आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन औषधं आणायची, ती घ्यायची की झालं अशीच अनेकांची समजूत असते. पण त्याहीपेक्षा डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये यासाठी काय करता येईल ते पहायला हवं…
षष्ठी उपक्रम
रोगी बरे करण्याकरिता फक्त औषध म्हणजे गोळ्या, काढे, टॉनिक, इंजेक्शन हेच उपचार आहेत असे नाही. आपले प्राचीनतम शास्त्र-आयुर्वेद ‘स्वास्थरक्षण व रोगनिवारण’ याकरिता आश्वासन हा पहिला उपचार सांगत आहे. ‘तू बरा होशील’, असे पाठीवर हात फिरवून रोग्याला सांगितले की त्याचा अर्धा रोग पळून जातो. काही रोगांत ‘काही काळ रोगाची उपेक्षा करा’ असे सांगितले आहे. कुठे लंघन सुचविले आहे, कुठे नुसतेच थंड वा गरम पाणी सांगितले आहे. मणी किंवा फुले धारण असे उपचार सांगितले आहेत. मंत्र, होम, हवन, साधुजन, गुरुजन, ब्राह्मण, देवता पूजन असेही उपचार आहेत. रुग्णांच्या हिताच्या किंवा त्याचे मन रिझवणाऱ्या मनोरंजक गोष्टी सांगाव्या. ठरावीक वेळांत येणाऱ्या तापाची आठवण होऊ नये म्हणून इतर गोष्टींत मन गुंतवून ठेवावे.
आपला विश्वास बसणार नाही इतके छोटे छोटे असंख्य उपचार वापरात आहेत. काहीजण त्यास ‘नुक्से्’ म्हणतात. सुश्रुताचार्यानी अशा अनेकानेक उपचारांना ‘षष्ठी उपक्रम’ अशी संज्ञा दिली आहे. वानगीदाखल काही उपचार पुढीलप्रमाणे आहेत.
स्नेहकर्म
मराठी माणसाच्या आहारात स्निग्धांश फार कमी असतो. गुजराथी समाजात तेलकट आहार जास्त, पंजाबमध्ये तेलकट, तुपकट भले तो डालडा का असेना, फारच खातात. स्निग्ध आहारामुळे शरीराची दरक्षणी होणारी झीज भरून यायला मदत होते. ज्वारीच्या भाकरीबरोबर गोडेतेल, शेंगदाणे किंवा कारल्याची चटणी हे सोपे स्नेहकर्म झाले.
अच्छ स्नेहपान
आयुर्वेदीय उपचारात शरीराची शुद्धी करायची असली तर प्रथम स्निग्ध करून घ्यावे असे सांगितले आहे. शरीर स्निग्ध करताना केवळ एक वा जास्त दिवस स्निग्ध पदार्थ तेल, तूप किंवा प्राण्यांची चरबी खाऊन राहायचे ठरवले तर त्यास अच्छ स्नेहपान असे म्हणतात. नेहमीचे जेवण जेवताना सोबत तेल, तूप किंवा चरबी खाल्ली व त्याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी व सायंकाळी जर विशेष मात्रेने तेल खाल्ले व त्यास ‘विचारणा’ स्नेह असे म्हणतात. अच्छे स्नेहपानात इतर पदार्थाचे जेवण वज्र्य असते.
शौचाला खडा होणे, पोटात नुसता वायू धरणे, हर्निया विकारात आतडी खाली सरकणे, वायूच्या त्रासाने पोट दुखणे, अन्नवह स्रोतसे, खूप रूक्ष होणे, जेवणानंतर संडासची भावना होणे, लहान व मोठे दोन्ही सांधे दुखणे व कटकट आवाज करणे अशा नाना तऱ्हेच्या तक्रारी वाताची रुक्षता वाढल्याने होतात. यावरील अक्सर व एकवेळ नेटाने करावयाचा इलाज म्हणजे चिंचेचा थोडा काढा व किंचित मीठ या मिश्रणात तीन चमचे गोडे तेल उकळावे. पाणी आटले की ते तेल पहाटेपासून चार-पाच वेळा वरील प्रमाणांत घ्यावे. एक दिवस सर्व आतडय़ांना याप्रकारे लुब्रिकेशन होऊ द्यावे. कोठा खूपच जड, क्रूर असला तर दोन दिवस हा प्रयोग करावा. इतर काहीही आहार घेऊ नये.
ज्यांना तेल पिवविणार नाही त्यांनी याच प्रकारे तूप तयार करून केवळ त्या तुपावर एक दिवस तरी राहून पाहावे.
विचारणा स्नेह
विचारणा स्नेहात भरपूर तेल-तूप असलेले पदार्थ हा प्रामुख्याने आहार असतो. इतर आहार पदार्थ गौण असतात. ज्यांना पोटात वायूचा त्रास आहे. आतडी रूक्ष आहेत त्यांनी कारळे, तीळ, खोबरे, शेंगदाणे यांची चटणी भरपूर खावी. तिखट तारतम्याने वापरावे.
जे कृश आहेत त्यांनी भरपूर तूप असलेला किंवा रवा, साखर, दूध, केळी व तूप समभाग घेऊन तयार केलेला सत्यनारायणाचा प्रसाद खावा. ज्यांच्या शरीरात पित्त व वायू दोन्ही दोष आहेत त्यांनी तेलावर परतलेली घावन किंवा धिरडी हा आहार ठेवावा. सोबत लोणी किंवा तूप खावे, ज्यांना पालेभाज्या खाण्याची हौस आहे त्यांनी भरपूर तेलावर परतलेली माठ, मेथी, करडई, अंबाडी, राजगिरा, मुळा, कोथिंबीर अशी पालेभाजी खावी. डोळ्याच्या किंवा मेंदूच्या मगजमारीकरिता ताजे लोणी हा उत्तम उपाय आहे.
अभ्यंग
‘स्नेह, द्यावा, स्नेह घ्यावा;
स्नेह जिवीचा विसावा।’
असे कोणी प्रेमळ माणसाने कोणत्या संदर्भात म्हटले आहे, माहीत नाही, पण स्नेहामुळे शरीरात रोगनिवारण व स्वास्थ्यरक्षणाकरिता किती अमोलिक काम होते हे ज्या वेळेस आपण विविध प्रकारे स्नेह वापरू तेव्हाच कळते. शरीरात जेथे जेथे स्नेह आवश्यक आहे, तेथील स्नेहाचे प्रमाण कमी झाले की रूक्षतेची, पित्ताची, धातुक्षीणतेची दुखणी सुरू होतात.
‘‘दिप्तान्तराग्नि: परिशुद्धकोष्ठ: प्रत्यग्रधातुबलवर्णयुक्त:।
दृढेन्द्रियो मन्दजर: शतायू स्नेहापसेवी पुरुष: प्रदिष्ट:।।’’
ज्यांना १०० वर्षे निरोगी आयुष्य जगायचे आहे, शरीरातील कमतरता कमी करून ‘नवनिर्माण’ व्हावयास हवे त्यांनी स्नेहनाचा विधिपूर्वक माफक, सार्वदेहिक कसा उपयोग करून घ्यावा याकरिता पुढील उपक्रमांचा वापर करावा.
समस्त वातविकार, म्हातारपणाच्या सुरकुत्या, कामांतील मंदपणा, ठणका, सूज, जखडणे या एक ना अनेक तक्रारींकरिता सर्वागाला हलक्या हाताने मसाज करणे मोठा आनंदाचा भाग आहे. स्वत:चे स्वत: मसाज करता येते. आपल्या स्वास्थ्याकरिता जमले तर सकाळी आंघोळीचे अगोदर अर्धा तास किंवा रात्री झोपताना अभ्यंग करावे. अभ्यंगाला कोणतेही तेल प्रकृतीनुरूप वापरावे. तिळतेल, खोबरेल, मोहरी तेल, अनुक्रमे वात, पित्त व कफ प्रवृत्तीला धरून आहे. जेथे आवश्यक तेथे तेल थोडे गरम करून त्यात किंचित मीठ मिसळून मसाज केले तर तेल त्वचेत खोलवर पोचते. काहीजण अभ्यंगाकरिता ट्रान्सफॉर्मर ऑइल किंवा रॉकेल वापरतात. हे योग्य नव्हे. आपण शास्त्रांत सांगितलेलीच तेले वापरावीत. ती निर्धोक व सुरक्षित आहेत.
कर्णपूरण
कान कोरडे होतात, खाजतात, विलक्षण कंड सुटते, कानांतून आवाज येतात, कान हलके होतात, अशा वेळेस कानात जरूर तीळ तेल टाकावे. न मिळाल्यास गोडे तेल टाकावे. कानांत टाकण्याअगोदर किंचित कोमट करून घ्यावे. दोन पाच मिनिटांत तेल कानांतून काढून टाकावे. ज्यांचा कान कधी वाहिला आहे त्यांनी मात्र हा उपक्रम करू नये. कानांत खोबरेल तेल कदापि टाकू नये.
नेत्रपूरण, नस्य, नाभिपूरण
बेंबीच्यापाशी एरंडेल किंवा गोडे तेल जिरवत राहिले तर लहान बालकांची व वृद्धांची पोटदुखी, वायू सरकून लगेच थांबते. डोळा सर्व धातूंचे सार आहे. शरीरातील रस, मांस, मेद, मज्जा व शुक्र हे धातू क्षीण झाले की डोळे खोल जातात, रूक्ष होतात, तेज सहन होत नाही. अति उन्हात किंवा उष्णतेशी सतत काम करणाऱ्यांचे डोळे तळावतात. त्याकरिता नारळाचे दूध काढून ते चमच्यांत आटवावे. त्यांचे तयार झालेले खोबरेल किंवा खात्रीचे तूप, लोणी दोन्ही डोळ्यांत दोन तीन थेंब टाकावे. पाच दहा मिनिटे तसेच राहू द्यावे. ज्यांना झोप कमी आहे त्यांनी झोपण्यापूर्वी हा प्रयोग जरूर करावा. फायदा होतो. ‘नासा ही शिरसो द्वारं!’ नाकात टाकलेले औषध डोक्यातील सर्व अवयवांची काळजी घेते. कान, नाक, घसा, गळा, मेंदू, डोळे, केस या संबंधित सर्व विकारात तीळ तेल किंवा चांगल्या तुपाचे दोन चार थेंबाचे नस्य करावे. ज्यांना आपली इंद्रिये बळकट हवी आहेत,
केस गळणे थांबावे किंवा पांढरे केस काळे व्हावेत असे वाटते त्यांनी नियमित नस्य उपक्रम करावा. अनुभव घ्यावा. इतरांना सांगावा. सर्दी, डोकेदुखी, झोपच न येणे, फिटस् येणे, थॉयराईड ग्रंथीची वाढ, गंडमाळा, स्मृती कमी होणे, चक्कर या विकारांत गाईचे तुपाचे नस्य मोठा गुण देते. श्रद्धेने उपचार करावयास हवा. ज्यांना मजबूत खांदा व मान, बळकट छाती व सुंदर त्वचा हवी आहे त्यांनी नस्य प्रयोग जरूर करावा. ज्यांची नखे कुरतडलेली, रूक्ष, तुटकी, फुटलेली आहेत त्यांनी तुपाचा नित्य प्रयोग नखप्रतिसारणांकरिता करावा. स्वत:च्या पायाची सेवा स्वत: नियमित केली तर ते पाय दीर्घकाळ उत्तम काम देतात. कोणत्याही कामाला लटपटत नाहीत. जळवात, भेगा, रक्त येणे या पायांच्या तक्रारींकरिता तूप किंवा एरंडेलाचा प्रयोग करावा. पादशीलन तीळ तेल किंवा गोडे तेलाचेही होते. त्यानंतर आवश्यक तर पाय गार किंवा गरम पाण्यात थोडय़ा वेळाने ठेवावेत.
पिचकारी, बस्ती, शिरोपिचु
पिचकारी किंवा शास्त्रीय शब्द मात्राबस्ती हा आयुर्वेदीय मंडळीचा खास उपचार आहे. एनिमा दिला तर संडासला लगेच प्रेरणा होते. तसे तेलाच्या पिचकारीने नाही. उपलब्धतेनुसार कोणत्याही तेलाची पिचकारी संडासला खडा होणे, वायू धरणे, जंत, कृमी, पोटदुखी, लघवी अडणे, मुदतीचा ताप, बिनमोडाची मूळव्याध, अंग बाहेर येणे, अर्धागवात, मेंदूला सूज येणे, फिटस् येणे इत्यादी नाना वाताच्या, पक्काशयाच्या व अपान वायूच्या क्षेत्रांत उत्तम व तात्काळ गुण देते. जे औषध तोंडावाटे पोटात जाऊन काम करावयास चोवीस तास लागतात, त्याचजागी पिचकारी लगेच काम देते. पिचकारीकरिता एरंडेल कधी वापरू नये. सर्वसामान्यांना साबण पाण्याचा एनिमा माहीत आहे. पण या एनिमामुळे दीर्घकालीन गुण मिळत नाही. तात्पुरता थोडा मळ सरकणे, वायू मोकळा होणे इतपत गुण मिळतो. पण त्यापेक्षा अधिक गुण मिळण्याकरिता एरंडेल तेल सोडून कोणतेही तेल, गरम पाणी व साबण असा अनुवासन बस्ती वापरल्यामुळे पक्काशयाच्या आतल्या त्वचेला साबणाने होणारी संभाव्य इजा टळते. शिवाय आतडय़ा अधिक कार्यक्षम होतात. मेंदूचे विकार, डोळे गरम होणे, झोप न लागणे, उन्माद, फिटस् येणे, विस्मरण, डोळे रूक्ष होणे, तळावणे, अशा नाना मेंदूच्या, डोळ्यांच्या तक्रारीत डोक्यावर कोणत्याही तेलाची पट्टी ठेवावयाची असल्यास थोडे थोडे तेल पुन: पुन्हा डोक्यावर टाकत जावे. याचा उपचारांचा आणखी व्यापक भाग म्हणजे शिरोबस्ती. त्याकरिता डोक्याच्या आकाराची दोन्ही बाजूंनी खुली अशी चामडय़ाची टोपी करावी. डोक्यात ती बसवून बाहेरून उडीद डाळीच्या पिठाचा लेप लावावा. डोक्यावर भरपूर तेल ओतावे. हे तेल तास अर्धा तास ठेवावे. मेंदूकरिता हा उत्तम बाह्य़ोपचार आहे.
अग्निस्वेद
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. ‘चांगले’सुद्धा अति झाले की ‘वाईट’ ठरते. दोन्ही शब्द सापेक्ष आहेत. आपण गोड रस, तूप, दूध, बदाम, गहू, भात, हरभरा, शेंगदाणे, साखर यांची प्रशस्ती करतो. विश्रांती, निवांत झोप, आराम यांची ‘चाह’ करतो. पण काही वेळ अशी येते की या सर्व गोष्टी शरीरस्वास्थ्याला बाधा करणाऱ्या ठरतात. शरीर चांगले राखायचे असेल तर स्नेहाचा त्याग करून शरीराला ‘घाम’ गाळावयास लावणेच हिताचे असते. चरबीचे थरच्या थर, मान, छाती, कंबर, पोट, मांडय़ा, पोटऱ्या यावर जमविणे प्राणघातक ठरू शकते. चंद्रकिरण शीतल, आल्हाददायक, सुखकर याबद्दल वाद नाही. पण नुसत्याच चांदण्याने शरीर तेजस्वी, ओजस्वी, चपळ, कामसू राहणार नाही. त्याकरिता शास्त्रकारांनी स्वेदसंहिता सांगितली आहे. हातापायांचे सांधे, कोठय़ांत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंत फाजील चरबी, कफ, मेद साठत जातो. तो स्नेहाने किंवा अन्य उपायांनी ओला करून घाम काढून पातळ करावा लागतो. त्यामुळेच शरीराचे चलनवलन चांगले राहते. याकरिता कफ, कफवात व वात विकारांना नाना तऱ्हेचे स्वेदनाचे, घाम काढण्याचे उपाय शास्त्रकारांनी सांगितले आहेत.
सर्वागातील घाम बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष अग्निशी संबंधाला फार महत्त्व आहे. पूर्वी घरोघरी चुली, बंब, शेगडय़ा होत्या. शेकोटय़ा पेटत असत. त्यामुळे प्रत्यक्ष अग्नीशी संपर्क ठेवून शरीरात ऊब आणणे सहज शक्य होते. आता त्याकरिता इलेक्ट्रिकची विविध साधने उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष चुलीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून जी ऊब मिळते त्याची सर या लाल गोळ्याला किंवा इलेक्ट्रिक पॅडला येत नाही. दमेकरी, संधिवात, आमवात, स्थूल शरीर, सायटिका, फ्रोझन शोल्डर, कंबर, पाठदुखी, गुडघेदुखी इ. विकारांत शेकोटी शेक सुसह्य़ व आपणास पाहिजे तसा त्या त्या भागाला देता येतो. ज्यांना हा शेक तीव्र वाटतो त्यांनी शेकाअगोदर कोणतेतरी तेल अंगाला जरूर लावावे. मगच शेक घ्यावा. नुसत्या कोरडय़ा शेकामुळे नसा कडक होतात.
उपनाह, गरम पाण्याच्या पट्टय़ा, पिंडस्वेद, मेणलेप
आरोग्यरक्षण व रोग निवारणाकरिता नाना गोष्टींची निवड, तारतम्य वापरून गरज व उपलब्धता यांचा विचार करून करता येते. आयुर्वेदाच्या शास्त्रकारांनी किती बारकाईने व लहानसहान बाबी लक्षात घेऊन केलेला विचार पाहिला की आपणालाही आपल्या जवळपासचे साधे-सोपे उपचार सुचतात, वापरता येतात. वातविकारात लहान-मोठे सांधे, गुडघे, खांदा, मनगटे, कंबर असे नाना अवयवांना सूज येते, ठणका मारतो, जखडतात. पिंडस्वेद करून शेकावयास सांगितले आहे. या शेकाचा फायदा म्हणजे याचा चटका बसणार नाही ही काळजी घेता येते. गरजेप्रमाणे कमी-अधिक जाड-पातळ फडक्यात पिंड ठेवून शेकता येते. हे भाताचे गोळे किमान दोन वेळा वापरता येतात.
पिंडस्वेदाची उष्णता जास्त काळ टिकते. टिकाऊ परिणाम देते. असाच शेक, उपनाह म्हणजे पोटीस बांधून करता येतो. उपनाहामध्ये चटका चांगला अशी अपेक्षा आहे. पोटीस किंवा उपनाहाकरिता कणीक, तेल, हळद, गाजर, कांदा, बटाटा अशा विविध भाज्यांचा उपयोग करता येईल. उद्देश हा की दुखणाऱ्या भागाच्या ठिकाणी उष्णता तर दीर्घकाळ राहावी व त्याचा चटका बसून त्वचा लाल होणे, पुरळ किंवा फोड येणे होऊ नये. सुहागी टाकणखार एक भाग व चौपट कणीक पाण्यात कालवून गरम गरम असे पोटीस सर्वोत्तम पोटीस आहे. ज्यांना पोटीस शक्य नाही त्यांनी मीठ टाकून उकळलेल्या पाण्यात कापडाच्या पट्टय़ा भिजवून त्याने लहान-मोठे सांधे शेकावे. मात्र पाणी गार होऊ देऊ नये. पट्टय़ा वारंवार बदलाव्यात. वृद्ध रोगी, लहान बालके यांचा पाय मुरगळला किंवा सुजेकरिता हा सोपा उपाय आहे. काही संधिवाताचे विकार फारच त्रास देतात. बरेच पैसे खर्च करावे लागतात. वारंवारचा व कधी न संपणारा औषधांवरचा खर्च सर्वानाच परवडेल असे नाही. त्याकरिता एकवेळ मेण विकत आणावे. ते एखाद्या भांडय़ात पातळ करावे व सोसवेल इतपत गरम असताना दुखऱ्या सांध्यावर थापावे. थोडा वेळ राहू द्यावे. वर फडके बांधून बराच काळ ऊब मिळेल असे करता येते. हे मेण पुन: पुन्हा बऱ्याच वेळा वापरता येते.
ऊन, सूर्यस्नान
ज्यांना डायरेक्ट शेक घेणे शक्य नाही त्यांनी सोसवेल इतपत ऊन अंगावर जास्त काळ घ्यावे. विशेषत: सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत उन्हात केलेले काम शरीराला नवजीवन देते. ज्यांना शक्य आहे त्यांनी बागेत, शेतात किंवा बाहेर फिरायला जाण्याच्या निमित्ताने सकाळी सात ते दहा या काळात डायरेक्ट ऊन घ्यावे. या उन्हातून अनेक जीवनसत्त्वे शरीराला मिळतात. शरीरातून कळत-नकळत बरीच मलद्रव्ये घाम स्वरूपात बाहेर पडतात. ही मलद्रव्ये सावकाश बाहेर पडत असल्याने थकवा येत नाही. क्षय, प्लुरसी, पांडू, त्वचेचे विकार, स्थौल्य, मधुमेह या विकारांत सूर्यप्रकाश डायरेक्ट घ्यावा. डॉक्टर व औषधे यांना त्यामुळे लांब ठेवता येते. वृद्ध माणसांनी कोवळ्या उन्हात बसून पाठीवर ऊन घ्यावे. तरुणांनी सूर्यस्नान करावयास हरकत नाही. पण त्याचा अतिरेक होऊ नये. एकूण उद्देश शरीरातील आवश्यक मलद्रव्ये सुखाने घामरूपाने बाहेर जावयास हवी. घाम येईल असे गरम गरम पाणी पिऊनही शरीरातून एकाच वेळात घाम बाहेर काढता येतो. गरम गरम चहा पिणे, सुंठ, गवती चहा किंवा तुळशीची पाने, पारिजातकाची पाने उकळून ते पाणी पिणे हा स्वेदनाचाच प्रकार होय.
मुंबईसारख्या ठिकाणी सर्वागाला घाम आणण्याकरिता फार मोठे खटाटोपाचे प्रयत्न करावे लागत नाहीत. लोकलच्या धमाल गर्दीत सेकंड क्लासमधून सकाळी किंवा सायंकाळी दहा-पंधरा मिनिटे केलेला प्रवास पुरेसा ठरेल. पण तो गमतीचा भाग झाला. मुंबईत शाल, ब्लँकेट, कांबळे असे उबदार अंथरूण घेऊन दहा-पंधरा मिनिटे बसले तर संधिवात, आमवात, स्थौल्य, मधुमेह या विकारांत बराच उपशय मिळतो.
पेटिकास्वेद, स्थानिक स्वेद
नाशिक, पुणे, सातारा अशा थंड हवेच्या ठिकाणी सर्वाग स्वेदाकरिता पेटिकास्वेद म्हणजे बंद पेटीत बसविलेल्या फळीवर झोपून खालून काढय़ाची किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम उपाय होय.
त्याचबरोबर स्थानिक स्वेद म्हणून प्रेशर कुकरला रबरी नळी लावून पाण्याची वाफ त्या त्या अवयवाला देता येते. अर्धागवात, सायटिका, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या वातविकारात स्थौल्य कमी करण्याकरिता पेटिका स्वेद फार फायदेशीर आहे. मात्र तो प्रयोग कोणत्या तरी देखरेखीखालीच व्हावा.
अवगाह, शॉवरबाथ, द्रोणी स्वेद
याशिवाय टबबाथ किंवा अवगाह किंवा द्रोणी स्वेद हा गरम पाण्यात टबमध्ये बसण्याचा उपचार काही विकारांवर उपयुक्त आहे. त्यामुळे मुतखडय़ाच्या वेदना, अपानवायूचे त्रास, पाठ, गुडघेदुखी या विकारांत अगदी आराम मिळतो. गरम पाण्याचा शॉवर बाथ उपयुक्त आहे. पण डोळे व डोके यांना शक्यतो फार गरम पाणी वापरू नये. कारण त्यामुळे केस व दृष्टीचे आरोग्य बिघडते.
तवा
काहीच शक्य नाही म्हणजे घरचा तवा तापवून जखडलेली पाठ, मुतखडय़ाच्या तीव्र वेदना, सायटिका, उसण भरणे याकरिता तव्यावर फडके तापवून शेकावे. असा शेक वारंवार घ्यावा लागला तर पाठीची त्वचा हुळहुळी व लाल होते. त्याकरिता शक्य ती काळजी घ्यावी. घरात अनेक पेन किलर गोळ्या खबरदारी म्हणून काही जण ठेवतात. त्यापेक्षा रबराची हॉटवॉटर बॅग ठेवावी. पाठ-कंबरदुखीकरिता त्या बॅगेमधील पाण्याचा अप्रत्यक्ष शेक एकदम आराम देतो. औषधे टाळता येतात.
कुस्तीचा हौद
माझे गुरुजी वैद्यराज पराडकर व आम्ही काही शिष्य मंडळी अतिस्थूल व्यक्तींकरिता प्रत्येक आयुर्वेदीय रुग्णालयांत कुस्तीचा हौदा तयार ठेवता येईल का, याची चर्चा करीत असू. लहानपणी कुस्ती खेळण्याअगोदर कुस्तीचे शिक्षक, कुस्तीचा लाल मातीचा हौद खणावयास सांगत. फावडय़ाने माती खणावयास लागले की अंगातून किती घाम लाल मातीत पडतो हे प्रत्यक्ष हौदा खणल्याशिवाय कळणार नाही. भल्या भल्या अतिविशाल स्त्री- पुरुषांनी, विशेषत: तरुण तीस-चाळीस वयापर्यंतच्यांनी हा प्रयोग करावयास हवा. आजकाल नवनवीन ‘स्लिमिंग क्लिनिक’ निघत आहेत. मॉडर्न जिम आहेत. अशा ठिकाणी तांबडय़ा मातीचे हौद सुरू केले व ते खणल्यावर चांगली शॉवर बाथची सोय केली तर बऱ्यापैकी श्रीमंत व स्थूल रुग्ण नक्कीच हौदांचा वापर करून आपले शरीर कमी करू शकतील. ज्यांना शारीरिक श्रमाची बिलकूल सवय नाही अशा बडय़ा बडय़ा मॅनेजर, डायरेक्टर किंवा सुखवस्तूंनी करून पाहण्यासारखा प्रयोग आहे. या हौदातील माती अंगाला चोळून रूक्ष अभ्यंगही करता येते. जे बेडौल शरीर कोणत्याच औषधांना दाद देत नाही ते पंधरा दिवसांत सुधारू लागेल.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com