जुलै महिन्यात पावसाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे या महिन्यात पाणी उकळून पिणं आवश्यक असतं. अन्यथा पोटाच्या विकारांना सामोरं जायची वेळ येते.
जूनच्या तुलनेत जुलै महिना हा मोसमी पावसाच्या दृष्टीने खूपखूप विश्वासार्ह महिना समजला जातो. जून महिन्यातील पावसाबद्दल आपली केंद्रीय व स्थानिक वेधशाळा विविध अंदाज बांधत असते. पण जून महिन्यात सुरू झालेला पाऊस कमी-अधिक भरवशाचा असतो. पण जुलैमध्ये तो खात्री दिल्याप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे पुरेसा पडून तुम्हा-आम्हाला मोठाच दिलासा देत असतो. अशा या मोसमी पावसाने वेळेवर पडून शेतकरी बांधवांना पुरेसा दिलासा दिला तर ती मंडळी मे व जूनमधील शेतीविषयक कमी-अधिक कष्टाची कामे उरकून ९ जुलैच्या आषाढी एकादशीनिमित्त सुरू होणाऱ्या वारीकरिता सुसज्ज होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, उकडलेल्या बटाटय़ांची भाजी, तांबडय़ा भोपळय़ाचे भरीत, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, केळय़ांचे शिकरण, शिंगाडय़ाच्या पिठाचा शिरा, रताळय़ाच्या फोडी अशा अनेकानेक रुचकर पदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी आपणाला मिळते.
‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ असे मेघदूत काव्यात कवी कुलगुरू कालिदासांनी वर्णन केलेला आषाढ महिना जूनच्या शेवटा-शेवटास येऊन गेला. त्यानिमित्ताने तुम्ही आम्ही आकाशातील मेघांच्या पुरेपूर बरसातीकडे जुलै महिन्यात खूप खूप लक्ष देऊन असतो. आम्ही भिजलो तरी चालेल पण ‘तू बरसत ये, बरसत ये!’ अशी मेघराजाची आळवणी ११ जुलैच्या विश्वजनसंख्या दिनानिमित्त करूया! प्रत्येकाला दोन वेळचे जेवण व पिण्याकरिता पाणी व चोवीस तास मोकळी हवा मिळण्याकरिता मेघराजाची, वरुणराजाची कृपा हवीच. ११ जुलै दिवशी साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात होत असते. त्याची सांगता १३ जुलै रोजी होणार आहे. विसाव्या शतकाच्या मध्य काळात महाराष्ट्रात थोर संत, अभ्यासक व स्वचारित्र्याने मार्गदर्शक असे प्राचार्य मामा दांडेकर, पंढरीचे वारकरी होऊन गेले. त्यांची पुण्यतिथी ११ जुलै रोजी आहे. ‘गुरुब्र्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरू साक्षात महेश्वर:!’ असा अतिमंगलकारक परम आदरणीय दिवस १२ जुलै या दिवशी येत आहे. त्याच दिवशी संन्यासी जणांचा चातुर्मास प्रारंभ होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांकरिता आपल्या प्राणांची बाजी लावून अनेकानेक मावळय़ांनी ‘हिंदवी’ साम्राज्य स्थापनेकरिता अभूतपूर्व योगदान दिले. अशा एका योद्धय़ाचा १३ जुलै, बाजीप्रभू देशपांडे यांचा पुण्यतिथी दिवस आहे. १५ जुलै अंगारकी चतुर्थी आहे. अल्पशिक्षित दलित समाजाला जागे करून संघटित करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचे तरुणपणी समर्थपणे केले. १८ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी मानाची बिरुदावली असणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी २३ जुलै रोजी येत आहे. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघी झाली माझी पंढरी’ अशी शेतमळय़ात दैनंदिन काम करताना अभंग रचना करणाऱ्या संत सावतामाळींची पुण्यतिथी या वर्षी २५ जुलै रोजी येत आहे. भारतातील अल्पसंख्य वर्गातील मोठय़ा समाजाची मुस्लीम समाजाची रमजान ईद २९ जुलैला सुरू होत आहे. आताच्या एकविसाव्या शतकातील तरुण पिढीला ‘नाना शंकरशेट’ या व्यक्तिमत्त्वाची काहीच माहिती दिली जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या थोर शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या कार्याचे स्मरण ३१ जुलैच्या पुण्यतिथी निमित्ताने करूया.
या वर्षीचा जुलै महिना व जवळपास संपूर्ण आषाढ महिना यांच्यावर, वर्षां ऋ तूतल्या अत्यंत रूक्ष हवामानाचा खूप खूप परिणाम असणार आहे. एकीकडे तुलनेने चांगला पाऊस पडला तर हवेत गारठा असतो. जुलै महिन्यात विसर्गकालाला सुरुवात होत असते. यापुढे येणारा काळ हा ‘तबियत’ कमाविण्याचा काळ असतो. असे असले तरी नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे नद्या, नाले, ओढे हे पडून गेलेल्या पावसाच्या गढूळ माती, धूळमिश्रित पाण्याने भरभरून ओसंडून वाहत असतात. अशा पाण्याला ‘आम्लविपाकी’ पाणी अशी शास्त्रीय संज्ञा आहे. असे पाणी पचायला जड व अनेकानेक रोगांना, विशेषत: पोटाच्या रोगांना आमंत्रण देणारे असते. एकीकडे हवेतील बाष्पामुळे व आकाशातील ढग खाली आल्यामुळे तुम्हा-आम्हाला मिळणाऱ्या प्राणवायूचे, मोकळय़ा हवेचे प्रमाण कमी झालेले असते. वायू हा दोष आपल्या शरीरावर व वातावरणात सर्वत्र प्रभुत्व गाजवत असतो. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बहुसंख्य मंडळींचा जाठराग्नी मंद झालेला असतो. आम्लविपाकी पाणी, मंद जाठराग्नी, भरून आलेले आभाळ या सगळय़ांच्या एकत्रित परिणामामुळे; तुम्ही आम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीत कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. क्रमांक एकची प्राथमिक सुरक्षितता, आपण पीत असलेल्या पाण्याबद्दल अत्यावश्यक आहे. नवीन सुधारलेल्या अतिसुशिक्षित व गल्लावाल्या जगात विविध बाटल्यातून विकले जाणारे पाणी, खूप खूप सुरक्षित किंवा ‘सेफ’ पाणी समजले जाते. परंतु वाचक मित्रहो, जगात सर्वात सुरक्षित आरोग्यदायी व अनेकानेक पोटाच्या विकारांना दूर ठेवणारे पाणी म्हणजे ‘उकळलेले पाणी’! पुणे, मुंबईसारखे सर्वच ठिकाणी क्लोरिनमुळे शुद्ध केलेले पाणी, सार्वजनिक पाणी वितरण यंत्रणेमार्फत मिळत नाही. या काळातील नद्या, नाले, ओढे यांचे पाणी जरी गाळून घेतले तरी ते पुरेसे आरोग्यदायी नाही.
या वर्षां ऋतूच्या प्रारंभीच्या काळात, जुलै महिन्यात, तुम्ही आम्ही पाणी न उकळता प्यायलो तर साध्या-सुध्या जेवणामुळेसुद्धा जुलाब, अतिसार, पोट बिघडणे, वारंवार शौचास जावयास लागणे, तोंडाची चव जाणे या विकारांना सामोरे जावे लागते. आपल्या आहारात, जरा जरी इकडे तिकडे खाणेपिणे झाले तरी पोट लगेच बिघडते. गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, खवा असणारे पेढा, बर्फी व अन्य मिठाई पदार्थ, तसेच मांसाहार, पावबिस्कीट व शंकास्पद जेवणामुळे, खूप खूप पश्चात्तापाची पाळी येऊ शकते. त्याकरिता पाणी उकळूनच प्यावे. असे उकळलेले पाणी सहा तासापुरतेच वापरात असावे. याचाच अर्थ दिवसभरात आपण जे पाणी पिणार आहोत ते तीन वेळा उकळलेले असावे.
जुलै महिन्यात रणरणते ऊन नसले तरी दिवसेंदिवस लहानमोठय़ा शहरात उकाडय़ाचे प्रमाण सर्वत्र वाढत्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अकाली थकवा येणे, छाती-पोटात जळजळ होणे, पायांची आग होणे अशा काही समस्यांना कमी-अधिक प्रमाणात सर्वानाच तोंड द्यावे लागते. वर सांगितलेल्या चुकीच्या खाण्यापिण्याने विशेषत: सार्वजनिक मोठमोठय़ा समारंभात खाल्ले- प्यायलेले अन्न त्रास देऊ शकते. शरीरातून खूप घाम निघून गेला असल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशी समस्या येऊ नये म्हणून आपल्या पाण्यामध्ये एका ग्लासला पाव चमचा या हिशेबात सुंठचूर्ण मिसळावे.
‘शुण्ठय़ां वातं शमयेद् गुडुचि!’ असे शास्त्रवचन आहे. आपण जे दुपारी वा रात्री कमी अधिक जेवत असतो ते आपल्या आमाशयात किमान चार तास पडून राहते. ते अन्न संयमित प्रमाणात घेतले तर पश्चात्ताप करावा लागत नाही. पण काही वेळा नाइलाजाने बाहेरचे जेवण, हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थ, शंकास्पद शिळे अन्न खावे लागत असेल तर ‘सुंठमाईला’ जवळ करूया! अलीकडे सर्वत्र शहाळी मुबलक व तुलनेने कमी किमतीत मिळतात. चहा, कॉफी अशी पेय घेण्यापेक्षा नारळपाणी, घरी केलेले ताजे लिंबूसरबत किंवा कैरीचे पन्हे, खात्रीचे कोकम सरबत अशांची मदत सकाळी आठ-नऊ वाजता ऑफिसला जाण्याअगोदर किंवा सायंकाळी पाच वाजता जरूर घ्यावी. त्यामुळे तोंडाची अन्नाची चव टिकून राहते. जुलै महिन्यात न्याहरी अजिबात चुकवू नये. वर सांगितलेले पातळ पदार्थ व त्याबरोबर पातळ सुकी चपाती किंवा व्यवस्थित रवा भाजून केलेला उपमा, उपीट अशी न्याहरी चांगली.
दुपारच्या जेवणाच्या वेळी भूक मारू नये, पण त्याचबरोबर खूप जडान्न खाऊ नये हे सांगावयास नकोच. यापूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणेच पुदिना, आले, लसूण, कोथिंबीर, लसणीची पात, फार आंबट नसलेली कैरी अशांची चटणी जेवणासोबत घेतल्यास भोजनाचा स्वाद नक्कीच वाढतो. या काळात तुम्हा-आम्हाला हिरवीगार सॅलडची पाने खुणावत असतात. अशी पाने स्वच्छ धुऊन घ्यायला हवीत हे सांगावयास नकोच. विशेषत: नोकरदार मंडळींनी गहू, भाताचा वापर दुपारच्या जेवणात थोडा कमी करून सॅलड किंवा वर सांगितलेल्या चटण्या कोशिंबिरीवर जास्त भर द्यावा. या पावसाळय़ाच्या काळात तऱ्हेतऱ्हेच्या वाल, पापडी, बीन्स, श्रावणघेवडा मुबलक प्रमाणात सर्वच मंडीबाजारात मिळतात. कमी बियांची काटेरी वांगी, दुधी भोपळा, पडवळ या भाज्या मुबलक प्रमाणात व तुलनेने स्वस्तात मिळतात. त्यांचाही वापर करावा.
काहींना दुपारी पाच-साडेपाच सहाच्या सुमारास पोट खाली होऊन संध्याकाळची न्याहरी म्हणून खायला मोह होतो. अशा वेळी राजगिरा किंवा भाताच्या, ज्वारीच्या लाह्य़ा, सॅलड, लिंबू सरबत, घरचे खात्रीचे ताक असे पदार्थ घेऊन पाहावे. या वेळेस संयम पाळला तर रात्रीचे जेवण व्यवस्थित जेवता येते. रात्रीचे जेवण जेवताना थोडे अधिक अन्न खाल्ले तरी फार बिघडत नाही. याकरिता दुपारप्रमाणेच भाज्या व तोंडीलावणी व्यवस्थित असावी. दुपारच्या जेवणात गव्हाची पोळी खाल्ली असेल तर रात्रौच्या जेवणात ‘चेंज’ म्हणून ज्वारीची पातळ भाकरी किंवा ज्वारी बाजरी मिक्स भाकरीचा सहारा घ्यावा. काहींना रात्रौ उशिरा दूध पिऊन झोपायची सवय असते. जी मंडळी कृश आहेत, ज्यांना जडान्न चालत नाही व कपभर किंवा ग्लासभर दुधाने पोट बिघडत नाही अशांनी रात्रौ दूध जरूर घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार सुंठ, साखर, वेलची किंवा शतावरी कल्प, चमचा दोन चमचे मिसळला तर झोप शांत लागतेच व सकाळी नवीन उत्साहात, नव्या दिवसाचा सामना करावयास आपण सिद्ध होतो. मात्र हे दूध जेवणानंतर लगेच न पिता, रात्रौ ‘द्विसहस्रपावली’ म्हणजे किमान पंधरा-वीस मिनिटे फिरून आल्यावर दूध घ्यावे. रात्रौ चहा, कॉफीचे सेवन अजिबात करू नये.
जुलै महिन्यात बहुधा आंब्याचा हंगाम संपत आलेला असतो. हापूस, पायरी हे जून महिन्यातच गायब झालेले असतात. तरीपण नीलम, तोतापुरी, लंगडा, दशेरी असे आंबे मुबलक प्रमाणात मिळत असतात. करवंदे, जांभळे यांचा सीझन संपलेला असला तरी फणसाचे गरे, खरबूज, पांढरे जांब, ताडगोळे, पपई व वर्षभर मिळणाऱ्या सफरचंदासारख्या फळांचा आस्वाद अवश्य घ्यावा. माझे वडील नेहमी एक मोलाचा सल्ला आपल्या रुग्ण मित्रांना देत. त्यांचा सांगावा फारच मोलाचा व आजच्या खूप खूप फास्ट असणाऱ्या जीवनशैलीतही उपयोगी पडणारा आहे. ‘सकाळी लवकर उठा, पुरेसा व्यायाम करा, दूध प्या, चहा-कॉफी अजिबात पिऊ नका. कपडय़ांवर वा छानछौकीवर पैसे खर्च करण्यापेक्षा भरपूर फळे खा. ती तुम्हा आम्हाला टिकावू स्वरूपाचे, ‘फायटिंग-फायटिंग’ बल देतात. काही मंडळी गुलकंद, सब्जा किंवा तुळशीच्या बियांचे सरबत यांचा आस्वाद घेऊ इच्छितात. त्यात वावगे काहीच नाही. बाजारातील गुलकंद घेण्यापेक्षा, ताज्या गुलाबाच्या पाकळय़ांचा किंचित साखर टाकून, मिक्सरच्या मदतीने इन्स्टंट गुलकंद तयार करावा आणि खावा!