उन्हाळा पूर्णपणे संपलेला नाही आणि पावसाळा पूर्णपणे सुरू झालेला नाही असा उंबरठय़ावरचा महिना म्हणजे जून. या महिन्यामध्ये आपण आपल्या प्रकृतीची काळजी कशी घ्यावी?
जून महिन्यासंबंधी काही कमी-जास्त लिहावयाचे म्हटले की ‘जून’ या महिन्याच्या स्पेिलगमधल्या खवठए यानी ‘जुने’ या शब्दाची तसेच ‘जुने ते सोने’ या म्हणीची किंवा जून म्हणजे दणकट, रुंद बांध्याच्या चिंचेसारख्या वृक्षांची आठवण होते. गेला महिनाभर तुम्ही- आम्ही कमीत कमी अक्षरे असलेल्या, पण महाप्रचंड वैशाख वणव्याचा ‘मे’ महिन्याचा उन्हाळय़ाचा अनुभव घेतला. सामान्यपणे मे महिन्यात शेवटी शेवटी १-२ वळवाचे पाऊस पडतात व मग ‘आम्ही जून महिन्यापासून चार महिने मुक्कामाला येत आहोत,’ असा श्री वरुणराजाचा आगाऊ संदेश देतात. एप्रिल, मेपासूनच जसजसे हवामानातील दिवसाचे तापमान ३५-३६ पासून ४०-४२ अंश से. पर्यंत वाढत जाते तसतसे आपण जून महिन्याकडे आपली दृष्टी लावून बसतो व एकदाचा मघा नक्षत्राचा पाऊस ५ जून गुरुवारी ‘केव्हा येतो,’ ‘केव्हा भिजवतो’ याची वाट पाहतो.
जून महिन्याची ५ तारीख मोठी प्रेरणा देणारी आहे. ‘मेरी झांशी नही दूंगी!’ अशी घोषणा करून, त्या घोषणेबरहुकूम प्राणार्पण करणाऱ्या झाशीच्या राणीचा पुण्यतिथी दिवस आहे. त्याअगोदर १ जून रोजी शिखांचे गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिन साजरा होतो. ५ जून हा दिवस जगभर ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. अलीकडे जगभर पृथ्वीवरील वाढते तापमान, घसरलेले पावसाचे प्रमाण, जंगल व वनसंपत्तीचा विध्वंस याबद्दल लहानशा शेतकरी बांधवांपासून ते थेट थोर थोर नेत्यांना खूप काळजी लागून राहिली आहे. या जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने नुसतीच ‘झाडे वाचवा’ ही माहीम पुरेशी नाही. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा अशी सार्वत्रिक हिरवाईची मोहीम आबालवृद्धांनी ठिकठिकाणी हातात घ्यावयास हवी. जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही-आम्ही, आपल्या बालगोपालांसह, आपल्या आसपास, कुंडीत प्लॅस्टिक छोटय़ा पिशव्यांत, ओसाड जमिनीत, विविध रस्त्यांतील कंपाऊंडवर जी झाडे नव्याने लावू ती वरुणराजाच्या कृपेने वाढणार, बहरणार! आपल्या आसपास आपण लावलेल्या रोपटय़ांची, झाडाझुडपांची वाढ हा एक मोठाच निर्मळ आनंद असतो. तो आपण कुटुंबाबरोबर शेजारी- पाजाऱ्यांबरोबर साजरा करावा. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘वृक्षवल्ली सोयरे, आम्हा वनचरे’ हा संत तुकोबारायांचा सांगावा प्रत्यक्षात अमलात आणू या.
शिवरायांचा राज्याभिषेक दिन यंदा ११ जूनला येत आहे. एक गमतीदार विरोधाभास असा की त्यांचे थोर सुपुत्र धर्मवीर संभाजीमहाराज यांची जयंती १० जूनला येत आहे. ‘फैला है वटपादप विशाल..’अशी थोर राजनीती पुरुष व प्रसिद्ध हिंदी कवी श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची हिंदी कविता भारतीय संस्कृतीत ‘वड’ याबद्दल खूप खूप प्रेरणादायक सांगून जाते. वटपौर्णिमा १२ जूनला आहे. ‘कहत कबीर, सुनो भाई साधो’ असे सोप्या सोप्या हिंदी भाषेत तुम्हा आम्हाला सदाचरणाचे धडे देणाऱ्या संत कबीरांची १३ जूनला जयंती साजरी करू या!
‘‘कण कण चुनके महल बनाया, ना घर तेरा, ना घर मेरा, पंछी का एक सवेरा!’’ अशासारखे सोपे सोपे मार्गदर्शन आणखी कोणी दिले आहे काय? खूप खूप श्रीमंती बंगले, महाल उभारणाऱ्यांनो कबीराला क्षणभर तरी आठवा. आत्मचिंतन करा!
आपल्या महाराष्ट्राला समाजसुधारकांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. १७ जून हा थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा पुण्यतिथी दिवस आहे. २१ जून दक्षिणायनारंभ, सौर वर्षांऋतू प्रारंभ म्हणून विशेष पवित्र दिवस समजला जातो. राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी याच दिवशी येते. २६ जून या दिवशी छत्रपती शाहूमहाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्रात दीर्घकाळ मराठी साम्राज्य सांभाळणाऱ्या थोर शासकाचे स्मरण करू या! संस्कृत साहित्यात कवी कालिदास यांना अग्रगण्य स्थान आहे. २८ जून हा ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून देशभर, सर्वत्र लहान-थोर साहित्यिक साजरा करत असतात. २९ जूनला मुस्लीम बांधवांचा रमजान मासारंभ सुरू होत आहे.
गेल्या काही वर्षांचा जून महिन्यातील पाऊसपाण्याचा आढावा घेतला तर इतका बेभरवशाचा पाऊस व त्यामुळे तापमानातील चिंताजनक वाढ, कधी कडक उन्हाळा, कधी गारपीट यामुळे सामान्य माणूसही महाराष्ट्रात वाढत्या पाणीसमस्येच्या चिंतेने त्रस्त होत असतो. वातावरणातील असंतुलित घटकांमुळे दुष्काळी पट्टा विस्तारतोय. तुम्हा- आम्हाला सुखाची सावली देणाऱ्या हिरवाईचे, जंगल संपत्तीचे, वनांचे क्षेत्र संकोच पावत आहे, याची आठवण ठेवू या. नुसती आठवण ठेवण्यापेक्षा ही हिरवाई जपू या. ज्यांच्या घरात बाळगोपाळ आहेत. त्यांनी मे महिन्यात खूप खूप सुट्टीचा, सुट्टीतल्या विविध छंदांचा आनंद घेतला, आता मुलांना नव्या जोमाने आभ्यासाला लागावयाचे आहे. ज्या मुलांना भावी आयुष्यात काही विशेष कर्तबगारी दाखवायची आहे त्याच्याकरिता जून महिना हा भावी करिअरचा पाया आहे, असे लक्षात ठेवावे. आपल्या शाळा, कॉलेजच्या जीवनात दोन सोप्या गोष्टींचे भान ठेवले तर कोणताही अभ्यासक्रम अवघड कधीच नसतो, याचा अनुभव मी व माझ्यासारख्या अनेकांनी घेतलेला आहे. १) रात्रौ खूप जागरण न करता लवकर झोपावे. २) सकाळी घरातील इतर मंडळींची झोप न बिघडवता लवकर उठावे व तास-दीड तास आपला महत्त्वाचा अभ्यास वा लिखाण करावे. यामुळे आपले आरोग्य तर चांगले राहतेच व शिक्षण स्तरही उंचावतो. अलीकडे विविध महाविद्यालयांतील किंवा बारावीनंतरचे विविध अभ्यासक्रम खूपच महागडे झालेले आहेत. या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश जीवघेणी स्पर्धा बनली आहे. त्याकरिता पालकांनी मुलांना वरील दिनक्रमाची सवय लावणे, कुटुंबाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीनेही बहुमोल हिताचे आहे.
उन्हाळा संपत आलेला आहे. अजून पावसाळय़ाची सुरुवात व्हायची आहे. अशा मधल्या काळात फळे, भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ खूप महागतात. या पदार्थात याच काळात वाढती भेसळ आढळते. या विविध भेसळींमुळे विविध प्रकारचे शारीरिक आजार, अॅलर्जी, शीतपित्त, सूज उद्भवतात. याच काळात उन्हाळय़ात गमावलेली ताकद परत मिळवण्याकरिता शरीर संतुलित ठेवावे लागते. उन्हाळय़ात आपण खूप खूप पाणी पीत होतो. आता जून महिन्यात पाण्यापेक्षा विविध फळांचे ताजे ताजे रस घ्यावे. हे रस बाजारातील तयार ज्यूसच्या बाटल्या नसाव्यात. माझ्याकडे मे महिन्यातील कडक उन्हाळय़ानंतर घामोळे, त्वचा काळवंडणे, सन बर्न, गजकर्ण, खूप खूप घाम येणे, डोळय़ांवरील ताण या तक्रारींकरिता रुग्ण औषधे मागतात. त्यांना मी विविध फळांचे द्राक्ष, संत्रा, मोसंबी, आंबा, जांभूळ, डाळिंब यांचे सर्व स्वच्छतेचे नियम पाळून केलेले स्वरस दुपारी ४-५ वाजता घ्यायला सांगतो. त्यामुळे पोटातील पचनेंद्रियांना त्रास न होता टिकावू स्वरूपाची ऊर्जा मिळते. ज्यांना विविध फळांचे रस काढून घेणे जमत नाही त्यांनी निदान नारळपाणी, ताजे गोड चवीचे ताक किंवा लिंबू सरबत दुपारच्या वेळात किंवा सकाळी १० वाजता अवश्य घ्यावे. मे महिन्यातील कडक उन्हाळा संपला नाही असे समजून जून महिन्यातील दुपारचे जेवण हलकेफुलकेच असावे. त्या जेवणात काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, पांढरा गोड कांदा, लाल रंगाचा गोड चवीचा मुळा यांच्या कोथिंबिरींना प्राधान्य द्यावे. गव्हाच्या चपात्यांपेक्षा ज्वारीची ताजी पातळ भाकरी मराठी माणसाला मोठीच टिकाऊ ऊर्जा देते. हे म्यां भाकरीप्रेमीने सांगावयास नकोच. दुपारच्या जेवणात खूप कडधान्ये वापरण्यापेक्षा रात्रौच्या सायंकाळच्या लवकरच्या जेवणात आपल्या आवडीनुसार विविध कडधान्यांचा माफक प्रमाणात जरूर वापर करावा. त्याकरिता मूग, मूगडाळ, चवळी, राजमा यांना प्राधान्य द्यावे. पोटात वायू धरत नसेल तर वाल, पावटा, हरबरा, छोले अशांच्या उसळी थोडा संयम राखून त्यात लसूण, आल्याचा योग्य वापर करून जरूर आस्वाद घ्यावा. मटकी, मका ही कडधान्ये कष्टकरी, कामकऱ्यांकरिता ठीक आहेत. बुद्धिजीवी व्हाइट कॉलर, ब्ल्यू कॉलरवाल्यांकरिता नाही, हे लक्षात ठेवावे.
मे महिन्यातील आपला आवडता आंबा, जून महिन्यातही मुबलक प्रमाणात आपल्या सेवेला हल्ली उपलब्ध असतो. या काळात मिळणाऱ्या तोतापुरी, नीलम अशा आंब्यांमध्ये कीड संभवते. याकरिता आंब्याच्या फोडी काळजीपूर्वक खाव्यात. आंब्याचा रस घ्यावयाचा असल्यास त्यात मिरेपूड टाकावयास विसरू नये. कोणत्याही परिस्थितीत बर्फाचा वापर अवश्य टाळावा. बाजारात सर्वत्र मुबलकपणे मिळणारा बर्फ हा सुरक्षितपणे, निदरेष, स्वच्छ पाण्यापासून बनला आहे, याची खात्री कोणीच बर्फ उत्पादक कधीच देत नाहीत. जून महिन्यात दुधाचे आईस्क्रीम घ्यावयाचे असल्यास पहिल्या पंधरवडय़ापर्यंतच घ्यावे. मात्र ते घरी केलेले असावे. असे आईस्क्रीम जेवणानंतर कधीही लगेच घेऊ नये. ही सूचना देण्याचे कारण की विविध हॉटेल, फाइव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम सव्र्ह करण्याची पद्धत आहे. जेवणानंतर लगेच आईस्क्रीम घेतल्याने पचनक्रिया मंदावते, हे मी सांगावयास नकोच.
अलीकडे देशातील विविध राज्यांतील विविध भाषक आपापली अन्न संस्कृती घेऊन पुणे-मुंबईसारख्या शहरात उदरनिर्वाह, नोकरीनिमित्त येत-जात असतात. आपला महाराष्ट्र अशांचे विविध हॉटेल, रेस्टॉरंट किंवा भोजनशाळांमध्ये नवनवीन प्रकारच्या फूड डिशने स्वागत अगत्यपूर्वक करत असतो. एककाळ तुमच्या-आमच्या रोजच्या जेवणात ‘हेल्दी फूड’ हा शब्द कधीच नसे. तुमचे-आमचे आई-वडील साधेसुधे ताजेताजे जेवण स्वत: जेवायचे, दुसऱ्यांना वाढायचे. आता आपल्या बहुढंगी, बहुभाषी, बहुरंगी समाज जीवनात ओटस, मुसळी, सोयाबीन, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑइल अशा विविध पदार्थाचे कळत नकळत आक्रमण होत आहे. हे पदार्थ मूळचे आपल्याकडचे नाहीत. या पदार्थामुळे आपले आरोग्य सुधारते, असे आधुनिक आहारतज्ज्ञ दिवस-रात्र विविध लेखांद्वारे तुम्हा-आम्हाला सांगत आहेत. एकीकडे हेच आहारातज्ज्ञ स्थौल्यसंबंधी वाढत्या विकारांबद्दल मधुमेह, रक्तदाबवृद्धी, फाजील चरबी वाढणे, मेंदू व मूत्रपिंडाचे विकार याबद्दल वॉर्निग देत असतात. पण त्याचबरोबर मराठमोळय़ा ज्वारी, बाजरी व साध्या सोप्या पालेभाज्या, फळभाज्या यांची आठवण करून द्यायला विसरतात, हे योग्य नव्हे. ओटस् मुसळी हे शब्द ऐकायला कानाला बरे वाटतात. तज्ज्ञ आहार सल्लागारांची कॅल्शियम, काबरेहायड्रेट, आयर्न ही भाषा थोडी बाजूला ठेवून आपण आपल्या सकाळ- संध्याकाळच्या जेवणात वरी, नाचणी, जुना तांदूळ, ज्वारी, मूग यांच्याशी दोस्ती करून आपले दुपारचे व रात्रीचे जेवण साधेसुधे पण आरोग्यदायी ठेवू या. ज्यांना घर आहे त्यांनी जूनसारख्या वर्षांऋतूच्या प्रारंभी कटाक्षाने हॉटेल, रेस्टॉरंटमधले जेवण शक्यतो टाळावे. कारण त्या जेवणामुळे त्या तथाकथित ‘चटकमटक’ जेवणामुळे जेवताना बरे वाटते, पण नंतर जून महिन्यात कफ पातळ होऊन सर्दी, कफ, खोकला, तापाचे व विशेषत: अपचनाचे विकार निश्चयाने संभवतात. थोडा संयम पाळून आपल्या दुपारच्या व रात्रीच्या जेवणात तुलनेने कमी तिखट, थोडे तुरट रसाचे, किंचीत कडू रसाचे जेवण जेवावे. या काळात पाणी गढूळ असण्याची शक्यता जास्त असते. त्याकरिता पाणी उकळून प्यावे किंवा सुंठमिश्रित पाणी अवश्य प्यावे. जेवणाच्या साध्यासुध्या पदार्थामध्ये सुंठ, ओवा, जिरे, पुदिना, लसूण, मिरे यांचे योगदान पचनाकरिता मोठे असते. हे कदापि विसरू नये. ‘अन्न रक्षति पुरुष:।’ हे वचन बरोबर आहे, पण ते सुरक्षित असायलाच हवे याकरिता जून महिन्यात सावध रहावे. हा कानमंत्र लक्षात असावा. शुभं भवतु.