आयुर्वेदीय दृष्टिकोनाप्रमाणे हा महिना ‘विसर्गकाल’ या नावाने ओळखला जातो. या महिन्यात भरपूर व्यायाम करावा. हा पुढील तीन-चार महिन्यांचा, शरीर कमवायच्या कालांचा पहिला महिना आहे हे समजून दुपारचे जेवण व्यवस्थित जेवावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़, आपल्या विविध सणांमुळे, त्यात सामील होणाऱ्या, लहानथोर उत्सवप्रेमींमुळे उठून दिसते. ऑक्टोबर महिन्यात आश्विन महिन्याचे तीन आठवडे, कार्तिक महिन्याचा एक आठवडा, यामुळे नवरात्र, दसरा व दिवाळी अशा सणांची रेलचेल असणारा हा महिना आहे. एक ऑक्टोबर महालक्ष्मी पूजनानिमित्त जुन्या वळणाच्या कुटुंबात ‘घागरी फुंकण्याचा कार्यक्रम’ साजरा केला जातो. या दिवशी ज्येष्ठ नागरिक दिन व रक्तदान दिन म्हणूनही अनेक सामाजिक संस्था आपापले योगदान त्या निमित्ताने देत असतात. दोन ऑक्टोबर सरस्वती पूजन; याच दिवशी महात्मा गांधी व स्व. लालबहादूर शास्त्री या दोघांची जयंती! तीन ऑक्टोबर या दिवशी यंदा विजयादशमीबरोबरच बौद्ध जयंती साजरी करण्याचा योग आहे. त्यानिमित्ताने आपटय़ाची पाने व पवित्र बोधीवृक्षाची आठवण ठेवू या! यंदाच्या काही पंचांगांत तीन ऑक्टोबर, काही पंचांगांत चार ऑक्टोबर साईबाबा पुण्यतिथी अशी नोंद आहे. पाच ऑक्टोबरला बकरी ईद आहे. काही कॅलेंडरमध्ये बकरी ईदची तारीख ही सहा ऑक्टोबर दिली आहे. असो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू श्री दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी सहा ऑक्टोबर रोजी आहे. तो दिवस ‘जागतिक निवारा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. सात ऑक्टोबर, कोजागिरीनिमित्ताने रात्रौ जागू या व केशर दुधाची मजा चाखू या. आठ ऑक्टोबरला यंदा देशाच्या पूर्व भागात खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. पुणे शहरात कुंटे चौक हे प्रसिद्ध ठिकाण ज्यांच्या नावामुळे आहे त्या महादेव मोरेश्वर कुंटे या थोर सामाजिक, इतिहासकार नेत्याची आठवण ठेवू या. नऊ ऑक्टोबर रोजी ‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने नवीन पिढीने; महाराष्ट्राच्या जुन्या सामाजिक इतिहासाचा जरूर मागोवा घ्यावा. ‘तुकडय़ा म्हणे’ या नावाने प्रबोधन करणाऱ्या संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी १३ ऑक्टोबर या दिवशी आहे. १५ ऑक्टोबरला जागतिक अंध दिनानिमित्त, जवळपास असणाऱ्या नेत्रपेढीत नेत्रदानाचे फॉर्म भरण्याचे किमान कार्य आठवणीने करू या! २० ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबपर्यंत तुम्ही-आम्ही सर्वच जण वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुदर्शी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज या सणांनिमित्त खूप व्यस्त असणार आहोत. तरीपण २१ ऑक्टोबर, श्री. धन्वन्तरी उत्सवानिमित्त वैद्यकीय तातडीची मदत देणाऱ्या डॉक्टर वैद्यांची आठवण ठेवू या. २३ ऑक्टोबरला महावीर निर्वाण दिन आहे. त्याच दिवशी हेमंत ऋतूचा प्रारंभ होत आहे. स्वाभाविकपणेच आगामी काळात भरपूर व्यायाम व भरपूर आहार यामुळे सर्वानाच आपली प्रकृती सुदृढ करण्याची संधी आहे. २६ ऑक्टोबर रोजी मुस्लीम बांधवांचा हिजरी सण १४३६ प्रारंभ होत आहे. ३१ ऑक्टोबर देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त इतिहासाचा थोडा मागोवा घेऊ या!
यंदाचा ऑक्टोबर महिन्याचा प्रारंभ अश्विनातील शेवटचा पंधरवडा व कार्तिकातील पहिला अठवडा असल्यामुळे सर्वत्र सृष्टीमध्ये स्निग्ध वातावरणाचा अनुभव तुम्ही-आम्ही घेतो. या काळात शरीरात मध्यमबल व लवणरसाचे प्राबल्य आहे असे आयुर्वेदशास्त्र सांगते. या काळात आपली पृथ्वी पुरेशा पावसामुळे तृप्त झालेली असते. सर्वत्र शीतल वातावरण असते. दिवसा ‘ऑक्टोबर हिटचा’ अनुभव आला तरी रात्र तुलनेने खूपच सुखावह असते. या काळात वातावरणातील मोकळ्या हवेमुळे निरभ्र आकाशामुळे समस्त प्राणिसृष्टीचा, आपणा सर्वाचाच पाचकाग्नी उत्तम असतो, त्यामुळेच या काळात मधुर व कडू पण थंड गुणाच्या, शीत वीर्याच्या आहाराचा आपणास मनमुराद अनुभव घेता येतो. वर्षां ऋतूत आपण सांभाळून जेवत होतो. पण आता आपल्या वाढलेल्या भुकेला वाजवी न्याय जरूर देऊ या!
ऑक्टोबर महिन्यात गहू, हरबरा, वाटाणा, चवळी, राजमा, मक्याची कणसे, रताळी, बटाटे अशा पौष्टिक भाज्यांचा समावेश आपल्या आहारात अवश्य करू या. मात्र या काळात आहाराबरोबरच सकाळचा रोजचा व्यायाम, सूर्यनमस्कार, जोर बैठका, पळणे व जमले तर पोहणे व सायंकाळी विविध खेळांद्वारे तबियत कमवू या. या काळातील नदीनाल्यातील जलाचे वर्णन ‘हंसोदक’ असे आयुर्वेदीय शास्त्रकारांनी केलेले आहे. दिवसा सूर्यकिरणांच्या प्रभावाने तप्त होणारे पाणी रात्रौ चंद्रमाच्या शीतल किरणांनी थंड होत असते. असे हे पाणी ‘हंस’ या प्राण्यांना विशेष बल देत असते, अशी भावना आहे. तुम्ही अनेक मजली इमारतीत राहात असाल, तर पुढील प्रकारे अत्यंत शुद्ध जल साठविण्याची संधी अजिबात गमवू नका. आपल्या गच्चीवर मोठाली पातेली ठेवावी, त्यांना स्वच्छ फडकी बांधावी. या दिवसात जी काही पर्जन्यवृष्टी होईल ते पाणी साठवावे, आपल्या स्वास्थ्याकरिता अवश्य वापरावे. हे ‘गंगोदक’ अत्यंत शुद्ध व आरोग्यदायी असते.
आयुर्वेदीय दृष्टिकोनाप्रमाणे हा महिना ‘विसर्गकाल’ या नावाने ओळखला जातो. श्री भगवान सूर्यनारायण यांनी यापूर्वी ‘आदान कालात’ आपल्या तीव्र सूर्यकिरणांनी मानवी शारीरबल शोषून घेतलेले असते. त्यामुळे तो काळ शारीरिक दौर्बल्याचा असतो. पण आत्ताची ऑक्टोबर हीट ही आरोग्यदायी असते. कारण त्याला निरभ्र आकाश व शीतल रात्रीची जोड असते. ज्या मंडळींचे काही कारणाने शारीरिक वजन कमी झालेले आहे, दुबळेपणा आलेला आहे त्यांनी आपली दिवसाची सुरुवात ‘अभ्यंग’ या सकाळी सकाळी आपल्या सर्वागाला हलक्या हाताने तेल जिरवण्यापासून करावी.
अभ्यङ्गमाचरेन्नित्यं
सजराश्रमवात हा।
दृष्टि प्रसादपुष्टय़ायु:
स्वप्नसुत्वक्त्वदाढर्य़कृत्॥
अ.हृ.सू २/७
अष्टांग हृदय़कार श्री वाग्भटाचार्य यांनी वरील श्लोकात आपणाला आपले उत्तम आयुरारोग्याकरिता जो तेल जिरवण्याचा सोपा, सुलभ व तुलनेने खूप-खूप स्वस्त मार्ग सांगितला आहे, त्याचा जरूर वापर करू या. त्यामुळे अकाली म्हातारपण दूर ठेवता येते, शरीर कोणतेही शारीरिक श्रम करायला नाही म्हणत नाही. समस्त वातविकारांना लहानमोठे सांध्यांचे, मणक्यांचे, स्नायूंचे विकार यांच्यापासून निश्चितपणे छुटकारा मिळतो. दृष्टी स्वच्छ राहते, शरीर पुष्ट होते, दीर्घायुष्याचा लाभ होतो. रात्रौ झोप चांगली लागते. आपली त्वचा सुकुमार व आकर्षक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर कोणत्याही कमी-अधिक कठीण प्रसंगाला तोंड देण्याकरिता दृढ असे होते.
माझे वय फार नाही, आत्ता या महिन्यातच मी वयाची ब्याऐंशी पूर्ण केली आहे. माझा दिवसाचा प्रारंभ मी किमान बारा सूर्यनमस्कार व आपल्या शरीराला स्वत:च्या हाताने तेल जिरवून करत असतो. त्यामुळे मला जी शक्ती, जोम, स्नायूंची ताकद मिळते, ती दिवसाच्या किमान बारा तासांकरिता पुरेशी ऊर्जा देते. आपण आपल्या आरोग्याकरिता सकाळी दहा मिनिटे दिली तरी तुम्ही दिवसभर न थकता सर्वतऱ्हेच्या शारीरिक व मानसिकही जबाबदाऱ्या जरूर पेलू शकता. त्याकरिता महागडी बाजारू तेलेच वापरली पाहिजेत असे नाही. तिळाचे तेल किंचित कोमट करावे व वापरावे. त्याऐवजी खोबरेल तेल किंवा शेंगदाणा-गोडेतेल किंवा एरंडेल तेलही चांगले गुण नक्की देते. अभ्यंग म्हणजे आपणच आपल्या अंगास हलक्या हाताने तेल जिरविणे. आपल्या हातापायांना खालून वर असे उलटय़ा दिशेने तेल जिरवावे, मान, खांदा, कंबर, गुडघे, पाठ, पोट यांना गोल पद्धतीने तेल जिरवावे. तळपाय तळहात, कानशिले, कपाळ यांना हलक्या हाताने खोबरेल तेल किंवा शक्य असल्यास लोणी, तुपाचा वापर करावा. डालडा, गन ऑइल अशा खराब गोष्टींचा कदापि वापर करू नये.
वरीलप्रकारे अभ्यंग व स्नान केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नाष्टापाणी व्यवस्थित करावे. नुसत्या चहा-कॉफीवर भागवू नये. विविध प्रकारची धिरडी किंवा ताजी पोळी कमी-अधिक रुचकर चटणीबरोबर अवश्य खावी. शक्य असल्यास मुगाचे, गुळपापडीचे, रवा-बेसनाचे वा डिंकाचे लाडू खावेत. ज्यांना आयुर्वेदातील परमलोकप्रिय टॉनिक च्यवनप्राश घ्यावयाचे आहे त्यांनी प्रथम च्यवनप्राशचा आनंद घ्यावा व मग तास अध्र्या तासाने नाश्ता करावा. चहा, कॉफी किंवा कोको अशा पेयांची ज्यांना सवय आहे त्यांनी ती पेये नाष्टय़ानंतर लगेचच घेऊ नयेत. नाही तर एकावर एक खाद्यपदार्थ व पेयांच्या माऱ्याने दुपारचे जेवण नकोसे होते. ज्यांना सकाळी फलाहार करावासा वाटतो त्यांनी सफरचंद, मोसंबी, चिकू, पपई, डाळिंब अशांचा आस्वाद जरूर घ्यावा. फलाहार सकाळी करणाऱ्यांनी नाश्त्याचे इतर पदार्थ शक्यतो अवश्य टाळावेत. आपल्या चहा, कॉफीमध्ये नेहमीच्या साखरेऐवजी आयुर्वेदीय शतावरीकल्प त्याच प्रमाणात वापरला तर तुमच्या स्नायूंना एक विशेष टिकाऊ बल मिळते. शतावरी ही वनस्पती आपल्या स्नायूंना बल देते, लवचीक करते. म्हणूनच तिला ‘शतवीर्या किंवा सहस्रवीर्या’ असे सार्थ नाव मिळालेले आहे. ओव्हल्टीन, बोर्नव्हिटा या बाजारू टॉनिकांपेक्षा शतावरी कल्प केव्हाही चांगला!
ज्यांना च्यवनप्राश किंवा सकाळच्या व्यायामानंतर खूप महागडी टॉनिक घेणे परवडत नाही, त्यांनी पुढील प्रकारे अल्पमोली, बहुगुणी शतावरी लापशीचा अवश्य प्रयोग करावा. एक चमचा शतावरी चूर्ण, एक चमचा तुपावर भाजावे, चवीपुरती साखर, एक ग्लास दुधात मिसळावी. ते दूध व भाजलेले शतावरी चूर्ण एकत्र मिसळून शतावरी लापशी करावी. दूध पचनाबद्दल धास्ती वाटत असल्यास, आवश्यकतेनुसार सुंठ चूर्ण मिसळावे.
ऑक्टोबर महिना हा पुढील तीन-चार महिन्यांचा, शरीर कमवायच्या कालांचा पहिला महिना आहे हे समजून दुपारचे जेवण व्यवस्थित जेवावे. मागे-पुढे पाहू नये. आपण भात, पोळी, भाकरी यांची निवड आपल्या आवडीनुसार जरूर करावी. या काळात सुदैवाने सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या ताज्या ताज्या मिळतात. बटाटा, कांदा अशा नेहमीच्या भाज्यांपेक्षा अनेकानेक भाज्या बाजारात मिळतात. या भाज्या पचाव्या म्हणून योग्य ती लोणची, चटणी, कोशिंबिरी, रायती यांचा सहारा घ्यावा.
ऑक्टोबर महिन्यात दुपारी पुरेसे जेवण जेवले असले तरी दुपारी चार-पाच वाजता पुन्हा भूक लागू शकते. ती भागविण्याकरिता आपल्या आवडी-निवडी वा सवडीप्रमाणे बशी-अर्धी बशी उपमा, खूप तिखट-मीठ नसलेले फोडणीचे पोहे किंवा झटपट मिनिटा-दोन मिनिटांत होणारे दहीपोहे किंवा अगोदरच घरी करून ठेवलेल्या बटाटय़ाचा चिवडा यांचा आस्वाद घ्यावा. ज्यांना रात्रौ खूप उशिरा जेवणाची सवय आहे त्यांनी असे दुपारचे थोडेसे खाणे जरूर खावे. पण खूप स्थूल, हृद्रोगी, मधुमेही किंवा चरबी खूप असलेल्या व्यक्तींनी दुपारची भूक थोडी मारावी. चहा, कॉफी वा कोकोचा आसरा घ्यावा. सत्तर-पंचाहत्तरीच्या पुढच्या व्यक्तींनी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपले अल्पस्वल्प भोजन करावे. दिवसेंदिवस खूप खाऊन-पिऊन, आपले पोट वाढवून, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढवून आपल्या तब्येतीचे खोबरे केलेले अनेकानेक रुग्णमित्र, डॉक्टर-वैद्यांची दर आठवडय़ाला जवळीक करत असतात. अशांनी ऑक्टोबर महिन्यात जरूर सावध राहायला हवे. त्यांनी ‘रात्री जो उशिरा जेवेल, तो जरूर भोगेल,’ हे शास्त्रवचन लक्षात ठेवावे.
वर सांगितलेल्या अपवादात्मक, अतिस्थूल व्यक्ती सोडून बाकीच्यांनी या चांगल्या ऋतूत रात्रौ ‘शांतपणे’ व्यवस्थित जेवावे. अलीकडे बहुतेक मंडळी आपल्या दूरदर्शन संचासमोर कार्यक्रम पाहात पाहात, विविध चॅनेल्सवरील तथाकथित रंजक कार्यक्रम बघत, जेवततात. काहीजण सकाळी आलेली विविध वर्तमानपत्रे रात्रौ जेवताना वाचतात. हे सर्व टाळून आपण रात्रौ शांतपणे नीट जेवलो, तरच ते जेवण आपल्या अंगी लागते. रात्रौच्या जेवणानंतर लगेचच निद्राधीन न होता किमान अर्धा तास मोकळ्या हवेत फिरून यावे, व झोपावे.
लवकर झोपे, लवकर उठे।
त्याला आरोग्य संपत्ति भेटे॥

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health awareness months october
Show comments