आपला देश ऋतूंचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात सहा ऋतूनुसार बदल होत असतो. मराठी तिथीनुसार हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद हे ऋतू इंग्रजी महिन्यांच्या दोन-दोन महिन्यांमध्ये विभागून येत असतात. त्यापैकी ‘एप्रिल व मे’ महिन्यात ‘ग्रीष्म’ असतो. याच वेळी मराठी महिन्याची ‘ज्येष्ठ व आषाढ’ कालक्रमणा सुरू असते.
‘ग्रीष्म’ नावाप्रमाणे अतिशय उष्ण असतो. या ऋतूत रात्र छोटी व दिवस मोठा असतो. वायूची रूक्षता वाढलेली असते. वातावरणातही अतिशय उष्णता आणि रूक्षता यामुळे मनुष्य दुर्बल होतो. पचनशक्ती कमजोर झालेली असते. शरीरातला जलीय अंश कमी होतो. लोक अधिक उकाडय़ाने त्रासून जातात. अगदी दुपारी लोकांना घरातून निघणेही अशक्य होतं म्हणून या ऋतूत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.
विदर्भात उन्हाचा अधिक त्रास होतो. त्यामुळे तेथील लोकांना अधिक काळजी घ्यावी लागते. त्याकरिता आहारात बदल करायला पाहिजे आणि काही पथ्ये पाळायला हवीत म्हणजे उष्णतेचा त्रास होणार नाही.
ग्रीष्मातील योग्य आहार – गोड, आंबट पदार्थ आहारात घ्यावे, दूध, तूप, साखर यांचा अधिक वापर करावा. द्रव पदार्थ जेवणात घ्यावे. आंब्याचा रस पातळ स्वरूपातच घ्यावा. जास्त घट्ट असू नये. दिवसभरात लिंबू सरबत, ताक, गोड ताक, पन्हे यापैकी एकाचा वापर करावा. सगळे एकावेळी घेऊ नये, रोज बदल करावा.
स्निग्ध पदार्थामध्ये गाईचे तूप दुधातून घ्यावे. अक्रोड व बदाम बी यामध्ये भरपूर स्निग्धता असते. त्या खाव्यात. रोज २, ३ बिया खाव्यात. थंड, शीतल पदार्थामध्ये मनुक्यांचा आस्वाद घ्यावा. थंड मातीच्या माठातले पाणी प्यावे. अधिक रसरसीत पाणीदार फळे खाण्यासाठी घ्यावी. यामध्ये टरबूज, खरबूज, कलिंगड, नारळाचे पाणी प्यावे. ही फळे ग्रीष्म ऋतूतील उन्हाचा त्रास कमी करतात.
ग्रीष्मातील योग्य विहार – उन्हापासून स्वत:चा बचाव करावा. उन्हात बाहेर पडू नये. पडायचेच असल्यास सुती कापडाचे रुमाल डोके, कान, कपाळ झाकतील अशा रीतीने बांधावे. उन्हाळी कोटचा वापर करावा. डोळय़ांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चांगल्या कंपनीचे गॉगल्स वापरावे. रात्री झोपते वेळी थोडा वेळ डोळय़ावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.
घर थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. कुलरचा सौम्य वापर करावा. पूर्वी गुढीपाडव्याला पळसाच्या हिरव्या फांद्यांचा मंडप अंगणात टाकायचे आता ग्रीन कापड (उष्णता कमी करणारे) मिळायला लागले आहे. त्याचा अंगणात किंवा खिडक्या व गॅलरीजमध्ये पडद्यासारखा वापर करावा ज्यामुळे घर बऱ्याच प्रमाणात थंड राहते व ग्रीष्म ऋतू लहान मुलांकरिता सुसह्य़ होऊ शकतो. चंदनाचा टिळा लहान मुलांना लावून द्यावा. सुगंधी थंड फुलांचे गजरे वापरावेत. देवघर सुगंधी थंड फुलांनी सजवावे ज्यामुळे घरात थंड व सुगंधी वातावरण निर्माण होते व मन प्रसन्न होऊन आल्हाददायक वाटते. सायंकाळी बागेत फिरायला जावे व अनवाणी पायांने हिरवळीवर फिरावे. शक्य असल्यास अंगणात किंवा टेरेसवर झोपावे. चांदण्यांचा आनंद घ्यावा. लहान मुलांना चांदणं मोजताना खूप मजा वाटते व शांत झोप लागते.
ग्रीष्मामध्ये शक्यतोवर सुती कपडे परिधान करावे. अशा रीतीने स्वत:ला उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राखता येते.

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader