबर तो खेळतो. घराबाहेर सोडून जात नाही. मी कामात असलो की तो माझ्याजवळ बसतो. मी त्याचे कधी स्वागत करीन याची तो वाट पाहत असतो.
पालीची एक गमतीदार गोष्ट मला आठवते. माझ्याकडे एक लेखक त्यांची गोष्ट ऐकवायला आले होते. घरात कुणी आले की पाली त्यांच्याजवळ जातो. त्यांच्या पायाला हुंगतो. त्याचे ते वागणे त्याने त्या माणसाशी ओळख करून घेतल्याची खूण असते. त्या लेखकांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि पाली घोरायला सुरुवात केली. ते लेखक अस्वस्थ व्हायचे. मी त्यांना म्हणालो, तुम्ही गोष्ट ऐकवत जा. पालीला घोरायची सवय आहे.
माझे एक मित्र म्हणाले, कुत्रा घरात आला की लहान मुलांचे इंग्रजी सुधारते. आपण कुत्र्याला शिकवलेले शब्द मुले शिकतात.
मी मात्र पालीशी हिंदीत बोलतो. भाषा ही संस्कृती आहे. भाषेमुळे संस्कृती टिकून राहते. पालीशी मी कधी इंग्रजीत बोलत नाही.
(सौजन्य : अरुण शेवते, ॠतुरंग दिवाळी २०००)

Story img Loader