हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळात म्हणजे १९५० ते ७० या कालावधीत अनेक संगीतप्रधान चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र, यात मैलाचा दगड म्हणून उल्लेख करावा लागेल तो राज कपूरच्या ‘संगम’चा! या चित्रपटाला गेल्याच वर्षी थोडीथोडकी नाही, तर पन्नास वर्षे पूर्ण झाली, यावर विश्वासच बसत नाही. या चित्रपटाचा विषय निघाला की, बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. ‘संगम’ प्रदर्शित झाला तेव्हा आम्ही फार मोठे नव्हतो, फक्त सहावीत होतो. आता सव्वाशे वय असलेल्या छबिलदास शाळेचे आम्ही विद्यार्थी. रोज शाळा सुटल्यानंतर प्लाझासमोरच्या बस स्टॉपवर असणारी ‘संगम’ची पोस्टर्स पाहाण्यात आम्ही मित्र रंगून जायचो. एकदा वर्गात गंमत झाली. आमचे वर्गशिक्षक होते शिदोरे सर. आमचा एक मित्र ‘मुलाला अर्धा दिवस सुटी द्यावी’ अशा आशयाची वडिलांची चिठ्ठी घेऊन आला. आमचा मित्र एकदम तंदुरुस्त दिसत असल्याने सरांनी थोडं दमात घेऊन त्याला खरं कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘सर, आज आम्ही सगळे ‘संगम’ पाहायला जाणार आहोत, बाबांनी तर रजाच घेतली आहे..’’ हे ऐकून पूर्ण वर्ग हसायला लागला. विशेष म्हणजे, सरांनीही त्याच्या प्रामाणिकपणाला दाद दिली; पण मला आजही असं वाटतं की, शिदोरे सरांचंही या चित्रपटावर तितकंच प्रेम असल्याने त्यांनी आमच्या मित्राला परवानगी दिली असेल.
– तर, मोठे झाल्यानंतर या चित्रपटाची महती आणखी उमगत गेली. (मी, वसंत खेर, किरण शेंबेकर आदी मित्रांनी मिळून ‘झपाटा’ हा वाद्यवृंद सुरू केला, तेव्हा तर या गाण्यांची व शंकर-जयकिशन यांची थोरवी आणखी अधोरेखित होत गेली, ‘झपाटा’च्या निमित्ताने शंकरजींचा सहवासही आम्हाला अनेकदा लाभला!) साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन के. अब्बास यांनी ‘संगम’ची कथा लिहिली. ही कथा प्रभावीपणे गुंफताना राज कपूरने जी कल्पकता दाखवली, जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, कलादिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, पाश्र्वसंगीत या सर्वच आघाडय़ांवर हा चित्रपट लक्षणीय ठरला. आमच्यासारख्या संगीतप्रेमींना हा चित्रपट जास्त भावला तो गाण्यांमुळे. शंकर-जयकिशन यांनी यात अजोड कामगिरी केली आहे. ‘मेरे मन की गंगा’ या गाण्याचा किस्सा तेव्हा खूप गाजला होता. नायिकेच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाचा बरेच दिवस होकार येत नसल्याने आरकेने म्हणे तिला तार करून प्रश्न विचारला होता, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही..’ आणि तिनेही ठसक्यात उत्तर दिलं होतं, ‘होगा, होगा, होगा!’ पुढे महान गीतकार शैलेंद्रने हे गाणं पूर्ण केलं आणि एसजेंनी त्याला सहज-सोप्या चालीत गुंफलं. गाण्यात नायिकेचा आवाज वापरण्याची कन्सेप्ट तेव्हा नवीनच होती. त्यानंतर अनेक नायिकांनी याचं अनुकरण केलं.
– ‘हर दिल जो प्यार करेगा’ या गाण्यात तर बोंगो, पियानो, व्हायोलिन, अॅकॉर्डियन आदी वाद्यांच्या साथीने एसजेंनी कहरच केला आहे. मोहम्मद रफी काही कारणास्तव येऊ न शकल्याने महेंद्र कपूरला पाचारण करण्यात आलं आणि त्यानेही या संधीचं सोनं केलं. लता, मुकेश आणि महेंद्र कपूरच्या स्वरातलं हे गाणं काळजाचा ठाव घेतं. गोपाल म्हणजे राजेंद्रकुमारच्या तोंडी असलेल्या ‘खामोशी का ये अफसाना रह जाएगा बाद मेरे’ या ओळी म्हणजे चित्रपटातल्या भावी संघर्षांचं सूचनच. गोपाल असा इन्ट्रोव्हर्ट तर सुंदर म्हणजे राज कपूर अतिशय आक्रमक व धसमुसळा प्रेमी. राधाला आपलं करायचंच या ईर्षेने पेटलेला सुंदर म्हणतो, ‘बाहों के तुझे हार मै पहनाऊंगा एक दिन, सब देखते रह जाएंगे ले जाऊंगा एक दिन.. ओ मेहबूबा’. या गाण्याच्या ठेक्यावर आरके ज्या ग्रेसफुली थिरकलाय त्याला तोड नाही.
– ‘मै का करु राम मुझे बुढ्ढा मिल गया’ या गाण्याची शब्दरचना थिल्लर असल्याचे सांगत लतादीदींनी ते गाण्यास प्रथम नकार दिला होता, मात्र आरके आणि जयकिशनने त्यांचं मन वळवलं, अशी चर्चाही तेव्हा होती. तो वाद तेव्हा मिटला, परंतु तेव्हापासून आरके कॅम्पची घडी विस्कटतच गेली. दुर्दैवाने यास गाणीच जबाबदार ठरली. जयकिशनने संगीतबद्ध केलेल्या व रफींनी गायलेल्या ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ने लाखो कानसेनांवर मोहिनी घातली होती. रफींचा मधाळ आवाज, कल्पक वाद्यवृंद आणि गाण्याच्या शेवटी लतादीदींचं गुणगुणणं.. क्या बात है! याच्याच विरोधी भावनेचं व शंकर यांनी संगीतबद्ध केलेलं ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणंही अप्रतिम होतं. मात्र बिनाका गीतमालेत ‘ये मेरा प्रेमपत्र’ला श्रोत्यांचा कौल मिळाला आणि काही विघ्नसंतोषी लोकांनी एसजेंचे एकमेकांविरोधात कान भरले. या दोन महान संगीतकारांमध्ये बेबनावाची ठिणगी पडली ती तेव्हाच. ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ हे त्यांच्या बाबतीत सर्वार्थाने खरं होतं, मात्र ते दिवस सरले, हेही खरंच.
– ‘संगम’च्या आधी आणि त्यानंतर आरकेने बरेच चित्रपट निर्माण केले, तरीही त्याचं खरं कसब दिसलं ते याच चित्रपटात. आमच्या पिढीतल्या अनेकांच्या भावविश्वाचा बराचसा भाग या चित्रपटाने, त्यातल्या गाण्यांनी व्यापला आहे, यात अतिशयोक्ती नाही.
-प्रा. कृष्णकुमार गावंड