निखिल बेल्लारीकर – response.lokprabha@expressindia.com
यात्रा हे भारतीय समाजव्यवस्थेचे एक अविभाज्य अंग आहे. वर्षभर कैक यात्रांमध्ये अनेक धर्म-पंथांतील भारतीय सहभागी होतात. पण प्राचीन व त्यातही मध्ययुगीन काळापासून भारतीयांनी जवळपास दरवर्षी भारताबाहेरील यात्रेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इस्लाममधील हज यात्रा! भारतात इस्लामचा शिरकाव झाल्यापासून भारतीय मुस्लीम या यात्रेत सहभागी होण्यासाठी मक्केला जात आले आहेत.
आता हजबद्दल प्राथमिक माहिती घेऊ. इस्लामी वर्षांतील शेवटचा महिना जिल्हेजच्या आठव्या ते तेराव्या तारखेपर्यंत ही यात्रा चालते. इहराम नामक पांढरे वस्त्र याकरिता आवश्यक असते. सर्वप्रथम तवाफ आणि साइ हे दोन विधी पार पाडले जातात. तवाफ म्हणजे मक्केतील काबाभोवती घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने सात प्रदक्षिणा घालणे आणि साइ म्हणजे साफा आणि मारवा या काबाजवळील दोन टेकडय़ांमध्ये सात वेळा ये-जा करणे होय. यातही पहिल्या तीन वेळा घाईने, किंबहुना पळत पळत ये-जा करणे आवश्यक असते. अब्राहमिक परंपरेप्रमाणे, अब्राहमपत्नी हॅगार हिने आपल्या मुलांसाठी पाण्याचा शोध घेताना जी वणवण केली तिचे हे प्रतीक होय. यानंतर मक्केपासून काही अंतरावर असलेल्या मिना येथील मदानात पूर्ण दिवस व्यतीत करून पुढच्या दिवशी अराफातच्या डोंगरावर जाऊन ईश्वरचिंतन करणे, धार्मिक प्रवचने ऐकणे हा एक महत्त्वाचा विधी असतो. यानंतर परत मक्केकडे येताना सतानाचे प्रतीक असलेल्या तीन खांबांपकी कोणत्याही एकावर निषेधाचे प्रतीक म्हणून सात छोटे दगड मारले जातात आणि त्यानंतर एखादा प्राणी बळी दिला जातो. यामागेही इब्राहिम आणि इस्माईलच्या पुराणकथेचा संदर्भ आहे. यानंतर तवाफ आणि सतानाचा निषेध हे विधी पुन्हा एक-दोनदा केल्यावर मग यात्रा संपते. हज यात्रा केलेल्याला ‘हाजी’ अशी संज्ञा आहे. मध्ययुगीन इस्लामी समाजात हाजींना खूप मान असे. विशेष म्हणजे इस्लाम संस्थापक मुहंमद यांना इस्लामी जगात सर्वोच्च मानले जाऊनही हजमध्ये मदिनेस भेट देण्यासंबंधी काहीच नमूद नाही.
प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यभरात एकदा तरी हज यात्रा करावीच अशी इस्लामची आज्ञा आहे. कुराणातही अनेक ठिकाणी यासंबंधी स्पष्ट विधाने आहेत. कोणत्याही कारणाने हजच्या विशिष्ट वेळी मक्केत जाता आले नाही तर वर्षांत कधीही करता येणारी आणि एका दिवसात आटपणारी उमराह नामक यात्राही आहे. परंतु हजइतकी प्रतिष्ठा अन्य कोणत्याही यात्रेला नसल्याने हजला जाण्याकडे जुन्या काळाप्रमाणेच आजही मुस्लिमांचा भर असतो. मध्ययुगात प्रामुख्याने धर्मश्रद्धेपायी ही यात्रा केली जात असे. भारतातील इस्लामी सुलतान धर्मकार्य म्हणून हज यात्रेकरूंच्या येण्याजाण्याचा खर्च उचलत, स्वखर्चाने कैक मोठमोठी जहाजे त्यांच्याकरिता पाठवली जात. मक्का तसंच आसपासच्या भूभागाचे पारंपरिक शासक ‘शरीफ’ यांना बहुमोल किमतीच्या भेटवस्तू देऊन बदल्यात त्यांच्याकडून धार्मिक व सामाजिक पािठबा मिळवत. मक्केचे धार्मिक महत्त्व वादातीत असल्याने मक्केहून मिळणाऱ्या पािठब्याचे सामाजिक वजनही मोठेच होते.
भारतातून मक्केस रस्ता व समुद्र अशा दोन्ही मार्गानी जात. त्यातही जमीनमार्ग हा मुख्यत: काश्मीर, अफगाणिस्तान वगरे भागांसाठीच तुलनेने सोयीचा होता. त्यामुळे भारतातील बहुसंख्य लोक हे समुद्रमार्गच निवडत. त्यातही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुरत बंदराचा सिंहाचा वाटा होता. मध्यपूर्वेशी व्यापारासाठीचे हे सर्वात प्रमुख बंदर असून तिथे प्रचंड प्रमाणावर व्यापार चालत असे. इंडोनेशिया, मलेशिया भागातील मुस्लीमही जहाजातून सुरतमाग्रेच मक्केस जात. तीच गोष्ट बंगाल, ओदिशा, आंध्र व तमिळनाडू भागांतील मुस्लिमांची. सुरतेखेरीज केरळ तसेच कोकणातील चौल, दाभोळ इत्यादी बंदरांमधूनही हज यात्रेकरू मक्केस जात. मुघल काळात दरवर्षी भारतातून हज यात्रेस जाणाऱ्यांची संख्या होती किमान १५ हजार! तत्कालीन लोकसंख्येच्या प्रमाणात हा आकडा बराच मोठा आहे. हज यात्रेकरिता मक्केस तेव्हा दोनेक लाख लोक जमत, त्यांपकी किमान १५ हजार भारतीय मुस्लीम असत.
भारताहून समुद्रमाग्रे मक्केस जाण्यासाठी साधारणपणे दोन महिने लागत. यात एक अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे हज यात्रेचे वेळापत्रक आणि समुद्रप्रवासाचे वेळापत्रक यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नव्हती. जिल्हेज महिन्याच्या आठव्या तारखेस मक्केत असणे हे हज यात्रेसाठी आवश्यक, तर जून ते सप्टेंबरमध्ये भारतीय किनारपट्टीवर मान्सूनमुळे नौकानयन अशक्य होते. इस्लामी वर्ष हे चांद्र वर्ष असल्याने जिल्हेज महिना कोणत्याही सौर ऋतूमध्ये येत असे. दोन-तीन दशकांच्या आवर्तनानंतर जिल्हेज महिन्याच्या सौर वर्षांतील स्थानाची पुनरावृत्ती होते. नौकानयनाचे वेळापत्रक हे सौर वर्षांवर अवलंबून असल्याने जिल्हेज महिना कोणत्याही सौर महिन्यात आला तरी मान्सून विचारात घेऊनच प्रवास करणे आवश्यक होते. त्यामुळे कैकदा भारतातून मक्केस गेलेल्या यात्रेकरूंना जिल्हेजपर्यंत अनेक महिने वाट पाहावी लागे. याखेरीज आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्का आणि आसपासचा प्रदेश पूर्णत: वैराण वाळवंटी असल्याने भारतातून निघतानाच आवश्यक अन्नसामग्री बरोबर घ्यावी लागे. वाटेत समुद्रावर, त्यातही विशेषत: तांबडय़ा समुद्राच्या तोंडाशी युरोपीय चाचेगिरीचा सामना करावा लागे. पोर्तुगीज, इंग्रज, डच, इत्यादींसाठी मक्केला जाणारी जहाजे हे एक सोपे लक्ष्य होते. त्यांवरचा माल लुटून ते यात्रेकरूंना मोखासारख्या एखाद्या बंदरावर उतरवत. मग या लुबाडल्या गेलेल्या यात्रेकरूंना पुढचा सर्व प्रवास वाळवंटातून पायी करावा लागे. तिथेही भटक्या बदावी टोळ्यांचा धोका असेच. त्यांपासून ऑटोमन सत्ता संरक्षण पुरवत असली तरी ते दरवेळी पुरेसे नसे. समुद्रावरील लुटालूट टाळण्यासाठी मुघल, दख्खनी सुलतान सर्वच अगोदर चांगले मूल्य मोजून पोर्तुगीजांचे ‘कार्ताझ’ घेत. त्यामुळे समुद्रावरील संकटे काही अंशी तरी निवारली जात. मुस्लीम-ख्रिश्चन धर्मसंघर्ष पोर्तुगीजांच्या आगमनाने विकोपाला जाईल अशी काही वेळेस चिन्हे दिसली तरी आर्थिक व धार्मिक गरजांमुळे अकबरासारख्या शक्तिशाली शासकाच्या काळाही पोर्तुगीजांशी जुळवून घेणे भाग होते. पोर्तुगीज सर्वच जहाजांची कसून झडती घेत. भारतीय व्यापाऱ्यांना पुढे पुढे व्यापाराची मुभा असली तरी पोर्तुगीज प्रभुत्व असेपर्यंत मसाल्याचा व्यापार करण्यास सक्त मनाई होती. दख्खनी सुलतानांसोबतच मुघल राजसत्तेने हज यात्रेकरूंसाठी खूप सोयी पुरवल्या.
इ. स. १५७२-७३ मध्ये गुजरातवर कब्जा केल्यानंतर अकबराने यात लक्ष घालून इजिप्त आणि सीरियाप्रमाणे भारतातूनही जमीनमाग्रे मक्केपर्यंत स्वखर्चाने काही वष्रे एक काफिला पाठवला. यासाठी आपल्या सरदारांपकी एकाला मीर हाज- यात्रेचा मुख्य व्यवस्थापक नेमले. मीर हाजसोबत मक्केत करायच्या दानधर्मासाठी इ. स. १५७६-७७ आणि त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये अनुक्रमे तत्कालीन सहा लाख आणि पाच लाख रुपये व अनेक भेटवस्तू दिल्याचा उल्लेख सापडतो. याशिवाय अकबराचा एक विशेष धार्मिक सरदार अब्दुर्रहीम याने १५०० टन भारवहन क्षमतेची तीन जहाजे स्वखर्चाने याकरिता दिली होती. या मोठय़ा जहाजांवर हजारेक माणसे सहज मावत. ही आर्थिक मदत नंतरच्या बादशहांनीही चालू ठेवली. औरंगजेबाने इ. स. १६५९ मध्ये मक्केतील दानधर्मासाठी अदमासे तत्कालीन सहा लाख दिल्याची नोंद आहे. मक्केत केलेल्या दानापकी २५ टक्के तेथील ‘शरीफ’ नामक शासक घेत, तर उरलेले सामान्य लोकांसाठी असे. यातही कधी कधी लुबाडणुकीचे प्रसंग येत.
मुघल तसेच दख्खनी सुलतानांनी पुरवलेल्या सोयींमुळे हज यात्रा करणाऱ्यांत मौलवींचाही भरणा होता. अनेक भारतीय मौलवींनी हज यात्रा अनेकदा केली, इतकेच नव्हे तर मक्का तसेच आसपासच्या प्रांतात अनेक वष्रे राहून भारतात परत आले. अगदी इ. स. १२ व्या शतकातील शेख बहाउद्दीन झकारियाच्या प्रवासाबद्दलही बरीच माहिती उपलब्ध आहे. तो मूळचा मुलतानी असून त्याने अफगाणिस्तानहून (तत्कालीन खोरासान) बुखाऱ्यात स्थलांतर केले. पुढे जमीनमाग्रे हज यात्रा करून मदिनेत पाच वष्रे राहिला आणि जेरुसलेम, बगदाद यांसारख्या ठिकाणी अध्यापनही केले. पुढे इ. स. १६ व्या शतकातील मौलवी इब्राहिम मुहद्दिस कादिरी, इ. स. १७ व्या शतकातील दिल्लीतील प्रख्यात हदीसचा विद्वान मौलवी अब्दुल हक्क देहलवी, ही यांतील काही महत्त्वाची उदाहरणे. इब्राहिम कादिरी हा कैरो, मक्का, सीरिया इत्यादी इस्लामच्या प्रख्यात केंद्रांमध्ये तब्बल २४ वष्रे अध्ययन-अध्यापन करून मृत्यूपर्यंत आग्य््राात राहिला. अब्दुल हक्क देहलवीबद्दल सांगण्याजोगी रोचक गोष्ट म्हणजे त्याचा गुरू आणि गुरूचा गुरू दोघेही भारतीयच होते! देहलवीचा गुरू अब्दुलवाहाब बुरहानपुरी आणि बुरहानपुरीचा गुरू हा अली-अल-मुत्तकी नामक मूळचा बुरहानपूरचाच! त्याचे कुटुंब भारताहून मक्केत स्थायिक झाले होते. वाहाबी पंथाचा संस्थापक वाहाब याचा गुरू मुहम्मद हय्यात इब्न इब्राहीम अल सिंधी हाही मूळचा भारतीयच होता. पुढे तो मदिनेत स्थायिक झाला.
मौलवींसोबतच आणखी एक तुलनेने छोटा परंतु प्रभावी वर्ग या यात्रेला जात असे, तो म्हणजे राजस्त्रिया. अकबराची एक आत्या गुलबदन बेगम हिने मोठय़ा लवाजम्यासह इ. स. १५७६ मध्ये हज यात्रा केली. सोबतच इराणमधील करबला, नजफ, कोम, इत्यादी शिया पंथीय धर्मस्थळांनाही भेट दिली. तब्बल सहा वर्षांनी इ. स. १५८२ मध्ये ती परतली. पुढे इ. स. १६४० मध्ये कुतुबशाही राजस्त्रियांनीही हजला जाण्याचा प्रयत्न केला. सफावी इराणच्या बादशहाने त्यांना शिया पंथाची धर्मस्थळे बघण्यास पूर्ण मदत केली. पुढे मक्केचा रस्ता मात्र युद्धामुळे धोकादायक असल्याने त्यांना तिथे जाता आले नाही. यानंतर इ. स. १६६४ मध्ये आदिलशाहीतील प्रसिद्ध बडी साहेबा हिनेही तब्बल चारदा हज यात्रा केली, इराणमधील धर्मस्थळेही पाहून घेतली. याकरिता तिने एक डच जहाज भाडय़ाने घेतले होते. शिवछत्रपतींचे दक्षिण कोकणातील सुभेदार रावजी सोमनाथ यांनी तिला पाटगाव ते वेंगुल्र्यापर्यंत २०० सनिकांनिशी संरक्षण पुरविल्याचाही उल्लेख आहे.
तत्कालीन राजकारणाचे बळी ठरलेल्यांसाठीही मक्केला जाणे हा मृत्युदंड टाळण्याचा रामबाण उपाय होता. बहामनी राज्यक्रांतीचा बळी ठरलेल्या एका सुलतानापासून ते हुमायूनच्या अनेक नातेवाईकांपर्यंत, अकबराचा प्रसिद्ध सरदार आणि एक प्रकारे शिक्षक बराम खान याचा प्रतिस्पर्धी मीर असगर मुन्शीपर्यंत अशी याची अनेक उदाहरणे तत्कालीन साधनांत सापडतात. जहांगिराचा एक इराणी हाकिम मासिहुज्जमान याच्यावर शाही खप्पामर्जी झाल्यावर त्याने हजला जाऊ द्यावे अशी विनंती केली. इस्लामप्रमाणे ही विनंती मान्य करावीच लागत असल्यामुळे जहांगीरने त्याला परवानगी तर दिलीच, शिवाय प्रवासाकरिता तत्कालीन २० हजार रुपयेही दिले! इ. स. १६९०-९१ मध्ये मराठय़ांविरुद्ध समाधानकारक कामगिरी न केल्यामुळे अबू अल खैर नामक मुघल सरदाराची मनसब जप्त करून त्याला मक्केला पाठवण्यात आले.
हज यात्रेच्या निमित्ताने आणि अन्यथाही भारतीय व्यापारी नेहमीच मक्केपर्यंत जात. हजच्या काही दिवसांतील गर्दीचा फायदा घेऊन तिथे व्यापार चाले, परंतु त्याचे प्रमाण फारसे नव्हते. इस्लामी धर्माज्ञेमुळे मुस्लिमेतरांना मक्का तसेच मदिना दोन्ही शहरे वज्र्य असल्याने त्यांमधील व्यापार फक्त मुस्लिमांच्याच ताब्यात होता. त्यामुळे बिगरमुस्लीम व्यापारी मोखा, जेद्दा या मुख्य बंदरांपर्यंतच जाऊ शकत. या बंदरांमधील व्यापार हा हजशी निगडित नसल्याने त्याच्याशी तूर्त या लेखात कर्तव्य नाही. हज म्हणजे प्रामुख्याने धर्मकारण आणि त्याला जोडून मर्यादित अर्थकारण होय. भारतीय मुसलमानांनी गेल्या हजारेक वर्षांत केलेल्या या यात्रेचे अनेक व्यापक, बहुपेडी पलू हा मुळातूनच अभ्यासायचा एक रोचक विषय आहे. वाचकांना या विषयाची व्याप्ती लक्षात आणून देणे हा प्रस्तुत लेखाचा मुख्य उद्देश होय.