माझा तिरस्कार, धिक्कार, आणि माझ्यावर अविश्वास दाखविणाऱ्या नजरा माझा नेहमीच पाठलाग करत असतात. कारणपरत्वे त्या परत दिसताच मला अस्वस्थ करून सोडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणसाच्या आयुष्यात त्याने कोणाकडून काही कारणास्तव ऐकलेली वाक्ये किंवा शब्द त्याच्या मनात कायमचे घर करून बसतात. विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाहीत इतके ते शब्द मनाच्या तळात कायमचे घट्ट बसलेले असतात. आणि प्रसंगानुरूप परत आठवतात. तसेच काहीचे डोळे किंवा नजर आपला कायम पाठलाग करीत असतात.
आणि वेळ येताच ती नजर आपल्यासमोर दत्त म्हणून उभी राहते.
मी नोकरी करीत असताना एक जोडधंदाही करीत असे. त्यानिमित्त मला बऱ्याच गिऱ्हाइकांकडे जावे लागे. एका गिऱ्हाइकाच्या केबिनमध्ये तो बसायचा त्या खुर्चीमागे त्याच्या दिवंगत वडिलांचा फोटो लावला होता. का कोणास ठाऊक? त्या फोटोतले त्यांचे डोळे मला घाबरवून सोडत असत. इतके की, तेथे असेपर्यंत मी त्या फोटोकडे बघायचे टाळत असे. आणि कधी एकदा तेथून निघतो असे होऊन जात असे. त्या नजरेचा मी अगदी धसका घेतला होता. त्या गोष्टीला आता कैक वष्रे होऊन गेली. नंतर एखाद्या दुकानात गेलो तरी गल्ल्यावर पसे देताना त्या मॅनेजरच्या मागे कोणा दिवंगत व्यक्तीचा फोटो लावला असेल तर त्याकडे बघायची हिंमत मी करीत नाही. मला ती नजर परत दिसेल आणि माझा वेध घेईल अशी भीती वाटते.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मी जेव्हा दादरला राहत होतो तेव्हा रोज सकाळी शिवाजी पार्कला फेऱ्या मारण्यासाठी जात असे. असाच एकदा फेऱ्या मारीत असताना, माझ्यासमोर चालणारी एक मध्यमवयीन व्यक्ती चालता चालता अचानक खाली पडली आणि चक्कपूर्ण आडवी झाली. तिच्या पाठीमागे लगेच मीच असल्याने मीच तिच्या जवळ त्वरित पोहोचलो. तो एका कुशीवर पडला होता. त्या व्यक्तीला मी सरळ केले. आणि माझे त्याच्या चेहऱ्याकडे प्रथम लक्ष गेले. त्याचे डोळे सताड उघडे होते. आणि त्याला मला काही सांगायचे होते, असे भाव त्याच्या डोळ्यांत मला जाणवत होते. पण बघता बघता त्याचे डोळे निष्प्राण झाले. त्याचे घारे डोळे जणूकाही निश्चल गारगोटय़ा झाल्या. हे जग सोडून जाताना त्याने शेवटी मला बघितले होते, ना नात्यातला, ना ओळखीचा, पण शेवटी माझे चित्र डोळ्यात घेऊन त्याने शेवटचा श्वास घेतला ही गोष्ट माझ्या मनावर खोल आघात करून गेली. नंतर मी वेळोवेळी अगदी जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींच्या अंतयात्रेसाठी गेलो. पण मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे मात्र बघण्याचे धाडस माझ्याने होत नाही. मला तीच पूर्वी त्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसलेली नजर परत याही मृताच्या डोळ्यात दिसेल अशी उगाचच भीती वाटते.

माझा एक अगदी जवळचा मित्र, जो माझ्याबरोबरच आमच्या कंपनीत नोकरीला लागला आणि सेवानिवृत्तही आम्ही एक-दोन महिन्याच्या फरकाने झालो. आमच्यामध्ये काही कारणाने वाद झाले, भांडणे झाली, काही काळ अबोलाही होता. परंतु दोघांत वितुष्ट मात्र कधीच आले नाही. जो काही त्या वेळी गरसमज झाला असेल तो दूर झाला की आम्ही परत पूर्वीसारखेच मित्रत्वाच्या नात्याने वागू लागायचो. एकदा त्याला त्याच्या बायकोच्या वाढदिवसाला एखादी सुंदर भेटवस्तू घ्यायची होती. अशा वेळी आम्ही हमखास खरेदीला एकत्र जात असू. तसेच त्या वेळीही गेलो. भेटवस्तूंची बरीच दुकाने पालथी घातली. काचेच्या सुंदर सुंदर भेटवस्तू मिळणाऱ्या एका दुकानात आम्ही दोघे गेलो. त्याला एक अप्रतिम आकाराचा आणि रंगांचा फ्लॉवरपॉट पसंत पडला. त्याला त्याच प्रकारचे दोन फ्लॉवरपॉट घ्यायचे होते; परंतु त्या प्रकारचा एकमेव फ्लॉवरपॉट त्या दुकानात उपलब्ध होता, दुकानदाराने खूप शोधाशोध केली, आजूबाजूला तशीच काही दुकाने होती तेथे मिळतो का तेही त्याने न कुरकुर करता शोधून पाहिले, पण तशाच प्रकारचा दुसरा पिस शोधूनही सापडेना. मित्र म्हणाला, एक तर एक, हाच घेऊन जाऊ, असा फ्लॉवरपॉट माझ्या बायकोने दिल्ली-आग्रा ट्रिपमध्ये पसंत केला होता. तिच्या तो अगदी मनात भरला होता. पण त्यामुळेच त्याची किंमतही दुकानदार अवाच्या सव्वा सांगत होता. माझ्याकडे तेवढे पसे शिल्लक नव्हते. तेव्हापासून मी अशा फ्लॉवरपॉटच्या शोधात आहे. आज एक तरी मिळाला आहे. तो घेऊन टाकतो. त्याने दुकानदाराला पसे दिले आणि दुकानाच्या बाहेर पडण्यापूर्वी नीट बघण्यासाठी माझ्या हातात दिला. मी तो हातात घेतला, मात्र कसा कोणास ठाऊक माझ्या हातातून तो सुळकन् सुटला आणि खाली पडून त्याचे तुकडे झाले. मी ते उचलायला अपराधी भावनेने खाली वाकलो आणि हातात ते काचेचे तुकडे घेऊन तसाच वर उठलो. आणि मित्राच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल तिरस्कार तर स्पष्ट दिसत होताच, पण त्याचबरोबर जे नजरेचे एक वेगळेच रसायन तयार झाले होते, ते पाहून मला आता धरणीने दुभंगून त्वरित पोटात घ्यावे असे वाटून गेले. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि काचेच्या भेटवस्तूंचे दुकान पाहिले की तेथे थबकून तसा फ्लॉवरपॉट दिसतो का त्याचा शोध घेतो, पण मला कुठलीच काचेची वस्तू घेण्याचे धाडस आता होत नाही. माझा अगदी टोकाचा तिटकारा आणि धिक्कार करणारे ते माझ्या मित्राचे डोळे मला दिसू लागतात. आणि काही न घेताच तेथून काढता पाय घेतो.
मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे नोकरी करणारे. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना एका आजींकडे दिवसभर ठेवत होतो. त्या आजी अतिशय प्रेमळ होत्या. स्वत:च्या नातवाप्रमाणे त्या आमच्या मुलांचे संगोपन अतिशय प्रेमाने करायच्या, आम्ही नििश्चतपणे बाहेर राहून आपापल्या नोकऱ्या सांभाळू शकलो ते आजींमुळेंच. वयोमानामुळे नंतर त्यांना ते कामही झेपेनासे झाले म्हणून त्यांनी मोठय़ा नाइलाजाने आम्हाला अन्यत्र सोय पाहण्यासाठी सांगितले. आम्हाला एक चांगले कुटुंब त्यासाठी मिळालेही. पण आजींच्या प्रेमाला पारखी झालेली आमची मुले तेथे रमेनात. मोठा मुलगा आमची अडचण समजू शकत होता, मात्र लहान मुलगा जेमतेम दोन वर्षांचा होता. तेवढी समज असण्याचे त्याचे वयही नव्हते. आम्हाला त्याची नाखुशी लक्षात येत होती, पण पर्याय उपलब्ध होत नव्हता. एकदा लहान मुलगा तापाने आजारी झाला रोज मी त्याला त्या कुटुंबाकडे सोपवून पुढे कामावर जात असे. आधीच तो तेथे जाण्यासाठी नाखूश होता, त्यात त्याला तापही होता. मी दोघांना नेहमीप्रमाणे तयार करून त्या कुटुंबांकडे दोघांना घेऊन गेलो. त्यांना काही सूचना दिल्या आणि जण्यासाठी दाराकडे वळलो आणि अच्छा करण्यासाठी मुलांकडे पाहिले. मोठय़ाने नेहमीप्रमाणे हसून अच्छा केला, पण लहान मुलाचे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. ओठ हुंदका आवरण्यासाठी दुमडले होते, त्याच्या नजरेत मला अगतिकता, कारुण्य आणि आणखी काही भावांचे असे काही मिश्रण दिसले की माझा पाय तेथून निघता निघेना. अपराधी भावना मन कुरतडू लागली. तेव्हापासून शाळेत निघालेल्या अगदी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे धर्य मला होत नाही. माझ्या मुलाचे ते लाचार, अगतिक आणि केविलवाणे डोळे मला त्या लेकराच्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मी कोणा लहान मुलाचा कायम अपराधी आहे ही भावना मला कुरतडू लागते.
अशा कधी काळी माझ्या नजरेस पडलेल्या, माझा तिरस्कार, धिक्कार आणि माझ्यावर अविश्वास दाखविणाऱ्या नजरा माझा नेहमीच पाठलाग करीत असतात. कारणपरत्वे त्या परत दिसताच मला अस्वस्थ करून सोडतात. त्यांच्या नुसत्या आठवणीही मला हादरवून टाकतात.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hard words