ट्रेक करायचा म्हटलं की आपोआप हरिश्चंद्रगडाचं नाव घेतलं जातं. त्यामुळे तिथे ट्रेकर्सची जणू काही जत्राच असते. अट्टल भटक्यांना सह्य़ाद्रीचं रौद्रभीषण सौंदर्य अनुभवताना अशी गर्दीही टाळायची असते. अशा भटकंतीतून साकारलेला हा हरिश्चंद्रगडाच्या परिसरातला आगळावेगळा ट्रेक..

lp61थंडीचा पारा प्रत्येक क्षणागणिक वाढतच चाललाय. आकाशात लाखो ग्रहताऱ्यांचं संमेलन भरलंय. कुणी त्यातले गुरू, शुक्र, सप्तर्षी, मृग नक्षत्र ओळखून आम्हालाही खगोलशास्त्राची सैर करून आणतोय. कोणी सह्य़ाद्रीतल्या थरारक चढाईचे अनुभव सांगतोय, तर कोणाला भुताखेतांच्या गप्पांचा आग्रह केला जातोय. हरिश्चंद्राच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या अजस्र कडय़ांनी पाठीमागे फेर धरलाय, त्याचं रौद्र रुप मिट्ट काळोखातही स्पष्ट जाणवतंय, पाचनईमधल्या आमच्या तुकाराम भोईरच्या हक्काच्या ओसरीवर वीस ‘अट्टल आणि सराईत’ डोंगरभटक्यांची ही हळूहळू रंगू लागलेली मैफील पाहून कोणालाही हेवा वाटला असता.
मायबोलीच्या भटक्या लेखकांचं सालाबादप्रमाणे भरलेलं स्नेहसंमेलनही त्याच्या स्थळाप्रमाणेच भन्नाट होतं. अजय ढमढेरे काकांच्या शब्दात ‘हरिश्चंद्राचे उपग्रह’ म्हणावेत अशा नगर जिल्ह्य़ातल्या, सह्य़ाद्रीचा अर्क दाखवणाऱ्या तीन किल्ल्यांची झालेली निश्चिती हीच आमची उत्कंठा वाढवायला कारणीभूत होती. शिरपुंजे ऊर्फ आंबीतचा भैरवगड, कोथळ्याचा भैरोबा दुर्ग आणि हरिश्चंद्राशेजारचा काहीसा उपेक्षित असणारा कलाडगड यांचं दर्शन आणि भक्कम ट्रेकर्सची साथ हाच या ट्रेकचा ‘यूएसपी’ होता. शनिवार उजाडताना शिरपुंज्यात पोहोचलो तेव्हा पूर्वेचं दार नुकतंच उघडून लालबुंद लोहगोलाने काही सोनेरी कवडसे अभिषेक म्हणून भैरोबाच्या अनगड राऊळावरही टाकले. तीन कातळकडय़ांचा मिळून बनलेल्या भैरवगडाच्या मधल्या आणि उजवीकडच्या कातळकडय़ाच्या मधोमध एका गुहेत भैरोबा वसलाय. शिरपुंज्यातूनही त्याची ती गुहा, बाहेरची रेलिंग्ज् आणि गुहेची ओळख पटवून देणारे झेंडे स्पष्ट दिसत होते.
   हा भैरोबा म्हणजे पंचक्रोशीचं श्रद्धास्थान. कमानीवरच्या फोटोत दिसत असल्याप्रमाणे खरं तर गडावर खंडोबा वसलाय. पण त्याला आणि पुढे या गडाला भैरवगड कोणी केलं कुणास ठाऊक!
शिरपुंज्यातून गडावर जाण्यासाठी प्रशस्त वाट आहे. खरंतर राजमार्गच! भैरोबाच्या भक्तांनी सह्य़ाद्रीच्या भक्तांसाठी तयार केलेला. गडाचा ऐंशी टक्के भाग चढून झाला की ग्रामस्थांनी दरीच्या कडेला संरक्षक रेलिंग्ज् लावली आहेत. गडाच्या मार्गावर कुणा अनामिक कारागिराने कातळात खोदलेल्या पायऱ्या आपला मार्ग सुकर करतात. शेवटच्या नाळेतली खडी चढण सकाळच्या थंडाव्यामुळे आणि गडाच्या कडय़ांनी दिलेल्या सावलीमुळे सुसह्य़ होते.

Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
Traffic jam on both lanes due to track closure on highway
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
Leopard Buldhana, Reunion of Mother Leopard ,
बुलढाणा : बिबट माता आणि हरवलेल्या पिल्लाची पुनर्भेट
tiger Karhandla , Karhandla Sanctuary,
VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…
Ashish Deshmukh raid illegal sand, Ashish Deshmukh,
VIDEO : अवैध वाळू व सुपारी तस्करांवर आमदाराकडून छापा, नागपुरातील केळवद परिसरात…
vulture released from tadoba andhari tiger reserve traveled 4000 kilometers reached tamil nadu
पाच राज्ये अन् चार हजार कि.मी.चा प्रवास; ताडोबातील गिधाड तामिळनाडूत

lp64शिरपुंज्यातून निघाल्यापासून तासाभरात आम्ही भैरवगडाच्या शेजारच्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो आणि डोळे विस्फारणारं दृश्य समोर आलं. मुळा खोऱ्यात हरिश्चंद्राच्या सभोवार फेर धरलेल्या किल्ल्यांनी, सुळक्यांनी आणि अफाट पसरलेल्या डोंगरांनी जो काही नजारा पेश केला त्याच्यासाठी शब्दच थिटे पडावेत. कलाडगड, न्हाप्ता, कलाडचा अंगठा, कोंबडा सुळका, कोथळ्याचा भैरवगड आणि असे कितीतरी. ह्य़ा सगळ्यावर कडी करणारा सह्य़ाद्रीचा अनभिषिक्त सम्राट, साक्षात हरिश्चंद्रगड मुळा खोऱ्यातल्या सह्य़ाद्रीच्या लोभस रूपाचं एखाद्या इतिहासपुरुषाप्रमाणे रक्षण करत होता. त्याचा बालेकिल्ला, तारामती शिखर, टोलारखिंड, वेताळधार, रोहिदास शिखर आणि पश्चिमेकडे अनादी अनंत काळापासून ठाण मांडून बसलेला कोकणकडा हे दृश्य वर्णनाच्या पलीकडचंच.

lp62भैरवगडाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात खणखणीत अशा पायऱ्या असून त्या चढून आलो की गडाचा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दरवाजा आहे. त्याच्या कमानीच्या बुरुजांनीच काय ते गडाचं गडपण राखलंय. भैरवगडच्या विस्तीर्ण पठारावर आमचं पाऊल पडल्याक्षणीच त्याचा दुर्गमपणा नजरेत भरला. दरवाजातून थोडीशी उजवीकडे गेलेली वाट भैरोबाच्या गुहेकडे घेऊन जाते. शिरपुंज्याच्या अनवट दुर्गरत्नाने आपल्या माथ्यावर पाण्याची असंख्य टाकी धारण करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याची अनेक जोडटाकी भैरवगडावर आहेत, ह्य़ातल्या काही टाक्यांचं पाणी चवीला बरं तर काही पचनसंस्थेशी प्रतारणा करणारं.
शिरपुंजे गावाच्या माथ्यावर असलेल्या कडय़ाच्या एका नैसर्गिक गुहेत भैरोबाचं ठाणं आहे. दोन दालनांच्या गुहेतील एका दालनात खंडोबाची कमालीची देखणी मूर्ती तर त्याच्या शेजारच्या दालनात चार-पाच लोक झोपू शकतील एवढी जागा. गुहेच्या बाहेरच्या बाजूला जवळपास अर्धा पुरुष उंचीचे वीरगळ आहेत. काहींवर देव-देवतांची चित्रं कोरलेली आहेत, तर काहींवर काही प्रसंग कोरलेले आहेत.

lp63गुहेपासून समोर थोडक्या उंचीचा गडमाथा आहे. माथ्याकडे जातानाही पाण्याची काही टाकी आहेत, पण त्यापैकी खांबटाकं म्हणजे अमृतकुंभच. टाक्यापासून समोर दिसणारा गवताळ गडमाथा आणि त्याची पाठराखण करणारा शिंदोळा डोंगर म्हणजे लाजवाब. खांबटाक्यापासून पाचव्या मिनिटाला गडमाथा गाठला तेव्हा पश्चिमेकडची हरिश्चंद्र रांग बऱ्यापैकी स्पष्ट झाली होती. भैरवगडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक झेंडा आणि त्याच्या थोडंसं पुढे काही खांबटाकी आहेत.
अकराला शिरपुंजे गावात परतलो तेव्हा ऊन भाजून काढत होतं. आंबीत-शिसवद मार्गे भैरोबा दुर्गाच्या पायथ्याचं कोथळे गावा जवळ आलो. गडाच्या पायथ्याला टोलार खिंडीची दिशा दाखवणारी पूर्णपणे गंजलेली पाटी आहे. त्याच्याच शेजारी वनखात्याने गडाचा मार्ग दाखवणारा दिशादर्शक फलक बसवला आहे. भैरोबा दुर्ग कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्याच्या कक्षेत येत असल्याने आणि हा भैरोबा पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असल्याने वन खात्याने गडावर आवश्यक सोयी केल्या आहेत.
भैरोबा दुर्गाची वाटही ठसठशीत आणि प्रशस्त. पायवाटेपासून ते अगदी गडमाथ्यापर्यंत निबिड जंगल आहे. इथली गूढ शांतता भंग केली ती एका अनामिक फडफडीनं. डोळ्याची पापणी लवायच्या आत एक पांढरी आकृती उडत गेली. भटकंतीतलं अक्षरश: ‘स्वर्गसुख’ म्हणावं असा पांढराशुभ्र स्वर्गीय नर्तक (पॅराडाईज फ्लायकॅचर) आमच्या समोरच्या एका फांदीवर आपली लांबलचक शेपूट खाली सोडून निवांत बसला होता. हा अत्यंत लाजरा पक्षी नजरेस पडल्यास तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कुणीही नाही! भैरोबा दुर्गाची चढण आता त्याच्या कातळकडय़ाच्या पोटाशी घेऊन जात होती आणि त्याच्या जंगलाचं देखणेपण वाढतच जात होतं.
भैरोबा दुर्गाच्या कातळकडय़ाच्या पोटात दोन गुहावजा पाण्याची टाकी आहेत. वनविभागाने इथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी दोन लोखंडी जिनेसुद्धा बसवले आहेत. गडाच्या शेवटच्या टप्प्यातील घळ पार करताना खोदीव पावटय़ा लागतात आणि हा किल्ला असल्याची जाणीव होते. गडाची शेवटची शिडी चढण्याच्या आधी त्या शिडीच्या पायथ्याला थंडगार पाण्याचं खोदीव टाकं आहे. वरून शेवाळलेलं तर आतून थंडगार, श्रमपरिहार करणारं. वनविभागाने त्याची रसिकता सिद्ध करत इथेच दोन लोखंडी बाकं बसवली आहेत. ही भैरोबा दुर्गावरची सर्वात सुंदर जागा म्हणावी लागेल. कातळकडय़ाच्या थंडगार सावलीत बसून समोरच्या सह्य़रांगांचं असीम दृश्य न्याहाळतानाचा आनंद काही औरच.
नव्वद फुटांची शिडी चढून गेलो की आपला गडावर प्रवेश होतो. गडाच्या समोरच उभी ठाकली आहे हरिश्चंद्राची भव्य वेताळधार. जणू काही भैरोबा दुर्गाला कुशीत घ्यायला निघालेली. गडाच्या माथ्याच्या मधोमध भैरोबाचं उघडय़ावरचं देवस्थान, त्याच्यासमोर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि दोन दगडी दीपमाळा. पण इथून ३६० अंशात दिसणाऱ्या सह्य़ाद्रीच्या रौद्र रांगा बघताना आम्ही सुखावलो. पूर्वेकडे कुंजरगड ऊर्फ कोंबडकिल्ला, त्याच्या डावीकडे बाळूबाई डोंगर, दक्षिणेकडे अजस्र असा कारकाई पर्वत, पश्चिमेकडे हरिश्चंद्रगड व टोलारखिंड, उत्तरेकडे शिरपुंज्याचा भैरवगड, बेभान पसरलेला घनचक्कर डोंगर व त्याची मुडा-गवळदेव ही शिखरं आणि दूरवर पाबरगड. बास, पैसा वसूल! भैरोबा दुर्गाच्या पश्चिमेकडे पाण्याची जोडटाकी असून त्या धारेच्या शेवटी काळ्या पाषाणातील भक्कम तटबंदी उभारली आहे. भैरोबा दुर्गाला खेटून उभ्या असलेल्या छोटय़ाशा टेकडीला कुणा अनामिक भाविकाने ‘देवाचा गाढव’ असं नाव दिलंय. भैरोबा दुर्ग म्हणजे देवाचा रथ आणि तो ओढणारा हा गाढव! या अचाट कल्पनाशक्तीला मानाचा मुजरा!!
भैरोबा दुर्गाची फेरी ही फार तर अध्र्या तासाची पण मनाचं समाधान म्हणाल तर ब्रम्हांडाएवढं. त्याची जागा, परिसर, वरून दिसणारा सह्य़ाद्रीचा मुग्ध नजारा म्हणजे केवळ अप्रतिम. प्रसन्न मनाने कोथळे-पाचनई रस्त्यावरच्या लव्हाळी गावात पोहोचलो आणि आमच्या नंदू भांगरेच्या अन्नपूर्णेच्या हातचं अत्यंत स्वादिष्ट जेवण जेवलो. लव्हाळी गावाचं ‘लोकेशन’ म्हणजे निसर्गचित्रात शोभावं असंच. इथे एखादा मुक्काम सवड काढून करायलाच हवा.
तळपत्या भास्कराची रखरख कमी झाली तेव्हा आम्ही पाचनईच्या वाटेला लागलो. लव्हाळी-पाचनई घाटामध्ये एक क्षण असा आला की आम्ही स्वत:ला रोखूच शकलो नाही आणि जगाचाही विसर पडावा असं दृश्य डोळ्यात भरलं. सूर्यास्ताच्या समयी झालेल्या सप्तरंगांच्या रंगपंचमीमध्ये मुळा खोरं अक्षरश: न्हाऊन निघालं होतं. कलाडगड, कलाडचा अंगठा, कुमशेतचा कोंबडा, न्हाप्ता सुळक्यांची जोडगोळी आणि सर्वात शेवटी आजोबा डोंगर, सारं काही अवर्णनीय!
पाचनईत पोहोचताना मात्र पूर्ण अंधार पडला होता. तुकाराम भोईरने नेहमीच्याच प्रेमाने स्वागत केलं. त्याच्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात भटक्यांची मैफील उत्तरोत्तर रंगू लागली. बाराच्या ठोक्याला काहींच्या डोळ्यांनी साथ सोडल्यामुळे तर काहींनी उद्या सकाळी झोप पूर्ण न होण्याच्या भीतीने अंथरूणात धाव घेतली. आजचा दिवसच साला भन्नाट होता.
पाचनईमधला रविवार उजाडला तोच मुळी डोळ्यांसमोर कलाडगडाची दृश्यं घेऊन. पाचनईमधल्या बादड, भारमलांच्या अंगणात गाडय़ांची संख्या वाढू लागली. हरिश्चंद्रावर आजही ‘जत्रा’ भरणार ह्य़ाचा हा पुरावा. आम्ही मात्र त्या पुरात वाहून जाणार नव्हतो, या विचारानेच सुखावलो. तुकारामच्या अंगणातूनच उत्तरेकडे कलाडगड आणि न्हाप्त्याची दुक्कल नजरेस पडत होती, धडकी भरवत होती. ‘‘जाताना ती पाप-पुण्याची कुंडं बघून या बरं का!’’ इति तुकाराम. पाप-पुण्याची कुंड? असेल बुवा!!
पाचनईमधून कलाडगड पायथ्याच्या पेठेच्या वाडीकडे नेणारा नऊ किलोमीटर्सचा डांबरी रस्ता हळूहळू घाटाची वळणं चढू लागला. पण स्वत:चं वाहन असेल तर कलाडगड चढण्यासाठी पेठेच्या वाडीत जाण्याची काहीच गरज नाही. पेठेच्या वाडीकडे जाताना रस्त्याच्या मधूनच एका झाडाखालून गडाची प्रशस्त पायवाट गेली आहे. पण स्थानिक माणूस सोबत नसेल तर ती सापडणं केवळ अशक्य.
कलाडगडाची चढण प्रशस्त, सोपी तरीही अत्यंत खडी व काही ठिकाणी घसरगुंडी उडवणारी. जाताना वाटेत गडाच्या पायऱ्यांनाच शेंदूर फासून त्यांना देवपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तास-सव्वा तासात गडाच्या शेवटच्या टप्प्यातील भक्कम पायऱ्यांना सुरुवात झाली.
शेवटच्या टप्प्यात कलाडच्या कातळात खोदलेल्या अरुंद अशा खोदीव पावटय़ांचा जिनाच आहे. तिरक्या रेषेत त्या वर सरकल्याने आणि खाली शेकडो फूट दरी आ वासून उभी असल्याने क्षणभर काळजाचे ठोके चुकले आणि ‘होल्ड’ वरची पकड थरथरली. पण सह्य़ाद्रीच्या या वैशिष्टय़ाला स्मरून हा जरासा कठीण टप्पाही लीलया पार झाला आणि कलाडगड माथ्यावर प्रवेशलो. माथ्यावर उजवीकडे भैरोबाचं गुहावजा स्थान आहे. आमच्या या भटकंतीतला हा तिसरा भैरोबा. आधीच्या दोघांप्रमाणे अनगड जागी वसलेला. आमच्याबरोबरचे पाचनईचे भारमलमामा या भैरोबाच्या दर्शनासाठी कलाडगडाच्या वाटेवरच्या पायाला बोचणाऱ्या दगडगोटय़ांतून, काटय़ाकुटय़ांतून आणि तापलेल्या कातळावरून अनवाणीच आले होते.
कलाडगडचा सर्वोच्च माथा उजवीकडे ठेवत आणि डावीकडच्या खोल दरीचा मान राखत अरुंद निसरडय़ा पायवाटेने गडाच्या पश्चिमेकडच्या सोंडेवर पोहोचलो. स्वागतासाठी सुरुवातीलाच थंडगार पाण्याचं टाकं. याच सोंडेवर पुढे एक छोटीशी घुमटी अन् त्याच्यासमोर शेंदूर फासलेले दगड आहेत. त्यांना दंडवत घालून कलाडगडाच्या सोंडेच्या शेवटी पोहोचलो. स्वर्गानुभूती!
सह्य़ाद्री नावाच्या जादूगाराने अगदी ‘फुरसत मे’ तयार केलेला हा प्रदेश. ३६० अंशातलं बेभान दृश्य वेड लावून गेलं. अजस्र, राकट, रौद्र, भीषण, अफाट, बुलंद, बेलाग.. आता शब्दच सुचत नाहीयेत. ईशान्येकडे सिंदोळा डोंगर, घनचक्कर, शिरपुंज्याचा भैरवगड, पाबरगड त्याच्याच पुढे उत्तरेकडे कात्राकडा, करंडा, गुहीरीचे दार, आजोबा, पाथरा घाट, खाली कुमशेत गाव, वाकडी सुळका, बुधला, माळ डोंगर, वायव्येकडे कुमशेतचा कोंबडा, न्हाप्ता आणि पश्चिमेकडे हरिश्चंद्राचं एकेक अंग.. बालेकिल्ला, तारामती शिखर, टोलारखिंड, वेताळधार, रोहिदास शिखर, सादडे घाट, त्यापाठीमागे भोजगिरी, दौंडय़ा आणि अस्पष्ट दिसणारा निमगिरी. कलाडला खेटून शिवपिंडीसमोर बसलेल्या नंदीप्रमाणे दिसणारा कलाडचा अंगठा आणि कलाडच्या उत्तर पायथ्याचं टुमदार पेठेची वाडी गाव. आहाहा.. डोळ्यांसाठी जणू सह्य़ाद्रीने पेश केलेली मेजवानीच. आमचा जवळपास अर्धा तास नि:शब्द गेला हे आम्ही त्या सह्य़विश्वात हरवल्याचं मूर्तिमंत उदाहरण.
कलाडच्या माथ्यावर ना बुरुज, ना तटबंदी, ना दरवाजे, ना कोणा अनाम गडकऱ्याचे जोते. थोडक्यात कोणतंही गडपण नाही! पण माथ्यावरून दिसणारं सह्य़ाद्रीचं वेगळेपण मात्र शब्दांच्या विचारांच्या आणि भावनांच्या परिसीमा ओलांडून जाणारं. बघताक्षणी भावणारं, चिरकाल स्मरणात राहणारं. आजही हे वर्णन करताना ते दृश्य जसंच्या तसं डोळ्यांसमोर उभं राहिलंय..
अंगावर शहारा आणतंय!
दोन दिवसांत हरिश्चंद्राच्या परिघातल्या या तीन अनवट आणि अनगड किल्ल्यांची सफर अनोखीच होती. पंचक्रोशीसाठी ही भैरवाची ठाणी पण आमच्यासाठी मात्र सह्य़ाद्रीतील श्रद्धास्थानं! सोबत असणारे दर्दी भटके आणि सह्य़ाद्रीतला बेभान करणारा माहोल. एका परिपूर्ण भटकंतीसाठी अजून काय हवं!!!

Story img Loader