मृत्यूच्या अंतिम सत्याची रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना जाणीव करून देणे आणि शारीरिक त्रासातून रुग्णाची सुटका करण्यासाठी अर्थात वेदनारहित मृत्यूसाठी प्रयत्न करणे म्हणजेच पॅलिएटिव्ह केअर. अलीकडे ही संकल्पना वेगाने मान्यता पावली आहे.
आयुष्य सुंदर आहे आणि मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे. आणि तरीही प्रत्येकाला मृत्यूची चाहूल कळते आणि मानवतेच असे नाही. वृद्धापकाळात या सत्याची हळूहळू जाणीव होऊ लागते आणि ते स्वीकारण्यासाठी नकळत का होईना, मन तयार होऊ लागते. मात्र याच गतीने, क्रमाने शांतपणे मृत्यू येईल, याचीही शाश्वती नाही. किंबहुना वैद्यकीय ज्ञानामुळे आयुर्मान वाढले असले तरी अधिकाधिक लोक व्याधिग्रस्तही आहे. याशिवाय तरुण वयात किंवा बालवयातच दुर्धर आजार झालेल्यांचा तर मानसिक पातळीवरही प्रचंड गोंधळ उडतो. कितीही अद्ययावत उपचार केले तरी अंतिम सत्य दूर नाही, याची रुग्ण व नातेवाईकांना जाणीव करून देणे आणि त्यासाठी त्यांची मानसिक तयारी करणे व यादरम्यान शारीरिक त्रासापासून रुग्णाची सुटका करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. ही कल्पना जुनी असली तरी गेल्या दहा वर्षांत संपूर्ण जगात वेगाने मान्यता पावली आहे.
पॅलिएटिव्ह हा शब्द लॅटिन पॅलिर या शब्दावरून आला आहे. याचा शब्दश: अर्थ म्हणजे आच्छादणे. वेदना कमी करणारी औषधे व समुपदेशन यांचा एकत्रित वापर करून रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांसाठी आधार देण्याचे कार्य पॅलिएटिव्ह या पूरक सेवा देणाऱ्या संकल्पनेत अंतर्भूत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पॅलिएटिव्ह केअरची केलेली व्याख्याही याच प्रकारची आहे. आजाराचे लवकर निदान आणि त्याची व्यापकता यांचा अंदाज घेऊन वेदना, शारीरिक-मानसिक समस्या तसेच आध्यात्मिक पातळीवरील गुंता सोडवण्यास मदत करून दुर्धर आजाराशी सामना करणारे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे पॅलिएटिव्ह केअरमध्ये अपेक्षित आहे. आजारावर उपाय करणे शक्य नसले तरी वेदना तसेच ताण वाढवणारी लक्षणे कमी करणे, आयुष्याचा आनंद घेतानाच मृत्यू ही सामान्य प्रक्रिया असल्याची जाणीव देणे, मृत्यूला लवकर कवटाळणे किंवा दूर लोटण्याची मानसिकता होऊ न देणे, रुग्णसेवेत मानसिक शांतता व अध्यात्माचीही जोड देणे, अखेरच्या श्वासापर्यंत रुग्णाला जास्तीत जास्त क्रियाशील ठेवता येण्याजोगी मदत पुरवणे, रुग्णांच्या आजारपणाशी सामना करण्यासाठी तसेच स्वत:चे दु:ख कमी करण्यासाठी कुटुंबीयांना मदत करणे, त्यासाठी आवश्यक असल्यास समुपदेशनाचा आधार घेणे, आजारातील व एकंदरच जीवनमान उंचावणे यासाठी प्रयत्न करता येतात. दुर्धर आजाराचे निदान झाल्यास सुरुवातीपासूनच, आयुष्यभर घ्याव्या लागणाऱ्या इतर उपचारांच्या सोबतीने ही काळजी घेता येते.
दुर्धर आजारांनी वेढलेल्या रुग्णांचा आयुष्याच्या अखेरच्या वाटेवरचा प्रवास कमी वेदनादायी करण्यासाठी मुंबईतील बहुतांश मोठय़ा रुग्णालयांनी आता ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. टाटा स्मारक रुग्णालयातही कर्करोगग्रस्तांना ही सेवा पुरवली जाते. याशिवाय दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या, काळजी घेण्यासाठी कोणीही नसलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या अखेरच्या प्रवासात साथ देण्यासाठी काही संस्था विनामूल्य काम करत आहेत. वांद्रे येथील शांती अवेदना आश्रम, तसेच बदलापूर येथील अमृतकृपासागर शुश्रूषालयात अशा रुग्णांची काळजी वाहिली जाते. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही कर्करोग असलेल्यांना सर्व प्रकारची सेवा पुरवणारी संस्था असून त्यांच्याकडूनही पॅलिएटिव्ह केअर विभाग सांभाळला जातो. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना समुपदेशन करून वेदना कमी करणारी औषधे देण्यासाठी संबंधित डॉक्टरांकडे पाठवले जाते.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असले आणि ते रुग्णांना दिलासा देण्याचेही काम करत असले तरी आजच्या सुपरस्पेशालिटीच्या जगात त्यांच्याकडून सर्व अपेक्षा करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना कल्पना देऊन, त्यांच्या वेदना कमी करणे व भविष्यकाळाला सामोरे जाण्यासाठी मानसिक बळ देण्याची पूरक सेवा करण्यासाठी डॉक्टर, नर्स, समुपदेशक, आहारतज्ज्ञ यांचा पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये सहभाग असतो. काही वेळा आजार दुर्धर नसला तरी गंभीर आजार व गुंतागुंतीचे -दीर्घ काळ चालणारे उपचार यांतही पॅलिएटिव्ह केअर घेतली जाते.
पॅलिएटिव्ह केअर ही संकल्पना बहुतांशरीत्या कर्करोगाशी जोडली गेली आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन अशा उपचारांच्या कधीही न संपणाऱ्या चक्रातून जात असताना रुग्ण व त्यांचे कुटुंबीय कमालीचे खंगतात. आजाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांना शरीरासोबत मानसिक आवर्तनांनाही तोंड द्यावे लागते. यात रुग्णांसोबत घरातील माणसेही ओढली जातात. या आजार व उपचारातील गुंतागुंतीमध्ये आधार देण्यासाठी पूरक व्यवस्था मान्यता पावली. मात्र आता केवळ कर्करोगच नव्हे तर जिवाला धोका निर्माण करणाऱ्या, आयुष्यभर जडलेल्या आजारांसाठीही वैद्यकशास्त्रातील या कल्पनेला पाठिंबा मिळत आहे. क्षयरोग, हृदयविकार, शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडविकार अशा आजारांसाठीही पॅलिएटिव्ह केअर अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. या काळात रुग्णाला घरात मन:शांती मिळणेही आवश्यक असते. नियमित कामांमध्ये दीर्घकाळ झालेल्या बदलांमुळे घरातील वातावरणही निराशादायी झालेले असते. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनाही समुपदेशन करून रुग्णांच्या शारीरिक व मानसिक वेदना कमी केल्या जातात.
पॅलिएटिव्ह केअरसोबत आता हॉस्पिक केअरबाबतही जागृती होत आहे. पॅलिएटिव्ह ही संकल्पना दीर्घकालीन उपचार आवश्यक असलेल्या तसेच दुर्धर आजारांबाबत असून हॉस्पिक ही संकल्पना सहा महिन्यांपेक्षाही कमी आयुष्य राहिलेल्या रुग्णांशी निगडित आहे. ती पॅलिएटिव्ह केअरचाच भाग असू शकते. अर्थात पॅलिएटिव्ह केअर स्वीकारणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे असा अर्थ होत नाही तर आजारातून बाहेर पडण्यासाठी आणखी एक उपचारपद्धती म्हणून त्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. मुख्य म्हणजे पॅलिएटिव्ह केअर सुरू केली की नियमित उपचार थांबवले जात नाहीत. तर त्या औषधांच्या सोबतीनेच हे उपचार केले जातात. मृत्यूकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता आयुष्याप्रमाणेच शेवटचा प्रवास शांतचित्ताने करण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड देऊन शारीरिक व मानसिक उपचार म्हणजेच पॅलिएटिव्ह केअर.
पॅलिएटिव्ह केअर सेवा देणाऱ्या संस्था
शांती अवेदना आश्रम
माऊंट मेरी रोड, वांद्रे पूर्व, मुंबई – ४०००५०
०२२-२६४२७४६४
अमृतकृपासागर शुश्रूषालय
वालिवली गाव, मांजर्ली रोड, बदलापूर, ठाणे<br />९५२५१६९११३८
सिप्ला कॅन्सर परिहार सेवा केंद्र
सिप्ला पेशंट केअर ट्रेनिंग प्रोजेक्ट
वारजे, पॉप्युलर नगरसमोर,
मुंबई-बंगलोर महामार्गानजीक,
पुणे – ४११०२९
९५२०२५२३११३१
कॅन्सर पेशंट एड असोसिएशन
किंग जॉर्ज मेमोरियल, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी
मुंबई – ४०००११
०२२- २४९२४०००