‘कळलं.??’ अशा कणखर आवाजात समोरच्याला दरडावणारी अक्कासाहेब ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरांत पोहोचवली ती हर्षदा खानविलकर या अभिनेत्रीने. त्यांच्याशी बातचीत.
० ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सतत सव्वाचार र्वष लोकप्रिय आहे. याबद्दल काय सांगाल?
– एखादी मालिका सुरुवातीपासून सलग इतकी र्वष लोकप्रिय राहण्याचं प्रमाण कमी आहे. ‘पुढचं पाऊल’ ही त्यापैकी एक मालिका असल्याचा खूप आनंद आहे. मालिकेच्या लोकप्रियतेत सातत्य आहे. तसंच जिथून मालिका सुरू झाली होती त्यापलीकडे ती कधी गेलेली नाही. त्यात एका कुटुंबाची गोष्ट आहे, तीच आजवर दाखवण्यात आली आहे. त्याच कुटुंबात घडणाऱ्या घटना दाखवल्या जाताहेत. मालिकेतल्या अख्ख्या कुटुंबाची प्रेक्षकांशी बांधीलकी असल्यामुळेच मालिका इतकी लोकप्रिय आहे.
० अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा नायिकेइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रस्थापित झाली आहे.
– ही मालिका सासू-सून या नात्यावर आधारित आहे. पण, ही गोष्ट कल्याणीचीच होती. कल्याणी लग्न करून ज्या कुटुंबात येते त्या कुटुंबाची, तिथल्या माणसांची गोष्ट आहे. त्यात तिची वेगवेगळी नाती दाखवली आहे. सासू-सुनेची कथा असल्यामुळे सासू सुनेला छळणार, सून ते सहन करणार, असं वाटत होतं. पण, असं काहीही न घडता गोष्ट वेगळ्या वाटेने पुढे जात राहिली. दोन्ही व्यक्तिरेखा वेगळ्या ठरल्या. सासू-सुनेचं नातं आई-मुलीसारखं असावं असं आपण नेहमी बोलतो पण, ‘पुढचं पाऊल’मुळे ते प्रत्यक्षात दिसायला लागलं असं मला वाटतं. चार र्वष ती मालिका त्या नात्यावर उभी केली गेली. अर्थातच कल्याणी या व्यक्तिरेखेमुळे अक्कासाहेबही मोठी होते. अक्कासाहेबांचा आब, रुबाब स्क्रीनवर दिसला पाहिजे याविषयी सगळेच आधीपासून ठाम होते. कोल्हापूरच्या सरदेशमुख कुटुंबातील सगळ्यात मोठी स्त्री भारदस्त, खूप श्रीमंत असेल, असा विचार होता. अक्कासाहेबांच्या यशामागे दोन गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. एक म्हणजे लुक आणि दुसरं म्हणजे अक्कासाहेबांचे संवाद. प्रोडक्शन टीममधल्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. सगळ्यांनी मिळून अक्कासाहेब प्रस्थापित केली आहे.
० नेहमी कणखर व्यक्तिरेखा करण्याकडेच कल असतो का?
– माझ्याकडे बघून मला सोशीक भूमिका द्यायला कोणी पुढे येत नाही, असं मला वाटतं.
० पण, सौम्य, सोशीक, शांत अशा व्यक्तिरेखेची विचारणा झाली तर?
– मला जर सोशीक भूमिका मिळाली तर मी करेन. प्रत्येक एपिसोडमध्ये मला जर रडायचं असेल तर माझी हरकत नाही. पण, त्या रडण्याला एक कारण पाहिजे. त्यामागे काही तरी लॉजिक हवं. सोशीक भूमिका करताना मला आतापेक्षा थोडा जास्त अभ्यास करावा लागेल हे खरंय. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सुरू झाली तेव्हा आमचे सुरुवातीचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी खऱ्या अर्थाने अक्कासाहेब उभी केली. त्यांना जशी अक्कासाहेब दिसत होती तशी मी साकारण्याचा प्रयत्न केला. मी ‘डिरेक्टर्स अॅक्ट्रेस’ आहे. मी सवयीने अभिनेत्री झाली आहे. अनेक जण लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघतात. मग ते एकांकिका, नाटक, शिबिरं करतात. तसं माझं कधीच झालेलं नव्हतं. मी चुकून झालेली अभिनेत्री आहे. सुदैवाने मला एकामागे एक चांगली कामं मिळत गेली. नशिबाने आणि इंडस्ट्रीतल्या काही लोकांच्या संपर्कामुळे गेली १७-१८ र्वष मी इंडस्ट्रीत टिकून आहे.
० चुकून झालेली अभिनेत्री म्हणजे?
– करिअरमध्ये काय करायचं हे मला अजिबात माहीतच नव्हतं. माझं काहीच ठरलेलं नव्हतं. माझ्या आईला वाटत होतं की, मी वकील व्हावं. म्हणून मी रुपारेल कॉलेजमध्ये लॉसाठी अॅडमिशन घेतलं. मला रोज वेगळं व्हायचं असायचं. एखाद्या दिवशी अभिनेत्री, कधी एअर हॉस्टेस, तर कधी पोलीस. पण, एक गोष्ट मला नक्की करायची होती, ते म्हणजे लग्न. तरुण असताना तेच डोक्यात होतं की, मोठं झाल्यावर काय लग्न करायचंय. करिअर हे माझं प्राधान्य कधीच नव्हतं. रुपारेलला असताना मला एका नाटकाची ऑफर आली. ते करताना आणखी काही कामांसाठी कुलदीप पवार यांनी माझं नाव सुचवलं. तिथून माझ्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. इतरांकडे बघून मी अभिनय शिकत आले आहे.
० मालिकांच्या भरपूर तास आणि दिवसांच्या शूटमुळे कलाकारांना ब्रीदिंग स्पेस मिळत नाही असा सूर असतो. तुम्हाला हे पटतं का?
– मला तरी ते त्रासदायक वाटत नाही. खरंतर कलाकार खूप कमी वेळ काम करतात. स्क्रिप्ट लिहून येते, मेकअप, हेअर करणारे आजूबाजूला असतात. चहा-कॉफी हवं-नको बघणारेही असतात. कलाकारांनी नेमकं काय करायचंय हे सांगणारेही लोक तिथे असतात. अर्थात कलाकाराचं काम सोपं नक्कीच नसतं. कारण तेवढय़ाच भावनेने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं. पण, त्यामागे इतरांचंही योगदान जास्त असतं. म्हणायला बारा तास असतात, पण वास्तविक कलाकार तेवढे सगळे तास काम करत नाहीत, आणि मला वाटतं की, मी माझं काम एन्जॉय करत असेन तर मला ते तास मोजावे लागणार नाहीत. आम्ही डेली सोपमध्ये काम करतो. रोज तेच काम असतं. त्यामुळे आम्हीच ते काम एन्जॉय केलं नाही तर ते चेहऱ्यावर कसं आणणार.
० तेचतेच करत राहिल्यामुळे सॅच्युरेशन येत नाही का?
– सॅच्युरेशन येणं, न येणं हे आपल्या मानण्यावर आहे. मी आज एक सीन करते. उद्या ती गोष्ट पुढे गेलेली असते. मग गोष्ट तीच असली तरी दुसरा सीन करते. त्यामुळे मला कंटाळा येत नाही. एक उदाहरण देते. एखादी गणिताची शिक्षिका रोज गणितच शिकवणार. पण, ती रोज वेगवेगळ्या इयत्तांना वेगवेगळी गणितं शिकवते. रोज एकच गणित शिकवत नाही. तसंच डेली सोपचंही आहे. रोज एकच शो जरी करत असले तरी वेगवेगळे प्रसंग शूट करतेय. ते एन्जॉय करायला हवं. त्यातली गंमत शोधणं कलाकाराचं काम आहे.
० हिंदीत प्रस्थापित व्हावंसं वाटलं नाही का?
– इतकी र्वष हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमधल्या मालिकांमध्ये काम करत आले. पण, ‘अस्तित्व एक प्रेमकहानी’ ही मालिका वगळता हिंदीमध्ये म्हणावी तशी माझ्या वाटेला कुठली मालिका आली नाही. जी लोकप्रियता, ओळख मराठी मालिकांमुळे मिळाली तसं हिंदीत दुर्दैवाने काही कारणास्तव झालं नाही. आता या मालिकेमुळे मराठीमध्येही दुसरं काम करायला पुरेसा वेळ नाही. कारण मालिकेत तुमच्या भूमिकेची लांबी मोठी असेल तर महिन्याचे पंचवीस दिवस काम करावं लागतं. पण, ‘पुढचं पाऊल’नंतर काही तरी वेगळं आलं तर करायला आवडेल.
० मालिकेची लांबी किती असावी?
– ठरावीक एपिसोडच झाले पाहिजेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. कलाकार चांगलं काम करत असतील, लेखक उत्तम कथा लिहीत असेल, दिग्दर्शक त्यातून काही चांगलं शोधत असेल; तर त्यातून उत्तमच कलाकृती निर्माण होणार, अशी मालिका सुरू ठेवायला काय हरकत आहे. परदेशी मालिकाही दहा-दहा र्वष चालू असतात. फरक इतकाच त्या सीझनप्रमाणे सुरू असतात. आपल्याकडे गोष्ट सलग असल्यामुळे त्याची लांबी जास्त वाटते.
० आता मालिका करत असतानाच कलाकार सिनेमा-नाटकांकडेही वळू लागले आहेत. तुम्हाला असं करावंसं नाही वाटलं कधी?
– अक्कासाहेब ही मध्यवर्ती भूमिका असल्याने साधारणत: मी सगळ्या सीनमध्ये असते. ‘पुढचं पाऊल’साठी मला किमान पंचवीस दिवस शूट करावं लागतं. अशा वेळी माझा चाहता वर्ग आहे किंवा मी अक्कासाहेब म्हणून लोकप्रिय आहे म्हणून मी जर वेगवेग़ळे प्रयोग करून बघायला हवेत असं मला वाटत नाही. मी असं केलं तर माझ्यामुळे मालिकेच्या शूटचं सगळं वेळापत्रक कोलमडेल. फक्त माझ्यासाठी नाइट शिफ्ट लावावी लागेल, जे मला पटत नाही. मालिकेसाठी माझी गरज जर पंचवीस दिवस आहे तर मी दुसरं प्रोजेक्ट करणार नाही. कारण नाटक घेतलं तर त्याचे महिन्यातून पुरेसे प्रयोग व्हावे लागतील आणि जर मी ते करू शकणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. दोन्ही हाताशी घेऊन एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय असं झालं तर ते योग्य नाही. पण, काही जण मालिका करून नाटक-सिनेमा करतात तर त्यांचे शूटचे दिवस कमी असावेत आणि त्यांच्या वेळा जमून येत असतील, असं मला वाटतं.
० आत्ताच्या मालिकांविषयीचं तुमचं काय मत आहे?
– मी हिंदी-मराठी मालिकांसह अनेक परदेशी मालिकाही बघते. सगळीकडे वेगवेगळे चांगले प्रयोग होताना दिसताहेत. एकूणच मनोरंजन क्षेत्र प्रगती करतंय असं लक्षात येतं. मी या क्षेत्राचा छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे.
० आवडती मालिका कोणती?
– आमच्याच प्रोडक्शन हाउसची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका आवडते. एकता कपूरच्या ‘ये है महोब्बते’ या मालिकेचा विषय आवडतो, संपूर्ण मालिका आवडत नसली तरी त्यातल्या नवरा-बायको या व्यक्तिरेखा खूप भावतात. ‘तू मेरा हिरो’ या मालिकेतली आळशी नायकाची व्यक्तिरेखा मस्त वाटते. काही परदेशी मालिकाही आवडतात.
० वेशभूषा करण्यातही तुम्हाला रस आहे.
– शृंगार हा माझा आवडीचा विषय. काही वर्षांपूर्वी ‘बेधुंद मनाच्या लहरी’ या मालिकेपासून वेशभूषा करायला सुरुवात केली. मग तिथून हा प्रवास सुरू झाला. आता मालिका करताना त्याकडे फार वळता येत नाही. पण, काही सिनेमांसाठी जमेल तसं करत असते. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ या दोन सिनेमांसाठी वेशभूषा केली होती. आगामी ‘तू ही रे’ या सिनेमासाठीही वेशभूषा केली आहे.
० पुढचे प्रोजेक्ट्स?
– सध्या मालिकेमुळे दुसरं काही करू शकत नाही. पण, नंतर वेळ मिळेल तसं मी वेशभूषेत काम करेन. एखादं छान नाटक करायला आवडेल. कारण नाटक करण्यासाठी पुरेसा वेळ हवा. त्याची तशी तालीम व्हायला हवी, आणि नाटक करणारच असेन तर त्याचे भरपूर प्रयोगही करायला आवडतील.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com